अभ्यास लेख २८
गीत १२४ कायम एकनिष्ठ राहू या!
सत्य आणि असत्य यातला फरक ओळखा
“आपल्या कंबरेभोवती सत्याचा पट्टा बांधा आणि . . . स्थिर उभे राहा.”—इफिस. ६:१४.
या लेखात:
यहोवाकडून आपल्याला शिकायला मिळालेलं सत्य आणि सैतान तसंच आपले विरोधक पसरवत असलेल्या खोट्या गोष्टी यांच्यातला फरक ओळखायला स्वतःला कसं प्रशिक्षण देता येईल, ते पाहा.
१. सत्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं?
आपलं देवाच्या वचनात असलेल्या सत्यावर प्रेम आहे आणि आपला विश्वास त्यावरच आधारलेला आहे. (रोम. १०:१७) “सत्याचा स्तंभ आणि आधार” म्हणून यहोवाने ख्रिस्ती मंडळीची स्थापना केली आहे, असं आपण मानतो. (१ तीम. ३:१५) तसंच संघटनेत “नेतृत्व” करणाऱ्या लोकांच्यापण आपण अधीन असतो, कारण ते आपल्याला बायबलमधून सत्यं समजावून सांगतात आणि देवाच्या इच्छेनुसार मार्गदर्शन देतात.—इब्री १३:१७.
२. याकोब ५:१९ प्रमाणे सत्य शिकल्यानंतरसुद्धा आपल्याला काय धोका असू शकतो?
२ पण, सत्य आणि भरवशालायक मार्गदर्शन पुरवण्यात देवाच्या संघटनेची जी भूमिका आहे ती स्वीकारल्यानंतरही आपण सत्यापासून भरकटू शकतो. (याकोब ५:१९ वाचा.) जेव्हा बायबलवरचा किंवा देवाच्या संघटनेद्वारे मिळणाऱ्या मार्गदर्शनावरचा आपला भरवसा कमी होतो, तेव्हा सैतानाला खूप आनंद होतो. कारण असं व्हावं अशीच त्याची इच्छा आहे.—इफिस. ४:१४.
३. आपल्याला सत्याला धरून राहायची का गरज आहे? (इफिसकर ६:१३, १४)
३ इफिसकर ६:१३, १४ वाचा. लवकरच सैतान, लोकांना सहज पटतील अशा खोट्या गोष्टी पसरवून सगळ्या राष्ट्रांतल्या लोकांना यहोवाच्या विरुद्ध बाजू घेण्यासाठी भाग पाडेल. (प्रकटी. १६:१३, १४) तसंच, तो देवाच्या लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आणखी जास्त करेल, अशी अपेक्षा आपण करू शकतो. (प्रकटी. १२:९) त्यामुळे सत्य आणि असत्य यातला फरक ओळखण्यासाठी आणि सत्याचं पालन करत राहण्यासाठी स्वतःला प्रशिक्षण देणं महत्त्वाचंय. (रोम. ६:१७; १ पेत्र १:२२) मोठ्या संकटात आपण वाचू की नाही हे या गोष्टीवरच अवलंबून आहे!
४. या लेखात आपण काय पाहणार आहोत?
४ या लेखात, बायबलमध्ये असलेलं सत्य ओळखण्यासाठी आणि देवाच्या संघटनेचं मार्गदर्शन स्वीकारण्यासाठी मदत करतील अशा दोन गुणांबद्दल आपण पाहणार आहोत. तसंच सत्याला धरून राहण्यासाठी आपल्याला कोणत्या तीन सूचनांचं पालन करावं लागेल तेही पाहू या.
सत्य ओळखण्यासाठी लागणारे गुण
५. यहोवाच्या भीतीमुळे आपल्याला सत्य ओळखायला कशी मदत होते?
५ यहोवाची भीती. यहोवाबद्दल आपल्या मनात योग्य भीती बाळगणं म्हणजे त्याच्यावर प्रेम करणं. इतकं की त्याचं मन दुखावेल अशी कोणतीच गोष्ट आपण करणार नाही. म्हणूनच आपण त्याची मर्जी मिळवायला योग्य आणि अयोग्यमधला, सत्य आणि असत्यामधला फरक ओळखायला आतुर असतो. (नीति. २:३-६; इब्री ५:१४) आपण कधीच माणसाच्या भीतीला यहोवावर असलेल्या आपल्या प्रेमाच्या आड येऊ देऊ नये. कारण सहसा माणसांना जे आवडतं ते यहोवाला आवडत नाही.
