काही विषयांवर स्पष्टीकरण
१. मोठी बाबेल
१. मोठी बाबेल
“मोठी बाबेल” खोट्या धर्मांना सूचित करते हे आपल्याला कशावरून कळतं? (प्रकटीकरण १७:५) खाली दिलेल्या मुद्द्यांवर विचार करा:
तिचा प्रभाव संपूर्ण जगावर आहे. मोठ्या बाबेलबद्दल असं म्हटलंय, की ती ‘जनसमुदाय आणि राष्ट्रांवर’ बसली आहे. ती “पृथ्वीवरच्या राजांवर राज्य” करते.—प्रकटीकरण १७:१५, १८.
ती राजकीय शक्तींना किंवा व्यापार जगताला सूचित करू शकत नाही. तिचा नाश झाल्यानंतरही ‘पृथ्वीवरचे राजे’ आणि “व्यापारी” अस्तित्वात असतात.—प्रकटीकरण १८:९, १५.
ती देवाची बदनामी करते. तिला वेश्या म्हणण्यात आलंय. कारण ती पैशांसाठी किंवा इतर फायद्यांसाठी मानवी सरकारांसोबत संबंध जोडते. (प्रकटीकरण १७:१, २) ती सर्व राष्ट्रांतल्या लोकांना बहकवते. तसंच, पुष्कळ लोकांच्या मृत्यूसाठीसुद्धा ती जबाबदार आहे.—प्रकटीकरण १८:२३, २४.
धडा १३ मुद्दा ६ वर परत जाण्यासाठी
२. मसीहा कधी प्रकट होणार होता?
बायबलमध्ये असं सांगितलं होतं की ६९ आठवड्यांचा काळ लोटल्यानंतर मसीहा येईल.—दानीएल ९:२५ वाचा.
हे ६९ आठवडे कधी सुरू झाले? इसवी सन पूर्व ४५५ मध्ये. त्या वर्षी राज्यपाल नहेम्या शहर ‘पुन्हा बांधण्यासाठी आणि ते आधीच्या स्थितीला आणण्यासाठी’ यरुशलेमला आला होता.—दानीएल ९:२५; नहेम्या २:१, ५-८.
६९ आठवडे म्हणजे किती वर्षं? बायबलच्या काही भविष्यवाण्यांमध्ये एक दिवस एका वर्षाला सूचित करतो. (गणना १४:३४; यहेज्केल ४:६) या हिशोबाने प्रत्येक आठवडा सात वर्षांच्या काळाला सूचित करतो. अशा रितीने, या भविष्यवाणीमधले ६९ आठवडे म्हणजे ४८३ वर्षं (६९ x ७).
हे ६९ आठवडे कधी संपले? इसवी सन पूर्व ४५५ पासून जर ४८३ वर्षं मोजली, तर आपण इसवी सन २९ या वर्षापर्यंत येऊन पोहचतो.a याच वर्षी येशूचा बाप्तिस्मा झाला आणि तो मसीहा बनला.—लूक ३:१, २, २१, २२.
३. रक्ताचा वापर करणाऱ्या उपचार पद्धती
यहोवाचे साक्षीदार रक्त संक्रमण, तसंच रक्तदानसुद्धा करत नाहीत. पण काही उपचार पद्धतींमध्ये रुग्णाच्या स्वतःच्या रक्ताचा वापर केला जातो. यांपैकी काही उपचार पद्धती साक्षीदार स्वीकारत नाहीत; जसं की, कधीकधी शस्त्रक्रियेच्या आधी रुग्णाचं स्वतःचं रक्त काढून ते साठवून ठेवलं जातं.—अनुवाद १५:२३.
