मुख्य विषय | जग अंताच्या उंबरठ्यावर?
‘जगाचा अंत’—याचा काय अर्थ होतो?
“जगाचा अंत जवळ आला आहे” असं जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा तुमच्या मनात काय येतं? तुम्हाला असं वाटतं का, की एखादा ग्रह पृथ्वीवर आदळून मानवजातीचा नाश होईल? की एखाद्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीमुळं किंवा तिसऱ्या महायुद्धामुळं या जगाचा नाश होईल? या विचारांनी काही जण खूप चिंतित होतात, काहींच्या मनात शंका येतात तर काहींना हसू येतं.
बायबलमध्येदेखील जगाचा “शेवट होईल” असं सांगितलं आहे. (मत्तय २४:१४) यालाच ‘देवाचा मोठा दिवस’ आणि “हर्मगिदोन” म्हटलं आहे. (प्रकटीकरण १६:१४, १६) हे खरं आहे की अंताविषयी, धर्मांमध्ये वेगवेगळी आणि निराशाजनक मतं आहेत. पण बायबलमध्ये जगाच्या अंताचा खरा अर्थ अगदी स्पष्टपणे सांगितला आहे. त्यासोबतच जगाचा अंत जवळ आहे की नाही हेदेखील पाहण्यास ते आपल्याला मदत करतं. आणि याहून महत्त्वाचं म्हणजे आपण त्या अंतातून कसं वाचू शकतो तेही आपल्याला शिकवतं. पण सर्वात आधी आपण या अंताबद्दल असलेले गैरसमज दूर करून बायबलनुसार त्याचा नेमका काय अर्थ होतो ते पाहूया.
अंत म्हणजे काय नाही
१. अंत म्हणजे संपूर्ण पृथ्वीचा विनाश नाही.
बायबलमध्ये सांगितलं आहे की “[देवाने] पृथ्वी तिच्या पायावर अशी स्थापिली . . . की ती कधीही ढळणार नाही.” (स्तोत्र १०४:५) हे आणि अशी इतर शास्त्रवचनं आपल्याला याची खातरी देतात की देव कधीच पृथ्वीचा नाश करणार नाही आणि कुणाला तिचा नाश करूही देणार नाही.—उपदेशक १:४; यशया ४५:१८.
२. अंत म्हणजे अनिश्चित घडणारी घटना नाही.
बायबलमध्ये सांगितलं आहे की देवानं जगाच्या अंताची वेळ निश्चित केली आहे. त्यामध्ये असं म्हटलं आहे: “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतासही नाही, पुत्रालाही नाही, केवळ पित्याला ठाऊक आहे. सावध असा, जागृत राहा; कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हाला ठाऊक नाही.” (मार्क १३:३२, ३३) यातून हे स्पष्ट होतं की अंत आणण्याचा नेमका “समय” देवानं (पित्यानं) आधीच ठरवला आहे.
३. अंत मानवामुळं किंवा मोठ्या उल्कापातामुळं होणार नाही.
जगाच्या अंताची सुरुवात कशानं होईल? बायबलमधील प्रकटीकरण पुस्तकाच्या १९ व्या अध्यायाच्या ११ व्या वचनात असं म्हटलं आहे: “मी स्वर्ग उघडलेला पाहिला, तो पाहा, एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला.” पुढं १९ व्या वचनात म्हटलं आहे: “ते श्वापद, पृथ्वीवरील राजे व त्यांची सैन्ये ही घोड्यावर बसलेल्या स्वाराबरोबर व त्याच्या सैन्याबरोबर लढाई करावयास एकत्र झालेली मी पाहिली.” (प्रकटीकरण १९:११-२१) या वचनाचा शब्दशः अर्थ आपण घेऊ नये; पण त्यातून आपल्याला एक गोष्ट मात्र स्पष्ट कळते: देव शत्रूंचा नाश करण्यासाठी देवदूतांची सेना पाठवेल.
बायबलमध्ये जगाच्या अंताविषयी सांगितलेली माहिती ही दुःखाची नव्हे तर आनंदाची आहे
अंत नेमका कशाचा?
