उत्पत्ती
११ तेव्हा सबंध पृथ्वीवर एकच भाषा आणि एकच बोली होती. २ लोक पूर्वेकडे प्रवास करू लागले तेव्हा त्यांना शिनार प्रदेशात+ एक मैदान दिसलं आणि ते तिथे राहू लागले. ३ मग ते एकमेकांना म्हणाले: “चला! आपण विटा बनवू आणि त्या आगीत भाजू.” म्हणून त्यांनी दगडांऐवजी विटा वापरल्या आणि चुना म्हणून डांबर वापरलं. ४ ते म्हणाले: “चला! आपण आपल्यासाठी एक शहर आणि एक बुरूज बांधू. त्या बुरुजाचं शिखर आकाशापर्यंत जाईल आणि आपलं नाव मोठं होईल आणि सबंध पृथ्वीवर आपली पांगापांग होणार नाही.”*+
५ मग यहोवाने खाली जाऊन मानवांनी बांधलेलं शहर आणि बुरूज पाहिला. ६ तेव्हा यहोवा म्हणाला: “पाहा! हे सर्व लोक एक आहेत आणि त्यांची भाषाही एक आहे+ आणि त्यांनी हे काय करायला सुरुवात केली आहे! आता त्यांच्या मनात आलेली कोणतीही गोष्ट करणं त्यांना अशक्य होणार नाही. ७ म्हणून चला! आपण+ खाली जाऊन त्यांच्या भाषेत गोंधळ करू, म्हणजे त्यांना एकमेकांची भाषा कळणार नाही.” ८ मग यहोवाने सबंध पृथ्वीवर त्यांची पांगापांग केली+ आणि हळूहळू त्यांनी ते शहर बांधण्याचं सोडून दिलं. ९ म्हणूनच त्या शहराचं नाव बाबेल*+ पडलं, कारण तिथे यहोवाने पृथ्वीवरच्या सर्व लोकांच्या भाषेत गोंधळ केला आणि यहोवाने त्यांची सबंध पृथ्वीवर पांगापांग केली.
१० हा शेमचा+ वृत्तान्त आहे.
जलप्रलयाच्या दोन वर्षांनंतर, शेम १०० वर्षांचा असताना त्याला अर्पक्षद+ झाला. ११ अर्पक्षदच्या जन्मानंतर शेम ५०० वर्षं जगला आणि त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या.+
१२ अर्पक्षद ३५ वर्षांचा झाल्यावर त्याला शेलह+ झाला. १३ शेलहच्या जन्मानंतर अर्पक्षद ४०३ वर्षं जगला आणि त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या.
१४ शेलह ३० वर्षांचा झाल्यावर त्याला एबर+ झाला. १५ एबरच्या जन्मानंतर शेलह ४०३ वर्षं जगला आणि त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या.
१६ एबर ३४ वर्षांचा झाल्यावर त्याला पेलेग+ झाला. १७ पेलेगच्या जन्मानंतर एबर ४३० वर्षं जगला आणि त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या.
१८ पेलेग ३० वर्षांचा झाल्यावर त्याला रऊ+ झाला. १९ रऊच्या जन्मानंतर पेलेग २०९ वर्षं जगला आणि त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या.
२० रऊ ३२ वर्षांचा झाल्यावर त्याला सरुग झाला. २१ सरुगच्या जन्मानंतर रऊ २०७ वर्षं जगला आणि त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या.
२२ सरुग ३० वर्षांचा झाल्यावर त्याला नाहोर झाला. २३ नाहोरच्या जन्मानंतर सरुग २०० वर्षं जगला आणि त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या.
२४ नाहोर २९ वर्षांचा झाल्यावर त्याला तेरह+ झाला. २५ तेरहच्या जन्मानंतर नाहोर ११९ वर्षं जगला आणि त्याला आणखी मुलं आणि मुली झाल्या.
२६ तेरह ७० वर्षांचा झाल्यावर त्याला अब्राम,+ नाहोर+ आणि हारान ही मुलं झाली.
२७ हा तेरहचा वृत्तान्त आहे.
तेरहला अब्राम, नाहोर आणि हारान ही मुलं झाली; आणि हारानला लोट+ झाला. २८ हारानचा पिता तेरह जिवंत असतानाच, आपल्या जन्माच्या ठिकाणी म्हणजे खास्द्यांच्या+ ऊर+ देशात हारानचा मृत्यू झाला. २९ अब्राम आणि नाहोर यांची लग्नं झाली. अब्रामच्या बायकोचं नाव साराय+ आणि नाहोरच्या बायकोचं नाव मिल्का+ होतं. मिल्का ही हारानची मुलगी होती आणि त्याला मिल्का आणि इस्का या मुली होत्या. ३० साराय वांझ होती;+ तिला मूलबाळ नव्हतं.
३१ नंतर, तेरह आपला मुलगा अब्राम आणि आपला नातू लोट,+ जो हारानचा मुलगा होता, तसंच आपली सून साराय यांना घेऊन, खास्द्यांच्या ऊर देशातून कनान+ देशात जायला निघाला. मग ते हारानला+ पोहोचले आणि तिथे राहू लागले. ३२ तेरह २०५ वर्षं जगला आणि हारानमध्ये त्याचा मृत्यू झाला.