पण रुग्णाच्या स्वतःच्या रक्ताचा वापर करणाऱ्या इतर काही उपचार पद्धती स्वीकारायच्या की नाही, हे प्रत्येक साक्षीदार स्वतः ठरवू शकतो. जसं की रक्त चाचण्या, हिमोडायलसिस, हिमोडायल्युशन, तसंच सेल-साल्वेज किंवा हार्ट-लंग बायपास मशीनचा वापर करणाऱ्या उपचार पद्धती.b यांपैकी कोणत्याही वैद्यकीय प्रक्रियेत, चाचणीत किंवा उपचार पद्धतीत स्वतःच्या रक्ताचा नेमका कशा प्रकारे वापर केला जाईल, याबद्दल प्रत्येक साक्षीदाराने स्वतःचा निर्णय घेतला पाहिजे. या प्रक्रियांचा वापर करण्याची प्रत्येक डॉक्टरची पद्धत वेगवेगळी असू शकते. म्हणूनच कोणतीही शस्त्रक्रिया, वैद्यकीय चाचणी किंवा उपचार पद्धत स्वीकारण्याआधी, ‘माझ्या रक्ताचा नेमका कसा वापर केला जाईल’ हे त्या साक्षीदाराने डॉक्टरांकडून स्पष्टपणे समजून घेतलं पाहिजे. खाली दिलेल्या प्रश्नांवर विचार करा:
जर माझं रक्त शरीराबाहेर वळवलं जाणार असेल आणि जर काही वेळासाठी त्या प्रवाहात खंड पडणार असेल, तर काय? माझा विवेक या रक्ताला अजूनही माझ्याच शरीराचा भाग समजेल का, आणि म्हणून ते ‘जमिनीवर ओतण्याची’ गरज नाही असं मानण्याची परवानगी देईल का?—अनुवाद १२:२३, २४.
जर एका वैद्यकीय प्रक्रियेदरम्यान माझं स्वतःचं रक्त शरीराबाहेर काढून, त्यात काही फेरबदल करून (जसं की ते औषधासोबत मिसळून) पुन्हा माझ्या शरीरात वळवलं जाणार असेल (किंवा शरीरावर लावलं जाणार असेल), तर काय? मी अशी प्रक्रिया स्वीकारू शकतो का, की ती स्वीकारल्यामुळे माझ्या बायबल प्रशिक्षित विवेकाला त्रास होईल?
धडा ३९ मुद्दा ३ वर परत जाण्यासाठी
४. विवाह जोडीदारापासून विभक्त (वेगळं) होणं
बायबल विवाह जोडीदारापासून विभक्त होण्याचं प्रोत्साहन देत नाही. आणि ते स्पष्टपणे सांगतं की विभक्त झालेल्या दोन्ही जोडीदारांना पुन्हा लग्न करण्याचा हक्क नाही. (१ करिंथकर ७:१०, ११) पण विशिष्ट परिस्थितींमध्ये काही खऱ्या ख्रिश्चनांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय.
जाणूनबुजून कुटुंबाची जबाबदारी न घेणं: एखादा पती आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायला तयार नसतो. त्यामुळे त्याच्या कुटुंबाच्या मूलभूत गरजासुद्धा पूर्ण होत नाहीत.—१ तीमथ्य ५:८.
खूप जास्त मारहाण करणं: इतकी मारहाण केली जाते की जोडीदाराचं आरोग्य किंवा जीवसुद्धा धोक्यात येतो.—गलतीकर ५:१९-२१.
यहोवासोबतचं नातं तोडण्याचा पुरेपूर प्रयत्न करणं: इतका तीव्र विरोध केला जातो की जोडीदाराला यहोवाची उपासना करणं अशक्य होऊन जातं.—प्रेषितांची कार्यं ५:२९.
धडा ४२ मुद्दा ३ वर परत जाण्यासाठी
५. सणवार आणि समारंभ
खरे ख्रिस्ती यहोवाला न आवडणारे सण साजरे करत नाहीत. पण या सणांच्या वेळी येणाऱ्या वेगवेगळ्या परिस्थिती कशा हाताळायच्या हे प्रत्येक साक्षीदाराने स्वतः ठरवलं पाहिजे. यासाठी त्याने बायबलप्रमाणे प्रशिक्षित केलेल्या आपल्या विवेकाचा उपयोग केला पाहिजे. अशा काही परिस्थितींचा विचार करा.
