वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w14 ४/१५ पृ. १७-२१
  • कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कुटुंबाच्या जबाबदाऱ्‍या आणि बायबलची तत्त्वे
  • निर्णयाचे दुष्परिणाम
  • चांगला व वाईट सल्ला
  • यहोवा आपले प्रयत्न यशस्वी करतो
  • युद्धाच्या बरोबरीचा जीवघेणा हल्ला
    सावध राहा!—१९९८
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • कौटुंबिक जीवन यशस्वी करणे
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • देवाला संतुष्ट करणारे कौटुंबिक जीवन
    देव आपल्याकडून काय अपेक्षितो
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
w14 ४/१५ पृ. १७-२१
मेरिलीन अगदी जड मनाने आपला नवरा जेम्स व मुलगा जिमी यांना सोडून नोकरीसाठी दुसऱ्‍या देशात जात आहे

कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही

“कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही, . . . तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही.”—मत्त. ६:२४.

तुम्हाला काय वाटते?

  • बायबलच्या तत्त्वांमुळे कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्‍यांबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगण्यास आपल्याला कशी मदत मिळते?

  • आपण फक्‍त यहोवाचीच सेवा करत आहोत हे आपल्या निर्णयांमुळे कसे दिसून येईल?

  • आपण यहोवाला जीवनात प्राधान्य देतो तेव्हा तो आपल्याला आशीर्वाद कसे देतो?

१-३. (क) आजच्या जगात बरेच लोक कोणत्या आर्थिक समस्यांना तोंड देतात आणि त्यांवर तोडगा काढण्यासाठी काही जण काय करतात? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.) (ख) मुलांच्या संगोपनाबाबत कोणत्या समस्या उद्‌भवू शकतात?

“माझे पती जेम्स, दररोज कामावरून पार थकून भागून घरी यायचे, पण त्यांच्या तुटपुंज्या पगारात फक्‍त आमच्या रोजच्या गरजाच भागायच्या,” असे मेरिलीन सांगते.a ती पुढे म्हणते: “मला त्यांचं ओझं जरा हलकं करायचं होतं आणि आमच्या मुलाला, जिमीला छानछान वस्तू घेऊन द्यायच्या होत्या ज्या त्याच्या शाळेतील मित्रांकडे होत्या.” मेरिलीनला तिच्या इतर नातेवाइकांनादेखील मदत करायची होती आणि भविष्यासाठी काही पैसे साठवून ठेवायचे होते. तिच्या बऱ्‍याच मैत्रिणी पैसे कमावण्यासाठी इतर देशांत जाऊन नोकरी करत होत्या. पण असे करण्याविषयी जेव्हा ती स्वतः विचार करायची तेव्हा तिच्या मनात मिश्र भावना यायच्या. असे का?

२ मेरिलीनचे तिच्या कुटुंबावर खूप प्रेम होते, आणि त्यामुळे त्यांना सोडून जायची व त्यांचा चांगला आध्यात्मिक नित्यक्रम बिघडायची तिच्या मनात धास्ती होती. तरीही तिने स्वतःशी असा तर्क केला की इतर जण नाही का कामासाठी काही काळ बाहेर देशात गेले आहेत व त्यांची कुटुंबेदेखील आध्यात्मिक रीत्या टिकून राहिली आहेत. पण तिच्या मनात प्रश्‍न होता की दुसऱ्‍या देशातून ती जिमीचे संगोपन कसे करणार? इंटरनेटचा वापर करून आपल्या मुलाला “प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात” यशस्वी रीत्या वाढवणे तिला शक्य होणार होते का?—इफिस. ६:४.

३ मेरिलीनने बाहेर देशात जाऊन काम करण्याबद्दल काही लोकांशी चर्चा केली. खरेतर तिने घर सोडून जावे अशी तिच्या पतीची मुळीच इच्छा नव्हती, पण तिची इच्छा असल्यास तो तिला अडवणार नाही असे त्याने म्हटले. मंडळीतील वडील व इतर बांधवांनी तिला न जाण्याचा सल्ला दिला, पण बऱ्‍याच बहिणींनी तिला बाहेर देशात जाण्याचे खूप प्रोत्साहन दिले. त्यांनी तिला म्हटले की, “तुझं तुझ्या कुटुंबावर प्रेम असेल तर तू नक्की जाशील. तू तिथं असूनसुद्धा यहोवाची सेवा करू शकतेस.” मेरिलीनच्या मनात अनिश्‍चितता असूनसुद्धा आपला पती जेम्स आणि मुलगा जिमी यांचा निरोप घेऊन ती दुसऱ्‍या देशात नोकरीसाठी निघून गेली. तिने जाताना असे वचन दिले की “मी तिथं जास्त काळ राहणार नाही.”

