वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w15 ७/१ पृ. ६-८
  • जग अंताच्या उंबरठ्यावर?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जग अंताच्या उंबरठ्यावर?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जगाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण टप्पा
  • जगाचा अंत कधी होईल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२१
  • देवाचा उद्देश लवकरच पूर्ण होणार
    जीवनाचा काय उद्देश आहे?
  • ही सुवार्ता तुम्ही ऐकावी असे त्यांना वाटते
    यहोवाचे साक्षीदार कोण आहेत? त्यांचा काय विश्‍वास आहे?
  • जी सुवार्ता तुम्ही ऐकावी असे त्यांना वाटते
    विसाव्या शतकातील यहोवाचे साक्षीदार
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
w15 ७/१ पृ. ६-८

मुख्य विषय | जग अंताच्या उंबरठ्यावर?

जग अंताच्या उंबरठ्यावर?

आज मानव एकमेकांवर सत्ता चालवून त्याचं भविष्य धोक्यात घालत आहे. पण देव हे असंच चालू देईल का? नाही. आपण आधीच्या लेखात पाहिल्याप्रमाणे कित्येक शतकांपासून होत असलेला अन्याय आणि दुःख यांचा देव अंत करेल. आपला निर्माणकर्ता देव लवकरच न्याय करणार आहे हे आपण ओळखावं अशी त्याची इच्छा आहे. ही महत्त्वाची गोष्ट तो कशी स्पष्ट करतो?

त्यासाठी एक उदाहरण लक्षात घ्या: एका अनोळखी ठिकाणी जाण्याकरता तुम्ही कारमधून प्रवास करत आहात. तिथं पोचण्याकरता तुम्ही इंटरनेटची, नकाशाची, आणि रस्त्यावर असणाऱ्‍या फलकावरील माहितीची मदत घ्याल. या माहितीनुसार तुम्हाला रस्त्यावर काही चिन्हं दिसतात तेव्हा तुमचं ठिकाण अगदी जवळ आलं आहे याची खातरी पटते. त्याचप्रमाणे देवानं आपल्याला त्याचं वचन बायबल दिलं आहे ज्यामध्ये जगात घडणाऱ्‍या खास घडामोडींविषयी सांगितलं आहे. आपण जेव्हा त्या पूर्ण होताना पाहतो तेव्हा आपल्याला खातरी पटते की आपण जगाच्या अंताच्या अगदी जवळ आलो आहोत.

बायबलमध्ये हे स्पष्ट केलं आहे की अंताच्या आधी अशा महत्त्वपूर्ण घटना घडतील ज्या जगाच्या इतिहासात कधीच घडल्या नाहीत. त्या वेळची परिस्थिती आणि जगभरात घडणाऱ्‍या त्या घटना आतापर्यंत झालेल्या सर्व घटनांपेक्षा वेगळ्या असतील. आता आपण देवाच्या वचनातील काही खास घटनांकडं लक्ष देऊया.

१. जागतिक घडामोडी: बायबलमधील मत्तय या पुस्तकाच्या २४ व्या अध्यायातील भविष्यवाणीमध्ये काही घटना दिल्या आहेत ज्या एकत्र मिळून एक महत्त्वपूर्ण चिन्ह ठरेल. हे चिन्ह “युगाच्या समाप्तीचे चिन्ह” असेल आणि पुढं जगाच्या अंताची सुरुवात होईल हे यावरून दिसेल. (वचन ३, १४) या चिन्हामध्ये पुढील गोष्टी समाविष्ट आहेत: मोठमोठी युद्धं, जागोजागी दुष्काळ व भूमिकंप, प्रेमाचा अभाव, कायदा न पाळणारे लोक आणि लोकांची दिशाभूल करणारे धार्मिक नेते. (वचन ६ ते २६) हे खरं आहे की या गोष्टी बऱ्‍याच शतकांपासून घडत असलेल्या आपण पाहतो. पण अंत जसजसा जवळ येत आहे तसतशा या सर्व घटना एकाच वेळी खूप मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यासोबतच पुढील तीन महत्त्वपूर्ण घटना पाहायला मिळतात.

२. लोकांची मनोवृत्ती: बायबलमध्ये असं सांगितलं आहे, की “शेवटल्या काळी” लोकांची मनोवृत्ती अतिशय वाईट होईल. ते म्हणतं: “माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापांस न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्‍वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी” होतील. (२ तीमथ्य ३:१-४) लोकांना एकमेकांबद्दल आदर नसणं ही काही नवीन गोष्ट नाही, पण “शेवटल्या काळी” या मनोवृत्तीमध्ये इतकी वाढ होईल की आपण “कठीण” दिवसांत जगत आहोत याची आपल्याला खातरी पटेल. लोकांच्या मनोवृत्तीमध्ये दिवसेंदिवस होणारे बदल तुम्हाला दिसतात का?

