धडा ३९
रक्ताबद्दल देवाचा दृष्टिकोन
रक्त हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण रक्ताशिवाय कोणीच जिवंत राहू शकत नाही. देवाने आपल्याला बनवलं असल्यामुळे आपण रक्ताचा वापर कसा केला पाहिजे ते सांगण्याचा अधिकार त्यालाच आहे. मग त्याने रक्ताबद्दल काय सांगितलंय? आपण खाण्यासाठी त्याचा वापर करू शकतो का? किंवा उपचारासाठी शरीरात रक्त चढवू शकतो का? याबाबतीत योग्य निर्णय तुम्ही कसे घेऊ शकता?
१. रक्ताबद्दल देवाचा काय दृष्टिकोन आहे?
जुन्या काळात यहोवाने त्याची उपासना करणाऱ्यांना सांगितलं होतं, की “प्रत्येक प्राण्याचं रक्त म्हणजेच त्याचं जीवन आहे.” (लेवीय १७:१४) यहोवाच्या नजरेत रक्त हे जीवनाला सूचित करतं. जीवन यहोवाकडून मिळालेली एक देणगी आहे. ते पवित्र आहे. म्हणून रक्तसुद्धा पवित्र आहे.
२. देवाने रक्ताबद्दल काय सांगितलंय?
ख्रिस्ती मंडळीची सुरुवात होण्याआधी, यहोवाने त्याच्या उपासकांना रक्त खाऊ नका अशी आज्ञा दिली होती. (उत्पत्ती ९:४ आणि लेवीय १७:१० वाचा.) आणि मग पुढे ख्रिस्ती मंडळीची सुरुवात झाल्यानंतर, यहोवाने त्याच्या उपासकांना या आज्ञेची पुन्हा आठवण करून दिली. नियमन मंडळाने त्यांना असं सांगितलं: ‘रक्तापासून दूर राहा.’—प्रेषितांची कार्यं १५:२८, २९ वाचा.
रक्तापासून दूर राहणं म्हणजे नेमकं काय? जर डॉक्टरने तुम्हाला मद्यपान करण्याची मनाई केली असेल, तर साहजिकच तुम्ही मद्य पिणार नाही. पण मद्य असलेले पदार्थ तुम्ही खाल का? किंवा शिरेवाटे ते शरीरात घ्याल का? नक्कीच नाही. तसंच यहोवानेसुद्धा आपल्याला रक्तापासून दूर राहायची आज्ञा दिली आहे. याचा अर्थ आपण रक्त खाऊ किंवा पिऊ नये. तसंच ज्या मांसातलं रक्त नीट काढलेलं नाही, असं मांस आपण खाऊ नये. यासोबतच आपण असे कोणतेही पदार्थ खाणार नाही, ज्यात रक्त मिसळलेलं आहे.
उपचारासाठी रक्ताचा वापर करण्याबद्दल काय? काही उपचार पद्धती स्पष्टपणे देवाच्या नियमाच्या विरोधात असतात. जसं की रक्त किंवा त्याच्या चार मुख्य घटकांपैकी कोणतंही घटक शरीरात चढवणं. ते मुख्य घटक म्हणजे, लाल रक्त पेशी, पांढऱ्या रक्त पेशी, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा. दुसरीकडे पाहता, काही उपचार पद्धती देवाच्या नियमाच्या विरोधात आहेत की नाहीत हे स्पष्ट नसतं. जसं की काही उपचार पद्धतींमध्ये रक्ताच्या मुख्य घटकांचे अंश वापरले जातात. तर अशाही काही उपचार पद्धती आहेत, ज्यात आपलं स्वतःचं रक्त वापरलं जातं. असे पर्याय स्वीकारावेत की नाही, याबाबतीत ज्याने त्याने स्वतःचा निर्णय घेतला पाहिजे.a—गलतीकर ६:५.
आणखी जाणून घेऊ या
रक्ताचा समावेश असलेल्या उपचार पद्धतींबद्दल निर्णय कसे घ्यावेत, यावर विचार करू या.
३. उपचारासंबंधी यहोवाला आवडतील असे निर्णय घ्या
उपचारासंबंधी तुम्ही देवाच्या इच्छेनुसार असलेले निर्णय कसे घेऊ शकता? व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेली पावलं उचलणं का महत्त्वाचं आहे यावर चर्चा करा.
बुद्धीसाठी प्रार्थना करा.—याकोब १:५.
बायबल तत्त्वांवर संशोधन करून ती कशी लागू करता येतील, यावर विचार करा.—नीतिवचनं १३:१६.
तुमच्याकडे कोणत्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत, याबद्दल माहिती काढा.
यांपैकी कोणत्या पद्धती तुम्ही मुळीच स्वीकारू शकत नाही, ते ठरवा.
