बाप्तिस्मा घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी प्रश्न
भाग २ ख्रिस्ती जीवन
बायबलचा अभ्यास केल्यामुळे तुम्हाला समजलं आहे, की यहोवाच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत आणि तुम्ही त्याच्या नीतिमान स्तरांप्रमाणे कसं जगू शकता. बायबलमधून मिळालेल्या ज्ञानामुळे, तुम्ही तुमच्या वागण्याबोलण्यात आणि जीवनाबद्दल तुमच्या दृष्टिकोनात बरेच बदल केले असतील. आता तुम्ही यहोवाच्या नीतिमान स्तरांप्रमाणे जीवन जगण्याचा निश्चय केला असल्यामुळे, तुम्ही आनंदाच्या संदेशाचा सेवक बनायला पात्र आहात.
खाली दिलेल्या प्रश्नांची उजळणी केल्यामुळे तुम्हाला यहोवाचे नीतिमान स्तर मनात पक्के बसवण्यासाठी मदत मिळेल. तसंच, त्याचे सेवक या नात्याने त्याचं मन आनंदित करण्यासाठी तुम्ही कोणत्या काही गोष्टी केल्या पाहिजेत, याचीही तुम्हाला आठवण होईल. या माहितीमुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी शुद्ध विवेकाने आणि यहोवाच्या गौरवासाठी करणं किती महत्त्वाचं आहे हे समजेल.—२ करिंथ. १:१२; १ तीम. १:१९; १ पेत्र ३:१६, २१.
बायबलचा अभ्यास करून इथपर्यंत प्रगती केल्यामुळे, यहोवाच्या अधिकाराला अधीन होण्यासाठी आणि त्याच्या संघटनेचा भाग बनण्यासाठी तुम्ही नक्कीच उत्सुक असाल. मंडळीत, कुटुंबात किंवा या जगातल्या राजकारणाच्या बाबतीत यहोवाच्या व्यवस्थेला अधीन होण्याचा अर्थ तुम्हाला कितपत समजला आहे, हे जाणून घेण्यासाठी इथे दिलेले प्रश्न आणि बायबलमधली वचनं तुम्हाला मदत करतील. तसंच, यहोवाने आपल्या लोकांना आध्यात्मिक शिक्षण देण्यासाठी आणि त्यांचा विश्वास मजबूत करण्यासाठी ज्या व्यवस्था केल्या आहेत, त्यांबद्दल तुमची कदरही नक्कीच वाढेल. यांपैकी एक व्यवस्था म्हणजे मंडळीच्या सभा, ज्यांत उपस्थित राहण्याचा आणि सहभाग घेण्याचा तुम्ही होताहोईल तितका प्रयत्न केला पाहिजे.
यासोबतच, राज्य प्रचाराचं काम करून तुम्ही इतरांना यहोवाबद्दल आणि तो मानवांसाठी काय करत आहे, याबद्दल समजून घ्यायला मदत करू शकता. या भागातून तुम्हाला समजेल, की राज्य प्रचाराच्या या कामात नियमित सहभाग घेणं किती महत्त्वाचं आहे. (मत्त. २४:१४; २८:१९, २०) तसंच, तुम्ही यहोवा देवाला केलेलं समर्पण आणि तुमचा बाप्तिस्मा किती गंभीर गोष्ट आहे, याचीही तुम्हाला जाणीव होईल. यहोवाने तुम्हाला दाखवलेल्या अपार कृपेबद्दल तुम्ही प्रामाणिक मनाने जी कदर व्यक्त करता, ती तो नक्कीच मौल्यवान लेखतो.
१. विवाहाबद्दल ख्रिस्ती स्तर काय आहे? बायबलप्रमाणे कोणत्या एकमेव कारणामुळे एक जोडपं घटस्फोट घेऊ शकतं?
