वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w14 ४/१५ पृ. १३-१६
  • पूर्णवेळेच्या सेवेमुळे अनेक आशीर्वाद मिळाले

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पूर्णवेळेच्या सेवेमुळे अनेक आशीर्वाद मिळाले
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कसा बनलो यहोवाचा सेवक?
  • जीवनाला मिळालं नवं वळण
  • बेथेलला कसा आलो?
  • बेथेलमधल्या नेमणुका
  • लग्न करण्याची इच्छा
  • सेवेचे विशेषाधिकार
  • समाधानदायक व अर्थपूर्ण जीवन
  • मला आध्यात्मिक बांधवांसोबत काम करण्याची सुसंधी लाभली
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • बेथेल सेवा—अधिक स्वयंसेवकांची आवश्‍यकता
    आमची राज्य सेवा—१९९५
  • हे तुमच्याकरता सर्वात उत्तम करियर असू शकेल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • तुम्ही स्वतःला उपलब्ध करू शकाल का?
    आमची राज्य सेवा—२००३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
w14 ४/१५ पृ. १३-१६
रॉबर्ट आणि लरेन वॉलन

जीवन कथा

पूर्णवेळेच्या सेवेमुळे अनेक आशीर्वाद मिळाले!

रॉबर्ट वॉलन यांच्याद्वारे कथित

पूर्णवेळेच्या सेवेत घालवलेल्या ६५ वर्षांकडे मागे वळून पाहताना, मी अगदी प्रामाणिकपणे असं म्हणू शकतो की माझं जीवन आनंदी दिवसांची एक मालिकाच होती. अर्थात, दुःखाचे किंवा निराशेचे दिवस कधी आलेच नाहीत असा याचा अर्थ नाही. (स्तो. ३४:१२; ९४:१९) पण एकंदरीत पाहता, माझं जीवन अतिशय समाधानदायक आणि अर्थपूर्ण होतं असं मी म्हणेन.

मी ७ सप्टेंबर १९५० रोजी ब्रुकलिन बेथेल कुटुंबाचा सदस्य बनलो. त्या वेळी, बेथेल कुटुंबात १९-८० या वयोगटातील, वेगवेगळ्या देशांचे ३५५ बंधू व भगिनी होत्या. त्यांपैकी बरेच जण अभिषिक्‍त ख्रिस्ती होते.

कसा बनलो यहोवाचा सेवक?

१० वर्षांचे असताना रॉबर्ट वॉलन

दहा वर्षांचा असताना माझ्या बाप्तिस्म्याच्या वेळी

आनंदी देव यहोवा याची सेवा करण्यास माझ्या आईनं मला शिकवलं. तिनं यहोवाची सेवा करण्यास सुरुवात केली तेव्हा मी अगदी लहान होतो. १ जुलै १९३९ रोजी अमेरिकेतील नेब्रॅस्का राज्यातील कलंबस शहरात झालेल्या एका झोन संमेलनात (ज्याला आता विभागीय संमेलन म्हणतात) वयाच्या दहाव्या वर्षी माझा बाप्तिस्मा झाला. भाड्यानं घेतलेल्या एका सभागृहात आम्ही सुमारे शंभरेक जण “फॅसिझम ऑर फ्रीडम” या विषयावर जोसेफ रदरफर्ड यांनी दिलेल्या भाषणाचं रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी एकत्र जमलो होतो. भाषण सुरू असताना त्या लहानशा सभागृहाबाहेर लोकांची गर्दी जमली. ते जबरदस्तीनं सभागृहात घुसले आणि त्यांनी सभा बंद पाडली. त्यानंतर त्यांनी आम्हाला शहराबाहेर हाकलून लावलं. शहरापासून काही अंतरावर असलेल्या एका बांधवाच्या मळ्यात जाऊन आम्ही भाषणाचा उरलेला भाग ऐकला. या सर्व घटनांमुळे माझ्या बाप्तिस्म्याची तारीख मी आजपर्यंत कधीही विसरलो नाही!

