योहान
१२ वल्हांडणाच्या सहा दिवसांआधी येशू बेथानी इथे आला. त्याने ज्याला मेलेल्यांतून उठवले होते तो लाजर इथेच राहायचा. २ त्यांनी येशूसाठी संध्याकाळच्या जेवणाची मेजवानी ठेवली होती आणि मार्था त्यांना वाढत होती. तसेच, येशूसोबत बसून जेवणाऱ्यांमध्ये लाजरही होता. ३ मग, मरीयाने सुमारे तीनशे ग्रॅम शुद्ध जटामांसीचे* अतिशय मौल्यवान असे सुगंधी तेल घेऊन, येशूच्या पायांवर ओतले आणि आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले. सुगंधी तेलाचा सुवास सबंध घरात दरवळू लागला. ४ पण, त्याच्या शिष्यांपैकी असलेला यहूदा इस्कर्योत, जो लवकरच त्याला विश्वासघाताने धरून देणार होता, तो म्हणाला: ५ “हे सुगंधी तेल तीनशे दिनारांना* विकून ते पैसे गरिबांना का देण्यात आले नाहीत?” ६ पण, त्याला गरिबांची काळजी असल्यामुळे तो असे बोलला नव्हता. खरेतर तो चोर होता आणि त्याच्याजवळ ठेवलेल्या पैशांच्या डब्यातून तो पैसे चोरायचा. ७ तेव्हा येशू म्हणाला: “तिला रागावू नका. माझ्या दफनविधीच्या तयारीसाठी तिला हा विधी करू द्या. ८ कारण गरीब तर नेहमीच तुमच्यासोबत असतील, पण मी नेहमी तुमच्यासोबत असणार नाही.”
९ यहुद्यांच्या एका मोठ्या समुदायाला तो तिथे असल्याचे कळले. तेव्हा, ते फक्त येशूसाठीच नाही तर ज्याला त्याने मेलेल्यांतून उठवले होते, त्या लाजरला पाहण्यासाठी त्या ठिकाणी आले. १० आता मुख्य याजक लाजरलाही मारून टाकण्याचा कट करू लागले. ११ कारण त्याच्यामुळेच यहुद्यांपैकी बरेच जण तिथे जात होते आणि त्याच्यावर विश्वास ठेवत होते.
१२ दुसऱ्या दिवशी सणाला आलेल्या मोठ्या लोकसमुदायाला कळले की येशू यरुशलेमला येणार आहे. १३ म्हणून ते खजुराच्या झाडाच्या फांद्या घेऊन त्याला भेटायला गेले आणि मोठ्याने अशी घोषणा करू लागले: “आम्ही प्रार्थना करतो, याचा उद्धार होवो! यहोवाच्या* नावाने येणारा इस्राएलचा राजा आशीर्वादित असो!” १४ येशूला एक गाढवाचे पिल्लू मिळाल्यावर तो त्यावर बसला. तेव्हा त्याच्याविषयी लिहिलेले हे शब्द पूर्ण झाले: १५ “सीयोनच्या कन्ये, भिऊ नकोस. पाहा! तुझा राजा गाढवाच्या पिल्लावर बसून येत आहे.” १६ त्याच्या शिष्यांना सुरुवातीला या गोष्टी समजल्या नाहीत, पण येशूला गौरवण्यात आल्यानंतर, त्यांना आठवले की त्याच्याविषयी या गोष्टी लिहिण्यात आल्या होत्या आणि त्यांनी त्याच्या बाबतीत या गोष्टी केल्या.
१७ ज्या वेळी त्याने लाजरला कबरेतून* बाहेर बोलावले व मेलेल्यांतून उठवले, त्या वेळी जे लोक त्याच्यासोबत होते ते याविषयी इतरांना साक्ष देऊ लागले. १८ मग, त्याने हा चमत्कार केल्याचे लोकांच्या कानावर आल्यामुळे ते त्याला भेटायला गेले. १९ तेव्हा परूशी एकमेकांना म्हणू लागले: “आता आपलं काहीच चालणार नाही. पाहा! सगळं जग त्याच्यामागे जात आहे!”
२० सणाच्या वेळी उपासना करायला आलेल्यांमध्ये काही ग्रीक लोकही होते. २१ ते फिलिप्पजवळ आले, जो गालीलच्या बेथसैदा इथला होता, आणि ते त्याला अशी विनंती करू लागले: “आम्हाला येशूला पाहायचं आहे.” २२ तेव्हा फिलिप्पने हे अंद्रियाला सांगितले. मग, अंद्रिया व फिलिप्प यांनी जाऊन येशूला सांगितले.
२३ पण येशूने त्यांना उत्तर दिले: “मनुष्याचा पुत्र गौरवला जाण्याची वेळ आली आहे. २४ मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, गव्हाचा दाणा जोपर्यंत जमिनीवर पडून मरत नाही, तोपर्यंत तो एकच दाणा राहतो. पण तो मेला, तर त्यापासून भरपूर पीक उत्पन्न होते. २५ ज्या कोणाला आपला जीव प्रिय वाटतो तो त्याचा नाश करतो, पण जो कोणी या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतो, तो सर्वकाळाचं जीवन मिळावं म्हणून त्याचं रक्षण करतो. २६ माझी सेवा करण्याची कोणाची इच्छा असेल, तर त्याने माझ्यामागे यावं आणि जिथे मी आहे तिथे माझा सेवकही असेल. माझा पिता माझी सेवा करणाऱ्याचा सन्मान करेल. २७ आता मी फार खिन्न झालो आहे. मी काय बोलू? बापा, ही वेळ टळून जाऊ दे. तरीपण, यासाठीच मी या वेळेपर्यंत आलो आहे. २८ बापा, तू आपल्या नावाचा गौरव कर.” मग आकाशातून अशी वाणी झाली: “मी त्याचा गौरव केला आहे आणि पुन्हा करेन.”
