योहान
११ लाजर नावाचा एक माणूस आजारी होता; तो बेथानी या गावाचा होता, जिथे मरीया व तिची बहीण मार्था राहत होत्या. २ ही तीच मरीया होती, जिने प्रभूवर सुगंधी तेल ओतून आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले होते; आणि तिचाच भाऊ लाजर आजारी होता. ३ म्हणून लाजरच्या बहिणींनी येशूला असा निरोप पाठवला: “प्रभू, पाहा! ज्याच्यावर तुझा जीव आहे तो आजारी आहे.” ४ पण येशूने हे ऐकले तेव्हा तो म्हणाला: “या आजारपणाचा शेवट मरणात नाही, तर देवाच्या गौरवात होईल, यासाठी की त्याद्वारे देवाच्या पुत्राचा गौरव व्हावा.”
५ येशूचे मार्थावर आणि तिच्या बहिणीवर, तसेच लाजरवर प्रेम होते. ६ पण, लाजर आजारी असल्याचे ऐकल्यावरही, तो जिथे होता तिथेच आणखी दोन दिवस राहिला. ७ मग, तो आपल्या शिष्यांना म्हणाला: “चला आपण यहूदीयात परत जाऊ.” ८ शिष्य त्याला म्हणाले: “रब्बी,* अलीकडेच यहूदीयातले लोक तुला दगडमार करायला पाहत होते, आणि तरीही तू तिथे परत जाणार?” ९ येशूने उत्तर दिले: “दिवसाचे बारा तास असतात, असतात ना? एखादा जर दिवसाच्या प्रकाशात चालला, तर त्याला ठेच लागत नाही कारण त्याला या जगाचा प्रकाश दिसतो. १० पण जर कोणी रात्री चालत असेल, तर त्याला ठेच लागते कारण त्याच्यात प्रकाश नसतो.”
११ या गोष्टी बोलल्यावर तो म्हणाला: “आपला मित्र लाजर झोपला आहे, पण मी त्याला उठवायला तिथे जात आहे.” १२ तेव्हा शिष्य त्याला म्हणाले: “प्रभू, तो झोपला असेल तर बरा होईल.” १३ खरेतर येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता. पण त्यांना वाटले, की तो विश्रांतीसाठी झोप घेण्याबद्दल बोलत आहे. १४ तेव्हा येशू स्पष्टपणे म्हणाला: “लाजर मेला आहे, १५ आणि मी तिथे नव्हतो या गोष्टीचा मला तुमच्यासाठी आनंद वाटतो, कारण आता तुमचा विश्वास आणखी वाढेल. तर चला आपण त्याच्याकडे जाऊ या.” १६ म्हणून थोमा, ज्याला जुळा असेही म्हणायचे, तो इतर शिष्यांना म्हणाला: “चला आपणही जाऊ या, म्हणजे आपल्याला त्याच्यासोबत मरण येईल.”
१७ येशू बेथानीला पोचला तेव्हा लाजर आधीच चार दिवसांपासून कबरेत* होता. १८ बेथानी हे यरुशलेमजवळ, म्हणजे तिथून सुमारे तीन किलोमीटर* अंतरावर होते. १९ बरेच यहुदी लोक मार्था व मरीया यांच्या भावाबद्दल त्यांचे सांत्वन करण्यासाठी आले होते. २० येशू येत आहे हे मार्थाने ऐकले तेव्हा ती त्याला भेटायला गेली; पण मरीया घरातच बसून राहिली. २१ येशूला भेटल्यावर मार्था म्हणाली: “प्रभू, तू इथे असतास तर माझा भाऊ मेला नसता. २२ तरी, अजूनही मला खातरी आहे की तू देवाकडे जे काही मागशील, ते देव तुला नक्की देईल.” २३ येशू तिला म्हणाला: “तुझा भाऊ उठेल.” २४ मार्था त्याला म्हणाली: “शेवटल्या दिवशी, तो पुनरुत्थानात* उठेल हे मला माहीत आहे.” २५ येशू तिला म्हणाला: “पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो, तो मेला तरीसुद्धा पुन्हा जिवंत होईल; २६ आणि जिवंत असलेला जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो, तो कधीही मरणार नाही. यावर तुझा विश्वास आहे का?” २७ ती त्याला म्हणाली: “हो प्रभू, जो जगात येणार होता तो ख्रिस्त, देवाचा पुत्र तूच आहेस यावर माझा विश्वास आहे.” २८ असे म्हटल्यानंतर ती तिथून निघून गेली आणि तिची बहीण मरीया हिला बाजूला घेऊन म्हणाली: “गुरू आला आहे, आणि तुला बोलावत आहे.” २९ हे ऐकल्यावर ती लगेच उठून त्याच्याकडे गेली.