कुटुंबाच्या जबाबदाऱ्‍या आणि बायबलची तत्त्वे

४. बरेच लोक स्थलांतर का करतात, आणि बऱ्‍याच वेळा मुलांच्या संगोपनाची जबाबदारी कोणावर येते?

४ यहोवाची अशी मुळीच इच्छा नाही की त्याच्या सेवकांनी अतिशय गरिबीत राहावे. गरिबीवर मात करण्यासाठी स्थलांतर हा खूप जुना उपाय आहे. (स्तो. ३७:२५; नीति. ३०:८) कुलपिता याकोबाने उपासमार टाळण्याकरता आपल्या मुलांना अन्‍न विकत घेण्यासाठी इजिप्तला पाठवले होते.b (उत्प. ४२:१, २) पण आज जे लोक आपले घर सोडून जातात ते उपासमार होत असल्यामुळे असे करत नाहीत. असे असू शकते की ते कर्जाच्या डोंगराखाली दबले गेले आहेत. इतर जणांना आपल्या कुटुंबाचे राहणीमान वाढवायचे असते. या अस्थिर अर्थव्यवस्थेत पैसा कमावण्याचे आपले ध्येय साध्य करण्यासाठी बरेच लोक एकतर त्यांच्या देशातच किंवा इतर देशात जाऊन, आपल्या कुटुंबापासून वेगळे राहतात. बऱ्‍याच वेळा ते आपल्या लहान मुलांना एका पालकाच्या, मोठ्या भावंडाच्या, आजीआजोबांच्या, नातेवाइकांच्या किंवा मित्रांच्या जबाबदारीवर सोडून जातात. दुसऱ्‍या देशात जाऊन काम करणाऱ्‍यांना आपल्या जोडीदाराला किंवा मुलाला सोडून जाणे जरी दुःखदायक वाटत असले, तरी त्यांना असे वाटते की त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नाही.

५, ६. (क) आनंद आणि सुरक्षा यांविषयी येशूने काय शिकवले? (ख) येशूने आपल्या अनुयायांना कोणत्या भौतिक गोष्टींसाठी प्रार्थना करण्यास शिकवले? (ग) यहोवा आपल्याला कोणत्या अर्थाने आशीर्वाद देतो?

५ येशूच्या काळातही बरेच लोक गरीब व दरिद्री होते आणि त्यांना कदाचित असे वाटले असेल की त्यांच्याजवळ जर पैसा असता तर ते आनंदी व जास्त सुरक्षित असते. (मार्क १४:७) पण, लोकांनी धनसंपत्तीऐवजी दुसऱ्‍या एका गोष्टीवर भरवसा ठेवावा अर्थात सर्वकाळ टिकणाऱ्‍या धनाचा स्रोत असलेल्या यहोवावर निर्भर राहावे अशी येशूची इच्छा होती. त्याने त्याच्या डोंगरावरील प्रवचनात स्पष्ट केले की खरा आनंद आणि सुरक्षा भौतिक वस्तूंवर अवलंबून नाही, तसेच या गोष्टी आपल्या प्रयत्नांवरही अवलंबून नाहीत, तर आपल्या स्वर्गीय पित्यासोबतच्या आपल्या मैत्रिपूर्ण नातेसंबंधावर त्या अवलंबून आहेत.