२९ तिथे उभ्या असलेल्या लोकांनी हे ऐकले आणि ढगांचा गडगडाट झाला आहे, असे ते म्हणू लागले. इतर जण म्हणाले: “देवदूत त्याच्याशी बोलला.” ३० तेव्हा येशू म्हणाला: “ही वाणी माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी झाली आहे. ३१ आता या जगाचा न्याय होत आहे; आता या जगाच्या राजाला हाकलून दिलं जाईल. ३२ मला मात्र पृथ्वीवरून उंच करण्यात येईल* तेव्हा मी सर्व प्रकारच्या लोकांना माझ्याकडे ओढून* घेईन.” ३३ खरेतर, लवकरच त्याला कोणत्या प्रकारचे मरण येणार आहे, हे सुचवण्याकरता तो असे बोलला. ३४ मग जमलेले लोक त्याला म्हणाले: “नियमशास्त्रातून आम्ही असं ऐकलं आहे की ख्रिस्त सर्वकाळ राहील. मग मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवरून उंच केलं जाईल* असं तुम्ही कसं म्हणू शकता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण?” ३५ तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “प्रकाश तुमच्यामध्ये आणखी थोडाच वेळ राहील. अंधाराने तुमच्यावर मात करू नये, म्हणून तुमच्याजवळ प्रकाश असेपर्यंत चाला; जो कोणी अंधारात चालतो त्याला आपण कुठे जात आहोत हे कळत नाही. ३६ तुमच्याजवळ प्रकाश असेपर्यंत त्या प्रकाशावर विश्वास ठेवा, यासाठी की तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे.”
या गोष्टी सांगितल्यानंतर येशू तिथून निघून गेला आणि त्यांच्यापासून लपला. ३७ त्याने त्यांच्यासमोर इतके चमत्कार* करूनही त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. ३८ यामुळे यशया संदेष्ट्याचे हे शब्द पूर्ण झाले: “हे यहोवा,* आमच्याकडून ऐकलेल्या गोष्टीवर* कोणी विश्वास ठेवला आहे? आणि यहोवाच्या* हाताचं सामर्थ्य कोणाला प्रकट झालं आहे?” ३९ त्यांनी विश्वास ठेवला नाही याचे कारण म्हणजे पुन्हा एकदा यशयानेच म्हटल्याप्रमाणे: ४० “त्याने त्यांचे डोळे आंधळे केले आहेत आणि त्यांची मने कठोर केली आहेत, यासाठी की त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहू नये आणि त्यांच्या मनाने याचा अर्थ समजून घेऊ नये, आणि त्यांनी मागे फिरू नये व मी त्यांना बरं करू नये.” ४१ यशयाने त्याचा गौरव पाहिल्यामुळे तो या गोष्टी बोलला आणि त्याने त्याच्याविषयी सांगितले. ४२ तरीसुद्धा, अधिकाऱ्यांपैकीही बऱ्याच जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, पण परूशी आपल्याला सभास्थानातून बहिष्कृत करतील, अशी भीती वाटत असल्यामुळे त्यांनी त्याला उघडपणे स्वीकारले नाही. ४३ कारण त्यांना देवाकडून मिळणाऱ्या प्रशंसेपेक्षा, माणसांकडून होणारी प्रशंसा जास्त प्रिय वाटली.
४४ पण, येशू मोठ्याने म्हणाला: “जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो, तो फक्त माझ्यावरच नाही तर ज्याने मला पाठवलं त्याच्यावरही विश्वास ठेवतो. ४५ आणि जो कोणी मला पाहतो, तो मला पाठवणाऱ्यालाही पाहतो. ४६ मी जगाचा प्रकाश म्हणून आलो आहे, यासाठी की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधारात राहू नये. ४७ पण, कोणी माझ्या शिकवणी ऐकून त्यांचं पालन न केल्यास मी त्याचा न्याय करत नाही; कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नाही, तर जगाला वाचवण्यासाठी* आलो आहे. ४८ जो कोणी माझा अनादर करतो आणि माझ्या शिकवणी स्वीकारत नाही, त्याचा न्याय करणारा एक आहे. अर्थात, मी सांगितलेला संदेश. तोच शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करेल. ४९ कारण मी स्वतःच्या मनाने बोललो नाही, तर ज्या पित्याने मला पाठवलं त्यानेच, काय म्हणायचे आणि काय बोलायचे याबद्दल मला आज्ञा दिली आहे. ५० आणि त्याची आज्ञा म्हणजे सर्वकाळाचं जीवन आहे हे मला माहीत आहे. म्हणून मी जे काही बोलतो ते पित्याने सांगितल्याप्रमाणेच बोलतो.”