योहान
१९ मग, पिलातने येशूला नेऊन त्याला फटके मारण्याची आज्ञा दिली. २ तेव्हा, शिपायांनी काट्यांचा एक मुकुट गुंफून त्याच्या डोक्यावर ठेवला आणि त्याला एक जांभळा झगा घातला. ३ मग ते वारंवार त्याच्याजवळ येऊन म्हणू लागले: “यहुद्यांच्या राजाचा जयजयकार असो!”* तसेच, ते त्याच्या तोंडावर मारू लागले. ४ तेव्हा, पिलात पुन्हा बाहेर जाऊन त्यांना म्हणाला: “पाहा! मला याच्यात काहीच दोष दिसत नाही, हे तुम्हाला कळावं म्हणून मी त्याला बाहेर आणतो.” ५ मग, काट्यांचा मुकुट आणि जांभळा झगा घातलेला येशू बाहेर आला तेव्हा पिलात त्यांना म्हणाला: “पाहा! हा माणूस!” ६ पण, त्याला पाहताच मुख्य याजक आणि रक्षक मोठ्याने ओरडून म्हणू लागले: “त्याला वधस्तंभावर* खिळा! त्याला वधस्तंभावर खिळा!”* तेव्हा, पिलात त्यांना म्हणाला: “तुम्हीच त्याला घेऊन जा आणि मृत्युदंड द्या,* कारण मला तरी त्याच्यात काहीच दोष आढळत नाही.” ७ यहुद्यांनी त्याला उत्तर दिले: “आमचा एक नियम आहे आणि त्या नियमानुसार याला मृत्युदंड झालाच पाहिजे, कारण मी देवाचा पुत्र आहे असे याने म्हटले.”
८ पिलातने हे ऐकले तेव्हा तो आणखीनच घाबरला, ९ आणि पुन्हा राज्यपालाच्या घरात जाऊन त्याने येशूला विचारले: “तू कुठला आहेस?” पण, येशूने काहीच उत्तर दिले नाही. १० म्हणून, पिलात त्याला म्हणाला: “तू मला काहीच उत्तर देणार नाहीस का? तुझी सुटका करण्याचा किंवा तुला मृत्युदंड देण्याचा* मला अधिकार आहे, हे तुला माहीत नाही का?” ११ येशूने त्याला उत्तर दिले: “देवाने तुम्हाला अधिकार दिला नसता, तर तुमचा माझ्यावर काहीच अधिकार नसता. म्हणूनच, ज्या माणसाने मला तुमच्या स्वाधीन केलं त्याचं पाप अधिक मोठं आहे.”
१२ त्यामुळे, पिलात त्याची सुटका करण्याचा प्रयत्न करू लागला. पण, यहुदी ओरडून म्हणाले: “तुम्ही जर याची सुटका केली, तर तुम्ही कैसराचे* मित्र नाही. जो कोणी राजा असल्याचा दावा करतो तो कैसराविरुद्ध बोलतो.”* १३ हे ऐकल्यावर पिलातने येशूला बाहेर आणले आणि ‘फरसबंदी कट्टा’ म्हटलेल्या ठिकाणी, ज्याला इब्री भाषेत गब्बाथा म्हणतात, तिथे तो एका न्यायासनावर बसला. १४ तो वल्हांडणाच्या तयारीचा दिवस होता आणि दुपारचे सुमारे बारा* वाजले होते. पिलात यहुद्यांना म्हणाला: “पाहा! तुमचा राजा!” १५ पण ते ओरडू लागले: “याला घेऊन जा! याला घेऊन जा! याला वधस्तंभावर खिळा!” पिलातने त्यांना विचारले: “मी तुमच्या राजाला मृत्युदंड द्यावा का?”* तेव्हा, मुख्य याजकांनी उत्तर दिले: “कैसराशिवाय आमचा कोणी राजा नाही.” १६ मग, त्याने वधस्तंभावर खिळण्यासाठी त्याला त्यांच्या हाती दिले.
तेव्हा, त्यांनी त्याला ताब्यात घेतले. १७ येशू आपला वधस्तंभ स्वतः उचलून ‘कवटीची जागा’ म्हटलेल्या ठिकाणी गेला. इब्री भाषेत त्याला गुलगुथा असे म्हटले आहे. १८ तिथे त्यांनी आणखी दोन माणसांसोबत त्याला वधस्तंभावर खिळले. एक माणूस त्याच्या उजवीकडे, तर दुसरा डावीकडे आणि येशू त्यांच्या मधोमध होता. १९ तसेच, पिलातने वधस्तंभाच्या वर एक पाटी लावली, ज्यावर असे लिहिले होते: “नासरेथचा येशू, यहुद्यांचा राजा.” २० बऱ्याच यहुद्यांनी ती पाटी वाचली, कारण येशूला वधस्तंभावर खिळण्यात आले, ते ठिकाण शहराजवळच होते. ही पाटी इब्री, लॅटिन आणि ग्रीक भाषेत लिहिण्यात आली होती. २१ पण, यहुद्यांच्या मुख्य याजकांनी पिलातला म्हटले: “‘यहुद्यांचा राजा,’ असं लिहू नका, तर ‘स्वतःला यहुद्यांचा राजा म्हणणारा,’ असं लिहा.” २२ पिलातने उत्तर दिले: “मी जे लिहिलं, ते लिहिलं.”