लहानपणापासून मला सत्याविषयीचं ज्ञान देण्यासाठी माझ्या आईनं खूप मेहनत घेतली. माझे बाबा माणूस म्हणून आणि वडील म्हणून खूप चांगले होते, पण त्यांना देवाधर्मात किंवा मला देवाविषयी शिकवण्यात अजिबातच रस नव्हता. पण आईनं आणि ओमाहा मंडळीतल्या इतर साक्षीदारांनी मला नेहमी प्रोत्साहन दिलं, ज्याची मला त्या वेळी खूप गरज होती.

जीवनाला मिळालं नवं वळण

माझं शालेय शिक्षण पूर्ण होत आलं, तेव्हा पुढं काय करावं याविषयी निर्णय घेण्याची वेळ आली. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी माझ्या वयाच्या इतर मुलांसोबत वेकेशन पायनियर (ज्यांना आता सहायक पायनियर म्हणतात) म्हणून सेवा करायचो.

गिलियड प्रशालेच्या सातव्या वर्गातून नुकत्याच पदवीधर झालेल्या जॉन चिमिक्लिस आणि टेड जॅरझ या दोन तरुण अविवाहित बांधवांना आमच्या भागात प्रवासी कार्य करण्यासाठी नेमण्यात आलं होतं. ते दोघंही फक्‍त बावीस-तेवीस वर्षांचे होते हे समजल्यावर मला खूप आश्‍चर्य वाटलं. त्या वेळी मी १८ वर्षांचा होतो आणि लवकरच माझं शिक्षण पूर्ण होणार होतं. मला अजूनही आठवतं, बंधू चिमिक्लिस यांनी, “तुझा पुढं काय करण्याचा विचार आहे?” असं मला विचारलं. जेव्हा मी पूर्णवेळेची सेवा सुरू करण्याची इच्छा असल्याचं त्यांना सांगितलं तेव्हा ते मला म्हणाले, “हो, लगेच पूर्णवेळेची सेवा सुरू कर. कोण जाणे, तुझ्यासाठी कोणकोणते आशीर्वाद राखून ठेवले आहेत!” त्यांच्या या सल्ल्याचा तसंच त्या बांधवांच्या उदाहरणाचा माझ्या मनावर खोलवर ठसा उमटला. त्यामुळे, १९४८ मध्ये शिक्षण पूर्ण होताच मी पायनियर सेवेला सुरुवात केली.

बेथेलला कसा आलो?

१९५० सालच्या जुलै महिन्यात मी माझ्या आईवडिलांसोबत न्यू यॉर्क सिटीतल्या यँकी स्टेडियममध्ये भरवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला गेलो होतो. अधिवेशनात मी बेथेल सेवा करू इच्छिणाऱ्‍यांसाठी असलेल्या सभेला हजर राहिलो आणि मला बेथेलमध्ये सेवा करायला आवडेल असं पत्रात लिहून दिलं.

मी आईबाबांसोबत राहून पायनियर सेवा करत होतो. याला बाबांची हरकत नव्हती. पण राहण्याचा आणि खाण्यापिण्याचा थोडाबहुत खर्च मी द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे मी नोकरी शोधू लागलो. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला एके दिवशी बाहेर जात असताना मी टपालपेटीजवळ थांबलो. तिथं मला ब्रुकलिनहून माझ्यासाठी आलेलं एक पत्र मिळालं. पत्र नेथन एच. नॉर यांचं होतं. त्यांनी लिहिलं होतं: “तुम्ही बेथेल सेवेसाठी भरलेला अर्ज मिळाला. प्रभू तुम्हाला घेऊन जाईपर्यंत तुम्ही येथेच सेवा कराल असे आम्ही समजतो. तेव्हा, ७ सप्टेंबर १९५० रोजी १२४ कोलंबिया हाइट्‌स, ब्रुकलिन, न्यूयॉर्क या पत्त्यावर येऊन बेथेल सेवेस रुजू व्हावे.”