३. पृथ्वीला बिघडवणारे लोक: बायबलमध्ये सांगितलं आहे की देव, “पृथ्वीचा नाश” करणाऱ्‍यांचा नाश करेल. (प्रकटीकरण ११:१८, ईझी-टू-रीड व्हर्शन) कोणकोणत्या मार्गानं लोक पृथ्वीला बिघडवत आहेत? प्राचीन काळातील नोहाच्या दिवसांतील परिस्थिती लक्षात घ्या: “त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती; ती जाचजुलमांनी भरली होती. देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तो पाहा, ती भ्रष्ट होती.” म्हणून देवानं त्या भ्रष्ट लोकांबद्दल म्हटलं: “मी ... त्यांचा नाश करेन.” (उत्पत्ति ६:११-१३) हिंसाचारानं भरलेली पृथ्वी तुम्ही पाहू शकता का? त्यासोबतच आज मानवाकडे इतकी क्षमता आहे की तो खरंच मानवजातीचा नाश करण्याद्वारे पृथ्वीचा पूर्णपणे नाश करू शकतो; कारण त्याच्याकडे ती सर्व शस्त्रं आहेत. आणखी एका मार्गानं मानव पृथ्वीला बिघडवत आहे. त्यानं जीवनावश्‍यक गोष्टी जसं की हवा, पाणी आणि पर्यावरणातील इतर घटक यांचा गैरवापर करून पृथ्वीचं नैसर्गिक चक्र विस्कटून टाकलं आहे.

जरा विचार करा, ‘काही शतकांआधी मानवाकडे संपूर्ण मानवजातीचा नाश करण्याची ताकद तरी होती का?’ पण आता, आधुनिक शस्त्रं गोळा करण्याद्वारे आणि पर्यावरणाला बिघडवण्याद्वारे त्यांच्याकडे मानवांचा पूर्णपणे नाश करण्याची ताकद आहे हे त्यांनी दाखवलं आहे. तंत्रज्ञानात अतिशय वेगानं होणारी वाढ आणि त्याचे परिणाम, मानव पूर्णपणे समजू शकत नाही आणि त्यावर नियंत्रणही करू शकत नाही. अर्थात, पृथ्वीचं पुढं काय होणार हे ठरवणं किंवा त्यावर नियंत्रण करणं मानवांच्या हातात नाही. त्यांनी पृथ्वीवरील सर्व सजीवांचा पूर्णपणे नाश करण्याआधी देव पृथ्वीचा नाश करणाऱ्‍यांचा नाश करेल. आणि तो असं नक्की करेल!

४. जगभरात चाललेलं सुवार्ता सांगण्याचं काम: पहिल्या मुद्द्‌यातील भविष्यवाणीनुसार आणखी एक घटना म्हणजे याआधी कधी झालं नाही इतक्या मोठ्या प्रमाणात केलं जाणारं सुवार्ता सांगण्याचं काम. याबद्दल बायबलमध्ये असं म्हटलं आहे: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) हे सुवार्ता सांगण्याचं काम अनेक शतकांपासून चाललेल्या इतर बऱ्‍याच धर्मप्रचारापेक्षा अतिशय वेगळं आहे. शेवटल्या दिवसांदरम्यान देवाच्या “राज्याची” सुवार्ता या विशिष्ट संदेशावर भर दिला जाईल. तुम्हाला असा कोणता धार्मिक गट माहीत आहे का जो अशी सुवार्ता सांगतो? आणि जरी सांगत असला तरी तो गट “राज्याची ही सुवार्ता सर्व जगात” सांगत आहे का, की फक्‍त आसपासच्या लोकांना?

दोन यहोवाचे साक्षीदार समुद्र किनाऱ्‍यावरील एका मनुष्याला सुवार्ता सांगताना बायबलमधील शास्त्रवचन दाखवत आहेत

जगभरात शेकडो भाषांमध्ये देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली जात आहे