६ आदर्श प्रार्थनेत येशूने आपल्याला आर्थिक सुरक्षेसाठी नाही तर आपल्या रोजच्या गरजांसाठी, “रोजची भाकर” मागण्यासाठी शिकवले. त्याने आपल्या ऐकणाऱ्‍यांना स्पष्टपणे म्हटले: “पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका. . . . तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा.” (मत्त. ६:९, ११, १९, २०) यहोवाने अभिवचन दिल्याप्रमाणे तो आपल्याला आशीर्वाद देईल असा भरवसा आपण बाळगू शकतो. देवाचा आशीर्वाद आपल्यावर असतो म्हणजे फक्‍त त्याची कृपादृष्टी आपल्यावर असते इतकेच नाही, तर आपल्या गरजा पुरवण्यासाठी यहोवा सक्रियपणे कार्यदेखील करतो. जीवनात खरा आनंद आणि सुरक्षा मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पैशावर नव्हे तर आपल्या प्रेमळ पित्यावर विसंबून राहणे.—मत्तय ६:२४, २५, ३१-३४ वाचा.

७. (क) मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी यहोवाने कोणावर सोपवली आहे? (ख) आईवडील दोघांनी मुलांसोबत वेळ घालवणे का गरजेचे आहे?

७ देवाचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटण्यात, कौटुंबिक जबाबदाऱ्‍यांकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहणे समाविष्ट आहे. मोशेच्या नियमात एक तत्त्व दिले होते जे आज ख्रिश्‍चनांना लागू होते: आईवडिलांनी स्वतः आपल्या मुलांना आध्यात्मिक प्रशिक्षण देण्याची गरज आहे. (अनुवाद ६:६, ७ वाचा.) देवाने ही जबाबदारी आई व वडील दोघांवर सोपवली आहे, आजीआजोबा किंवा इतर कोणावर नाही. राजा शलमोनाने असे म्हटले: “माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको.” (नीति. १:८) त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता की मुलांना शिकवताना व मार्गदर्शन देताना आईवडील दोघांनी प्रत्यक्ष उपस्थित असले पाहिजे. (नीति. ३१:१०, २७, २८) आईवडील यहोवाविषयी दररोज चर्चा करत असताना मुले ऐकतात आणि त्यांचे चांगले उदाहरण ते प्रत्यक्ष पाहतात. त्यांना आपल्या आईवडिलांकडून प्रामुख्याने याच मार्गांनी आध्यात्मिक प्रशिक्षण मिळते.

निर्णयाचे दुष्परिणाम

८, ९. (क) एक पालक जेव्हा कुटुंबापासून दूर राहतो तेव्हा सहसा कोणते बदल घडतात? (ख) वेगळे राहिल्यामुळे कोणते भावनिक व नैतिक नुकसान होऊ शकते?

८ दुसऱ्‍या देशात जाण्याआधी, त्यात कोणते धोके आहेत व कोणते त्याग करावे लागतील याचा सहसा लोक विचार करतात, पण कुटुंबाला सोडून गेल्यामुळे होणाऱ्‍या सर्व दुष्परिणामांचा अंदाज घेणे त्यांना शक्य नसते. (नीति. २२:३)c मेरिलीन घर सोडून गेल्यानंतर लगेच, आपल्या कुटुंबापासून वेगळे झाल्याची भावना तिचे मन खाऊ लागली. तिचा पती व मुलगा यांनाही तिची खूप आठवण येऊ लागली. तिचा मुलगा जिमी तिला नेहमी विचारायचा, “तू मला का सोडून गेली?” खरेतर, तिने ठरवले होते की काही महिन्यांसाठीच ती त्या देशात काम करेल. पण जेव्हा या महिन्यांचे रूपांतर अनेक वर्षांत झाले, तेव्हा तिच्या कुटुंबात होत असलेले बदल पाहून तिला अधिकच अस्वस्थ वाटू लागले. जिमी तिच्यापासून भावनिक रीत्या दुरावत चालला होता. खूप दुःखाने मेरिलीन म्हणते, “त्याचं माझ्यावर प्रेमच राहिलं नाही.”

