२ करिंथकर
२ तुमच्याकडे पुन्हा आल्यावर तुम्हाला दुःख द्यायचे नाही, असे मी ठरवले आहे. २ कारण जर मी तुम्हाला दुःखी केले, तर मला कोण आनंदित करेल? मला आनंद देणारे तुम्हीच तर आहात. ३ मी तुम्हाला जे काही लिहिले ते यासाठी लिहिले, की मी तिथे आल्यावर ज्यांच्याविषयी मला आनंद वाटायला पाहिजे, त्यांच्यामुळे मी दुःखी होऊ नये. कारण, मला खातरी आहे की ज्या गोष्टींमुळे मला आनंद होतो, त्या गोष्टींमुळे तुम्हा सर्वांनाही तितकाच आनंद होतो. ४ कारण मी खूप दुःखाने आणि मनःस्ताप सहन करून, अश्रू गाळत तुम्हाला पत्र लिहिले. तुम्हाला दुःख देण्याचा माझा हेतू नव्हता, तर माझे तुमच्यावर किती प्रेम आहे हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा होती.
५ आता, जर कोणी दुःख दिले आहे तर ते फक्त मलाच नाही, तर काही प्रमाणात तुम्हा सर्वांनाच दिले आहे—मला जास्त कठोर शब्दांत सांगण्याची इच्छा नाही. ६ त्या मनुष्याला बहुतेक जणांनी जे ताडन दिले आहे, ते पुरेसे आहे. ७ आता मात्र तुम्ही त्याला प्रेमळपणे क्षमा करून त्याचे सांत्वन केले पाहिजे, नाहीतर तो दुःखसागरात बुडून जाईल.* ८ म्हणून, तुम्ही त्याला आपल्या प्रेमाचे आश्वासन द्यावे असे मी तुम्हाला प्रोत्साहन देतो. ९ तुम्हाला पत्र लिहिण्याचे आणखी एक कारण म्हणजे, तुम्ही सर्व बाबतींत आज्ञाधारक असल्याचे दाखवून देणार की नाही हे मला पाहायचे होते. १० तुम्ही ज्या कोणाला क्षमा करता, त्याला मीसुद्धा क्षमा करतो. खरेतर, मी ज्या कोणाला क्षमा केली आहे, (जर मी कोणाला कशाविषयी क्षमा केली असेन, तर) ती ख्रिस्ताला साक्षी ठेवून तुमच्यासाठीच केली आहे; ११ यासाठी की, सैतानाने आपल्यावर विजय मिळवू नये,* कारण आपल्याला त्याचे डावपेच* माहीत नाहीत, असे नाही.
१२ आता, मी जेव्हा ख्रिस्ताबद्दलचा आनंदाचा संदेश घोषित करण्यासाठी त्रोवस इथे आलो आणि प्रभूच्या कार्यात माझ्यासाठी एक दार उघडण्यात आले, १३ तेव्हा माझा भाऊ तीत याची भेट न झाल्यामुळे माझा जीव कासावीस झाला. म्हणून, तिथल्या शिष्यांचा निरोप घेऊन मी मासेदोनियाला निघून गेलो.
१४ पण, देवाचे आभार मानतो की तो जणू एका विजयोत्सवाच्या मिरवणुकीत आम्हाला ख्रिस्ताच्या सोबतीने नेतो आणि त्याच्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध आमच्याद्वारे सगळीकडे पसरवतो! १५ कारण तारण होणाऱ्या* व नाश होणाऱ्यांमध्ये आम्ही देवाच्या नजरेत ख्रिस्ताविषयीच्या संदेशाचा मोहक सुगंध आहोत. १६ नाश होणाऱ्यांसाठी आम्ही मरण आणणारा मरणाचा गंध,* आणि तारण होणाऱ्यांसाठी जीवन देणारा जीवनाचा सुगंध आहोत. आणि अशा सेवेसाठी पुरेशी पात्रता कोणाजवळ आहे? १७ आमच्याजवळ आहे, कारण पुष्कळ मनुष्यांप्रमाणे आम्ही देवाच्या वचनाचे विक्रेते* नाही, तर देवाने पाठवल्याप्रमाणे आम्ही पूर्ण प्रामाणिकतेने बोलतो. हो, आम्ही देवाच्या समोर ख्रिस्ताच्या सोबतीने ही सेवा करतो.