योहान
९ तिथून जात असताना, त्याला एक माणूस दिसला जो जन्मापासून आंधळा होता. २ तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले: “रब्बी,* कोणाच्या पापामुळे हा मनुष्य असा आंधळा जन्माला आला, याने केलेल्या पापामुळे की याच्या आईवडिलांनी केलेल्या पापामुळे?” ३ येशूने उत्तर दिले: “याने किंवा याच्या आईवडिलांनी केलेल्या पापामुळे नाही, तर याच्या बाबतीत देवाचं सामर्थ्य* सर्वांना दिसून यावं म्हणून हा असा जन्माला आला. ४ ज्याने मला पाठवलं, त्याची कार्यं दिवस असेपर्यंत आपण केली पाहिजेत, कारण अशी रात्र येत आहे, जेव्हा कोणीही काम करू शकणार नाही. ५ या जगात असेपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे.” ६ या गोष्टी सांगितल्यावर तो जमिनीवर थुंकला आणि थुंकीने मातीचा लेप तयार करून त्याने त्या आंधळ्या माणसाच्या डोळ्यांवर लावला ७ आणि त्याला म्हणाला: “शिलोहाच्या (म्हणजे, “पाठवलेला”) तळ्यात जाऊन डोळे धू.” तेव्हा तो गेला आणि त्याने आपले डोळे धुतले. तो परत आला तेव्हा त्याला दिसू लागले होते.
८ मग त्याचे शेजारीपाजारी आणि ज्यांनी त्याला पूर्वी भीक मागताना पाहिले होते, ते म्हणू लागले: “हा तोच माणूस आहे ना, जो बसून भीक मागायचा?” ९ काही म्हणाले: “हा तोच आहे.” तर इतर जण म्हणू लागले: “नाही हा फक्त त्याच्यासारखा दिसतो.” पण तो त्यांना सांगत होता की “मीच तो आहे.” १० तेव्हा त्यांनी त्याला विचारले: “मग, तुला कसं काय दिसू लागलं?” ११ त्याने उत्तर दिले: “येशू नावाच्या एका मनुष्याने लेप तयार करून माझ्या डोळ्यांवर लावला आणि तो मला म्हणाला, ‘शिलोहाच्या तळ्यात जाऊन धू.’ तेव्हा मी जाऊन डोळे धुतले आणि मला दिसू लागलं.” १२ तेव्हा ते त्याला म्हणाले: “कुठे आहे तो माणूस?” तो म्हणाला: “मला माहीत नाही.”
१३ मग ते पूर्वी आंधळ्या असलेल्या त्या माणसाला परूश्यांकडे घेऊन गेले. १४ येशूने ज्या दिवशी लेप तयार करून त्या माणसाला दृष्टी दिली होती, तो शब्बाथाचा दिवस होता. १५ तेव्हा परूशीदेखील त्या माणसाला विचारू लागले, की तुला कसे काय दिसू लागले? तो त्यांना म्हणाला: “त्याने माझ्या डोळ्यांवर लेप लावला, मी डोळे धुतले आणि आता मी पाहू शकतो.” १६ तेव्हा परूश्यांपैकी काही जण म्हणू लागले: “तो माणूस देवापासून असू शकत नाही, कारण तो शब्बाथ पाळत नाही.” पण, इतर जण म्हणाले: “एक पापी माणूस इतके अद्भुत चमत्कार* कसे काय करू शकेल?” अशा रीतीने त्यांच्यामध्ये फूट पडली. १७ मग ते पुन्हा त्या आंधळ्या माणसाला म्हणाले: “त्याने तुला दृष्टी दिली, तेव्हा तूच सांग, त्याच्याविषयी तुझं काय म्हणणं आहे?” तो म्हणाला: “तो संदेष्टा आहे.”