९ पालक व मुले जेव्हा कुटुंब या नात्याने एकत्र राहत नाहीत तेव्हा भावनिक व नैतिक रीत्या त्यांचे नुकसान होऊ शकते.d मुले जितकी लहान असतील आणि वेगळे राहण्याचा काळ जितका जास्त असेल तितकेच जास्त नुकसान होईल. मेरिलीनने जिमीला सांगितले की ती जे काही करत आहे ते त्याच्या भल्यासाठीच आहे. पण जिमीला असे वाटायचे की त्याच्या आईने त्याला सोडून दिले आहे. सुरुवातीला ती घरात नसल्यामुळे तो चिडचिड करायचा, पण नंतर जेव्हा ती सुट्ट्यांसाठी घरी यायची तेव्हा ती घरी असल्यामुळे तो चिडचिड करायचा. ज्या मुलांचे पालक त्यांना एकटे सोडून बाहेर देशात काम करायला जातात त्यांच्या बाबतीत सहसा जे होते तेच जिमीच्या बाबतीतही झाले. आईचे ऐकावे व तिच्यावर प्रेम करावे, हे सांगण्याचा अधिकार आता तिला राहिला नाही, असे त्याला वाटू लागले.—नीतिसूत्रे २९:१५ वाचा.

मेरिलीन जेम्स व जिमीबरोबर इंटरनेटद्वारे बोलत आहे

तुम्ही इंटरनेटवर तुमच्या मुलाला मिठीत घेऊ शकत नाही (परिच्छेद १० पाहा)

१०. (क) पालक मुलांना भेटवस्तू देऊन स्वतःची कमी भरून काढण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मुलांवर काय परिणाम होतो? (ख) एक पालक जेव्हा आपल्या मुलाला किंवा मुलीला लांब राहून वाढवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यात कोणत्या गोष्टीची कमी असते?

१० मेरिलीनने घरच्यांसाठी पैसे आणि भेटवस्तू पाठवून तिची कमी भरून काढण्याचा प्रयत्न तर केला, पण तिला असे जाणवले की ती तिच्या मुलाला नकळतपणे आध्यात्मिक गोष्टी व कौटुंबिक नात्यांपासून दूर करत होती व भौतिक गोष्टींना जास्त महत्त्व देण्यास प्रवृत्त करत होती. (नीति. २२:६) जिमी तिला सांगायचा की, “तू परत येऊ नको, तू तिथेच राहा. फक्‍त माझ्यासाठी खेळणी पाठवत राहा.” मेरिलीनला या गोष्टीची जाणीव होऊ लागली की ती इंटरनेटद्वारे, पत्रांद्वारे, किंवा व्हिडिओ चॅट्‌सद्वारे तिच्या मुलाचे संगोपन करू शकत नाही. ती म्हणते, “तुम्ही इंटरनेटवर तुमच्या मुलाला मिठीत घेऊ शकत नाही किंवा त्याचा मुका घेऊ शकत नाही.”

कामाच्या ठिकाणी मेरिलीनला तिच्या मालकांच्या लैंगिक शोषणाला तोंड द्यावे लागते

जोडीदारापासून दूर राहिल्यामुळे तुमच्यासमोर कोणता धोका येऊ शकतो? (परिच्छेद ११ पाहा)

११. (क) नोकरी करण्यासाठी जोडीदारापासून वेगळे राहिल्यामुळे वैवाहिक जीवनावर कोणता परिणाम होतो? (ख) एका बहिणीला हे कसे लक्षात आले की तिने तिच्या कुटुंबासोबत राहणे जरुरीचे आहे?

