धडा ३८
जीवनाच्या देणगीची कदर करा
जीवन खरंच खूप सुंदर आहे. कधीकधी आपल्यासमोर समस्या येतात हे खरंय, पण त्यावेळीसुद्धा आपण जीवनात काही सुंदर क्षणांचा आनंद घेऊ शकतो. या मौल्यवान देणगीची आपल्याला कदर आहे हे आपण कसं दाखवू शकतो? आणि असं करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण कोणतंय?
१. आपण जीवनाला मौल्यवान का समजलं पाहिजे?
जीवन हे आपल्या प्रेमळ पित्याने, यहोवाने दिलेली देणगी आहे. म्हणून आपण जीवनाला मौल्यवान समजलं पाहिजे. यहोवा “जीवनाचा उगम” आहे आणि त्यानेच सर्वकाही बनवलं. (स्तोत्र ३६:९) “तोच सगळ्यांना जीवन, श्वास आणि इतर सगळ्या गोष्टी देतो.” (प्रेषितांची कार्यं १७:२५, २८) जिवंत राहण्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट यहोवाने आपल्याला दिली आहे. पण इतकंच नाही, तर जीवनाचा आनंद घेण्यासाठीसुद्धा त्याने आपल्याला बऱ्याच चांगल्या गोष्टी दिल्या आहेत.—प्रेषितांची कार्यं १४:१७ वाचा.
२. आपण जीवनाच्या देणगीची कदर करतो हे आपण यहोवाला कसं दाखवू शकतो?
तुम्ही आईच्या गर्भात होता तेव्हापासूनच यहोवा तुमची काळजी घेतोय. देवाचा सेवक दावीद त्याला म्हणाला: “मी गर्भात होतो, तेव्हा तुझ्या डोळ्यांनी मला पाहिलं.” (स्तोत्र १३९:१६) यहोवा तुमच्या जीवनाला खूप मौल्यवान लेखतो. (मत्तय १०:२९-३१ वाचा.) जेव्हा कोणी मुद्दामहून दुसऱ्याचा किंवा स्वतःचा जीव घेतो,a तेव्हा यहोवाला खूप दुःख होतं. (निर्गम २०:१३) तसंच, जर आपण विनाकारण आपला जीव धोक्यात घातला, किंवा दुसऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली नाही, तर यहोवाला खूप वाईट वाटेल. पण जेव्हा आपण स्वतःची काळजी घेतो आणि दुसऱ्यांच्याही जिवाला मौल्यवान लेखतो, तेव्हा आपण दाखवून देतो की जीवनाच्या मौल्यवान देणगीची आपल्याला कदर आहे.
आणखी जाणून घेऊ या
जीवनाच्या देणगीची तुम्हाला कदर आहे हे तुम्ही कोणकोणत्या मार्गांनी दाखवू शकता, हे आता पाहू या.
३. आपल्या आरोग्याची काळजी घ्या
जेव्हा आपण यहोवाला समर्पण करतो, तेव्हा आपण आपलं संपूर्ण जीवन त्याच्या सेवेसाठी देतो. जणू काय आपण आपलं शरीर बलिदान म्हणून यहोवाला अर्पण करत असतो. रोमकर १२:१, २ वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण कोणतं असलं पाहिजे?
तुम्ही हे कोणकोणत्या मार्गांनी करू शकता?
४. स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेची काळजी घ्या
ज्यांमुळे आपल्याला आणि दुसऱ्यांना दुखापत होऊ शकते किंवा कोणाचा जीव जाऊ शकतो, अशा गोष्टी आपण नाही केल्या पाहिजे. आपल्या सुरक्षेची काळजी कशी घेता येईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा.
नीतिवचनं २२:३ वाचा, आणि खाली दिलेल्या परिस्थितींत तुम्ही तुमच्या आणि दुसऱ्यांच्या सुरक्षेची काळजी कशी घेऊ शकता यावर चर्चा करा:
घरात असताना.
कामाच्या ठिकाणी असताना.
खेळ खेळताना.
गाडी चालवताना किंवा गाडीने प्रवास करताना.
