उत्पत्ती
२२ यानंतर खऱ्या देवाने अब्राहामची परीक्षा घेतली.+ तो त्याला म्हणाला: “अब्राहाम!” तेव्हा त्याने उत्तर दिलं: “मी इथे आहे!” २ देव त्याला म्हणाला: “कृपा करून तुझ्या एकुलत्या एका मुलाला, ज्याच्यावर तुझं इतकं प्रेम आहे,+ त्या इसहाकला+ घेऊन मोरिया+ देशात जा. तिथे मी सांगेन त्या डोंगरावर त्याचं होमार्पण कर.”
३ म्हणून अब्राहामने पहाटे उठून गाढवावर खोगीर घातलं आणि दोन सेवकांना आणि आपला मुलगा इसहाक याला आपल्यासोबत घेतलं. त्याने होमार्पणासाठी लाकूड तोडलं आणि मग तो खऱ्या देवाने सांगितलेल्या ठिकाणी जायला निघाला. ४ तिसऱ्या दिवशी, अब्राहामने समोर पाहिलं तेव्हा त्याला दुरून ते ठिकाण दिसलं. ५ तेव्हा अब्राहाम आपल्या सेवकांना म्हणाला: “तुम्ही इथेच गाढवाजवळ थांबा. मी आणि इसहाक तिकडे जाऊन देवाची उपासना करून परत येतो.”
६ मग अब्राहामने होमार्पणाचं लाकूड घेतलं आणि इसहाकच्या पाठीवर ठेवलं. त्याने हातात आग आणि सुरा घेतला आणि ते दोघं चालत निघाले. ७ तेव्हा इसहाक अब्राहामला म्हणाला: “बाबा!” त्याने उत्तर दिलं: “बोल माझ्या बाळा!” इसहाक म्हणाला: “आपल्याजवळ आग आणि लाकडं तर आहेत, पण होमार्पणासाठी मेंढरू कुठे आहे?” ८ यावर अब्राहाम म्हणाला: “बाळा, होमार्पणासाठी मेंढरू+ देवच पुरवेल.” मग ते दोघं पुढे चालत गेले.
९ शेवटी, ते खऱ्या देवाने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले. अब्राहामने तिथे एक वेदी बांधून त्यावर लाकडं ठेवली. त्यानंतर त्याने आपला मुलगा इसहाक याचे हातपाय बांधून त्याला वेदीवरच्या लाकडांवर ठेवलं.+ १० मग अब्राहामने आपल्या मुलाला मारण्यासाठी सुरा उचलला,+ ११ तेवढ्यात यहोवाचा दूत त्याला आकाशातून हाक मारून म्हणाला: “अब्राहाम, अब्राहाम!” त्यावर तो म्हणाला: “मी इथे आहे!” १२ तेव्हा स्वर्गदूत म्हणाला: “त्या मुलाला मारू नकोस, त्याला काहीही करू नकोस. तू देवाला भिऊन वागणारा आहेस, हे आता मला कळलं आहे. कारण तू तुझ्या एकुलत्या एका मुलालाही, मला अर्पण करायला मागेपुढे पाहिलं नाहीस.”+ १३ मग अब्राहामने समोर पाहिलं, तेव्हा जवळच एका झुडपात त्याला एक मेंढा दिसला. त्याची शिंगं त्या झुडपात अडकली होती. अब्राहामने जाऊन तो मेंढा घेतला आणि आपल्या मुलाऐवजी त्याचं होमार्पण केलं. १४ अब्राहामने त्या ठिकाणाचं नाव यहोवा-यिरे* ठेवलं. म्हणून अजूनही असं म्हटलं जातं: “यहोवाच्या डोंगरावर ते पुरवलं जाईल.”+
१५ मग यहोवाच्या दूताने अब्राहामला दुसऱ्यांदा आकाशातून हाक मारली. १६ तो म्हणाला: “यहोवा म्हणतो: ‘मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो,+ की तू हे जे केलंस, म्हणजे आपल्या एकुलत्या एका मुलालाही मला अर्पण करायला मागेपुढे पाहिलं नाहीस,+ १७ म्हणून मी नक्की तुला आशीर्वाद देईन आणि तुझी संतती* आकाशातल्या ताऱ्यांसारखी आणि समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या वाळूच्या कणांसारखी वाढवीन.+ तुझी संतती* आपल्या शत्रूंच्या शहरांचा* ताबा घेईल.+ १८ आणि तुझ्या संततीमुळे*+ पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल,* कारण तू माझं ऐकलं आहेस.’”+
१९ त्यानंतर अब्राहाम आपल्या सेवकांकडे परत गेला आणि ते तिथून बैर-शेबाला+ आले. अब्राहाम पुढेही बैर-शेबामध्येच राहिला.
२० काही काळानंतर, अब्राहामला असं सांगण्यात आलं: “मिल्का हिलासुद्धा तुझा भाऊ नाहोर+ याच्यापासून मुलं झाली आहेत: २१ मोठ्याचं नाव ऊस, त्याचा भाऊ बूज, अरामचा पिता कमुवेल, २२ केसद, हजो, पिलदाश, यिदलाप आणि बथुवेल.”+ २३ बथुवेलला रिबका+ झाली. मिल्काला अब्राहामचा भाऊ नाहोर याच्यापासून झालेली ही आठ मुलं. २४ त्याची उपपत्नी रेऊमा हिला झालेल्या मुलांची नावं अशी: तेबाह, गहाम, तहश आणि माका.