११ मेरिलीनचा यहोवासोबतचा आणि तिचा पती जेम्स यांच्यासोबतचा नातेसंबंधही बिघडत चालला होता. ती आठवड्यातून एकदा किंवा त्याहून कमी वेळा ख्रिस्ती सभांना आणि क्षेत्र सेवेला उपस्थित राहू शकत होती. तिला तिच्या मालकाकडून अनैतिक कृत्य करण्याच्या दबावाचादेखील सामना करावा लागायचा. समस्यांचा सामना करत असताना त्यांबद्दल बोलायला जोडीदार जवळ नसल्यामुळे मेरिलीन आणि जेम्स दोघेही भावनिक रीत्या इतर व्यक्‍तींच्या जास्त जवळ गेले. त्यामुळे ते जवळजवळ अनैतिक कृत्य करण्याच्या मार्गावरच होते. मेरिलीनच्या लक्षात आले की तिने व तिच्या पतीने व्यभिचार केला नसला, तरी एकमेकांच्या भावनिक व शारीरिक गरजा पूर्ण करण्याच्या बायबलमधील मार्गदर्शनाचे ते पालन करू शकत नव्हते. अचानक मनात आलेला एखादा विचार आपल्या जोडीदाराला सांगणे, त्याच्याकडे पाहण्याद्वारे, स्मितहास्य करण्याद्वारे, हाताच्या स्पर्शाद्वारे, मिठीत घेण्याद्वारे एकमेकांबद्दल मनात असलेले “प्रेम” व्यक्‍त करणे किंवा वैवाहिक “हक्क” देणे त्यांना शक्य होत नव्हते. (गीत. १:२; १ करिंथ. ७:३, ५) आणि इतकेच नव्हे तर आपल्या मुलासोबत मिळून यहोवाची उपासना करणेही त्यांना शक्य होत नव्हते. मेरिलीन पुढे असे सांगते: “एका अधिवेशनात जेव्हा मी हे ऐकलं की यहोवाच्या महान दिवसात सुरक्षित राहायचं असेल तर कौटुंबिक उपासना अत्यंत महत्त्वाची आहे, तेव्हा मला हे समजलं की आता मी घरी गेलंच पाहिजे. मला पुन्हा माझ्या कुटुंबाच्या आध्यात्मिकतेला आणि आमच्या नातेसंबंधाला मजबूत करावं लागणार होतं.”

चांगला व वाईट सल्ला

१२. जे आपल्या कुटुंबापासून दूर राहत आहेत त्यांना शास्त्रवचनांतील कोणता सल्ला मदत करेल?

१२ मेरिलीनने जेव्हा घरी परतण्याचा विचार केला तेव्हा लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया दाखवली. तिने परदेशातील तिच्या मंडळीतील वडिलांना तिच्या निर्णयाबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी तिच्या विश्‍वासाची व धैर्याची प्रशंसा केली. पण जे लोक स्वतः नोकरी करण्यासाठी आपल्या कुटुंबापासून व जोडीदारापासून लांब राहत होते त्यांची प्रतिक्रिया मात्र वेगळी होती. तिच्या चांगल्या उदाहरणाचे अनुकरण करण्याऐवजी त्यांनी तिचा विचार बदलण्याचा प्रयत्न केला. ते तिला म्हणाले: “तू काही दिवसांतच इथं परत येशील. तू जर घरी परत गेलीस तर घरखर्च कसा चालवशील?” इतरांना निरुत्साहित करण्याऐवजी ख्रिस्ती बंधुभगिनींनी “तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की, त्यांनी आपल्या नवऱ्‍यावर व मुलाबाळांवर प्रेम करावे . . . घरचे काम पाहणाऱ्‍या,” स्वतःच्या घरचे काम पाहणाऱ्‍या असाव्यात “म्हणजे देवाच्या वचनांची निंदा होणार नाही.”—तीत २:३-५ वाचा.

१३, १४. यहोवाची इच्छा पूर्ण करण्याकरता कुटुंबातील सदस्यांच्या इच्छांच्या विरोधात जाण्यासाठी विश्‍वास असणे जरुरीचे का आहे? स्पष्ट करा.

१३ स्थलांतर करणाऱ्‍यांपैकी बऱ्‍याच लोकांचे संगोपन अशा संस्कृतीत झाले आहे जिथे कुटुंबातील सदस्यांप्रती, खासकरून आईवडिलांप्रती असलेली जबाबदारी पूर्ण करण्यावर खूप जोर देण्यात येतो. एका ख्रिश्‍चनाला देवाला आनंदित करण्यासाठी प्रचलित असलेल्या प्रथांच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या इच्छेच्या विरोधात जाण्यासाठी दृढ विश्‍वास असणे खूप महत्त्वाचे आहे.