त्या दिवशी बाबा कामावरून घरी परतले तेव्हा मी त्यांना सांगितलं की मला नोकरी मिळाली. ते म्हणाले, “छान, कुठं काम करणार आहेस?” मी म्हटलं, “ब्रुकलिन बेथेलमध्ये, महिन्याला १० डॉलर प्रमाणं.” हे ऐकून खरंतर त्यांना धक्काच बसला, पण तरीही ते म्हणाले की मी स्वतःहून हे काम निवडलं असल्यामुळे मी ते प्रामाणिकपणे करावं आणि त्यात यशस्वी व्हावं. याच्या थोड्याच काळानंतर १९५३ साली यँकी स्टेडियममध्ये झालेल्या अधिवेशनात बाबांचा बाप्तिस्मा झाला!

रॉबर्ट वॉलन आणि अल्फ्‌रेड नस्रल्ला

माझा पायनियर सोबती, ॲल्फ्‌रेड नस्रल्ला याच्यासोबत

आनंदाची गोष्ट म्हणजे, ॲल्फ्‌रेड नस्रल्ला या माझ्या पायनियर सोबत्यालाही त्याच सुमारास बेथेल सेवेचं निमंत्रण मिळालं आणि आम्ही दोघं सोबतच ब्रुकलिनला गेलो. काही काळानं त्याचं लग्न झालं आणि तो व त्याची पत्नी जोॲन हे गिलियड प्रशालेला उपस्थित राहिले. त्यानंतर त्यांनी लेबनॉन इथं मिशनरी सेवा केली आणि मग प्रवासी कार्य करण्यासाठी अमेरिकेला परतले.

बेथेलमधल्या नेमणुका

बेथेलला आल्यावर सर्वात आधी मला बाईंड्रीमध्ये काम करायला सांगण्यात आलं, जिथं पुस्तकं शिवली जायची. मी ज्या पहिल्या प्रकाशनावर काम केलं, ते होतं व्हॉट हॅझ रिलिजन डन्‌ फॉर मॅन्काइंड? हे पुस्तक. बाईंड्रीमध्ये साधारण आठ महिने काम केल्यानंतर मला बंधू थॉमस जे. सल्लिव्हन यांच्या देखरेखीखाली सेवा विभागात काम करण्यासाठी नेमण्यात आलं. बंधू सल्लिव्हन यांच्यासोबत काम करणं अतिशय आनंददायक होतं आणि त्यांनी संघटनेत अनेक वर्षं काम करताना मिळवलेल्या आध्यात्मिक ज्ञानाचा व सुज्ञतेचा मला खूप फायदा झाला.

सेवा विभागात जवळजवळ तीन वर्षं पूर्ण झाली होती, तेव्हा फॅक्ट्रीचे काम पाहणारे बंधू मॅक्स लार्सन यांनी मला सांगितलं की बंधू नॉर यांना मला भेटायचं आहे. आपल्या हातून काही चूक तर झाली नसेल, अशी मला काळजी वाटू लागली. पण, बंधू नॉर यांनी येणाऱ्‍या नजीकच्या भविष्यात माझा बेथेल सोडण्याचा विचार तर नाही ना, एवढंच विचारण्यासाठी मला बोलावलं होतं असं सांगितलं तेव्हा मला हायसं वाटलं. खरंतर, त्यांना तात्पुरत्या काळासाठी त्यांच्या कार्यालयात काम करण्यासाठी एका बांधवाची गरज होती आणि मला हे काम करता येईल का हे त्यांना पाहायचं होतं. मी त्यांना सांगितलं की बेथेल सोडण्याचा माझा मुळीच विचार नाही. त्यानंतरची २० वर्षं मला त्यांच्या कार्यालयात काम करण्याचा विशेषाधिकार मिळाला.

मी कित्येक बांधवांना हे बोलून दाखवलं आहे, की बंधू सल्लिव्हन आणि बंधू नॉर, तसंच बेथेलमधले इतर बांधव जसे की मिल्टन हेन्शेल, क्लाउस जेन्सन, मॅक्स लार्सन, ह्‍यूगो रीमर आणि ग्रँट सूटर यांच्यासोबत काम करताना मला ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या त्या बाहेरच्या एखाद्या महाविद्यालयात पैसे देऊनही मला शिकायला मिळाल्या नसत्या.