“तुम्ही वाचलं नाही का, की निर्माणकर्त्याने सुरुवातीपासूनच त्यांना स्त्री व पुरुष असं निर्माण केलं, आणि म्हटलं, की ‘या कारणामुळे, पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ती दोघं एकदेह होतील’? तर मग, आता ती दोन नाहीत तर एकदेह अशी आहेत. म्हणूनच, देवाने जे जोडलं आहे, ते कोणत्याही मनुष्याने वेगळं करू नये. . . . जो कोणी अनैतिक लैंगिक कृत्यांशिवाय इतर कोणत्याही कारणामुळे आपल्या पत्नीला घटस्फोट देतो आणि दुसऱ्या स्त्रीशी लग्न करतो, तो व्यभिचार करतो.”—मत्त. १९:४-६, ९.
२. पती पत्नी म्हणून सोबत राहणाऱ्यांचा कायदेशीर रीत्या विवाह का झालेला असला पाहिजे? तुम्ही विवाहित असाल, तर तुमचा विवाह कायदेशीर रीत्या योग्य आहे, आणि त्याला सरकारची मान्यता आहे याची तुम्हाला खात्री आहे का?
“त्यांना याची आठवण करून देत राहा, की त्यांनी सरकार आणि अधिकारी यांच्या अधीन व आज्ञेत राहावे.”—तीत ३:१.
“विवाहबंधनाचा सर्वांनी आदर करावा, आणि अंथरूण निर्दोष असावे, कारण अनैतिक लैंगिक कृत्ये आणि व्यभिचार करणाऱ्यांचा देव न्याय करेल.”—इब्री १३:४.
३. कुटुंबात तुमची काय भूमिका आहे?
“माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको.”—नीति. १:८.
“जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक . . . आहे, तसेच पतीसुद्धा पत्नीचे मस्तक आहे. पतींनो, ख्रिस्ताने ज्याप्रमाणे मंडळीवर प्रेम केले . . . त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा आपल्या पत्नींवर प्रेम करा.”—इफिस. ५:२३, २५.
“वडिलांनो, आपल्या मुलांना चीड आणू नका, तर त्यांना यहोवाच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवत राहा.”—इफिस. ६:४.
“मुलांनो, सर्व बाबतींत आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहा, कारण यामुळे प्रभूला आनंद होतो.”—कलस्सै. ३:२०.
“पत्नींनो, तुम्हीसुद्धा आपल्या पतींच्या अधीन राहा.”—१ पेत्र ३:१.
४. आपण जीवनाबद्दल आदर का दाखवला पाहिजे?
“[देव] सर्वांना जीवन, श्वास आणि इतर सर्व गोष्टी देतो. . . . कारण त्याच्यामुळेच आपण जिवंत आहोत व चालतो-फिरतो.”—प्रे. कार्ये १७:२५, २८.
५. आपण कोणाचीही, न जन्मलेल्या बाळाचीही हत्या का करू नये?
“माणसं एकमेकांशी मारामारी करत असताना, एखाद्या गरोदर स्त्रीला मार लागून . . . जीवहानी झाली, तर जिवाबद्दल जीव दिला जावा.”—निर्ग. २१:२२, २३, NW.
“मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले, आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते.”—स्तो. १३९:१६.
“परमेश्वर ज्यांचा द्वेष करतो अशा सहा गोष्टी आहेत . . . निर्दोष रक्त पाडणारे हात.”—नीति. ६:१६, १७.
६. रक्ताबद्दल देवाची काय आज्ञा आहे?
“रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी, . . . यांपासून दूर राहा.”—प्रे. कार्ये १५:२९.
७. आपल्या ख्रिस्ती भाऊबहिणींवर आपण प्रेम का केलं पाहिजे?
“मी तुम्हाला एक नवीन आज्ञा देतो, की एकमेकांवर प्रेम करा; जसं मी तुमच्यावर प्रेम केलं, तसंच तुम्हीही एकमेकांवर प्रेम करा. तुमचं एकमेकांवर प्रेम असलं, तर यावरूनच सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.”—योहा. १३:३४, ३५.
८. एखादा जीवघेणा, संसर्गजन्य रोग आपल्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला लागू नये म्हणून: (क) संसर्ग झालेल्या व्यक्तीने प्रेम व्यक्त करण्यासाठी मिठी मारणं किंवा मुका घेणं यांसारख्या गोष्टी का करू नयेत? (ख) कोणी त्याला आपल्या घरी न बोलवण्याचं ठरवलं, तर त्याने का रागावू नये? (ग) एखाद्याला संसर्गजन्य रोगाची लागण झाली असण्याची शक्यता असेल, तर लग्न करण्याच्या उद्देशाने गाठीभेटी सुरू करण्याआधी त्याने स्वतःहून रक्त तपासणी का करून घेतली पाहिजे? (घ) संसर्गजन्य रोग झालेल्या व्यक्तीने बाप्तिस्मा घेण्याआधी वडील वर्गाच्या संयोजकाला याबद्दल का सांगितलं पाहिजे?
“एकमेकांवर प्रेम करणे, याशिवाय कोणाचे काही देणे ठेवू नका. . . . ‘आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखंच प्रेम कर,’ . . . प्रेम आपल्या शेजाऱ्याचे वाईट करत नाही.”—रोम. १३:८-१०.
“फक्त स्वतःच्याच फायद्याचा विचार करू नका, तर इतरांच्या फायद्याचाही विचार करा.”—फिलिप्पै. २:४.
९. आपण इतरांना क्षमा करावी अशी अपेक्षा यहोवा आपल्याकडून का करतो?
“कोणाविरुद्ध काही तक्रार असली, तरी एकमेकांचे सहन करत राहा आणि एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करत जा. यहोवाने जशी तुम्हाला मोठ्या मनाने क्षमा केली आहे, तशी तुम्हीही केली पाहिजे.”—कलस्सै. ३:१३.
१०. एखाद्या बांधवाने तुमची बदनामी केली किंवा तुम्हाला फसवलं तर तुम्ही काय केलं पाहिजे?
“तुझ्या भावाने काही पाप केल्यास, एकांतात जाऊन त्याच्याशी बोल आणि त्याचा दोष त्याला दाखव. जर त्याने तुझं ऐकलं, तर तू आपल्या भावाला मिळवलं आहे. पण त्याने जर ऐकलं नाही, तर मग आपल्यासोबत आणखी एकदोन जणांना घेऊन त्याच्याकडे जा, म्हणजे दोन किंवा तीन जणांच्या साक्षीने प्रत्येक गोष्ट सिद्ध केली जाईल. जर त्याने त्यांचं ऐकलं नाही, तर मंडळीशी बोल. आणि जर त्याने मंडळीचंही ऐकलं नाही, तर मग त्याला विदेशी किंवा जकातदार याच्यासारखं समजलं जावं.”—मत्त. १८:१५-१७.
११. पुढे सांगितलेल्या पापांबद्दल यहोवा काय विचार करतो?
▪ लैंगिक अनैतिक कृत्यं
▪ उपासनेत मूर्तींचा वापर
▪ समलैंगिकता
▪ चोरी
▪ जुगार
▪ दारुडेपणा
“फसू नका. अनैतिक लैंगिक कृत्ये करणारे, मूर्तिपूजक, व्यभिचारी, पुरुषवेश्या, समलैंगिक कृत्ये करणारे पुरुष, चोर, लोभी, दारुडे, शिव्याशाप देणारे आणि इतरांना लुबाडणारे देवाच्या राज्याचे वारसदार होणार नाहीत.”—१ करिंथ. ६:९, १०.
१२. लैंगिक अनैतिक कृत्यांच्या (यांत वेगवेगळ्या प्रकारच्या विवाहबाह्य लैंगिक कृत्यांचा समावेश आहे) बाबतीत तुम्ही काय निश्चय केला आहे?
“अनैतिक लैंगिक कृत्यांपासून दूर पळा!”—१ करिंथ. ६:१८.
१३. वैद्यकीय उपचारांसाठी घेतलेली औषधं सोडून इतर कोणतेही व्यसन लावणारे किंवा गुंगी आणणारे पदार्थ आपण का घेऊ नयेत?
“तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र आणि देवाला स्वीकारयोग्य बलिदान म्हणून अर्पण करावीत. अशा रीतीने, तुम्हाला आपल्या विचारशक्तीने पवित्र सेवा करता येईल. आणि यापुढे या जगाच्या व्यवस्थेचे अनुकरण करू नका, तर आपली विचारसरणी बदलून स्वतःचे रूपांतर होऊ द्या; म्हणजे, देवाची उत्तम, स्वीकारयोग्य आणि परिपूर्ण इच्छा काय आहे याची तुम्हाला खातरी पटेल.”—रोम. १२:१, २.
१४. दुरात्म्यांशी संबंधित असलेल्या कोणत्या गोष्टी करण्याची देवाने मनाई केली आहे?
“चेटूक करणारा, शकुनमुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादूगार, वशीकरण करणारा, पंचाक्षरी, छाछू करणारा, अथवा मृतात्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा.”—अनु. १८:१०, ११.
१५. एखाद्याने गंभीर पाप केलं असेल आणि त्याला यहोवाची मर्जी पुन्हा मिळवायची असेल, तर त्याने लगेच काय केलं पाहिजे?
“मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले; मी आपली अनीती लपवून ठेवली नाही; मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो.”—स्तो. ३२:५.
“तुमच्यामध्ये कोणी आजारी आहे का? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी यहोवाच्या नावाने त्याला तेल लावून त्याच्यासाठी प्रार्थना करावी. आणि विश्वासाची प्रार्थना त्या मनुष्याला बरे करेल व यहोवा त्याला त्याच्या आजारातून उठवेल. शिवाय, त्याने पापे केली असली, तर त्याला क्षमा केली जाईल.”—याको. ५:१४, १५.
१६. एखाद्या ख्रिस्ती बांधवाने गंभीर पाप केल्याचं तुम्हाला माहीत असेल, तर तुम्ही काय केलं पाहिजे?
“साक्षीदाराने पाहिलेल्या किंवा त्याला माहीत असलेल्या बाबीविषयी त्याला प्रतिज्ञेवर विचारले असता त्याने ती न सांगण्याचे पाप केल्यास त्या अन्यायाबद्दल त्याने शिक्षा भोगावी.”—लेवी. ५:१.
१७. एखादी व्यक्ती आता यहोवाची साक्षीदार नाही अशी घोषणा केली जाते, तेव्हा आपण त्या व्यक्तीशी कसं वागलं पाहिजे?
“बंधू म्हटलेला कोणताही मनुष्य अनैतिक लैंगिक कृत्ये करणारा, लोभी, मूर्तिपूजक, शिव्याशाप देणारा, दारुडा, किंवा इतरांना लुबाडणारा असेल, तर अशा मनुष्याची संगत सोडून द्या, त्याच्यासोबत जेवायलाही बसू नका.”—१ करिंथ. ५:११.
“हे शिक्षण न देणारा कोणीही तुमच्याकडे आला, तर त्याला आपल्या घरात घेऊ नका किंवा त्याला नमस्कारही करू नका.”—२ योहा. १०.
१८. तुमचे जवळचे मित्र यहोवावर प्रेम करणाऱ्यांपैकीच का असले पाहिजे?
“सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.”—नीति. १३:२०.
“फसू नका. वाईट संगतीमुळे चांगल्या सवयी बिघडतात.”—१ करिंथ. १५:३३.
१९. यहोवाचे साक्षीदार राजकारणात कोणाचीही बाजू का घेत नाहीत?
“जसा मी जगाचा भाग नाही, तसे तेही जगाचा भाग नाहीत.”—योहा. १७:१६.
२०. तुम्ही सरकारच्या नियमांचं पालन का केलं पाहिजे?
“प्रत्येकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावे, कारण देवाकडून नाही असा कोणताही अधिकार नाही; जे काही अधिकार आहेत, ते देवानेच नेमले आहेत.”—रोम. १३:१.
२१. माणसांचे नियम देवाच्या नियमांच्या विरोधात असतात तेव्हा तुम्ही काय कराल?
“आम्ही माणसांपेक्षा देवाला आपला शासक मानून त्याची आज्ञा पाळली पाहिजे.”—प्रे. कार्ये ५:२९.
२२. नोकरी निवडताना बायबलमधली कोणती वचनं तुम्हाला या जगापासून वेगळं राहायला मदत करतील?
“यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.”—मीखा ४:३.
“माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या [मोठ्या बाबेलच्या] पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुमच्यावर तिच्या कोणत्याही पीडा येऊ नयेत म्हणून तिच्यामधून बाहेर या!”—प्रकटी. १८:४.
२३. तुम्ही कोणत्या प्रकारचं मनोरंजन निवडाल आणि कोणतं टाळाल?
“हिंसा ज्यांना प्रिय आहे, अशांचा [देव] द्वेष करतो.”—स्तो. ११:५, सुबोध भाषांतर.
“वाइटाचा द्वेष करा आणि चांगल्याला जडून राहा.”—रोम. १२:९.
“जे काही खरे, जे काही गांभीर्याने विचार करण्याजोगे, जे काही नीतिमान, जे काही शुद्ध, जे काही प्रिय मानण्यालायक, जे काही आदरणीय, जे काही सात्त्विक आणि जे काही प्रशंसनीय आहे, अशाच गोष्टींचा नेहमी विचार करत जा.”—फिलिप्पै. ४:८.
२४. यहोवाचे साक्षीदार इतर धार्मिक गटांसोबत उपासना का करत नाहीत?
“तुम्ही ‘यहोवाच्या मेजावरून’ आणि दुरात्म्यांच्याही मेजावरून जेवू शकत नाही.”—१ करिंथ. १०:२१.
“‘स्वतःला त्यांच्यापासून वेगळे करा,’ ‘आणि अशुद्ध वस्तूला स्पर्श करू नका’; ‘म्हणजे मी तुम्हाला स्वीकारेन,’ असे यहोवा म्हणतो.”—२ करिंथ. ६:१७.
२५. एखाद्या सोहळ्यात भाग घ्यावा किंवा नाही हे ठरवायला कोणती तत्त्वं तुम्हाला मदत करतील?
“ते त्या राष्ट्रांत मिसळले, आणि त्यांचे आचार शिकले, त्यांनी त्यांच्या मूर्तींची पूजा केली; त्या त्यांस पाशरूप झाल्या.”—स्तो. १०६:३५, ३६.
“मृतांस तर काहीच कळत नाही.”—उप. ९:५.
“जसा मी जगाचा भाग नाही, तसे तेही जगाचा भाग नाहीत.”—योहा. १७:१६.
“जगाच्या लोकांच्या इच्छेनुसार वागण्यात आतापर्यंत तुम्ही जो वेळ घालवला तो पुरे झाला. कारण तेव्हा तुम्ही निर्लज्ज वर्तन करत होता, अनियंत्रित वासनांच्या आहारी गेला होता, तसेच प्रमाणाबाहेर पिणे, बेलगाम मौजमस्ती, दारूबाजी आणि घृणित मूर्तिपूजा यांसारख्या गोष्टी करत होता.”—१ पेत्र ४:३.
२६. वाढदिवस साजरे करावेत की नाही, हे ठरवण्यासाठी बायबलमधली उदाहरणं तुम्हाला कशी मदत करतात?
“तिसऱ्या दिवशी फारोचा वाढदिवस आला, तेव्हा त्याने आपल्या सर्व चाकरांस मेजवानी दिली, आणि त्याने आपला प्यालेबरदारांचा नायक व आचाऱ्यांचा नायक यांना पुढे आणले. त्याने प्यालेबरदारांच्या नायकास त्याच्या हुद्यावर पूर्ववत् नेमले, . . . पण त्याने आचाऱ्यांच्या नायकास फाशी दिले.”—उत्प. ४०:२०-२२.
“हेरोदच्या वाढदिवसाच्या सोहळ्यात हेरोदियाची मुलगी नाचली, तेव्हा हेरोद इतका खूश झाला की त्याने शपथ घेऊन, ती जे काही मागेल ते तिला दिले जाईल असे वचन दिले. तेव्हा आपल्या आईच्या सांगण्यावरून ती म्हणाली: ‘मला एका थाळीत, बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचं डोकं आणून द्या.’ आणि त्याने तुरुंगात माणसे पाठवून योहानचे डोके कापले.”—मत्त. १४:६-८, १०.
२७. वडिलांच्या मार्गदर्शनाचं पालन केलं पाहिजे असं तुम्हाला का वाटतं?
“जे तुमचे नेतृत्व करत आहेत त्यांच्या आज्ञा पाळा आणि त्यांच्या अधीन राहा, कारण आपल्याला हिशोब द्यायचा आहे हे ओळखून ते तुमचे रक्षण करत आहेत; यासाठी की त्यांनी हे काम आनंदाने करावे, दुःखाने नाही; कारण तसे झाल्यास तुमचेच नुकसान होईल.”—इब्री १३:१७.
२८. तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने बायबल वाचण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी नियमितपणे वेळ का काढला पाहिजे?
“[जो] परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे; आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.”—स्तो. १:२, ३.
२९. तुम्हाला सभांना जायला आणि त्यांत सहभाग घ्यायला का आवडतं?
“मी आपल्या बांधवांजवळ तुझ्या नावाची कीर्ती वर्णीन; मंडळीत तुझे स्तवन करीन.”—स्तो. २२:२२.
“एकमेकांबद्दल विचारशील राहून आपण प्रेम आणि चांगली कार्ये करण्यासाठी एकमेकांना उत्तेजन देऊ या, आणि जशी काहींची रीत आहे, त्याप्रमाणे आपण आपले एकत्र येणे सोडू नये, तर एकमेकांना प्रोत्साहन देत राहावे आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे आपण पाहतो तसतसे हे आणखी जास्त करावे.”—इब्री १०:२४, २५.
३०. येशूने आपल्याला कोणतं सगळ्यात महत्त्वाचं काम दिलं आहे?
“म्हणून, जा आणि सर्व राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा आणि त्यांना . . . बाप्तिस्मा द्या, व मी तुम्हाला आज्ञा दिलेल्या सर्व गोष्टी त्यांना पाळायला शिकवा.”—मत्त. २८:१९, २०.
३१. राज्याच्या कामासाठी दान देताना किंवा आपल्या भाऊबहिणींना मदत करताना आपण कशी मनोवृत्ती ठेवल्यामुळे यहोवाला आनंद होईल?
“तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर.”—नीति. ३:९.
“प्रत्येकाने आपल्या मनात जसे ठरवले आहे, तसेच द्यावे; त्याने कुरकुर करत किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण आनंदाने देणारा देवाला आवडतो.”—२ करिंथ. ९:७.
३२. ख्रिस्ती कोणत्या समस्या येण्याची अपेक्षा करू शकतात?
“नीतिमत्त्वासाठी ज्यांचा छळ झाला आहे ते सुखी आहेत, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमचा अपमान व छळ करतात आणि तुमच्यावर सर्व प्रकारचे खोटे आरोप लावतात तेव्हा तुम्ही सुखी आहात. हर्ष करा आणि अतिशय आनंदित व्हा, कारण स्वर्गात तुम्हाला मोठं प्रतिफळ मिळेल; तुमच्या अगोदर होऊन गेलेल्या संदेष्ट्यांचाही त्यांनी असाच छळ केला होता.”—मत्त. ५:१०-१२.
३३. यहोवाचा साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा होणं हा एक विशेष सन्मान का आहे?
“तुझी वचने माझा आनंद, माझ्या जिवाचा उल्लास अशी होती; कारण हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे नाम घेऊन मी आपणास तुझा म्हणवतो.”—यिर्म. १५:१६.