१४ कॅरनच्या अनुभवाकडे लक्ष द्या, ती म्हणते: “जेव्हा माझ्या मुलाचा, डॉनचा जन्म झाला तेव्हा मी आणि माझे पती दोघंही परदेशात काम करत होतो आणि मी नुकतीच बायबल अभ्यास करण्यास सुरुवात केली होती. माझ्या कुटुंबातील सर्वांची अशी इच्छा होती की आम्ही आर्थिक रीत्या स्थिर होईपर्यंत मी डॉनचं पालनपोषण करण्यासाठी त्याला घरी माझ्या आईवडिलांकडे पाठवावं.” पण जेव्हा कॅरनने तिच्या नातेवाइकांना सांगितले की ती स्वतः तिच्या मुलाचे संगोपन करू इच्छिते तेव्हा त्यांनी व तिच्या पतीने तिची थट्टा केली व ती आळशी आहे असे म्हटले. कॅरन म्हणते: “खरं सांगायचं तर काही वर्षांसाठी डॉनला माझ्या आईवडिलांकडे पाठवण्यात काय चुकीचं आहे ते मला तेव्हा इतक्या स्पष्टपणे कळत नव्हतं. पण मला हे माहीत होतं की मुलांचं संगोपन करण्याची जबाबदारी यहोवानं मुलांच्या आईवडिलांवर सोपवली आहे.” कॅरन जेव्हा पुन्हा गर्भवती झाली तेव्हा सत्यात नसलेल्या तिच्या पतीने तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव आणला. कॅरनने पूर्वी जो चांगला निर्णय घेतला होता त्यामुळे तिचा विश्‍वास मजबूत झाला होता आणि तिने पुन्हा एकदा खंबीरपणे यहोवाला मान्य असलेला निर्णय घेतला. पूर्ण कुटुंब सोबत राहिल्यामुळे आता ती, तिचे पती व तिची मुले खूप आनंदी आहेत. पण जर कॅरनने तिच्या एक किंवा दोन्ही मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी दुसऱ्‍या कोणावर सोपवली असती तर त्याचा परिणाम असा झाला नसता.

१५, १६. (क) एका बहिणीचे उदाहरण सांगा जिचे लहानपणी तिच्या आजीआजोबांनी संगोपन केले होते. (ख) पण तिच्या मुलीबद्दलही तसेच करण्याचे तिने का टाळले?

१५ विकी नावाची एक बहीण म्हणते: “काही वर्षांसाठी माझ्या आजीआजोबांनी माझं संगोपन केलं, पण त्याच वेळी माझ्या आईवडिलांनी माझ्या लहान बहिणीला त्यांच्यासोबत ठेवलं. जेव्हा मी पुन्हा माझ्या आईवडिलांसोबत राहायला आले तेव्हा त्यांच्याप्रती असलेल्या माझ्या भावना बदलल्या होत्या. माझी बहीण अगदी मनमोकळेपणे त्यांच्याशी बोलायची, त्यांना मिठी मारायची आणि तिचा त्यांच्यासोबत खूप जवळचा नातेसंबंध होता. पण मी माझ्या आईवडिलांच्या इतकी जवळ नव्हते, मोठी झाल्यावरही माझ्या मनात असलेल्या भावना मी त्यांच्यासमोर व्यक्‍त करू शकत नव्हते. आम्ही दोघींनीही आईवडिलांना असं आश्‍वासन दिलं आहे की जेव्हा ते म्हातारे होतील तेव्हा आम्ही त्यांची काळजी घेऊ. मी त्यांची काळजी घेणं, हे माझं कर्तव्य म्हणून करेन पण माझी बहीण मात्र तिचं त्यांच्यावर प्रेम असल्यामुळे असं करेल.

१६ “आता माझ्या आईची अशी इच्छा आहे की जसं तिनं मला तिच्या आईकडं पाठवलं होतं तसंच मीही माझ्या मुलीला वाढवण्याकरता तिच्याकडं पाठवावं. मी अगदी समजदारपणे तिला नकार दिला. मला व माझ्या पतीला आमच्या मुलीचं यहोवाच्या मार्गात स्वतः संगोपन करायचं आहे. मला माझ्या मुलीसोबत असलेला माझा नातेसंबंध धोक्यात आणण्याची मुळीच इच्छा नाही,” असे विकी म्हणते. विकीने हे अनुभवले आहे की यहोवाला आणि बायबलमधील त्याच्या तत्त्वांना भौतिक गोष्टींपेक्षा व कुटुंबातील इतर लोकांच्या इच्छांपेक्षा जास्त महत्त्व दिल्यानेच यश प्राप्त होते. येशूने अगदी स्पष्टपणे सांगितले: “कोणीही दोन धन्यांची,” देवाची आणि धनाची “चाकरी करू शकत नाही.”—मत्त. ६:२४; निर्ग. २३:२.