२३ मग, येशूला वधस्तंभावर खिळल्यानंतर शिपायांनी त्याचे बाह्य वस्त्र घेतले आणि त्याचे चार तुकडे करून प्रत्येकाला एक, असे आपसात वाटून घेतले. तसेच, त्यांनी त्याचा आतला झगासुद्धा घेतला. पण, आतला झगा शिवलेला नव्हता, तर वरपासून खालपर्यंत पूर्ण विणलेला होता. २४ म्हणून ते एकमेकांना म्हणाले: “हा झगा फाडण्याऐवजी, तो कोणाला मिळेल हे ठरवण्यासाठी आपण चिठ्ठ्या टाकू या.” शास्त्रवचनांत जे म्हटले आहे ते पूर्ण होण्यासाठी हे घडले: “त्यांनी आपसात माझी वस्त्रे वाटून घेतली आणि माझ्या कपड्यांसाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.” आणि शिपायांनी खरोखरच या गोष्टी केल्या.
२५ येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई आणि मावशी; क्लोपची बायको मरीया आणि मग्दालीया मरीया उभ्या होत्या. २६ जेव्हा येशूने आपल्या आईला आणि ज्याच्यावर त्याचे खूप प्रेम होते त्या शिष्याला जवळच उभे असलेले पाहिले, तेव्हा तो आपल्या आईला म्हणाला: “बाई,* पाहा! तुझा मुलगा!” २७ मग, तो त्या शिष्याला म्हणाला: “पाहा! तुझी आई!” त्या दिवसापासून, त्या शिष्याने तिला आपल्या घरी राहायला नेले.
२८ सर्व गोष्टी आता पूर्ण झाल्या आहेत हे ओळखल्यानंतर येशू म्हणाला: “मला तहान लागली आहे.” शास्त्रवचनात जे सांगितले आहे ते पूर्ण होण्यासाठी तो असे म्हणाला. २९ जवळच एका भांड्यात आंबट द्राक्षारस भरून ठेवला होता. त्यामुळे, त्यांनी त्यात बुडवलेला बोळा एजोबच्या* डहाळीच्या टोकावर ठेवून तो त्याच्या तोंडाला लावला. ३० तो आंबट द्राक्षारस चाखल्यावर येशू म्हणाला: “पूर्ण झालं आहे!” मग, त्याने मान टाकून प्राण सोडला.
३१ तो तयारीचा दिवस असल्यामुळे, शब्बाथाच्या दिवशी (कारण हा मोठा शब्बाथ होता) मृतदेह वधस्तंभावर राहू नयेत म्हणून यहुद्यांनी पिलातला अशी विनंती केली, की वधस्तंभावर खिळलेल्यांचे पाय तोडावेत आणि त्यांचे मृतदेह खाली उतरवावेत. ३२ त्यामुळे, शिपायांनी येशूजवळ वधस्तंभांवर खिळलेल्या पहिल्या माणसाचे आणि त्यानंतर दुसऱ्याचेही पाय तोडले. ३३ पण, येशूच्या जवळ आल्यावर तो आधीच मेला असल्याचे त्यांना आढळल्यामुळे, त्यांनी त्याचे पाय तोडले नाहीत. ३४ तरी एका शिपायाने त्याच्या कुशीत भाला भोसकला, तेव्हा लगेच रक्त व पाणी बाहेर आले. ३५ आणि ज्याने आपल्या डोळ्यांनी या सर्व गोष्टी पाहिल्या आहेत त्याने ही साक्ष दिली आहे आणि त्याची साक्ष खरी आहे; आपण जे सांगितले ते खरे आहे, हे त्याला माहीत आहे आणि तुम्हीसुद्धा विश्वास ठेवावा म्हणून त्याने या गोष्टी सांगितल्या आहेत. ३६ खरेतर, “त्याचं एकही हाड मोडलं जाणार नाही,” असे जे शास्त्रवचनात म्हटले आहे ते पूर्ण व्हावे म्हणून या गोष्टी घडून आल्या. ३७ शिवाय, दुसऱ्या एका शास्त्रवचनात असे म्हटले आहे: “ज्याला त्यांनी भोसकलं त्याला ते पाहतील.”
३८ या गोष्टी घडल्यानंतर, अरिमथाई येथील योसेफने आपल्याला येशूचा मृतदेह घेऊन जाऊ द्यावा अशी पिलातला विनंती केली. हा योसेफ येशूचा शिष्य होता, पण ही गोष्ट त्याने यहुद्यांच्या भीतीमुळे गुप्त ठेवली होती. पिलातने त्याला परवानगी दिल्यावर तो आला आणि येशूचा मृतदेह घेऊन गेला. ३९ तसेच, पहिल्यांदा जो रात्री येशूकडे आला होता तो निकदेमसुद्धा आपल्यासोबत गंधरस आणि अगरूचे सुमारे तीस किलो* मिश्रण घेऊन आला. ४० मग, त्यांनी येशूचा मृतदेह घेतला आणि यहुदी लोकांच्या दफनविधीनुसार त्याला या सुगंधी मसाल्यांसहित मलमलीच्या कापडांत गुंडाळले. ४१ त्याला मृत्युदंड देण्यात आला* त्या ठिकाणी एक बाग होती आणि त्या बागेत एक नवीन कबर* होती, जिच्यात आजपर्यंत कोणाचाही मृतदेह ठेवण्यात आला नव्हता. ४२ तो यहुद्यांचा तयारीचा दिवस असल्यामुळे आणि कबर जवळच असल्यामुळे त्यांनी येशूला तिथेच ठेवले.