मी ज्या बांधवांसोबत काम केलं ते सर्व यहोवाच्या संघटनेसाठी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं काम करायचे. बंधू नॉर यांना राज्याच्या कार्याचा शक्य तितक्या मोठ्या प्रमाणावर प्रसार व्हावा अशी इच्छा होती आणि यासाठी ते अहोरात्र परिश्रम घ्यायचे. त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्‍यांना त्यांच्याशी बोलण्यास कधीही भीती वाटत नसे. एखाद्या विषयावर आमचं त्यांच्यापेक्षा वेगळं मत असलं, तरीसुद्धा आम्ही अगदी मनमोकळेपणानं ते सांगू शकत होतो आणि यासाठी ते कधीही आमच्यावर रागवायचे नाहीत.

आपण ज्यांना क्षुल्लक गोष्टी समजतो त्यांच्याकडेही लक्ष देणं किती महत्त्वाचं आहे, याविषयी एकदा बंधू नॉर यांनी मला सांगितलं. उदाहरणार्थ, त्यांनी सांगितलं की जेव्हा ते फॅक्ट्रीच्या कामाची देखरेख करायचे तेव्हा बंधू रदरफर्ड त्यांना फोन करून सांगायचे: “बंधू नॉर, फॅक्ट्रीतून इकडे जेवायला येताना माझ्यासाठी काही खोडरबर आणा. मला काम करताना त्यांची गरज पडते.” बंधू नॉर यांनी सांगितलं की फोन खाली ठेवताच ते स्टेशनरीच्या वस्तू जिथं ठेवलेल्या असायच्या त्या खोलीत जायचे आणि खोडरबर घेऊन ते आपल्या खिशात ठेवायचे. मग दुपारी बंधू रदरफर्ड यांना कार्यालयात जाऊन ते खोडरबर द्यायचे. तशी ही लहानशीच गोष्ट होती, पण बंधू रदरफर्ड यांना त्यामुळं मदत व्हायची. मग बंधू नॉर यांनी मला सांगितलं: “मला माझ्या टेबलावर टोक केलेल्या पेन्सिली लागतात. तेव्हा, दररोज सकाळी तुम्ही त्या माझ्या टेबलावर ठेवाल का?” यानंतर बऱ्‍याच वर्षांपर्यंत मी त्यांच्या टेबलावर दररोज टोक केलेल्या पेन्सिली असतील याची खातरी केली.

एखादं काम करायला सांगितलं जातं तेव्हा लक्षपूर्वक ऐकणं किती गरजेचं आहे याविषयीही बंधू नॉर बरेचदा सांगायचे. एकदा त्यांनी एक विशिष्ट काम करण्यासंबंधी मला अगदी सुस्पष्ट सूचना दिल्या, पण मी त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं नाही. यामुळं माझ्या हातून चूक झाली आणि माझ्या चुकीमुळं त्यांची खूप फजिती झाली. मला याचं खूप वाईट वाटलं. म्हणून मी त्यांना थोडक्यात एक पत्र लिहिलं आणि माझ्या हातून झालेल्या चुकीबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्‍त केली. तसंच, दुसऱ्‍या एखाद्या विभागात माझी बदली करावी अशी विनंतीही केली. त्याच दिवशी सकाळी बंधू नॉर माझ्या टेबलाजवळ आले. ते म्हणाले, “रॉबर्ट, तुझं पत्र मी वाचलं. तुझ्या हातून चूक झाली आणि त्याविषयी मी तुझ्याशी बोललोदेखील. मला खातरी आहे की भविष्यात तू जास्त काळजीपूर्वक काम करशील. आता आपण दोघंही कामाला लागू या.” त्यांनी किती प्रेमळपणे आणि विचारीपणे ही बाब हाताळली हे पाहून मला खूप कृतज्ञ वाटलं.