६. दहा इस्राएली हेरांवर माणसाच्या भीतीचा कसा परिणाम झाला?
६ आपण देवाची भीती बाळगण्यापेक्षा जर माणसांना घाबरलो तर आपण सत्यापासून भरकटू शकतो. यहोवाने इस्राएली लोकांना कनान देश द्यायचं वचन दिलं होतं. या देशाची पाहणी करायला ज्या १२ हेरांना पाठवलं होतं त्यांचा विचार करा. त्यांच्यापैकी दहा हेरांच्या मनात यहोवावरच्या प्रेमापेक्षा कनानी लोकांची भीती जास्त होती. त्यांनी इतर इस्राएली लोकांना सांगितलं, की “आपण त्या लोकांशी लढू शकत नाही. कारण ते आपल्यापेक्षा ताकदवान आहेत.” (गण. १३:२७-३१) मानवी दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर कनानी लोक खरोखरच इस्राएली लोकांपेक्षा ताकदवान होते. पण इस्राएली लोक त्यांच्या शत्रूंवर विजय मिळवू शकणार नाहीत, असं जे त्यांनी म्हटलं त्यावरून कळतं, की ते यहोवाचा विचार करत नव्हते. इस्राएली लोकांनी काय करावं अशी यहोवाची इच्छा आहे, या गोष्टीकडे खरंतर त्या हेरांनी लक्ष द्यायला हवं होतं. तसंच अलीकडे यहोवाने त्यांच्यासाठी काय-काय केलं, यावर त्यांनी विचार करायला हवा होता. त्यामुळे त्यांना हे कळलं असतं, की कनानी लोकांची ताकद सर्वशक्तिमान यहोवाच्या सामर्थ्यापुढे काहीच नाही. त्या अविश्वासू हेरांच्या अगदी उलट, यहोशवा आणि कालेबने मात्र यहोवाची मर्जी मिळवायचा प्रयत्न केला. त्यांनी लोकांना सांगितलं: “यहोवाची आपल्यावर कृपा असली, तर तो नक्कीच आपल्याला तिथे घेऊन जाईल आणि तो . . . देश आपल्याला देईल.”—गण. १४:६-९.
७. यहोवाबद्दलची योग्य भीती आपण आपल्या मनात कशी वाढवू शकतो? (चित्रसुद्धा पहा.)
७ यहोवाबद्दल आपल्या मनात असलेली योग्य भीती वाढवण्यासाठी आपण प्रत्येक निर्णय घेताना यहोवाचं मन आनंदित करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. (स्तो. १६:८) बायबलचा एखादा अहवाल वाचताना स्वतःला विचारा: ‘मी जर या परिस्थितीत असतो तर मी काय केलं असतं?’ उदाहरणार्थ, दहा इस्राएली हेरांनी जेव्हा कनान देशाबद्दल त्यांचं मत सांगितलं, तेव्हा तुम्ही तिथे आहात अशी कल्पना करा. त्याने दिलेल्या बातमीवर विश्वास ठेवून तुम्हीसुद्धा माणसाच्या भीतीला बळी पडला असता का? की यहोवावरच्या तुमच्या प्रेमाला आणि त्याचं मन आनंदित करायच्या इच्छेला तुम्ही जास्त महत्त्व दिलं असतं? यहोशवा आणि कालेब यांनी जे सत्य ओळखलं होतं, ते इस्राएलच्या त्या अख्ख्या पिढीला ओळखता आलं नाही. त्यामुळे वचन दिलेला देशात जायची त्यांची संधी त्यांनी गमावली.—गण. १४:१०, २२, २३.
तुम्ही कोणावर विश्वास ठेवला असता? (परिच्छेद ७ पाहा)
८. आपण कोणता गुण वाढवायला मेहनत घेतली पाहिजे आणि का?
८ नम्रता. यहोवा नम्र लोकांना सत्य प्रकट करतो. (मत्त. ११:२५) आपणसुद्धा सत्य शिकून घेण्यासाठी नम्रपणे मदत स्वीकारली. (प्रे. कार्यं ८:३०, ३१) तरीसुद्धा गर्विष्ठपणा आपल्यात येऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. आपण जर गर्विष्ठ असू तर बायबलची तत्वं आणि यहोवाच्या संघटनेकडून मिळत असलेलं मार्गदर्शन जितकं योग्य आहे तितकंच आपलंही मत योग्य आहे, असं आपल्याला वाटू लागेल.
