उत्पत्ती
१२ यहोवा अब्रामला म्हणाला: “तू आपला देश, आपले नातेवाईक आणि आपल्या वडिलांचं घर सोडून, मी दाखवीन त्या देशात जा.+ २ मी तुला आशीर्वाद देईन आणि तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र बनवीन. मी तुझं नाव मोठं करीन आणि तू इतरांसाठी आशीर्वाद ठरशील.+ ३ जे तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन, जे तुला शाप देतील त्यांना मी शाप देईन.+ आणि पृथ्वीवरच्या सगळ्या कुटुंबांना तुझ्यामुळे आशीर्वाद मिळेल.”*+
४ मग यहोवाने सांगितल्याप्रमाणे अब्राम तिथून निघाला आणि लोटही त्याच्यासोबत निघाला. अब्रामने हारान सोडलं+ तेव्हा तो ७५ वर्षांचा होता. ५ अब्राम आपली बायको साराय,+ आपल्या भावाचा मुलगा लोट,+ तसंच त्यांनी जमवलेली मालमत्ता+ आणि हारानमध्ये त्यांनी मिळवलेले दासदासी यांना घेऊन कनान देशात+ जायला निघाला. ते कनान देशात पोहोचले, ६ तेव्हा अब्राम त्या देशातून प्रवास करत शेखेम+ इथे पोहोचला. हे ठिकाण मोरेच्या मोठ्या झाडांजवळ+ होतं. त्या काळात कनानी लोक त्या देशात राहत होते. ७ मग यहोवा अब्रामसमोर प्रकट होऊन म्हणाला: “मी तुझ्या संततीला*+ हा देश देईन.”+ त्यानंतर अब्रामने त्या जागेवर यहोवासाठी एक वेदी बांधली. तिथेच तो अब्रामला प्रकट झाला होता. ८ नंतर तो तिथून बेथेलच्या+ पूर्वेकडे असलेल्या डोंगराळ भागात गेला. तिथे त्याने तंबू ठोकला. त्याच्या पश्चिमेकडे बेथेल, तर पूर्वेकडे आय+ नावाचं ठिकाण होतं. त्याने तिथे यहोवासाठी वेदी बांधली+ आणि तो यहोवाच्या नावाने प्रार्थना करू लागला.+ ९ काही काळानंतर अब्रामने तिथून तळ हलवला आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम करत नेगेबच्या+ दिशेने गेला.
१० त्या काळी देशात खूप मोठा दुष्काळ पडला+ म्हणून अब्राम काही काळासाठी* इजिप्तमध्ये* राहायला गेला.+ ११ इजिप्तच्या जवळ असताना अब्राम सारायला म्हणाला: “हे बघ, तू दिसायला खूप सुंदर आहेस.+ १२ पण जेव्हा इजिप्तचे लोक तुला पाहतील तेव्हा ते म्हणतील, ‘ही तर याची बायको आहे.’ म्हणून ते मला मारून टाकतील पण तुला जिवंत ठेवतील. १३ त्यामुळे त्यांना सांग, की तू माझी बहीण आहेस. म्हणजे ते माझ्याशी चांगलं वागतील आणि माझा जीव वाचेल.”+
१४ अब्राम इजिप्तमध्ये पोहोचताच तिथल्या लोकांनी पाहिलं, की साराय दिसायला खूप सुंदर आहे. १५ फारोच्या राजकुमारांनीही तिला पाहिलं आणि ते फारोजवळ तिची स्तुती करू लागले. तेव्हा तिला फारोच्या घरी नेण्यात आलं. १६ तिच्यामुळे फारो अब्रामशी चांगला वागला आणि त्याने अब्रामला मेंढरं, गुरंढोरं, गाढवं, उंट आणि दासदासी दिल्या.+ १७ मग यहोवाने सारायमुळे फारो आणि त्याच्या घराण्यावर मोठ्या पीडा आणल्या. १८ तेव्हा फारो अब्रामला बोलावून म्हणाला: “तू माझ्यासोबत असं का केलंस? ती तुझी बायको आहे ही गोष्ट तू मला का नाही सांगितलीस? १९ ‘ती माझी बहीण आहे’+ असं का बोललास? तुझ्या बायकोला घेऊन तू इथून निघून जा.” २० मग फारोने आपल्या सेवकांना आज्ञा दिली आणि त्यांनी अब्रामला आणि त्याच्या बायकोला पाठवून दिलं. अब्रामकडे जे काही होतं, त्यासोबत फारोने त्याला तिथून पाठवून दिलं.+