३० येशू अजून गावात आला नव्हता, तर मार्था त्याला जिथे भेटली होती, तिथेच होता. ३१ जे यहुदी घरात मरीयाचे सांत्वन करत होते, त्यांनी तिला लगेच उठून बाहेर जाताना पाहिले आणि तिच्या मागोमाग तेसुद्धा गेले. कदाचित ती रडायला कबरेजवळ* जात असेल असे त्यांना वाटले. ३२ येशू जिथे होता, तिथे आल्यावर मरीया त्याला पाहून त्याच्या पाया पडली आणि म्हणाली: “प्रभू, तू इथे असतास तर माझा भाऊ मेला नसता.” ३३ येशूने तिला आणि तिच्यासोबत आलेल्या यहुद्यांना रडताना पाहिले तेव्हा तो अगदी आतून* कण्हला आणि खूप दुःखी झाला. ३४ तो म्हणाला: “तुम्ही त्याला कुठे ठेवलं आहे?” ते म्हणाले: “प्रभू, येऊन पाहा.” ३५ तेव्हा, येशू रडू लागला. ३६ हे पाहून तिथे असलेले यहुदी म्हणाले: “पाहा, याचा त्याच्यावर किती जीव होता!” ३७ पण त्यांच्यापैकी काही जण म्हणाले: “या मनुष्याने आंधळ्या माणसाला दृष्टी दिली, तर मग तो याला मरण्यापासून वाचवू शकला नसता का?”
३८ मग येशू पुन्हा आतून कण्हला आणि कबरेजवळ* आला. खरेतर ती एक गुहा होती, जिच्या तोंडावर मोठा दगड लावलेला होता. ३९ येशू म्हणाला: “तो दगड बाजूला करा.” मेलेल्या मनुष्याची बहीण मार्था त्याला म्हणाली: “प्रभू, आता तर त्याच्या शरीराला दुर्गंधी सुटली असेल, कारण चार दिवस होऊन गेले आहेत.” ४० येशू तिला म्हणाला: “तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरवी सामर्थ्य पाहशील, असं मी तुला सांगितलं नव्हतं का?” ४१ तेव्हा त्यांनी दगड बाजूला केला. मग येशूने वर स्वर्गाकडे पाहून म्हटले: “बापा, तू माझं ऐकलंस म्हणून मी तुझे उपकार मानतो. ४२ तू नेहमीच माझं ऐकतोस हे तर मला माहीत होतं; पण इथे उभ्या असलेल्या लोकांसाठी मी बोललो, यासाठी की तू मला पाठवलंस यावर त्यांनी विश्वास ठेवावा.” ४३ असे म्हटल्यावर तो मोठ्याने ओरडून म्हणाला: “लाजर, बाहेर ये!” ४४ तेव्हा जो मेला होता, तो बाहेर आला. त्याच्या हातापायांवर कापडाच्या पट्ट्या गुंडाळलेल्या होत्या आणि त्याचा चेहरा एका कापडाने झाकलेला होता. येशू त्यांना म्हणाला: “त्याला मोकळं करा आणि जाऊ द्या.”
४५ यामुळे, जे यहुदी मरीयाकडे आले होते आणि त्याने काय केले हे ज्यांनी पाहिले, त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, ४६ पण काही जणांनी परूश्यांकडे जाऊन, येशूने काय केले हे त्यांना सांगितले. ४७ तेव्हा, मुख्य याजक आणि परूशी यांनी न्यायसभा* भरवली आणि ते म्हणाले: “आता आपण काय करावं? कारण हा माणूस तर पुष्कळ चमत्कार* करतो. ४८ जर आपण त्याचं असंच चालू दिलं, तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवू लागतील आणि रोमी लोक येऊन आपलं मंदिर* आणि आपलं राष्ट्रही आपल्यापासून हिरावून घेतील.” ४९ पण त्यांच्यापैकी कयफा, जो त्या वर्षी महायाजक होता, तो त्यांना म्हणाला: “तुम्हाला अगदी काहीच कळत नाही, ५० आणि हेही तुमच्या लक्षात येत नाही, की सबंध राष्ट्राचा नाश होण्यापेक्षा, एका मनुष्याने लोकांसाठी मरावं, हे तुमच्या हिताचं आहे.” ५१ पण हे तो स्वतःच्या मनाने बोलला नाही, तर त्या वर्षी तो महायाजक असल्यामुळे त्याने अशी भविष्यवाणी केली, की येशू राष्ट्रासाठी मरणार आहे; ५२ आणि फक्त राष्ट्रासाठीच नाही, तर ठिकठिकाणी विखुरलेल्या देवाच्या मुलांना एक करण्यासाठी तो मरणार आहे. ५३ म्हणून, त्या दिवसापासून ते त्याला ठार मारण्याचा कट करू लागले.
५४ त्यामुळे, येशूने यहुद्यांच्या सार्वजनिक ठिकाणी फिरण्याचे सोडून दिले. आणि तिथून निघून तो रानाजवळच्या प्रदेशात, एफ्राईम नावाच्या शहरात गेला आणि तिथे आपल्या शिष्यांसोबत राहू लागला. ५५ आता यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता आणि खेड्यापाड्यांतले बरेच लोक वल्हांडणाआधी स्वतःला नियमानुसार शुद्ध करण्यासाठी वर यरुशलेमला गेले. ५६ ते येशूला शोधत होते आणि मंदिरात उभे राहून ते एकमेकांना विचारू लागले: “तुम्हाला काय वाटतं? तो सणाला येणारच नाही का?” ५७ पण मुख्य याजकांनी आणि परूश्यांनी अशी आज्ञा दिली होती, की येशू कुठे आहे हे कोणालाही कळले तर त्याने लगेच याची खबर द्यावी, म्हणजे ते त्याला धरू शकतील.*