५. न जन्मलेल्या बाळाच्या जिवालाही मौल्यवान समजा
एक बाळ जेव्हा आईच्या पोटात वाढत असतं, तेव्हापासूनच यहोवाचं त्याच्याकडे लक्ष असतं. याविषयीचं सुंदर वर्णन दावीदने त्याच्या एका गीतात केलंय. स्तोत्र १३९:१३-१७ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
यहोवाच्या नजरेत एका बाळाच्या जीवनाची सुरुवात कधी होते, गर्भधारणेच्या वेळी की त्याच्या जन्मापासून?
जुन्या काळात यहोवाने इस्राएली लोकांना जे नियम दिले होते, त्यांमुळे आईचं आणि तिच्या न जन्मलेल्या बाळाचं संरक्षण व्हायचं. निर्गम २१:२२, २३ वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
जर कोणी एका न जन्मलेल्या बाळाचा नकळत जीव घेतला, तर त्याबद्दल यहोवाला कसं वाटायचं?
मग कोणी मुद्दामहून असं केलं तर त्याला कसं वाटेल?b
यहोवा जसा विचार करतो, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
जीवनाला मौल्यवान समजणाऱ्या एखाद्या स्त्रीलाही काही परिस्थितींमुळे असं वाटू शकतं, की गर्भपात करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही. यशया ४१:१० वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
एखाद्या स्त्रीवर जर गर्भपात करण्याचा दबाव असेल, तर तिने कोणाची मदत घेतली पाहिजे? आणि का?
काही जण म्हणतात: “कधीकधी परिस्थितीमुळे स्त्रिया गर्भपात करतात.”
आईसोबतच यहोवा तिच्या गर्भात असलेल्या बाळाच्या जिवालाही मौल्यवान समजतो, असं आपण खातरीने का म्हणू शकतो?
थोडक्यात
बायबल सांगतं, जीवन ही यहोवाकडून मिळालेली एक देणगी आहे. म्हणून आपण त्याला मौल्यवान समजलं पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे आणि ते सुरक्षित ठेवलं पाहिजे.
उजळणी
यहोवा मानवी जीवनाला मौल्यवान का लेखतो?
जेव्हा कोणी मुद्दामहून स्वतःचा किंवा दुसऱ्यांचा जीव घेतो, तेव्हा यहोवाला कसं वाटतं?
जीवनाची देणगी तुम्हाला मौल्यवान का वाटते?
हेसुद्धा पाहा
जीवनाच्या देणगीबद्दल आपण यहोवाचे आभार कसे मानू शकतो?
एखाद्या स्त्रीने जर गर्भपात केला असेल, तर देव तिला माफ करेल का, या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या.
आपण निवडलेल्या खेळांवरून हे कसं दिसून येईल की आपणही देवासारखंच जीवनाला मौल्यवान लेखतो?
आत्महत्येचे विचार येत असलेल्या व्यक्तीला त्यांमधून बाहेर पडायला बायबल कशी मदत करू शकतं?
“मला जगायचं नाही—आत्महत्येचे विचार येतात तेव्हा बायबलमधून मला काही मदत मिळेल का?” (वेबसाईटवरचा लेख)
a यहोवाला दुःखी आणि मनाने खचलेल्या लोकांची खूप काळजी आहे. (स्तोत्र ३४:१८) अशा मनस्थितीत असलेल्या लोकांच्या मनात कधीकधी आत्महत्येचा विचार येतो. पण त्यांच्या मनाला होणाऱ्या वेदनांची यहोवाला जाणीव आहे आणि त्यांना मदत करायची त्याला इच्छा आहे. त्याने कोणती मदत पुरवली आहे हे जाणून घेण्यासाठी “मला जगायचं नाही—आत्महत्येचे विचार येतात तेव्हा बायबलमधून मला काही मदत मिळेल का?” हा लेख वाचा. हा लेख या धड्यातल्या ‘हेसुद्धा पाहा’ या भागात दिलेला आहे.
b ज्यांनी आधी गर्भपात केला असेल त्यांनी स्वतःला अपराधी समजू नये. कारण यहोवा त्यांना माफ करायला तयार आहे. याबद्दल जास्त माहितीसाठी “गर्भपाताविषयी बायबल काय म्हणतं?” हा लेख पाहा. हा लेख या धड्यातल्या ‘हेसुद्धा पाहा’ या भागात दिलेला आहे.