१८ पण तो आंधळा होता आणि त्याला दृष्टी आली, यावर यहुद्यांनी विश्वास ठेवला नाही. म्हणून, त्यांनी त्या माणसाच्या आईवडिलांना बोलावून आणले १९ आणि त्यांना विचारले: “तुमचा मुलगा, जो जन्मापासून आंधळा होता असं तुम्ही म्हणता, तो हाच का? मग आता याला कसं काय दिसतं?” २० त्याच्या आईवडिलांनी उत्तर दिले: “हा आमचा मुलगा आहे आणि हा जन्मापासून आंधळा होता, एवढंच आम्हाला माहीत आहे. २१ पण आता याला कसं काय दिसतं, आम्हाला माहीत नाही; किंवा त्याला कोणी दृष्टी दिली, हेही आम्हाला माहीत नाही. त्यालाच विचारा. तो समजदार आहे. तो स्वतःच सांगू शकतो.” २२ त्याचे आईवडील यहुद्यांच्या भीतीने असे बोलले. कारण यहुद्यांनी आधीच ठरवले होते, की येशू हा ख्रिस्त आहे असे जो कोणी म्हणेल त्याला सभास्थानातून बहिष्कृत केले जाईल. २३ म्हणून त्याचे आईवडील म्हणाले: “तो समजदार आहे. त्यालाच विचारा.”
२४ त्यामुळे, त्यांनी पूर्वी आंधळ्या असलेल्या त्या माणसाला दुसऱ्यांदा बोलावले आणि ते त्याला म्हणाले: “देवाला गौरव दे; तो मनुष्य पापी आहे हे आम्हाला माहीत आहे.” २५ त्याने उत्तर दिले: “तो पापी आहे की नाही ते मला माहीत नाही. मला इतकंच माहीत आहे, की पूर्वी मी आंधळा होतो पण आता मला दिसतं.” २६ तेव्हा ते त्याला म्हणाले: “त्याने काय केलं? तुझे डोळे कसे उघडले?” २७ तो म्हणाला: “मी तुम्हाला आधीच सांगितलं, पण तुम्ही ऐकलंच नाही. मग, तुम्हाला पुन्हा तेच का ऐकायचं आहे? तुम्हालाही त्याचे शिष्य व्हायचं आहे की काय?” २८ तेव्हा ते तिरस्काराने त्याला म्हणाले: “तू असशील त्याचा शिष्य, आम्ही तर मोशेचे शिष्य आहोत. २९ मोशेशी देव बोलला हे आम्हाला माहीत आहे, पण हा कोण, कुठला आम्हाला माहीत नाही.” ३० त्या माणसाने त्यांना म्हटले: “याचंच मला आश्चर्य वाटतं, की तो कुठला हे तुम्हाला माहीत नाही, पण तरी त्याने मला दृष्टी दिली. ३१ आपल्याला माहीत आहे, की देव पापी लोकांचं ऐकत नाही, तर जो त्याला भिऊन वागतो आणि त्याच्या इच्छेप्रमाणे करतो त्याचं तो ऐकतो. ३२ जुन्या काळापासून आजपर्यंत, कोणी जन्मापासून आंधळ्या माणसाला दृष्टी दिल्याचं आपण कधीच ऐकलं नव्हतं. ३३ जर हा माणूस देवापासून नसता, तर त्याला काहीच करता आलं नसतं.” ३४ तेव्हा ते त्याला म्हणाले: “तू सर्वस्वी पापात जन्माला आलास, आणि आम्हाला शिकवायला निघालास का?” असे म्हणून त्यांनी त्याला बाहेर काढले!
३५ त्याला बाहेर काढल्याचे येशूच्या कानावर आले. मग, त्याला भेटल्यावर येशू म्हणाला: “तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस का?” ३६ तो माणूस म्हणाला: “तो कोण आहे? मला सांगा, म्हणजे मी त्याच्यावर विश्वास ठेवीन.” ३७ येशू त्याला म्हणाला: “तू त्याला पाहिलं आहेस, आणि खरंतर तुझ्याशी जो बोलत आहे, तोच तो आहे.” ३८ तेव्हा तो म्हणाला: “प्रभू, मी त्याच्यावर विश्वास ठेवतो.” असे म्हणून त्याने त्याला नमन केले. ३९ मग येशू म्हणाला: “याच न्यायासाठी मी जगात आलो आहे, की ज्यांना दिसत नाही, त्यांना दिसावं आणि ज्यांना दिसतं त्यांनी आंधळं व्हावं.” ४० हे ऐकून, परूश्यांपैकी जे त्याच्यासोबत होते, ते म्हणाले: “आम्हीही आंधळे आहोत का?” ४१ येशू त्यांना म्हणाला: “तुम्ही आंधळे असता, तर तुमच्यावर पापाचा दोष आला नसता. पण तुम्ही म्हणता की ‘आम्हाला दिसतं,’ त्यामुळे तुमचं पाप तसंच राहील.”