९. आपण आपली नम्रता कशी टिकवून ठेवू शकतो?
९ आपली नम्रता टिकवून ठेवण्यासाठी आपण लक्षात ठेवले पाहिजे की यहोवाच्या महानतेपुढे आपण क्षुल्लक आहोत. (स्तो. ८:३, ४) आपण नम्र असावं आणि शिकवण्याच्या लायक असावं म्हणून आपण यहोवाला प्रार्थना करू शकतो. यहोवा त्याच्या वचनाद्वारे आणि त्याच्या संघटनेद्वारे आपल्याला त्याचे विचार कळवतो आणि या विचारांना आपल्या विचारांपेक्षा जास्त महत्त्व देण्यासाठी तो आपल्याला मदत करेल. यहोवाला नम्र लोक आवडतात आणि घमेंडी, गर्विष्ठ, उद्धट लोकांची त्याला घृणा वाटते. ही गोष्ट तुमच्या बायबल वाचनातून कशी सिद्ध होते हे पाहायचा प्रयत्न करा. तसंच एखाद्या नेमणुकीमुळे तुम्हाला थोड्या प्रमाणात अधिकार मिळतो आणि तुम्ही लोकांच्या नजरेत येता, तेव्हा खासकरून नम्रता दाखवायची जास्त गरज आहे.
आपण सत्याला धरून कसं राहू शकतो?
१०. यहोवाने त्याच्या लोकांना सूचना आणि मार्गदर्शन देण्यासाठी कोणाचा वापर केला?
१० यहोवाच्या संघटनेकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनावर तुमचा विश्वास कायम ठेवा. प्राचीन इस्राएलमध्ये यहोवाने त्याच्या लोकांना सूचना देण्यासाठी मोशे आणि नंतर यहोशवाचा उपयोग केला. (यहो. १:१६, १७) इस्राएली लोकांनी जेव्हा यांचा देवाचे प्रतिनिधी म्हणून स्वीकार केला, तेव्हा त्यांना आशीर्वाद मिळाले. यानंतर बऱ्याच शतकांनी जेव्हा पहिल्यांदा ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाली तेव्हा त्या काळातल्या ख्रिश्चनांना १२ प्रेषितांनी मार्गदर्शन दिलं. (प्रे. कार्यं ८:१४, १५) मग या प्रेषितांमध्ये यरुशलेममधल्या इतर वडिलांचासुद्धा समावेश करण्यात आला. या विश्वासू पुरुषांनी दिलेलं मार्गदर्शन पाळल्यामुळे “मंडळ्या विश्वासात मजबूत होत गेल्या आणि शिष्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली.” (प्रे. कार्यं १६:४, ५) आजच्या काळातसुद्धा जेव्हा आपण संघटनेकडून मिळालेल्या मार्गदर्शनाचं पालन करतो तेव्हा आपल्यालाही आशीर्वाद मिळतात. पण जेव्हा यहोवाने नियुक्त केलेल्या या लोकांना ओळखायला आपण तयार होत नाही तेव्हा यहोवाला कसं वाटतं? इस्राएली लोकांना वचन दिलेल्या देशात घेऊन जात असताना त्यांच्यासोबत काय घडलं, त्याचा विचार केल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं.
११. यहोवाने नेतृत्व करण्यासाठी ज्याला नेमलं होतं त्याला इस्राएलमधल्या काही लोकांनी आव्हान दिलं, तेव्हा काय झालं? (चित्रसुद्धा पाहा.)
११ वचन दिलेल्या देशात इस्राएली लोक जात असताना एकदा असं झालं, की इस्राएलमधल्या काही नावाजलेल्या लोकांनी मोशेला आणि देवाने त्याला जी जबाबदारी सोपवली होती, त्याला आव्हान दिलं. ते म्हणाले: “[फक्त मोशेच नाही तर] इस्राएलचे सगळेच लोक पवित्र आहेत आणि यहोवा त्यांच्यामध्ये राहतो.” (गण. १६:१-३) हे खरं आहे, की देवाच्या नजरेत “इस्राएलचे सगळेच लोक” पवित्र होते. पण यहोवाने मोशेला त्यांच्या लोकांमध्ये नेतृत्व करण्यासाठी निवडलं होतं. (गण. १६:२८) मोशेची टीका करून हे बंडखोर लोक खरंतर यहोवाचीच टीका करत होते. त्यांनी यहोवाला काय हवंय, यापेक्षा स्वतःला काय हवंय याकडे लक्ष दिलं. कारण त्यांना अधिकार आणि प्रतिष्ठा हवी होती. देवाने या बंडखोर लोकांना आणि त्यांना साथ देणाऱ्या हजारो लोकांना मारून टाकलं. (गण. १६:३०-३५, ४१, ४९) आजसुद्धा आपण अशी खातरी बाळगू शकतो, की यहोवाच्या संघटनेत असलेल्या व्यवस्थेचा जे लोक अनादर करतात, त्यांना देवाची स्वीकृती मिळत नाही.