यहोवा आपले प्रयत्न यशस्वी करतो

१७, १८. (क) कोणत्या बाबतीत ख्रिश्‍चनांसमोर नेहमीच पर्याय उपलब्ध असतो? (ख) पुढच्या लेखात कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करण्यात येईल?

१७ आपला पिता, यहोवा याने असे सांगितले आहे की जर आपण त्याच्या राज्याला आणि नीतिमत्त्व मिळवण्याला जीवनात प्रथम स्थानी ठेवले तर तो आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे त्या मिळवण्याकरता मदत करेल. (मत्त. ६:३३) म्हणून, खऱ्‍या ख्रिश्‍चनांसमोर नेहमी पर्याय उपलब्ध असतो. आपल्यासमोर कोणतीही समस्या आली तरी यहोवा त्यातून “निभावण्याचा” मार्ग नक्कीच काढेल असे त्याने अभिवचन दिले आहे. त्याने दाखवलेल्या मार्गानुसार केल्याने बायबलच्या तत्त्वांच्या विरोधात जाण्याची वेळ येत नाही. (१ करिंथकर १०:१३ वाचा.) आपण जेव्हा यहोवाची “प्रतीक्षा” करतो, प्रार्थनेत त्याच्याकडून बुद्धी व मार्गदर्शन मागण्याद्वारे त्याच्यावर “भाव ठेवतो” आणि त्याच्या आज्ञांचे व तत्त्वांचे पालन करतो तेव्हा तो आपल्या वतीने कार्य करतो. (स्तो. ३७:५, ७) आपण प्रामाणिकपणे फक्‍त त्याची, आपल्या एकच खऱ्‍या धन्याची सेवा करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो आपल्या श्रमाचे प्रतिफळ देतो. आपण जर त्याला आपल्या जीवनात प्रथम स्थान दिले तर तो आपले जीवन यशस्वी करेल.—उत्पत्ति ३९:३ पडताळून पाहा.

१८ कुटुंबापासून वेगळे राहिल्यामुळे जे नुकसान झाले आहे ते कसे भरून काढता येईल? विदेशात जाऊन काम करण्याऐवजी कुटुंबासोबतच राहून त्यांच्या गरजा भागवण्यासाठी कोणती व्यावहारिक पावले उचलता येतील? याबाबतीत योग्य निर्णय घेण्यासाठी आपण इतरांना प्रेमळपणे कसे उत्तेजन देऊ शकतो? पुढच्या लेखात या प्रश्‍नांवर चर्चा करण्यात आली आहे.

a काही नावे बदलण्यात आली आहेत.

b याकोबाची मुले प्रत्येक वेळी जेव्हा इजिप्तला गेली तेव्हा ती जास्तीतजास्त तीन आठवडे आपल्या कुटुंबांपासून दूर राहिली असावीत. नंतर जेव्हा याकोब आणि त्याची मुले इजिप्तमध्ये राहायला आली तेव्हा त्यांनी त्यांच्या पत्नींना व मुलांनाही आणले.—उत्प. ४६:६, ७.

c अवेक! फेब्रुवारी २०१३ यात प्रकाशित झालेला “इमिग्रेशन—ड्रीम्स ॲन्ड रियालिटीस” हा लेख पाहा.

d बऱ्‍याच देशांतील रिपोर्ट दाखवतात की नोकरी करण्यासाठी परदेशात जाऊन आपल्या जोडीदारापासून किंवा मुलांपासून वेगळे राहिल्यामुळे काही जणांच्या बाबतीत गंभीर समस्या उद्‌भवल्या आहेत. जसे की एका जोडीदाराने किंवा दोघांनी विश्‍वासघात, समलैंगिकता, किंवा अगदी जवळच्या नातेवाइकाशी अनैतिक संबंध ठेवणे यांसारख्या समस्या उद्‌भवल्या आहेत; तर मुलांमध्ये त्यांच्या वागण्यात व शैक्षणिक बाबतीत समस्या वाढणे, त्यांचे आक्रमक होणे, चिंता, नैराश्‍य किंवा आत्महत्या करण्याची वृत्ती वाढणे यांसारख्या समस्या उद्‌भवल्या आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा