बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीसोबत शेवटची चर्चा
सहसा, यहोवाच्या साक्षीदारांच्या संमेलनांमध्ये आणि अधिवेशनांमध्ये बाप्तिस्मा दिला जातो. बाप्तिस्म्याच्या भाषणाच्या शेवटी वक्ता बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्यांना उभं राहायला सांगतो आणि खाली दिलेल्या दोन प्रश्नांचं मोठ्या आवाजात उत्तर द्यायला सांगतो:
१. तुम्ही तुमच्या पापांबद्दल पश्चात्ताप करून यहोवा देवाला तुमचं जीवन समर्पित केलं आहे का आणि यहोवा देव येशू ख्रिस्ताद्वारे सर्वांचं तारण करणार आहे या गोष्टीचा स्वीकार केला आहे का?
२. बाप्तिस्मा घेतल्यामुळे तुम्हाला एक यहोवाचा साक्षीदार म्हणून ओळखलं जाईल आणि तुम्ही यहोवाच्या संघटनेचा भाग बनाल याची तुम्हाला जाणीव आहे का?
या दोन्ही प्रश्नांना होकार देऊन बाप्तिस्मा घेऊ इच्छिणारी व्यक्ती “सर्वांसमोर कबूल” करते, की तिचा खंडणी बलिदानावर विश्वास आहे. तसंच, तिने कोणतीही अट न ठेवता, आपलं जीवन यहोवाला समर्पित केलं आहे हेही ती सर्वांसमोर मान्य करते. (रोम. १०:९, १०) बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी आधीच या प्रश्नांवर प्रार्थनापूर्वक विचार केला पाहिजे. असं केल्यामुळे त्यांना अगदी मनापासून या प्रश्नांचं उत्तर देता येईल.
तुम्ही प्रार्थनेत यहोवाला आपलं जीवन समर्पित करून, फक्त त्याचीच उपासना करण्याचं, तसंच त्याच्या इच्छेला आपल्या जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व देण्याचं वचन त्याला दिलं आहे का?
आता संधी मिळताच, लवकरात लवकर बाप्तिस्मा घेतला पाहिजे, असं तुम्हाला अगदी मनापासून वाटतं का?
बाप्तिस्म्याच्या वेळी कोणत्या प्रकारचे कपडे घालणं योग्य आहे? (१ तीम. २:९, १०; योहा. १५:१९; फिलिप्पै. १:१०)
आपण “शालीनतेने व विचारशीलपणे” पेहराव केला पाहिजे. यामुळे आपण “देवाचे उपासक” आहोत हे दिसून येतं. म्हणून, बाप्तिस्मा घेणाऱ्यांनी अंगप्रदर्शन करणारे कपडे घालू नयेत. तसंच, ज्यांवर काही वाक्यं किंवा स्लोगन लिहिलेली असतात, असे कपडेही घालू नयेत. तर नीटनेटके, स्वच्छ आणि बाप्तिस्म्याच्या प्रसंगाला शोभतील असे शालीन कपडे घालावेत.
बाप्तिस्म्याच्या वेळी एका व्यक्तीची वागणूक कशी असली पाहिजे? (लूक ३:२१, २२)
ख्रिस्ती बाप्तिस्मा कसा असावा याबाबतीत येशूचा बाप्तिस्मा एक चांगलं उदाहरण आहे. बाप्तिस्मा ही एक गंभीर गोष्ट आहे याची त्याला जाणीव होती. त्याने त्याच्या वागण्यातून आणि मनोवृत्तीतून हे दाखवून दिलं. म्हणूनच, बाप्तिस्म्याच्या ठिकाणी अयोग्य प्रकारचे विनोद करणं, खेळणं, पोहणं, आणि प्रसंगाचं गांभीर्य निघून जाईल अशा प्रकारचं वागणं चुकीचं ठरेल. तसंच, नवीनच बाप्तिस्मा घेतलेल्या व्यक्तीने आपण मोठा विजय मिळवला आहे असं वागू नये. बाप्तिस्मा हा जरी आनंदाचा प्रसंग असला तरी आनंद व्यक्त करताना तो आदरणीय पद्धतीने व्यक्त केला पाहिजे.
नियमित सभेला गेल्यामुळे आणि भाऊबहिणींसोबत वेळ घालवल्यामुळे यहोवाला केलेल्या समर्पणाप्रमाणे जीवन जगायला तुम्हाला कशी मदत होईल?
बाप्तिस्म्यानंतर वैयक्तिक अभ्यासाचा आणि सेवाकार्यात नियमितपणे सहभाग घेण्याचा एक चांगला आराखडा असणं, का महत्त्वाचं आहे?
मंडळीच्या वडिलांसाठी सूचना
एक बाप्तिस्मा न घेतलेला प्रचारक बाप्तिस्मा घेण्याची इच्छा व्यक्त करतो, तेव्हा त्याला या पुस्तिकेतल्या पान १२-४७ वर असलेल्या “बाप्तिस्मा घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी प्रश्न” या भागाचा काळजीपूर्वक अभ्यास करण्याचं प्रोत्साहन द्या. त्याला पान ८ पासून सुरू होणारा “बाप्तिस्मा न झालेल्या प्रचारकासाठी दोन शब्द” हा भाग वाचायला सांगा. तिथे सांगितल्याप्रमाणे बाप्तिस्मा घेणारी व्यक्ती चर्चा चालू असताना तिच्या वैयक्तिक नोट्स वापरू शकते आणि पुस्तिका उघडी ठेवू शकते. वडिलांसोबत चर्चा करण्यासाठी कशी तयारी करावी हे त्यात सांगितलं आहे. शिवाय, वडिलांसोबत चर्चा करण्याआधी इतर कोणीही या प्रश्नांची उजळणी तिच्यासोबत करण्याची गरज नाही.
बाप्तिस्मा घेण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीने वडीलवर्गाच्या संयोजकाला याबद्दल सांगितलं पाहिजे. त्या व्यक्तीने “बाप्तिस्मा घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी प्रश्न” हा भाग वाचून काढल्यावर वडीलवर्गाचे संयोजक तिला विचारतील की तिने यहोवाच्या इच्छेप्रमाणे वागण्यासाठी प्रार्थनेत आपलं जीवन त्याला समर्पित केलं आहे का. जर तिने समर्पण केलं असेल तर वडीलवर्गाचे संयोजक “बाप्तिस्मा घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी प्रश्न” या भागाची त्या व्यक्तीसोबत चर्चा करण्यासाठी दोन वडिलांना नेमतील. दोन भागांपैकी एका भागावर एक वडील, तर दुसऱ्या भागावर दुसरे वडील चर्चा करतील. या चर्चा करण्यासाठी संमेलन किंवा अधिवेशनाची तारीख घोषित होईपर्यंत थांबण्याची गरज नाही.
दोन भागांची चर्चा एकेका तासाच्या दोन सत्रांत केली जाऊ शकते. पण जर गरज असेल तर आणखी वेळही घेतला जाऊ शकतो. प्रत्येक भागाच्या चर्चेची सुरुवात आणि शेवट प्रार्थनेने करावा. उजळणी करताना बाप्तिस्मा घेणाऱ्या व्यक्तीने किंवा वडिलांनी घाई करू नये. ज्या वडिलांना ही चर्चा करण्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी आपल्या आराखड्यात या चर्चेला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं पाहिजे.
वडिलांनी बाप्तिस्मा घेणाऱ्या सर्वांशी एकत्र मिळून चर्चा करण्याऐवजी प्रत्येकाबरोबर वैयक्तिकपणे चर्चा करणं चांगलं ठरेल. वडिलांनी बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांना प्रत्येक प्रश्न विचारावा. त्यामुळे त्यांना बायबलच्या शिकवणींची किती समज आहे, आणि ते बाप्तिस्मा घेण्यासाठी तयार आहेत की नाहीत, हेही स्पष्टपणे कळून येईल. आणि यामुळे बाप्तिस्मा घेणाऱ्यांनाही मोकळेपणाने बोलता येईल. बाप्तिस्मा घेणारं जोडपं असेल, तर त्यांचे प्रश्न एकत्र घेतले जाऊ शकतात.
बाप्तिस्मा घेणारी व्यक्ती बहीण असेल, तर इतरांना दिसेल पण ऐकू येणार नाही अशा ठिकाणी तिच्याशी चर्चा करण्यात यावी. आणि गरज असेल तर वडील आपल्यासोबत आणखी एका व्यक्तीला घेऊ शकतात. पण ती व्यक्ती वडील किंवा सहायक सेवक असली पाहिजे. पुढच्या परिच्छेदात सांगितल्याप्रमाणे ज्या भागावर चर्चा केली जाणार आहे त्यावरून हे ठरवलं जाऊ शकतं.
ज्या मंडळ्यांमध्ये कमी वडील असतील तिथे चांगली निर्णयक्षमता आणि समज असलेला सहायक सेवक “भाग १: ख्रिस्ती विश्वास” यात बाप्तिस्म्यासाठी असलेल्या प्रश्नांची उजळणी घेऊ शकतो. “भाग २: ख्रिस्ती जीवन” या भागाची उजळणी मात्र फक्त वडिलांनी घ्यावी. मंडळीत योग्य पात्रता असलेले पुरेसे बांधव नसतील तर विभागीय पर्यवेक्षकांना विचारून जवळच्या मंडळीतल्या वडिलांची मदत मागितली जाऊ शकते.
बाप्तिस्मा घेणारी व्यक्ती जर वयाने लहान असेल तर विश्वासात असलेले तिचे पालक उजळणी करताना सोबत असले पाहिजेत. पालकांना येणं शक्य नसेल तर दोन वडिलांनी (ज्या भागावर चर्चा चालू आहे त्याप्रमाणे एका वडिलाने किंवा एका सहायक सेवकाने) प्रत्येक भागाला उपस्थित असलं पाहिजे.
बाप्तिस्मा घेणाऱ्या व्यक्तीला बायबलच्या मुख्य शिकवणींची योग्य समज आहे की नाही याची वडील खात्री करतील. तसंच, त्या व्यक्तीला सत्याची मनापासून कदर आहे का आणि यहोवाच्या संघटनेबद्दल ती गाढ आदर दाखवते का हेही ते पाहतील. जर बाप्तिस्मा घेण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीला बायबलच्या मुख्य शिकवणींची समज नाही असं वडिलांना दिसलं, तर नंतर ती व्यक्ती बाप्तिस्मा घेण्याच्या पात्रतेची व्हावी म्हणून तिला वैयक्तिक मदत देण्याची व्यवस्था ते करतील. काही व्यक्तींना सेवाकार्यात आवेशी असणं आणि संघटनेच्या व्यवस्थेला अधीन राहणं किती महत्त्वाचं आहे, हे समजण्यासाठी आणखी वेळ देण्याची गरज असेल. एक व्यक्ती बाप्तिस्म्यासाठी तयार आहे की नाही हे ठरवण्यासाठी त्या एका तासातला वेळ कसा वापरायचा हे ठरवताना वडिलांनी समजूतदारपणा दाखवला पाहिजे. काही प्रश्नांवर चर्चा करताना जास्त वेळ लागू शकतो तर काही प्रश्नांना कमी वेळ लागेल. पण सर्व प्रश्न विचारणं गरजेचं आहे.