तुम्ही कोणाला साथ दिली असती? (परिच्छेद ११ पाहा)
१२. यहोवाच्या संघटनेवरचा आपला भरवसा आपण का टिकवून ठेवला पाहिजे?
१२ आपणसुद्धा यहोवाच्या संघटनेवरचा भरवसा टिकवून ठेवू शकतो. जेव्हा बायबलमधल्या एखाद्या सत्याच्या बाबतीत आपली समज सुधारण्याची गरज आहे किंवा संघटनेत राज्याचं काम ज्या पद्धतीने केलं जातं त्यात बदल करायची गरज आहे असं दिसून येतं, तेव्हा संघटनेत नेतृत्व करणारे बांधव तो बदल करायला लगेच तयार असतात. (नीति. ४:१८) कारण इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा त्यांना यहोवाला खूश करायचं असतं. तसंच ते जे काही निर्णय घेतात ते देवाच्या वचनाच्या आधारावर घ्यायचा पुरेपूर प्रयत्न करतात. कारण बायबलमध्ये वचनांचा असा नमुना आहे किंवा रूपरेषा आहे ज्याचं यहोवाच्या सगळ्या लोकांनी पालन केलं पाहिजे.
१३. ‘फायदेकारक वचनांचा नमुना’ म्हणजे काय आणि त्याबाबतीत आपण काय केलं पाहिजे?
१३ “फायदेकारक वचनांच्या नमुन्याला धरून राहा.” (२ तीम. १:१३) बायबलमध्ये ज्या ख्रिस्ती शिकवणी आहेत त्यांना या ठिकाणी ‘फायदेकारक वचनांचा नमुना’ असं म्हटलंय. (योहा. १७:१७) या शिकवणी आपल्या विश्वासाचा आधार आहेत. यहोवाच्या संघटनेने आपल्याला या नमुन्याला धरून राहायला शिकवलंय. जोपर्यंत आपण असं करू, तोपर्यंत आपल्याला आशीर्वाद मिळत राहतील.
१४. “फायदेकारक वचनांच्या नमुन्याला” धरून राहायला काही ख्रिस्ती कसे चुकले?
१४ आपण जर ‘फायदेकारक वचनांच्या नमुन्यापासून’ भरकटलो तर काय होऊ शकतं? याचं एक उदाहरण विचारात घ्या. पहिल्या शतकात काही ख्रिश्चनांमध्ये अशी अफवा पसरली होती की यहोवाचा दिवस आलाय. कदाचित एका पत्रामुळे त्यांची अशी समजूत झाली असेल. आणि हे पत्र प्रेषित पौलकडून आहे असं वाटल्यामुळे त्यांनी त्यावर विश्वास ठेवला असेल. पण वस्तुस्थिती काय आहे हे तपासण्याऐवजी थेस्सलनीका इथल्या काही ख्रिश्चनांनी या अफवेवर विश्वास ठेवला आणि ती आणखी पसरवली. पौल त्यांच्यासोबत असताना त्याने त्यांना जे शिकवलं होतं त्या गोष्टी जर त्यांनी लक्षात ठेवल्या असत्या तर त्यांची अशी फसवणूक झाली नसती. (२ थेस्सलनी. २:१-५) म्हणून पौलने त्यांना असा सल्ला दिला की ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. आणि भविष्यात त्यांना या बाबतीत मदत व्हावी म्हणून पौलने थेस्सलनीकाकरांना लिहिलेल्या दुसऱ्या पत्राच्या शेवटी असं म्हटलं: “मी पौल स्वतःच्या अक्षरांत तुम्हाला माझा नमस्कार सांगतो. प्रत्येक पत्रात हीच माझी खूण आहे; मी अशाच पद्धतीने लिहितो.”—२ थेस्सलनी. ३:१७.
१५. खऱ्या वाटणाऱ्या पण खोट्या असणाऱ्या गोष्टींपासून आपण स्वतःचं रक्षण कसं करू शकतो? उदाहरण द्या. (चित्रंसुद्धा पाहा.)
१५ पौलने थैस्सलनीकाकरांना लिहिलेल्या पत्रातून आपण काय शिकू शकतो? जेव्हा एखादी गोष्ट बायबलमधून शिकलेल्या गोष्टींप्रमाणे नसते किंवा एखादी खळबळजनक अफवा आपण ऐकतो, तेव्हा आपण समजबुद्धीने वागलं पाहिजे. पूर्वीच्या सोव्हिएत युनियनमध्ये आपल्या शत्रूंनी एकदा एक पत्र भाऊबहिणींना पाठवलं होतं. हे पत्र जणू जागतिक मुख्यालयातूनच आलंय असं वाटत होतं. या पत्रात आपल्या भावांना वेगळं होऊन एक स्वतंत्र संघटना स्थापन करण्याबद्दल प्रोत्साहन दिलं होतं. हे पत्र अगदी खरं असल्यासारखं भासत होतं. पण आपले विश्वासू भाऊबहीण यात फसले नाहीत. त्यांना कळलं, की या पत्रातला संदेश शिकलेल्या गोष्टींशी जुळत नाही. आजसुद्धा सत्याचे काही शत्रू कधीकधी आपल्याला गोंधळात टाकण्याच्या किंवा आपल्यात फूट पाडण्याच्या प्रयत्नात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. पण आपण ‘लगेच गोंधळून न जाता,’ जे ऐकतो किंवा वाचतो ते शिकलेल्या गोष्टींप्रमाणे आहे की नाही याचा विचार केला पाहिजे आणि स्वतःचं रक्षण केलं पाहिजे.—२ थेस्सलनी. २:२; १ योहा. ४:१.
खऱ्या वाटणाऱ्या खोट्या गोष्टीमुळे फसू नका (परिच्छेद १५ पाहा)a
१६. रोमकर १६:१७, १८ प्रमाणे काही जण सत्यापासून भरकटले तर आपण काय केलं पाहिजे?
१६ जे यहोवाशी एकनिष्ठ आहेत त्यांना जडून राहा. यहोवाची अशी इच्छा आहे, की आपण एकतेने त्याची उपासना करावी. जोपर्यंत आपण सत्याला धरून राहतो, तोपर्यंत आपल्यातली एकता टिकून राहील. सत्यापासून भरकटलेले लोक मंडळीत फुटी पाडतात. म्हणून “त्यांना टाळा” असं देव आपल्याला इशारा देतो. आपण जर असं नाही केलं, तर आपणसुद्धा सत्यापासून भरकटू शकतो.—रोमकर १६:१७, १८ वाचा.
१७. सत्य ओळखल्यामुळे आणि त्याला घट्ट धरून राहिल्यामुळे आपल्याला कसा फायदा होईल?
१७ जेव्हा आपण सत्य ओळखतो आणि त्याला धरून राहतो, तेव्हा आपण यहोवाच्या जवळ राहू शकतो आणि विश्वासात मजबूत होऊ शकतो. (इफिस. ४:१५, १६) तसंच, सैतानाच्या खोट्या शिकवणी आणि तो पसरवत असलेल्या खोट्या गोष्टींपासून आपलं संरक्षण होईल आणि मोठ्या संकटादरम्यान यहोवा आपली काळजी घेईल. म्हणून जे सत्य आहे, ते धरून राहा म्हणजे “शांतीचा देव तुमच्यासोबत राहील.”—फिलिप्पै. ४:८, ९.
गीत १२२ निर्भय व निश्चयी राहा!
a चित्राचं वर्णन: अनेक दशकांआधी, पूर्वीच्या सोव्हिएत संघातल्या भावांना एक पत्र मिळालं होतं, त्याचं एक नाट्यरूपांतरीत चित्र. हे पत्र जागतिक मुख्यालयातून असल्यासारखं भासत होतं. पण प्रत्यक्षात ते पत्र आपल्या शत्रूंनी पाठवलं होतं. आजच्या काळातसुद्धा आपले शत्रू यहोवाच्या संघटनेबद्दल दिशाभूल करणाऱ्या गोष्टी पसरवण्यासाठी इंटरनेटचा वापर करत आहेत.