१. अपयशी ठरलेल्या मानवी सरकारांचा अंत.
बायबल स्पष्ट म्हणतं: “स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करेल, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करेल व ते सर्वकाळ टिकेल.” (दानीएल २:४४) मागील तिसऱ्या मुद्द्यातील वचनात सांगितलं होतं की “घोड्यावर बसलेल्या स्वाराबरोबर व त्याच्या सैन्याबरोबर लढाई करावयास एकत्र” झालेले “पृथ्वीवरील राजे व त्यांची सैन्ये” यांचा नाश केला जाईल.—प्रकटीकरण १९:१९.
२. युद्ध, हिंसा आणि अन्यायाचा अंत.
देव संपूर्ण पृथ्वीवरील “लढाया बंद” करेल. (स्तोत्र ४६:९) त्यानंतर, “सरळ जनच देशांत वस्ती करतील; सात्विक जन त्यांत राहतील. दुर्जनांचा देशांतून उच्छेद होईल, अनाचाऱ्यांचे त्यांतून निर्मूलन होईल.” (नीतिसूत्रे २:२१, २२) देव म्हणतो: “पाहा, मी सर्व गोष्टी नवीन करतो.”—प्रकटीकरण २१:४, ५.
३. देवाची आणि मानवांची निराशा करणाऱ्या धर्मांचा अंत.
बायबलमध्ये म्हटलं आहे: “संदेष्टे खोटे संदेश देतात, त्यांच्या धोरणाने याजक अधिकार चालवतात ... पण अखेरीस [“अंत येईल तेव्हा”, NW] तुम्ही काय करणार?” (यिर्मया ५:३१) येशू ख्रिस्तानंही असं म्हटलं: “त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो, प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भुते घालवली, व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापुढून निघून जा.”—मत्तय ७:२१-२३.
४. आताच्या वाईट परिस्थितीला कारणीभूत असलेल्या आणि तिला पाठिंबा देणाऱ्या लोकांचा अंत.
येशू ख्रिस्तानं म्हटलं: “निवाडा हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती.” (योहान ३:१९) प्राचीन काळात नोहा नावाचा एक पुरुष होता जो देवाला विश्वासू होता; त्याच्या दिवसांतदेखील जागतिक नाश आला होता असं बायबलमध्ये सांगितलं आहे. “तेव्हाच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला; पण आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत; म्हणजे न्यायनिवाड्याचा व भक्तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहेत.”—२ पेत्र ३:५-७.
हे लक्षात घ्या की पुढं येणाऱ्या न्यायनिवाड्याची आणि नाशाच्या दिवसाची तुलना नोहाच्या दिवसांत झालेल्या नाशाशी करण्यात आली आहे. त्या वेळी कोणाचा नाश झाला होता? तेव्हा पृथ्वीचा नाही तर भक्तिहीन लोकांचा म्हणजे देवाच्या शत्रूंचा नाश झाला होता. त्याच प्रकारे पुढं देवाकडून न्यायनिवाड्याचा दिवस येणार आहे; त्यात देवाच्या इच्छेविरुद्ध काम करणाऱ्या त्याच्या शत्रूंचा नाश होईल. पण नोहा आणि त्याच्या कुटुंबाप्रमाणे देवाच्या मित्रांचा बचाव केला जाईल.—मत्तय २४:३७-४२.
देव जेव्हा सर्व वाईट गोष्टी काढून टाकेल तेव्हा पृथ्वी किती सुंदर बनेल याची कल्पना करा. यातून स्पष्ट होतं की बायबलमध्ये जगाच्या अंताविषयी सांगितलेली माहिती दुःखाची नव्हे तर आनंदाची आहे. तरी तुमच्या मनात असा प्रश्न येईल: ‘अंत कधी येईल ते बायबलमध्ये सांगितलं आहे का? तो जवळ आहे का? त्यातून माझा बचाव कसा होऊ शकेल?’ (w15-E 05/01)