यहोवाच्या साक्षीदारांची www.jw.org ही वेबसाईट राज्याच्या सुवार्तेकडे लक्ष वेधते. या वेबसाईटवर ७०० पेक्षा जास्त भाषांमध्ये सुवार्तेबद्दल अधिक माहिती देणारी साहित्यं आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर राज्याची सुवार्ता सांगण्यात पुढाकार घेणारा एखादा गट तुम्हाला माहीत आहे का? बऱ्‍याच काळाआधी इंटरनेटची सोय नव्हती तेव्हादेखील यहोवाचे साक्षीदार राज्याच्या सुवार्तेबद्दल इतरांना सांगण्यात खूप मेहनत घ्यायचे आणि त्यासाठी ते प्रसिद्ध होते. १९३९ या वर्षापासून टेहळणी बुरूज या नियतकालिकाच्या प्रत्येक अंकाच्या पहिल्या पानावर “यहोवाच्या राज्याचा प्रकाशक” असं छापलं जात आहे. धर्मावर आधारित असणाऱ्‍या एका पुस्तकात म्हटलं आहे की यहोवाच्या साक्षीदारांनी जितक्या आवेशानं आणि मोठ्या प्रमाणात सुवार्ता सांगण्याचं काम केलं आहे तितकं आतापर्यंत कुणीच केलं नाही. या सुवार्तेमध्ये, देव लवकरच त्याच्या राज्याद्वारे जगाचा अंत करेल यावर जोर देण्यात आला आहे.

जगाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण टप्पा

या लेखात दिलेल्या बायबलमधील चार महत्त्वपूर्ण घटना तुमच्याच जीवनकाळात पूर्ण होत असल्याचे तुमच्या लक्षात आलं आहे का? शंभर वर्षांपासून टेहळणी बुरूज हे नियतकालिक आपल्या वाचकांना जगातील घटनांबद्दल माहिती देते. यामुळं, जगाचा अंत किती जवळ आहे याचं स्वतः परीक्षण करण्यासाठी मदत मिळते. पण या माहितीवर शंका घेणारे काही जण ठामपणे म्हणतात की या नियतकालिकातली माहिती आणि आकडेवारी चुकीची असू शकते. ते असाही दावा करतात की, ‘परिस्थिती आधीही वाईट होती आणि आताही आहे; पण आज प्रसारमाध्यमे वाढल्यामुळं जगातील परिस्थिती खूपच वाईट होत आहे असं आपल्याला फक्‍त वाटतं.’ पण आता आपण सर्वात महत्त्वपूर्ण काळाच्या अगदी टोकाला येऊन पोचलो आहोत याचे असंख्य पुरावे आपल्याला पाहायला मिळतात.

काही तज्ज्ञांना वाटतं की विज्ञान ज्या दिशेनं वाटचाल करत आहे त्यामुळं लवकरच पृथ्वीवर मोठे बदल घडून येतील. जसं की काही शास्त्रज्ञांनी २०१४ मध्ये असा अहवाल दिला की “काही वैज्ञानिक शोधांच्या दुष्परिणामांवर काळजीपूर्वक विचार केल्यास हे दिसून येतं की मानवाजातीचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे.” बऱ्‍याच लोकांना याची खातरी पटली आहे की आपण जगाच्या इतिहासाच्या एका महत्त्वपूर्ण टप्प्याला येऊन पोचलो आहोत. या नियतकालिकाचे प्रकाशक आणि त्याच्या बऱ्‍याच वाचकांना याबद्दल बिलकुल शंका नाही की आपण ज्या महत्त्वपूर्ण काळात जगत आहोत तो शेवटला काळच आहे आणि जगाचा अंत अगदी जवळ आहे. पण भविष्याची भीती बाळगण्याऐवजी अंतानंतर काय होईल हे जाणून आपण आनंदी होऊ शकतो. असं आपण का म्हणू शकतो? कारण जगाच्या अंतातून तुमचा बचाव होऊ शकतो! (w15-E 05/01)

पृथ्वीचा नाश होईल असं यहोवाचे साक्षीदार सांगतात का?

नाही. उलट शंभरपेक्षा जास्त वर्षांपासून ते भविष्याबद्दल एक चांगला संदेश देत आहेत. जसं की, १९५८ या वर्षी झालेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिवेशनातील भाषणाचा विषय होता: “देवाचं राज्य शासन करत आहे—जगाचा अंत जवळ आहे का?” या भाषणात हे स्पष्ट केलं होतं की “देवाचं राज्य पृथ्वीचा नाश करण्यासाठी नाही तर सैतानाच्या जगाचा नाश करण्यासाठी येत आहे. तसंच, देवाचं राज्य पृथ्वीला जाळून खाक करण्यासाठी नाही तर स्वर्गात आणि पृथ्वीवरही त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी येत आहे. या कारणामुळं देवानं निर्माण केलेली पृथ्वी खूप मौल्यवान आहे आणि तो तिला कायम टिकवून ठेवेल.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा