योहान
१० “मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, जो मेंढवाड्याच्या* दारातून आत न येता, दुसरीकडून चढून आत येतो तो चोर व लुटारू असतो. २ पण जो दारातून आत येतो तो मेंढरांची काळजी घेणारा मेंढपाळ असतो. ३ दारावरचा पहारेकरी त्याच्यासाठी दार उघडतो आणि मेंढरं त्याचा आवाज ऐकतात. तो आपल्या मेंढरांना त्यांच्या नावांनी हाक मारतो आणि त्यांना बाहेर नेतो. ४ आपली सगळी मेंढरं बाहेर नेल्यावर तो त्यांच्यापुढे चालतो आणि मेंढरं त्याच्या मागेमागे चालतात, कारण ते त्याचा आवाज ओळखतात. ५ अनोळखी माणसाच्या मागे ते कधीही जाणार नाहीत, तर त्याच्यापासून पळून जातील, कारण ते अनोळखी माणसांचा आवाज ओळखत नाहीत.” ६ येशूने त्यांना हे उदाहरण दिले, पण तो काय सांगत आहे हे त्यांना समजले नाही.
७ म्हणून येशू पुन्हा म्हणाला: “मी तुम्हाला अगदी खरं सांगतो, मेंढरांसाठी असलेलं दार मी आहे. ८ माझी जागा घेण्यासाठी जे कोणी आले ते सर्व चोर व लुटारू आहेत; पण मेंढरांनी त्यांचं ऐकलं नाही. ९ मी दार आहे; जो कोणी माझ्यातून आत येतो त्याचं तारण होईल* आणि तो आत व बाहेर जाऊ-येऊ शकेल आणि त्याला चरायला गवत मिळेल. १० चोर फक्त लुटायला, ठार मारायला आणि नाश करायला येतो. पण, मी यासाठी आलो आहे की त्यांना जीवन मिळावं आणि तेसुद्धा भरपूर प्रमाणात मिळावं. ११ चांगला मेंढपाळ मी आहे; चांगला मेंढपाळ मेंढरांसाठी आपला प्राण देतो. १२ जो मेंढपाळ नसतो आणि मेंढरं ज्याची स्वतःची नसतात, असा मजुरीवर काम करणारा माणूस लांडग्याला येताना पाहतो आणि मेंढरांना वाऱ्यावर सोडून पळून जातो—आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून त्यांची पांगापांग करतो— १३ कारण तो मजूर असतो आणि त्याला मेंढरांची काळजी नसते. १४ मी चांगला मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो आणि मी पित्याला ओळखतो, १५ तसंच, मी माझ्या मेंढरांना ओळखतो आणि माझी मेंढरं मला ओळखतात; आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो.
१६ माझी दुसरीही मेंढरं आहेत, जी या मेंढवाड्यातली नाहीत. त्यांनाही मला आणलं पाहिजे. ती माझा आवाज ऐकतील आणि तेव्हा एक कळप आणि एक मेंढपाळ असं होईल. १७ पित्याचं माझ्यावर प्रेम आहे, कारण मी माझा प्राण देतो, यासाठी की तो मला परत मिळावा. १८ कोणीही माझ्या इच्छेविरुद्ध माझा प्राण घेत नाही, तर मी स्वतःहून तो देतो. मला माझा प्राण देण्याचा अधिकार आहे आणि तो परत मिळवण्याचाही अधिकार आहे. माझ्या पित्याकडून मला ही आज्ञा मिळाली आहे.”
१९ तो असे बोलल्यामुळे पुन्हा एकदा यहुद्यांमध्ये फूट पडली. २० त्यांच्यापैकी बरेच जण म्हणू लागले: “त्याला दुरात्म्याने पछाडलं आहे आणि तो वेडा झाला आहे. त्याचं तुम्ही का ऐकता?” २१ तर इतर जण म्हणाले: “दुरात्म्याने पछाडलेला असं बोलणार नाही. दुरात्मा एखाद्या आंधळ्या माणसाला दृष्टी देऊ शकत नाही. देऊ शकतो का?”
२२ मग, यरुशलेममध्ये समर्पणाचा सण झाला. त्या वेळी हिवाळा होता २३ आणि येशू मंदिरात शलमोनच्या वरांड्यात फिरत होता. २४ तेव्हा यहुद्यांनी त्याला घेरले आणि म्हणू लागले: “तू किती काळ आम्हाला अंधारात ठेवणार आहेस? तू ख्रिस्त असशील तर आम्हाला तसं स्पष्टपणे सांग.” २५ येशूने त्यांना उत्तर दिले: “मी तुम्हाला सांगितलं, पण तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही. मी पित्याच्या नावाने जी कार्यं करतो तीच माझ्याविषयी साक्ष देतात. २६ पण तुम्ही विश्वास ठेवत नाही, कारण तुम्ही माझी मेंढरं नाही. २७ माझी मेंढरं माझा आवाज ऐकतात आणि मी त्यांना ओळखतो आणि ते माझ्यामागे चालतात. २८ मी त्यांना सर्वकाळाचं जीवन देतो, आणि त्यांचा कधीही नाश होणार नाही; आणि कोणीही त्यांना माझ्या हातातून हिसकावून घेणार नाही. २९ माझ्या पित्याने मला जे दिलं आहे, ते इतर सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ आहे आणि पित्याच्या हातून त्यांना कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. ३० मी आणि पिता एक आहोत.”*
३१ पुन्हा एकदा यहुद्यांनी त्याला मारायला दगड उचलले. ३२ येशूने त्यांना म्हटले: “मी पित्याकडून तुम्हाला कितीतरी चांगली कार्यं करून दाखवली. त्यांपैकी कोणत्या कार्याबद्दल तुम्ही मला दगडमार करत आहात?” ३३ यहुद्यांनी त्याला उत्तर दिले: “आम्ही कोणत्याही चांगल्या कार्याबद्दल तुला दगडमार करत नाही, तर तू देवाची निंदा केलीस म्हणून करत आहोत. कारण तू माणूस असूनही देवाची बरोबरी करतोस.” ३४ येशूने त्यांना म्हटले: “तुमच्या नियमशास्त्रात असं लिहिलेलं नाही का, की ‘मी म्हणालो: “तुम्ही देव आहात”’?* ३५ हे शास्त्रवचन रद्द केलं जाऊ शकत नाही, हे आपल्याला माहीत आहे. मग, ज्यांना देवाच्या वचनाने दोषी ठरवलं, त्यांना जर ‘देव’ म्हणण्यात आलं आहे, ३६ तर मग, ‘मी देवाचा पुत्र आहे,’ असं म्हटल्यामुळे, ‘तू देवाची निंदा करतोस,’ असं तुम्ही का म्हणता? कारण मला तर पित्याने स्वतः पवित्र करून जगात पाठवलं आहे. ३७ जर मी माझ्या पित्याची कार्यं करत नसेन, तर माझ्यावर विश्वास ठेवू नका. ३८ पण जर मी ती करत असेन, तर माझ्यावर जरी तुम्ही विश्वास ठेवला नाही तरी त्या कार्यांवर विश्वास ठेवा, यासाठी की तुम्हाला कळावं आणि तुम्ही पुढेही हे मानावं की पिता माझ्यासोबत ऐक्यात आहे आणि मी पित्यासोबत ऐक्यात आहे.” ३९ तेव्हा त्यांनी पुन्हा त्याला धरण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांच्या हातून निसटला.
४० मग तो पुन्हा यार्देन नदीच्या पलीकडे, जिथे सुरुवातीला योहान बाप्तिस्मा देत होता, तिथे गेला आणि त्याच ठिकाणी राहिला. ४१ तेव्हा, बरेच लोक त्याच्याकडे येऊन म्हणू लागले: “योहानने एकही चमत्कार* केला नाही, पण या माणसाबद्दल योहानने जे काही सांगितलं होतं, ते सर्व खरं ठरलं.” ४२ आणि तिथल्या बऱ्याच लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.