कोणीतरी तुम्हाला सणाच्या शुभेच्छा देतं. तुम्ही फक्त “थँक्यू” म्हणू शकता. पण तुम्ही त्या सणात का भाग घेत नाही हे त्या व्यक्तीला जाणून घ्यायची खरंच इच्छा असेल, तर तुम्ही तिला जास्त माहिती देऊ शकता.
यहोवाचा साक्षीदार नसलेला तुमचा पती तुम्हाला सणाच्या निमित्ताने नातेवाइकांसोबत जेवणाच्या कार्यक्रमाला यायला सांगतो. जर तुमचा विवेक तुम्हाला जायची परवानगी देत असेल तर तुम्ही जाऊ शकता. पण तुम्ही आधीच तुमच्या पतीला स्पष्टपणे सांगू शकता, की जर त्या कार्यक्रमात बायबलच्या विरोधात असलेल्या प्रथा पाळल्या जाणार असतील तर तुम्ही त्यांत भाग घेणार नाही.c
सणाच्या दिवसांत तुमचा बॉस तुम्हाला बोनस देतो. तुम्ही तो बोनस घ्यायला नकार दिला पाहिजे का? हे गरजेचं नाही. पण निर्णय घेण्याआधी स्वतःला हे प्रश्न विचारा: ‘तुम्ही हा बोनस स्वीकारला तर तुम्ही सण साजरा करण्यात भाग घेत आहात असं तुमचा बॉस समजेल का? की फक्त तुमच्या चांगल्या कामाचं कौतुक म्हणून त्याने तो बोनस दिलाय?’
सणाच्या दिवसांत कोणीतरी तुम्हाला गिफ्ट देतं. गिफ्ट देणारा कदाचित म्हणेल: “मला माहीत आहे की तू हा सण साजरा करत नाहीस, पण मला द्यायची इच्छा होती.” कदाचित ती व्यक्ती फक्त प्रेमाने तुम्हाला ते गिफ्ट देत असेल. पण असं तर नाही ना, की ती व्यक्ती तुमची परीक्षा पाहण्यासाठी किंवा तुम्हाला त्या सणात सामील करण्यासाठी गिफ्ट देत आहे? या गोष्टींचा विचार केल्यानंतर ते गिफ्ट घ्यावं की नाही हे तुम्ही ठरवू शकता. आपण जो काही निर्णय घेतो त्यामुळे आपला विवेक शुद्ध राहिला पाहिजे आणि आपण यहोवाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे.—प्रेषितांची कार्यं २३:१.
धडा ४४ मुद्दा १ वर परत जाण्यासाठी
६. संसर्गजन्य रोग
आपलं इतरांवर प्रेम असल्यामुळे, आपल्याकडून कोणालाही संसर्गजन्य रोग होणार नाही याची आपण खास काळजी घेतो. जर आपल्याला एखादा संसर्गजन्य रोग झाला असेल, किंवा मग अशा रोगाचे जंतू आपल्या शरीरात आहेत असं वाटायचं काही कारण असेल, तरीही आपण ही काळजी घेतली पाहिजे. कारण बायबलमध्ये अशी आज्ञा दिली आहे: “आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखंच प्रेम करा.”—रोमकर १३:८-१०.
संसर्गजन्य रोग झालेली व्यक्ती या आज्ञेचं पालन कशी करू शकते? तिने इतरांना भेटताना स्वतःहून त्यांना स्पर्श करू नये; जसं की हात मिळवणं, मिठी मारणं किंवा मुका घेणं. तसंच, कोणी जर आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचा विचार करून अशा व्यक्तीला घरी बोलावलं नाही, तर तिने वाईट वाटून घेऊ नये. शिवाय, बाप्तिस्मा घेण्याआधी अशा व्यक्तीने आपल्या मंडळीतल्या वडील वर्गाच्या संयोजकाला आपल्या आजाराची आधीच कल्पना दिली पाहिजे. यामुळे बाप्तिस्मा घेणाऱ्या इतरांसाठी वेगळी व्यवस्था करता येईल. एखाद्या व्यक्तीला संसर्गजन्य रोग लागल्याची शक्यता असेल तर तिने लग्न ठरण्याआधी स्वतःहून ब्लड टेस्ट करून घेतली पाहिजे. हे सगळं करण्याद्वारे आपण दाखवतो की आपण ‘फक्त स्वतःच्याच नाही, तर इतरांच्या फायद्याचाही विचार करतो.’—फिलिप्पैकर २:४.
