योहान
१८ या गोष्टी सांगितल्यावर, येशू आपल्या शिष्यांसोबत किद्रोन खोऱ्याच्या* पलीकडे गेला; तिथे एक बाग होती आणि तो व त्याचे शिष्य त्या बागेत गेले. २ येशू सहसा आपल्या शिष्यांसोबत इथे यायचा; त्यामुळे, त्याला धरून देणाऱ्या यहूदालाही हे ठिकाण माहीत होते. ३ तो सैनिकांना, तसेच मुख्य याजकांनी व परूश्यांनी पाठवलेल्या रक्षकांना सोबत घेऊन तिथे आला; त्यांच्या हातात मशाली, कंदील आणि शस्त्रे होती. ४ आपल्यासोबत कायकाय घडणार आहे, हे येशूला माहीत असल्यामुळे तो पुढे येऊन त्यांना म्हणाला: “तुम्ही कोणाला शोधत आहात?” ५ ते त्याला म्हणाले: “नासरेथकर येशूला.” तेव्हा तो म्हणाला: “मीच तो आहे.” त्या वेळी, त्याला धरून देणारा यहूदासुद्धा त्यांच्यासोबत उभा होता.
६ पण, “मीच तो आहे,” असे येशूने त्यांना म्हटले तेव्हा ते मागे हटून जमिनीवर पडले. ७ म्हणून त्याने पुन्हा त्यांना विचारले: “तुम्ही कोणाला शोधत आहात?” ते म्हणाले: “नासरेथकर येशूला.” ८ त्यावर येशू त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला सांगितलं, मीच तो आहे. तुम्ही जर मला शोधत असाल, तर या माणसांना जाऊ द्या.” ९ हे यासाठी घडले, की त्याने म्हटलेले हे शब्द पूर्ण व्हावेत: “तू मला जे दिले आहेत, त्यांच्यापैकी एकालाही मी गमावलं नाही.”
१० तेव्हा शिमोन पेत्र, ज्याच्याजवळ तलवार होती, त्याने ती काढली आणि महायाजकाच्या दासावर हल्ला करून त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्ख होते. ११ पण, येशू पेत्रला म्हणाला: “आपली तलवार परत म्यानात ठेव. पित्याने मला जो प्याला दिला आहे तो मी पिऊ नये का?”
१२ मग सैनिक, सेनापती आणि यहुद्यांनी पाठवलेले रक्षक यांनी येशूला धरले* आणि त्याचे हात बांधले. १३ त्यांनी आधी त्याला हन्नाकडे नेले, कारण त्या वर्षी महायाजक असलेल्या कयफाचा तो सासरा होता. १४ खरेतर, कयफानेच यहूद्यांना असा सल्ला दिला होता, की एका मनुष्याने सर्व लोकांसाठी मरावे यातच त्यांचे भले आहे.
१५ त्या वेळी, शिमोन पेत्र व आणखी एक शिष्य येशूच्या मागेमागे चालत होते. तो शिष्य महायाजकाच्या ओळखीचा होता, त्यामुळे येशूसोबत तोही महायाजकाच्या अंगणात गेला. १६ पण, पेत्र बाहेर दाराजवळच* उभा होता. त्यामुळे, महायाजकाच्या ओळखीचा तो दुसरा शिष्य बाहेर गेला आणि दार राखणाऱ्या दासीशी बोलून त्याने पेत्रला आत आणले. १७ तेव्हा, त्या दासीने पेत्रला म्हटले: “तूसुद्धा या माणसाचा शिष्य आहेस ना?” तो म्हणाला: “मी नाही.” १८ थंडी असल्यामुळे दास आणि रक्षक कोळशाची शेकोटी पेटवून तिच्याभोवती शेकत उभे होते. पेत्रसुद्धा त्यांच्यासोबत शेकत उभा होता.
१९ मुख्य याजकाने येशूला त्याच्या शिष्यांबद्दल व शिकवणींबद्दल काही प्रश्न विचारले. २० तेव्हा येशूने त्याला उत्तर दिले: “मी उघडपणे जगासमोर बोललो. मी नेहमी सभास्थानात आणि मंदिरात शिकवायचो, जिथे सर्व यहुदी येतात; आणि मी गुप्तपणे काहीच बोललो नाही. २१ मग, तुम्ही मला प्रश्न का विचारता? मी सांगितलेल्या गोष्टी ज्यांनी ऐकल्या आहेत त्यांना विचारा. पाहा! मी काय बोललो हे या लोकांना माहीत आहे.” २२ तो असे बोलला तेव्हा जवळच उभ्या असलेल्या एका रक्षकाने येशूच्या थोबाडीत मारून म्हटले: “ही काय पद्धत झाली मुख्य याजकाशी बोलण्याची?” २३ येशूने त्याला उत्तर दिले: “मी काही चुकीचं बोललो असेन, तर मला सांग;* पण, जे मी बोललो ते खरं असेल, तर मग तू मला का मारतोस?” २४ मग, हन्नाने त्याला महायाजक कयफा याच्याकडे बांधलेलेच पाठवले.
२५ शिमोन पेत्र शेकोटीजवळच उभा होता. तेव्हा, ते त्याला म्हणाले: “तूसुद्धा त्याच्या शिष्यांपैकीच एक आहेस ना?” पण, तो नाकारून म्हणाला: “मी नाही.” २६ पेत्रने ज्याचा कान कापला होता, त्या माणसाचा एक नातेवाईक महायाजकाचा दास होता. तो म्हणाला: “मी तुला त्याच्याबरोबर बागेत पाहिलं नव्हतं का?” २७ पण, पुन्हा एकदा पेत्रने ही गोष्ट नाकारली आणि तेवढ्यात एक कोंबडा आरवला.
२८ नंतर ते येशूला, कयफाकडून राज्यपालाच्या घरी घेऊन गेले. तोपर्यंत, दिवस उजाडला होता. पण, वल्हांडणाचे भोजन करायचे असल्यामुळे त्यांना दूषित व्हायचे नव्हते. म्हणून ते स्वतः राज्यपालाच्या घरात गेले नाहीत. २९ त्यामुळे त्यांच्याशी बोलण्यासाठी पिलात बाहेर आला आणि म्हणाला: “याने काय गुन्हा केला आहे?” ३० ते त्याला म्हणाले: “हा अपराधी* नसता, तर आम्ही त्याला तुमच्याकडे आणलंच नसतं.” ३१ तेव्हा, पिलात त्यांना म्हणाला: “तुम्हीच याला घेऊन जा आणि तुमच्या नियमशास्त्रानुसार याचा न्याय करा.” त्यावर यहुदी त्याला म्हणाले: “नियमशास्त्रानुसार आम्हाला कोणालाही ठार मारण्याचा अधिकार नाही.” ३२ आपल्याला कशा प्रकारचे मरण येईल हे सूचित करण्यासाठी येशूने जे म्हटले होते, ते पूर्ण व्हावे यासाठी हे घडले.
३३ तेव्हा पिलात पुन्हा राज्यपालाच्या घरात गेला आणि येशूला बोलावून तो त्याला म्हणाला: “तू यहुद्यांचा राजा आहेस का?” ३४ येशू म्हणाला: “तुम्ही हे स्वतःहून विचारत आहात की इतरांच्या सांगण्यावरून?” ३५ पिलातने उत्तर दिले: “मी यहुदी आहे का? तुझ्या स्वतःच्या लोकांनी आणि मुख्य याजकांनीच तुला माझ्या स्वाधीन केलं आहे. सांग, काय केलंस तू?” ३६ येशूने उत्तर दिले: “माझं राज्य या जगाचा भाग नाही. जर माझं राज्य या जगाचा भाग असतं, तर मला यहुद्यांच्या स्वाधीन केलं जाऊ नये म्हणून माझे सेवक लढले असते. पण मुळातच माझं राज्य या जगाचं नाही.” ३७ पिलात त्याला म्हणाला: “तर मग, तू राजा आहेस का?” येशूने उत्तर दिले: “मी राजा आहे असं तुम्ही स्वतःच म्हणत आहात. खरंतर, यासाठीच माझा जन्म झाला आहे आणि यासाठीच मी जगात आलो आहे, की मी सत्याबद्दल साक्ष द्यावी. जो कोणी सत्याच्या बाजूने आहे, तो माझं ऐकतो.” ३८ पिलातने त्याला विचारले: “सत्य काय आहे?”
असे म्हटल्यावर तो पुन्हा बाहेर यहुद्यांकडे गेला आणि त्यांना म्हणाला: “मला याच्यात काहीच दोष दिसत नाही. ३९ शिवाय, वल्हांडणाच्या सणात मी एका कैद्याची सुटका करावी अशी तुमच्यामध्ये प्रथा आहे. तर मग, मी यहुद्यांच्या राजाची सुटका करावी अशी तुमची इच्छा आहे का?” ४० तेव्हा ते पुन्हा मोठ्याने ओरडून म्हणाले: “याची नाही, बरब्बाची सुटका करा!” बरब्बा हा एक लुटारू होता.