योहान
२० आठवड्याच्या पहिल्या दिवशी, अगदी पहाटे, अंधार असतानाच मग्दालीया मरीया कबरेकडे* आली. पण, कबरेच्या* तोंडावर लावलेला दगड आधीच बाजूला काढलेला तिला दिसला. २ म्हणून, ती धावत शिमोन पेत्रकडे आणि ज्याच्यावर येशूचे प्रेम होते त्या शिष्याकडे आली आणि त्यांना म्हणाली: “त्यांनी प्रभूला कबरेतून काढून नेलं आहे, आणि त्याला कुठे ठेवलं आहे हे आम्हाला माहीत नाही.”
३ तेव्हा, पेत्र आणि तो दुसरा शिष्य कबरेकडे जायला निघाले. ४ ते दोघे सोबतच धावत निघाले, पण दुसरा शिष्य त्याच्यापुढे जाऊन त्याच्याआधी कबरेजवळ पोहचला. ५ त्याने कबरेच्या आत डोकावून पाहिले तेव्हा तिथे मलमलीची कापडे पडलेली त्याला दिसली, पण तो आत गेला नाही. ६ मग, त्याच्यामागून शिमोन पेत्र आला व कबरेच्या आत गेला. आणि त्याला तिथे मलमलीची कापडे पडलेली दिसली. ७ पण, ज्या कापडाने येशूचे डोके झाकले होते ते इतर कापडांच्या पट्ट्यांसोबत नसून, एकीकडे गुंडाळून ठेवलेले होते. ८ मग, जो शिष्य सगळ्यात आधी कबरेजवळ पोहचला होता, तोसुद्धा कबरेच्या आत गेला आणि त्याने पाहिले व विश्वास ठेवला. ९ येशूचे मरणातून उठणे आवश्यक आहे, हे शास्त्रवचन त्यांना अजूनही समजले नव्हते. १० त्यामुळे, शिष्य आपापल्या घरी परत गेले.
११ मरीया मात्र अजूनही कबरेच्या बाहेर रडत उभी होती. रडतारडता तिने कबरेच्या आत डोकावून पाहिले, १२ तेव्हा जिथे येशूचा मृतदेह ठेवण्यात आला होता, तिथे तिला शुभ्र वस्त्र घातलेले दोन देवदूत दिसले; एक उशाशी आणि दुसरा पायाशी बसला होता. १३ ते तिला म्हणाले: “बाई, का रडतेस?” तेव्हा ती त्यांना म्हणाली: “ते माझ्या प्रभूला घेऊन गेले आहेत, आणि त्यांनी त्याला कुठे ठेवलं आहे हे मला माहीत नाही.” १४ असे म्हटल्यावर तिने मागे वळून पाहिले तेव्हा येशू तिथे उभा होता. पण, तो येशू आहे हे तिला समजले नाही. १५ येशू तिला म्हणाला: “बाई, का रडतेस? तू कोणाला शोधत आहेस?” तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली: “तुम्ही त्याला इथून नेलं असेल, तर त्याला कुठे ठेवलं आहे ते मला सांगा, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन.” १६ येशू तिला म्हणाला: “मरीया!” तेव्हा, मागे वळून ती इब्री भाषेत त्याला म्हणाली: “रब्बोनी!” (म्हणजे, “गुरुजी!”) १७ येशू तिला म्हणाला: “मला बिलगू नकोस, कारण मी अजून वर पित्याकडे गेलेलो नाही. तर माझ्या भावांना जाऊन सांग, ‘मी माझ्या पित्याकडे व तुमच्या पित्याकडे आणि माझ्या देवाकडे व तुमच्या देवाकडे वर जात आहे.’” १८ मग, मग्दालीया मरीयाने शिष्यांना येऊन ही बातमी सांगितली: “मी प्रभूला पाहिलं आहे!” आणि त्याने तिला जे काही म्हटले होते, ते तिने त्यांना सांगितले.
१९ त्या दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी, शिष्य यहुद्यांच्या भीतीमुळे दार लावून घरात असताना, येशू त्यांच्यामध्ये येऊन उभा राहिला आणि त्यांना म्हणाला: “तुम्हाला शांती असो.” २० असे म्हणून त्याने त्यांना आपले हात आणि आपली कूस दाखवली. तेव्हा, प्रभूला पाहून शिष्यांना खूप आनंद झाला. २१ येशू पुन्हा त्यांना म्हणाला: “तुम्हाला शांती असो. जसं पित्याने मला पाठवलं आहे, तसं मीही तुम्हाला पाठवत आहे.” २२ असे म्हटल्यानंतर, तो त्यांच्यावर फुंकर मारून म्हणाला: “तुम्हाला पवित्र आत्मा मिळो. २३ तुम्ही कोणाच्या पापांची क्षमा केली, तर त्यांची क्षमा होईल; पण, जर क्षमा केली नाही, तर त्यांची क्षमा होणार नाही.”
२४ पण, येशू आला तेव्हा बारा शिष्यांपैकी एक असलेला थोमा, ज्याला ‘जुळा’ असेही म्हटले जायचे तो इतर शिष्यांसोबत नव्हता. २५ म्हणून ते त्याला सांगू लागले: “आम्ही प्रभूला पाहिलं आहे!” पण, तो त्यांना म्हणाला: “जोपर्यंत मी त्याच्या हातांवरील खिळ्यांचे व्रण पाहणार नाही आणि त्यात बोट घालणार नाही, तसंच त्याच्या कुशीत हात घालणार नाही तोपर्यंत मला विश्वासच बसणार नाही.”
२६ मग, आठ दिवसांनंतर, शिष्य पुन्हा घरात होते आणि थोमाही त्यांच्यासोबत होता. तेव्हा, दार बंद असतानाही येशू त्यांच्यामध्ये येऊन उभा राहिला आणि म्हणाला: “तुम्हाला शांती असो.” २७ मग, तो थोमाला म्हणाला: “माझ्या हातांना बोट लावून पाहा, आणि आपला हात माझ्या कुशीत घाल. शंका घेण्याचं* सोडून दे आणि विश्वास ठेव.” २८ तेव्हा थोमा त्याला म्हणाला: “माझ्या प्रभू, माझ्या देवा!” २९ येशू त्याला म्हणाला: “तू मला पाहिलं आहे, म्हणून विश्वास ठेवतोस का? जे न पाहताही विश्वास ठेवतात, ते सुखी.”
३० खरेतर, येशूने आपल्या शिष्यांसमोर इतर अनेक चमत्कार* केले, ज्यांविषयी या गुंडाळीत लिहिण्यात आलेले नाही. ३१ पण, जे लिहिण्यात आले आहेत ते यासाठी, की येशू हा ख्रिस्त व देवाचा पुत्र आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवल्यामुळे तुम्हाला त्याच्या नावाने जीवन मिळावे.