धडा ५६ मुद्दा २ वर परत जाण्यासाठी
७. पैशांचे व्यवहार आणि कायद्याशी संबंधित बाबी
पैशांशी संबंधित सगळे व्यवहार आणि निर्णय लेखी स्वरूपात केल्यामुळे बऱ्याच समस्या टाळता येतात. मग हे व्यवहार आपण मंडळीतल्या एखाद्या भावासोबत करत असलो तरी. (यिर्मया ३२:९-१२) सगळे व्यवहार लेखी स्वरूपात करूनसुद्धा कधीकधी मंडळीतल्या भाऊबहिणींमध्ये पैशांवरून किंवा इतर गोष्टींवरून छोटेमोठे वाद होऊ शकतात. असे मतभेद लवकरात लवकर, शांतीने आणि आपसांतच सोडवणं चांगलं राहील.
पण फसवणूक किंवा बदनामी करणं यांसारख्या गंभीर समस्या निर्माण झाल्या, तर आपण त्या कशा सोडवल्या पाहिजेत? (मत्तय १८:१५-१७ वाचा.) येशूने सांगितलं होतं, की यासाठी आपण तीन पावलं उचलली पाहिजेत:
१. आपसांतच तो वाद मिटवायचा प्रयत्न करा.—१५ वं वचन पाहा.
२. जर तो वाद मिटवता आला नाही, तर मंडळीतल्या एक किंवा दोन प्रौढ आणि अनुभवी बांधवांना आपल्यासोबत घेऊन जा.—१६ वं वचन पाहा.
३. जर असं करूनही समस्या सुटली नाही, तरच आपण मंडळीतल्या वडिलांकडे जाऊ शकतो.—१७ वं वचन पाहा.
शक्यतो, आपण भाऊबहिणींसोबत झालेले वाद मिटवण्यासाठी कोर्टात नाही गेलं पाहिजे. कारण यामुळे यहोवाची आणि मंडळीची बदनामी होऊ शकते. (१ करिंथकर ६:१-८) पण अशाही काही समस्या असतात, ज्या सोडवण्यासाठी आपल्याला कोर्टात जावं लागू शकतं. जसं की: घटस्फोटाबद्दल किंवा घटस्फोटानंतर मुलांचा ताबा मिळवण्याबद्दलचे प्रश्न, तसंच पोटगी, विमा, दिवाळखोरी किंवा मृत्युपत्र यांबद्दलच्या समस्या. अशा प्रकारच्या समस्या शक्य तितक्या शांतपणे सोडवण्यासाठी जर एक भाऊ कोर्टात गेला, तर तो बायबलच्या विरोधात वागत नाही.
पण क्वचित प्रसंगी एखादा गंभीर गुन्हा झालेला असतो, जसं की बलात्कार, मुलांचं लैंगिक शोषण, हल्ला, मोठी चोरी किंवा खून. अशा परिस्थितीत, जर एका बांधवाने सरकारी अधिकाऱ्यांची मदत घेतली तर तो बायबलच्या विरोधात वागत नाही.
a इसवी सन पूर्व ४५५ पासून इसवी सन पूर्व १ पर्यंत ४५४ वर्षं होतात. इसवी सन पूर्व १ पासून इसवी सन १ पर्यंत १ वर्ष होतं (कारण शून्य वर्ष नव्हतं). आणि इसवी सन १ पासून इसवी सन २९ पर्यंत २८ वर्षं होतात. जर आपण ४५४ + १ + २८ अशी बेरीज केली, तर एकूण ४८३ वर्षं होतात.
b या वैद्यकीय प्रकियांबद्दल जास्त माहितीसाठी १५ ऑक्टोबर, २००० च्या टेहळणी बुरूज मधला “वाचकांचे प्रश्न” हा लेख पाहा.
c हे तत्त्व दोन्ही जोडीदारांना लागू होतं.