या प्रश्नांची चर्चा करण्यासाठी ज्या वडिलांना नेमलं आहे ते दुसऱ्या सत्रानंतर भेटतील आणि त्या व्यक्तीला बाप्तिस्मा घेऊ देणं योग्य आहे की नाही हे ठरवतील. असं करताना वडील प्रत्येकाची पार्श्वभूमी, क्षमता आणि इतर परिस्थितींचा विचार करतील. एखाद्याला यहोवाची मनापासून सेवा करायची आहे का आणि त्याला बायबलच्या मुख्य शिकवणी समजल्या आहेत का हेच वडिलांना खासकरून माहीत करून घ्यायचं असतं. तुमच्या प्रेमळ मदतीने, बाप्तिस्मा घेणारे आनंदाच्या संदेशाचे सेवक या नात्याने आपली महत्त्वाची जबाबदारी पार पाडू शकतील.
यानंतर, नेमलेले एक किंवा दोन्ही वडील त्या व्यक्तीला भेटतील आणि ती बाप्तिस्मा घ्यायला पात्र आहे की नाही हे तिला सांगतील. जर ती व्यक्ती पात्र असेल तर ते तिच्यासोबत पृ ५१-५३ वर असलेल्या “बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीसोबत शेवटची चर्चा” या भागाची चर्चा करतील. जर त्या व्यक्तीने कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकाचा अभ्यास पूर्ण केला नसेल तर तो बाप्तिस्म्यानंतर पूर्ण करावा असं उत्तेजन वडील तिला देतील. वडील त्या व्यक्तीला सांगतील, की मंडळीच्या प्रचारक अहवालात तिच्या नावाखाली तिच्या बाप्तिस्म्याच्या तारखेची नोंद केली जाईल. वडील त्या व्यक्तीला याची आठवण करून देतील, की या वैयक्तिक माहितीमुळे त्या व्यक्तीला मंडळीच्या कार्यात सहभाग घेणं आणि वडिलांकडून प्रोत्साहन आणि आध्यात्मिक मदत मिळणं शक्य होईल. यासोबतच वडील या गोष्टीची आठवण करून देऊ शकतात, की या वैयक्तिक माहितीचा वापर jw.org वर देण्यात आलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या ग्लोबल डेटा प्रोटेक्शन पॉलिसीप्रमाणे केला जाईल. ही चर्चा दहा मिनिटं किंवा त्यापेक्षा कमी वेळेत केली जावी.
प्रचारकाच्या बाप्तिस्म्याच्या एका वर्षांनंतर दोन वडील त्याची भेट घेतील आणि त्याला प्रोत्साहन आणि उपयुक्त सूचना देतील. त्या वडिलांपैकी एक त्या प्रचारकाच्या गटाचे पर्यवेक्षक असले पाहिजेत. बाप्तिस्मा घेतलेली व्यक्ती जर लहान असेल तर तिचे ख्रिस्ती पालक तिच्या सोबत असले पाहिजेत. ही भेट प्रेमळ आणि प्रोत्साहनदायक पद्धतीने घेतली जावी. या भेटीत वडील व्यक्तीच्या आध्यात्मिक प्रगतीची चर्चा करतील आणि वैयक्तिक अभ्यास व दररोज बायबलचं वाचन करणं, दर आठवडी कौटुंबिक उपासना करणं, नियमितपणे सभांना उपस्थित राहून त्यांत सहभाग घेणं आणि दर आठवडी सेवाकार्याला जाणं या सर्व गोष्टी करत राहण्यासाठी उपयुक्त सल्ला देतील. (इफिस. ५:१५, १६) जर त्या व्यक्तीने, कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकाचा अभ्यास अजून पूर्ण केला नसेल, तर कोणीतरी तिला मदत करावी अशी वडिलांनी व्यवस्था केली पाहिजे. वडिलांनी त्या व्यक्तीची प्रेमाने आणि भरभरून प्रशंसा करावी. सहसा एक किंवा दोन मुद्द्यांवर सल्ला किंवा सूचना देणं पुरेसं आहे.