लग्न करण्याची इच्छा

बेथेलमध्ये आठ वर्षं सेवा केल्यानंतर, बेथेल सेवा सोडून दुसरं काही करण्याचा माझा मुळीच विचार नव्हता. पण काही काळानं माझा हा विचार बदलला. १९५८ च्या सुमारास यँकी स्टेडियम व पोलो ग्राउंड्‌स इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाच्या वेळी मला लरेन ब्रुक्स भेटली. यापूर्वी, १९५५ मध्ये ती कॅनडातील माँट्रिऑल इथं पायनियर सेवा करत असताना आमची भेट झाली होती. पूर्णवेळेच्या सेवेबद्दल तिची मनोवृत्ती आणि यहोवाची संघटना जिथं कुठं पाठवेल तिथं जाऊन सेवा करण्याची तिची तयारी पाहून मी खूप प्रभावित झालो. लरेनचं गिलियड प्रशालेला उपस्थित राहण्याचं ध्येय होतं. १९५६ साली, ती २२ वर्षांची असताना तिला गिलियडच्या २७ व्या वर्गाचं आमंत्रण देण्यात आलं. पदवीधर झाल्यावर तिला ब्राझील इथं मिशनरी म्हणून नेमण्यात आलं. १९५८ मध्ये मी व लरेननं आमच्या मैत्रीला पुन्हा सुरुवात केली आणि मी तिला लग्नाची मागणी घातली तेव्हा तिनं होकार दिला. आम्ही पुढच्या वर्षी लग्न करून सोबत मिळून मिशनरी सेवा सुरू करण्याची योजना केली.

बंधू नॉर यांना जेव्हा मी माझ्या योजनेबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी असा सल्ला दिला की आम्ही आणखी तीन वर्षं थांबावं आणि मग लग्न करून ब्रुकलिन बेथेलमध्येच सेवा करावी. त्या वेळी, एखाद्या जोडप्याचं लग्न होताना जर त्यांच्यापैकी एकानं बेथेलमध्ये दहा किंवा त्यापेक्षा जास्त वर्षं सेवा केली असेल आणि दुसऱ्‍यानं कमीतकमी तीन वर्षं सेवा केली असेल तरच त्यांना लग्न झाल्यावर बेथेलमध्ये राहू दिलं जायचं. त्यामुळे, लरेन आमच्या लग्नाआधी दोन वर्षं ब्राझील बेथेलमध्ये आणि त्यानंतर एक वर्ष ब्रुकलिन बेथेलमध्ये सेवा करण्यास तयार झाली.

आमचं लग्न ठरल्यावर पहिली दोन वर्षं आम्ही फक्‍त पत्राद्वारे एकमेकांच्या संपर्कात राहू शकत होतो. त्या काळी फोनवर बोलणं परवडण्यासारखं नव्हतं आणि ई-मेलचा तर प्रश्‍नच नव्हता! १६ सप्टेंबर १९६१ या तारखेला आमचं लग्न झालं. आमच्या लग्नाचं भाषण बंधू नॉर यांनी दिलं ही आमच्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट होती. हे खरं आहे की दोनतीन वर्षांचा तो प्रतीक्षेचा काळ त्या वेळी आम्हाला खूप मोठा वाटला. पण आज जेव्हा आम्ही ५० पेक्षा जास्त वर्षांच्या आनंदी व समाधानी विवाहित जीवनाकडे मागे वळून पाहतो, तेव्हा त्या प्रतीक्षेचं सार्थक झालं असं आम्हाला वाटतं.

रॉबर्ट आणि लरेन वॉलन त्यांच्या लग्नाच्या दिवशी कुटुंबासोबत व मित्रांसोबत

आमच्या लग्नाच्या दिवशी. डावीकडून: नेथन एच. नॉर, पट्रीशा ब्रुक्स (लरेनची बहीण), लरेन व मी, कर्टिस जॉन्सन, फे व रॉय वॉलन (माझे आईबाबा)

सेवेचे विशेषाधिकार

१९६४ साली मला झोन ओव्हरसियर (परिमंडल पर्यवेक्षक) म्हणून इतर देशांना भेटी देण्याचा विशेषाधिकार मिळाला. त्या वेळी, अशा भेटी द्यायला जाताना पतींसोबत त्यांच्या पत्नींना पाठवलं जात नव्हतं. १९७७ मध्ये यात बदल करण्यात आला आणि पत्नीदेखील आपल्या पतींसोबत प्रवास करू लागल्या. त्या वर्षी लरेन व मी, ग्रँट व इडिथ सूटर यांच्यासोबत जर्मनी, ऑस्ट्रिया, ग्रीस, साइप्रस, टर्की व इझरायल या देशांतील शाखा कार्यालयांना भेटी दिल्या. मी आजवर जगातील जवळजवळ ७० देशांना भेटी दिल्या आहेत.

असेच एकदा १९८० साली आम्ही ब्राझीलला गेलो होतो, तेव्हा विषुववृत्तावर असलेल्या बेलेम या शहराला आम्ही भेट दिली. लरेननं पूर्वी इथं मिशनरी सेवा केली होती. मनाउस इथंही आम्ही बांधवांना भेटण्यासाठी थांबलो. तिथं एका स्टेडियममध्ये भाषण देण्यात आलं तेव्हा आम्हाला काही जणांचा एक गट वेगळा बसलेला दिसला. ब्राझीलमध्ये सहसा स्त्रिया एकमेकींना गालावर मुका घेऊन तर बांधव हातात हात देऊन अभिवादन करतात. पण हे लोक तसं करत नव्हते. आम्हाला प्रश्‍न पडला की असं का?

आम्हाला कळलं की ते ॲमेझॉनच्या जंगलात वसलेल्या कुष्ठरोग्यांच्या एका वसाहतीत राहणारे आपले प्रिय बांधव होते. इतरांचा विचार करून ते सभेला आलेल्या बांधवांना स्पर्श करण्याचं टाळत होते. पण आमच्या हृदयाला मात्र त्यांनी नक्कीच स्पर्श केला आणि त्यांच्या चेहऱ्‍यांवर ओसंडून वाहणारा आनंद आम्ही कधीही विसरू शकणार नाही! यशयाचे शब्द किती खरे आहेत: “माझे सेवक हर्षित चित्ताने जयजयकार करतील.”—यश. ६५:१४.

समाधानदायक व अर्थपूर्ण जीवन

रॉबर्ट आणि लरेन वॉलन बेथेलमध्ये सेवा करत असलेल्या एका तरुणाबरोबर बोलत असताना

लरेन व मी बरेचदा यहोवाच्या सेवेला समर्पित केलेल्या या सहा दशकांपेक्षा जास्त काळाबद्दल विचार करतो. यहोवाने त्याच्या संघटनेद्वारे आमच्या जीवनाला दिलेली दिशा स्वीकारल्यामुळे आम्हाला किती आशीर्वाद लाभले आहेत याचा विचार करून खूप आनंद होतो. आता मी पूर्वीसारखा जगभर प्रवास करू शकत नाही. पण, आजही मी नियमन मंडळाचा सहायक या नात्यानं संयोजक समिती व सेवा समितीसोबत कार्य करत आहे. जगभरातील आपल्या बांधवांची सेवा करण्यात जे थोडंबहुत योगदान देण्याची सुसंधी मला मिळाली आहे तिची मी मनापासून कदर करतो. “हा मी आहे, मला पाठीव” असं म्हणणाऱ्‍या यशयासारखीच मनोवृत्ती दाखवून आज किती मोठ्या संख्येनं तरुण व तरुणी पूर्णवेळेची सेवा करण्यासाठी पुढं येत आहेत हे पाहून आम्हाला खूप नवल वाटतं. (यश. ६:८) फार पूर्वी एका विभागीय पर्यवेक्षकानं मला म्हटलं होतं, “लगेच पूर्णवेळेची सेवा सुरू कर. कोण जाणे, तुझ्यासाठी कोणकोणते आशीर्वाद राखून ठेवले आहेत!” आज पूर्णवेळेची सेवा हाती घेणाऱ्‍या असंख्य तरुण बंधुभगिनींकडे पाहून हे शब्द किती खरे आहेत याची खातरी पटते.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा