नियमन मंडळाकडून पत्र
एकविसाव्या शतकात पदार्पण करत असताना, संपूर्ण जगभरातील ‘बंधुवर्गाला’ लिहिताना आणि तुमच्या परिश्रमांबद्दल तुमची प्रशंसा करताना आम्हाला आनंद वाटत आहे. (१ पेत्र २:१७) जवळजवळ २,००० वर्षांपूर्वी येशूने विचारले होते: “मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?” (लूक १८:८) गेल्या सेवा वर्षातील तुमचे आवेशपूर्ण कार्य येशूच्या या प्रश्नाचे होय असे उत्तर देते. तुमच्यातील काहींना तुमच्या विश्वासासाठी तुच्छ लेखण्यात आले, तुमची थट्टा करण्यात आली. अनेक ठिकाणी, तुम्ही युद्धे, संकटे, रोगराई किंवा दुष्काळ असूनही विश्वासूपणे सर्व सहन करीत आहात. (लूक २१:१०, ११) धार्मिक कार्यांबद्दलच्या तुमच्या आवेशामुळे येशूला अजूनही ‘पृथ्वीवर विश्वास आढळू शकतो.’ निश्चितच या कारणामुळे स्वर्गात जल्लोष होत आहे!
सहनशीलता दाखवणे इतके सोपे नाही याची आम्हाला जाणीव आहे. पश्चिम आशियातील एका देशातील आपल्या बांधवांवर आलेल्या परीक्षांचा विचार करा. त्या देशात तर यहोवाच्या साक्षीदारांविरुद्ध होणारी हिंसा ही काही नवीन गोष्ट नाही. अलीकडेच, ७०० लोक शांतपणे जमलेल्या एका संमेलनात पोलिस अचानक घुसले. रस्त्यांवर लावलेल्या अडथळ्यांमुळे १,३०० जण या संमेलनाला उपस्थित राहू शकले नाहीत. एक बुरखाधारी जमाव, ज्यांत काही पोलिसही होते, संमेलन होणाऱ्या ठिकाणी घुसला, अनेक उपस्थितांना मारहाण केली आणि संमेलनासाठी वापरल्या जाणाऱ्या ठिकाणी जाळपोळ केली. इतर काही प्रसंगी, धार्मिक कट्टरवाद्यांनी आपल्या बांधवांना खिळ्यांच्या दांडक्याने अगदी निर्दयीपणे मारले.
अशा प्रकारचे हल्ले धक्कादायक असले तरी आपल्यासाठी ते नवीन नाहीत. प्रेषित पौलाला असे लिहिण्यासाठी प्रेरित करण्यात आले होते: “ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल.” (२ तीम. ३:१२) पहिल्या शतकात, ख्रिश्चनांना शाब्दिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला; काहींना तर ठारही मारण्यात आले. (प्रे. कृत्ये ५:४०; १२:२; १६:२२-२४; १९:९) २० व्या शतकात हे खरे होते आणि २१ व्या शतकातही हे चालू राहील यात शंका नाही. परंतु, यहोवा आपल्याला सांगतो: “तुझ्यावर चालविण्याकरिता घडिलेले कोणतेहि हत्यार तुजवर चालणार नाही.” (यश. ५४:१७) किती हा अद्भुत दिलासा! होय, आपण यहोवासाठी इतके मौल्यवान आहोत की त्याचा संदेष्टा जखऱ्या याविषयी असे म्हणाला, की “जो कोणी तुम्हास स्पर्श करील तो त्याच्या [यहोवाच्या] डोळ्याच्या बुबुळालाच स्पर्श करील.” (जख. २:८) यहोवाच्या उपासकांच्या शत्रुंना कोणत्याही मार्गाने कायमचा विजय मिळणार नाही. खऱ्या उपासनेचाच विजय होणार आहे!
उदाहरणार्थ, पूर्वी उल्लेखलेल्या देशात, यहोवाच्या साक्षीदारांनी २००१ सेवा वर्षादरम्यान प्रचारकांच्या संख्येत दोन नवीन उच्चांक गाठले. होय, हालअपेष्टा होत असतानाही आपले बांधव इतर ठिकाणांप्रमाणे तेथेही टिकून आहेत. संपूर्ण जगभरात गेल्या सेवा वर्षात दर आठवडी, यहोवाला आपल्या जीवनाचे समर्पण म्हणून ५,०६६ जणांचा बाप्तिस्मा झाला. इतरांप्रमाणे या नवीन लोकांनीही आता, “देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार . . . परिपूर्ण व दृढनिश्चयी असे स्थिर” राहण्याचा निश्चय केला आहे.—कलस्सै. ४:१२.
तसेच, ग्रीसमधील अलीकडील घडामोडींचा विचार करा. वर्षानुवर्षे, कर्मठ ग्रीक चर्चकडून कडा विरोध होत असूनही यहोवाच्या साक्षीदारांना आता सरकारकडून “प्रचलित धर्म” म्हणून मान्यता मिळाली आहे. ही मान्यता देणाऱ्या दस्तऐवजात पुढे म्हटले होते, की ग्रीसच्या बेथेलच्या इमारती “पवित्र व पूजनीय ठिकाण आहे जे देवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे.” आम्हाला तुम्हास हेही सांगायला आनंद वाटत आहे की, गेल्या सेवा वर्षात न्यायालयांनी, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, जपान, बल्गेरिया, रशिया आणि रोमानिया या देशांमधील आपल्या उपासनेवर परिणाम होऊ शकणारे अनुकूल कायदेशीर निर्णय दिले. आपण यहोवाचे आभार मानू या की त्याने या देशांत प्रचाराचे कार्य चालू ठेवले आहे!
या शेवटल्या दिवसांत यहोवा ज्या मार्गांनी आपल्या लोकांच्या पाठीशी उभा राहतो यावर आपण विचार करतो तेव्हा आपल्याला दिसून येते, की त्याच्यासारखा सर्वोत्तम मित्र आपल्याला शोधून सापडणार नाही. त्याच्याबरोबर नातेसंबंध ठेवल्याने आपल्याला आनंद मिळतो कारण तो आपल्यावर प्रेम करतो, आपल्याला शिकवतो, आपली सुधारणूक करतो. अर्थात विश्वासाच्या परीक्षा ह्या येतच राहतील. परंतु यहोवावरील आपला अढळ विश्वास आपल्याला या सर्व परीक्षांमध्ये टिकून राहायला मदत करील. याकोबाने लिहिले: “माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हांला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हांस ठाऊक आहे की, तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो.” (याको. १:२, ३) शिवाय, आपल्या धीरावरून, आपले यहोवावर किती प्रेम आहे हे दिसून येते आणि यातून आपल्याला आनंद मिळतो! तेव्हा प्रिय बंधूभगिनींनो, यहोवा आपल्या प्रत्येकाच्या पाठीशी उभा आहे ही खात्री बाळगा. आपण विश्वासू राहिलो तर तो नक्कीच आपल्याला नवीन जगात नेईल. आपण यशस्वी व्हावे अशी त्याची इच्छा आहे.
यास्तव, तुम्ही सर्व तरुण वा वृद्ध, आम्ही तुम्हाला आर्जवतो, की तुम्ही आपल्यापुढे असलेल्या अद्भुत आशीर्वादांकडे आपले लक्ष लावा. “आपल्यासाठी जे गौरव प्रगट होणार आहे त्याच्यापुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाही असे मी मानतो,” असे लिहिणाऱ्या प्रेषित पौलाप्रमाणे मनोवृत्ती ठेवा. (रोम. ८:१८) कोणत्याही प्रकारच्या संकटाचा सामना करताना यहोवावर अवलंबून राहा. धीर धरा, हार मानू नका. तुम्हाला कधीही पस्तावा होणार नाही. देवाचे वचन आपल्याला आश्वासन देते: “धार्मिक तर आपल्या विश्वासाने वाचेल.”—हब. २:४.
आपले बांधव,
यहोवाच्या साक्षीदारांचे नियमन मंडळ