योहान
१७ या गोष्टी बोलल्यानंतर, वर आकाशाकडे पाहून येशू म्हणाला: “बापा, वेळ आली आहे. पुत्राने तुझा गौरव करावा म्हणून तू आपल्या पुत्राचा गौरव कर. २ तू सर्व मानवांवर त्याला अधिकार दिला आहे, यासाठी की जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सर्वकाळाचं जीवन द्यावं. ३ सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी हे आवश्यक आहे, की त्यांनी एकाच खऱ्या देवाला, म्हणजे तुला आणि ज्याला तू पाठवलं त्या येशू ख्रिस्ताला ओळखावं.* ४ तू मला दिलेलं कार्य पूर्ण करून मी पृथ्वीवर तुझा गौरव केला आहे. ५ म्हणून बापा, हे जग होण्यापूर्वी तुझ्याजवळ असताना मला जसा गौरव मिळाला होता, तसाच गौरव आताही तू मला आपल्याजवळ दे.
६ जे लोक तू मला या जगातून दिले होते, त्यांना मी तुझं नाव प्रकट* केलं आहे. ते तुझे होते आणि ते तू मला दिले, आणि त्यांनी तुझं वचन पाळलं आहे.* ७ जे काही तू मला दिलं आहे ते तुझ्यापासूनच आहे, हे आता त्यांना समजलं आहे; ८ कारण तू मला सांगितलेल्या गोष्टी मी त्यांना सांगितल्या आहेत; त्यांनी त्या स्वीकारल्या आहेत आणि मी तुझ्या वतीने आलो, याची त्यांना पक्की खातरी झाली आहे व तूच मला पाठवलं यावर त्यांनी विश्वास ठेवला आहे. ९ मी त्यांच्यासाठी विनंती करतो; मी ही विनंती जगासाठी नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी करतो, कारण ते तुझे आहेत; १० जे काही माझं आहे ते तुझं आहे आणि जे तुझं, ते माझं आहे आणि त्यांच्यामध्ये मला गौरवण्यात आलं आहे.
११ मी यापुढे जगात नाही, पण ते जगात आहेत, आणि मी तुझ्याकडे येत आहे. पवित्र बापा, तुझं स्वतःचं नाव, जे तू मला दिलं आहेस, त्या नावासाठी त्यांचा सांभाळ कर; म्हणजे जसे आपण एक* आहोत, तसे त्यांनीही एक व्हावे.* १२ मी त्यांच्यासोबत होतो तेव्हा तू मला दिलेल्या तुझ्या स्वतःच्या नावासाठी मी त्यांचा सांभाळ करायचो; मी त्यांचं संरक्षण केलं आहे आणि नाशाच्या पुत्राला सोडून त्यांच्यापैकी एकाचाही नाश झाला नाही; हे यासाठी घडलं, की त्याद्वारे शास्त्रवचन पूर्ण व्हावं. १३ पण, आता मी तुझ्याकडे येत आहे, आणि त्यांच्यामध्ये माझा आनंद पूर्ण व्हावा म्हणून मी जगात असतानाच या गोष्टी त्यांना सांगत आहे. १४ मी तुझं वचन त्यांना दिलं आहे, पण जगाने त्यांचा द्वेष केला आहे; कारण जसा मी जगाचा भाग नाही, तसे तेही जगाचा भाग नाहीत.
१५ तू त्यांना या जगातून काढून घे अशी मी विनंती करत नाही, तर त्या दुष्टापासून त्यांना सांभाळ, अशी विनंती करतो. १६ जसा मी जगाचा भाग नाही, तसे तेही जगाचा भाग नाहीत. १७ सत्याद्वारे त्यांना पवित्र कर,* तुझं वचन सत्य आहे. १८ जसं तू मला जगात पाठवलं, तसं मीही त्यांना जगात पाठवलं. १९ आणि त्यांनीही सत्याद्वारे पवित्र व्हावं, म्हणून मी त्यांच्यासाठी स्वतःला पवित्र करत आहे.
२० मी केवळ यांच्यासाठीच विनंती करतो असं नाही, तर जे यांच्या वचनाद्वारे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही मी विनंती करतो, २१ यासाठी की, त्या सर्वांनी एक व्हावं. बापा, जसा तू माझ्यासोबत ऐक्यात आहे आणि मी तुझ्यासोबत ऐक्यात आहे, तसंच त्यांनीही आपल्यासोबत ऐक्यात असावं, म्हणजे तू मला पाठवलं यावर जग विश्वास ठेवेल. २२ तू जो गौरव मला दिलास, तो मी त्यांना दिला आहे, यासाठी की जसे आपण एक आहोत, तसे त्यांनीही एक व्हावे. २३ मी त्यांच्यासोबत आणि तू माझ्यासोबत ऐक्यात असल्यामुळे त्यांनीही पूर्णपणे एक* असावं; म्हणजे जगाला हे समजेल, की तू मला पाठवलं आणि जसं तू माझ्यावर प्रेम केलं तसं त्यांच्यावरही केलं. २४ बापा, जे लोक तू मला दिले आहेत त्यांनी जिथे मी आहे तिथे माझ्यासोबत असावं, अशी माझी इच्छा आहे; यासाठी, की जो गौरव तू मला दिला आहेस तो त्यांनी पाहावा, कारण जगाच्या स्थापनेच्या आधीपासून तू माझ्यावर प्रेम केलंस. २५ नीतिमान बापा, जगाने खरंच तुला ओळखलं नाही, पण मी तुला ओळखतो, आणि तू मला पाठवलं हे यांनाही समजलं आहे. २६ मी त्यांना तुझं नाव प्रकट केलं आहे आणि पुढेही करीन, यासाठी की तुझं माझ्यावर असलेलं प्रेम त्यांच्यामध्ये असावं आणि मी त्यांच्यासोबत ऐक्यात असावं.”