तुम्ही जो काही निर्णय घ्याल, त्यामुळे तुमचा विवेक शुद्ध राहील याची खातरी करा.—प्रेषितांची कार्यं २४:१६.b
काही निर्णय आपण आपल्या विवेकाच्या आधारावर घेतले पाहिजे. दुसरं कोणीही आपल्यासाठी ते निर्णय घेऊ शकत नाही. मग तो आपला जोडीदार असो, मंडळीतला एखादा वडील असो किंवा आपला बायबल अभ्यास घेणारा भाऊ किंवा बहीण असो.—रोमकर १४:१२.
दुसऱ्यांना तुमचा निर्णय माहीत असावा म्हणून तो लिहून ठेवा.
४. यहोवाचे साक्षीदार चांगला उपचार घ्यायचा प्रयत्न करतात
रक्ताबद्दल देवाने दिलेल्या आज्ञेचं पालन करूनसुद्धा आपण चांगले उपचार घेऊ शकतो. व्हिडिओ पाहा.
तीत ३:२ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
आपण डॉक्टरांशी नम्रपणे आणि समजूतदारपणे का बोललं पाहिजे?
स्वीकारू शकत नाही |
वैयक्तिक निर्णय |
|---|---|
१. प्लाझ्मा |
प्लाझ्माचे अंश |
२. पांढऱ्या रक्त पेशी |
पांढऱ्या रक्त पेशींचे अंश |
३. प्लेटलेट्स |
प्लेटलेट्सचे अंश |
४. लाल रक्त पेशी |
लाल रक्त पेशींचे अंश |
५. रक्ताच्या अंशांबद्दलचे निर्णय
रक्ताचे चार प्रमुख घटक आहेत: लाल रक्त पेशी, पांढऱ्या रक्त पेशी, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा. याच घटकांचे बरेच छोटे-छोटे भाग असतात, ज्यांना रक्ताचे अंश म्हटलं जातं.c यांपैकी काही अंशांपासून औषधं तयार केली जातात, ज्यांचा उपयोग काही आजारांवर उपचार करण्यासाठी, तसंच रक्तस्राव थांबवण्यासाठी केला जातो.
रक्ताचे अंश घेण्याच्या बाबतीत प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने आपल्या बायबल प्रशिक्षित विवेकानुसार स्वतःचा निर्णय स्वतः घेतला पाहिजे. काही जण कदाचित रक्ताचे अंश असलेली औषधं किंवा उपचार पद्धती न स्वीकारण्याचा निर्णय घेतील. तर इतरांच्या विवेकाला त्या स्वीकारण्यात काही चुकीचं वाटणार नाही.
कोणताही निर्णय घेण्याआधी या प्रश्नावर विचार करा:
रक्ताचे काही अंश मी का स्वीकारतो किंवा का स्वीकारत नाही, हे मी डॉक्टरांना कसं समजावून सांगेन?
काही जण म्हणतात: “रक्त घेण्यात काय चुकीचंय? त्यामुळे तर जीव वाचतो.”
तुम्हाला काय वाटतं?
थोडक्यात
यहोवाची इच्छा आहे की आपण रक्ताचा चुकीचा वापर करू नये.
उजळणी
यहोवा रक्ताला पवित्र का समजतो?
‘रक्तापासून दूर राहा’ या देवाच्या आज्ञेप्रमाणे, शरीरात रक्त चढवणंही चुकीचं आहे असं आपण का म्हणू शकतो?
रक्ताचा समावेश असलेले उपचार स्वीकारताना आपण योग्य निर्णय कसे घेऊ शकतो?
हेसुद्धा पाहा
तुमच्या स्वतःच्या रक्ताचा वापर करणाऱ्या उपचार पद्धतींबाबतीत निर्णय घेताना, तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत?
रक्ताचे अंश घ्यावेत की नाही हे ठरवताना तुम्ही काय लक्षात घेतलं पाहिजे?
यहोवाचा रक्ताबद्दलचा दृष्टिकोन योग्य आहे याची खातरी एका डॉक्टरला कशी पटली?
“खून के बारे में मैंने परमेश्वर की सोच अपनायी” (ऑनलाईन लेख)
इस्पितळ संपर्क समितीत काम करणारे वडील भाऊ-बहिणींना कशी मदत करतात ते पाहा.
b मुद्दा ५ “रक्ताच्या अंशांबद्दलचे निर्णय” आणि काही विषयांवर स्पष्टीकरण क्र. ३ “रक्ताचा वापर करणाऱ्या उपचार पद्धती,” हे पाहा.
c काही डॉक्टर रक्ताच्या चार प्रमुख घटकांनाच रक्ताचे अंश (ब्लड फ्रॅक्शन्स) म्हणतात. म्हणून मग तुम्हाला डॉक्टरांना स्पष्टपणे सांगावं लागेल, की तुम्ही रक्त घेत नाही. तसंच, तुम्ही लाल रक्त पेशी, पांढऱ्या रक्त पेशी, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मासुद्धा घेत नाही. आणि हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे.