वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w26 फेब्रुवारी पृ. १४-१९
  • बाप्तिस्मा घेण्यासाठी प्रगती करत राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बाप्तिस्मा घेण्यासाठी प्रगती करत राहा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • काही जण का कचरतात?
  • यहोवाचा दिवस डोळ्यांपुढे ठेवणं का गरजेचंय?
  • तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो?
  • बाप्तिस्म्याचा अर्थ समजून घ्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
  • तुम्ही यहोवाला समर्पण करायला तयार आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • बाप्तिस्म्यानंतरही येशूच्या ‘मागे चालत राहा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • बाप्तिस्मा घ्यायला उशीर लावू नका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
w26 फेब्रुवारी पृ. १४-१९

२०-२६ एप्रिल, २०२६

गीत ४९ यहोवाचं मन आनंदित करा

बाप्तिस्मा घेण्यासाठी प्रगती करत राहा

“आताच विशेषकरून कृपेचा काळ आहे.”—२ करिंथ. ६:२.

या लेखात:

यहोवासोबत मैत्री करायची आणि बाप्तिस्मा घ्यायची हीच योग्य वेळ का आहे ते पाहा.

१. (क) बाप्तिस्म्यामुळे आपल्याला कोणते फायदे होतात? (ख) आपण या लेखात काय पाहणार आहोत?

तुम्ही तुमचं जीवन यहोवाला समर्पित करून बाप्तिस्मा घेतालाय का? जर असं असेल, तर तुम्ही प्रार्थनेत यहोवाला तुमच्या पापांची क्षमा मागितली असेल आणि कायम त्याची सेवा करायची इच्छा व्यक्‍त केली असेल. (१ पेत्र ३:२१) यात काही शंका नाही, की हा तुमच्या आयुष्यातला सगळ्यात चांगला निर्णय आहे! हे पाऊल उचलून तुम्ही तुमच्या मंडळीतल्या सगळ्यांसमोर, खासकरून नवीन लोकांसमोर एक चांगलं उदाहरण मांडलं आहे. पण अजून तुमचा बाप्तिस्मा झाला नसेल तर काय? हे खरंय, की तुमचं यहोवावर प्रेम आहे आणि तुम्हाला त्याची सेवा करायची इच्छा आहे. तुम्हाला हेही माहीत आहे, की पापांची क्षमा मिळवायला आणि यहोवाला खूश करायला बाप्तिस्मा घेणं गरजेचंय. (प्रे. कार्यं २:३८-४०) पण काही कारणांमुळे कदाचित तुम्ही बाप्तिस्मा घ्यायला कचरत असाल. म्हणून या लेखात आपण तीन प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत. (१) काही लोक बाप्तिस्मा घ्यायला का कचरतात? (२) यहोवाचा दिवस डोळ्यांपुढे ठेवणं का गरजेचंय? आणि (३) उशीर न करता बाप्तिस्मा घेतल्यामुळे तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो? या प्रश्‍नांवर चर्चा केल्यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला नक्कीच मदत होईल.

काही जण का कचरतात?

२. काही लोक बाप्तिस्मा घ्यायला का कचरतात?

२ काही जण भीतीमुळे बाप्तिस्मा घ्यायला कचरतात. त्यांना यहोवाची सेवा करायची तर असते, पण त्यांच्याकडून काहीतरी चूक होईल आणि यहोवा नाराज होईल अशी त्यांना भीती असते. तुम्हालाही असंच वाटतं का? जर असं असेल, तर भीतीवर मात करायला बायबलची काही वचनं तुम्हाला मदत करू शकतात. ती वचनं वाचल्यामुळे तुम्हाला याची खातरी पटेल, की यहोवा तुमच्याकडून कधीच परिपूर्णतेची अपेक्षा करत नाही. उलट, तुम्ही त्याला तुमचं सगळ्यात चांगलं ते देता, तेव्हा त्याला खूप आनंद होतो. (स्तो. १०३:१३, १४; कलस्सै. ३:२३) बाप्तिस्मा घेतल्यामुळे लोक तुमचा विरोध करतील अशी तुम्हाला भीती वाटत असेल, तर तुम्ही धैर्यासाठी यहोवाकडे मदत मागू शकता. मग तुम्हीही स्तोत्रकर्त्यासारखं म्हणू शकाल: “यहोवा माझ्या बाजूने आहे; मी घाबरणार नाही. माणूस माझं काय बिघडवू शकतो?”—स्तो. ११८:६.

३. आणखी कोणत्या गोष्टीमुळे काही लोक बाप्तिस्मा घ्यायला कचरतात? (चित्रसुद्धा पाहा.)

३ काहींना वाटतं, की त्यांच्याकडे बायबलचं जास्त ज्ञान नाही. पण बाप्तिस्मा घेण्यासाठी तुम्हाला बायबलचं किती ज्ञान असणं गरजेचंय? या घटनेचा विचार करा. एकदा प्रेषित पौल आणि सीला तुरुंगात असताना भूकंप झाला आणि त्यांना तुरुंगाच्या अधिकाऱ्‍याला आणि त्याच्या कुटुंबाला साक्ष द्यायची संधी मिळाली. त्या वेळी त्या अधिकाऱ्‍याला आणि त्याच्या कुटुंबाला कदाचित समजलं असेल, की जे काही घडलं तो खरंतर एक चमत्कार होता. तसंच, त्या रात्री त्यांना पौल आणि सीलाकडून इतरही काही गोष्टी शिकायला मिळाल्या. याचा परिणाम म्हणजे त्यांनी “उशीर न लावता . . . बाप्तिस्मा घेतला.” (प्रे. कार्यं १६:२५-३३) जर तुम्हालाही यहोवाबद्दल माहीत असेल, तुमचं त्याच्यावर मनापासून प्रेम असेल, तुमच्याकडे बायबलचं मुलभूत ज्ञान असेल, तुम्ही तुमच्या पापांबद्दल पश्‍चात्ताप केला असेल आणि यहोवाच्या स्तरांप्रमाणे जगण्याचा निश्‍चय केला असेल, तर तुम्हीही बाप्तिस्म्यासाठी तयार आहात.—मार्क १२:३०.

पौल आणि सीला तुरुंगाच्या अधिकाऱ्‍याला आणि त्याच्या घरच्यांना रात्रीच्या वेळी येशूबद्दल साक्ष देत आहेत. ते सगळे त्यांचं लक्ष देऊन ऐकत आहेत.

पौल आणि सीलाने तुरुंगाच्या अधिकाऱ्‍याला आणि त्याच्या घरच्यांना येशूबद्दल साक्ष दिली. त्यामुळे त्यांनी “उशीर न लावता . . . बाप्तिस्मा घेतला.” (परिच्छेद ३ पाहा)


४. कोणत्या गोष्टीवर खूप विचार केल्यामुळे काही लोक बाप्तिस्मा घ्यायला कचरतात? (चित्रसुद्धा पाहा.)

४ काही जण बाप्तिस्मा घ्यायला कचरतात, कारण त्यांना काही गोष्टी सोडायची इच्छा नसते. बाप्तिस्म्याचा निर्णय खूप गंभीर आहे आणि त्यामुळे आपण विचारपूर्वक हे पाऊल उचललं पाहिजे. (लूक १४:२७-३०) कॅन्डीसच्या उदाहरणाचा विचार करा. लहानपणापासून तिला सत्याबद्दल माहीत होतं. पण ती त्याप्रमाणे कधीच जगली नाही. मोठी झाल्यावर तिने परत बायबल अभ्यास करायला सुरुवात केली. ती म्हणते: “मी यहोवासाठी काय केलं पाहिजे, हे मला आधीपासूनच माहीत होतं. मी जसं जीवन जगत आहे ते यहोवाला आवडत नाही याची मला जाणीव होती. पण तरी मला ते सगळं खूप आवडायचं. म्हणून मी कधीच बदल करू शकणार नाही असं मला वाटायचं.” इतर काहींना याची भीती असते, की त्यांना यहोवाचे उच्च नैतिक स्तर पाळता येणार नाहीत. ‘माझ्याकडून एखादं गंभीर पाप झालं आणि मला मंडळीतून काढून टाकलं तर काय?’ असा ते विचार करतात. जर तुमच्या मनातही असेच विचार येत असतील तर तुम्ही काय करू शकता?

एक बहीण एका स्त्रीचा बायबल अभ्यास घेत आहे. बहीण बोलत असताना ती स्त्री तिच्या दारू पिण्याच्या सवयीबद्दल आणि तिच्या मित्रमैत्रीणिंसोबत क्लबमध्ये जाऊन डान्स करण्याच्या सवयीबद्दल विचार करत आहे.

काही जण यहोवाची सेवा करण्यासाठी त्यांना कराव्या लागणाऱ्‍या त्यागांबद्दल चिंता करतात (परिच्छेद ४ पाहा)


५. बाप्तिस्मा घेण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टीवर विचार करू शकता? (मत्तय १३:४४-४६)

५ एखादी वस्तू विकत घेताना आपण फक्‍त तिची किंमत पाहत नाही, तर तिच्यामुळे आपल्याला किती फायदा होईल याचाही आपण विचार करतो. आणि मग ती वस्तू महाग जरी असली, तरी आपण ती विकत घ्यायला मागेपुढे पाहत नाही. त्याच प्रकारे, बाप्तिस्म्याचा निर्णय घेताना, तुम्हाला बदल करणं किती कठीण जाईल फक्‍त याचाच विचार करू नका. तर त्यामुळे तुम्हाला किती फायदा होईल याचाही विचार करा. यहोवासोबत जवळचं नातं असल्यामुळे तुमच्या जीवनाला खरा अर्थ मिळेल. हेच समजवायला येशूने दोन उदाहरणांचा वापर केला. (मत्तय १३:४४-४६ वाचा.) दोन्ही उदाहरणातल्या माणसांनी त्यांना सापडलेली मौल्यवान गोष्ट विकत घ्यायला त्यांच्याकडे होतं-नव्हतं ते सगळं विकलं. तुम्हालाही एक खूप मौल्यवान गोष्ट सापडली आहे. ती म्हणजे, देवाच्या राज्याबद्दलचं सत्य. बाप्तिस्म्यासाठी बदल करायला जर तुम्ही कचरत असाल, तर तुम्ही येशूने दिलेल्या या उदाहरणांचा काळजीपूर्वक विचार करू शकता आणि स्वतःला काही प्रश्‍न विचारू शकता. जसं की, ‘देवाच्या राज्याची आनंदाची बातमी माझ्यासाठी खरंच मौल्यवान आहे का? यहोवासोबतचं माझं नातं, कायम जगण्याची आशा आणि माझे भाऊबहीण यांना मी खरंच मौल्यवान समजतो का?’ या प्रश्‍नांवर विचार केल्यामुळे बाप्तिस्म्यासाठी तुम्हाला कोणती पावलं उचलायची आहेत हे ठरवता येईल.

६. शिकलेल्या गोष्टी लागू करायला तुम्हाला कशामुळे मदत होईल?

६ बी पेरणाऱ्‍या शेतकऱ्‍याच्या उदाहरणात येशूने सांगितलं, की आनंदाचा संदेश ऐकणारे काही लोक त्याप्रमाणे वागणार नाहीत. असं असलं तरी, “चांगल्या आणि प्रामाणिक मनाचे लोक” आनंदाच्या संदेशाप्रमाणे वागतील. (लूक ८:५-१५) शिकलेल्या गोष्टींनुसार तुम्हाला वागता येईल की नाही अशी जर तुम्हाला चिंता असेल तर हार मानू नका. यहोवाच्या आज्ञा पाळण्यासाठी लागणारं मन यहोवा स्वतः तुम्हाला देऊ शकतो. तुम्हाला शिकलेल्या गोष्टींवर प्रेम करता यावं आणि त्या जीवनात लागू करता याव्यात यासाठी यहोवाकडे मदत मगा.—यहे. १८:३१; ३६:२६.

७-८. काही तरुण मुलं बाप्तिस्मा घ्यायला का कचरतात? (चित्रसुद्धा पाहा.)

७ काही तरुण मुलं इतरांच्या प्रभावाखाली येऊन बाप्तिस्मा घेत नाहीत. उदाहरणार्थ, शाळेत काही शिक्षक मुलांना शिकवतात, की नैतिकतेच्या बाबतीत त्यांचे विचार आजच्या काळाला धरून असले पाहिजेत; मग ते देवाच्या तत्त्वांविरुद्ध असले तरीही. पण अशा प्रकारच्या विचारांमुळे खूप नुकसान होऊ शकतं. (स्तो. १:१, २; नीति. ७:१-५) म्हणून इतरांच्या प्रभावाखाली येऊन काही करू नका. उलट, स्तोत्रकर्त्याच्या उदाहरणाचं अनुकरण करा. त्याने यहोवाला म्हटलं: “माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा माझ्याकडे जास्त सखोल समज आहे, कारण मी तुझ्या स्मरण-सूचनांवर मनन करतो.”—स्तो. ११९:९९.

८ असं दिसून आलंय, की कधीकधी काही भाऊबहीण आपल्या मुलांना बाप्तिस्मा घ्यायचं प्रोत्साहन देत नाहीत. त्यांना वाटतं, की आपल्या मुलांनी आधी चांगलं शिकावं, करिअर करावं आणि मग बाप्तिस्मा घ्यावा. किंवा काही भाऊबहीण आपल्या मुलांना आध्यात्मिक ध्येयं ठेवायला प्रोत्साहन देत नाहीत. मुलांनो, तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला बाप्तिस्म्याचं ध्येय गाठायला मदत करावी असं जर तुम्हाला वाटत असेल, तर याबद्दल त्यांच्याशी बोला. याची खातरी असू द्या, की तुमचं वय कितीही असलं तरी तुम्ही यहोवासोबत जवळचं नातं जोडू शकता.—नीति. २०:११.

एक तरुण मुलगा आपल्या आईवडिलांशी बोलताना त्यांना “कायम जीवनाचा आनंद घ्या!” या पुस्तकाचा २३ वा अध्याय दाखवत आहे.

बाप्तिस्मा घ्यायच्या तुमच्या ध्येयाबद्दल तुमच्या आईवडिलांशी मनमोकळेपणे बोला (परिच्छेद ८ पाहा)


९. काही जण बाप्तिस्मा घ्यायला वेळ का लावतात?

९ काही जण बाप्तिस्मा घ्यायला पात्र असले, तरी ते तसं करत नाहीत. कारण त्यांना त्यांच्या मित्रांसोबत किंवा घरच्यांसोबत बाप्तिस्मा घ्यायचा असतो. ते म्हणतात, की ‘आम्ही एकाच दिवशी बाप्तिस्मा घेऊ.’ हे चुकीचं नसलं, तरी या कारणामुळे बाप्तिस्मा घ्यायला वेळ लावणं योग्य आहे का? आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की समर्पण आणि बाप्तिस्मा हा एक वैयक्‍तिक निर्णय आहे. त्यामुळे दुसरे काय करत आहेत हे पाहून हा महत्त्वाचा निर्णय घेणं योग्य ठरणार नाही.—रोम. १४:१२.

यहोवाचा दिवस डोळ्यांपुढे ठेवणं का गरजेचंय?

१०. काही जण प्रगती करायला का वेळ लावतात?

१० काही जण बाप्तिस्मा घ्यायला वेळ लावतात, कारण अंत यायला अजून बराच वेळ आहे असं त्यांना वाटतं. पण, असा विचार करणं योग्य आहे का? येशूने त्याच्या शिष्यांना अशी ताकीद दिली: “तयार असा, कारण तुम्ही अपेक्षा केली नसेल अशा वेळी मनुष्याचा मुलगा येत आहे.”—लूक १२:४०.

११. यहोवाबद्दल आणखी शिकून घेतल्यामुळे आपण काय करायला प्रवृत्त होतो आणि का? (स्तोत्र ११९:६०)

११ आपलं यहोवावर प्रेम आहे आणि आपल्याला त्याच्या आज्ञा पाळायची इच्छा आहे, म्हणून आपण त्याला आपलं जीवन समर्पित करतो आणि बाप्तिस्मा घेतो. जितकं जास्त आपण यहोवाबद्दल जाणून घेतो तितकंच जास्त आपल्याला हे जाणवतं, की त्याचं आपल्यावर प्रेम आहे आणि त्याच्या आज्ञा पाळल्याने आपलाच फायदा होतो. (स्तोत्र ११९:६० वाचा.) याकोबने देवाच्या आज्ञा पाळण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण सांगितलं. ते म्हणजे, उद्या नेमकं काय होईल हे आपल्यापैकी कोणीच सांगू शकत नाही. म्हणून आपण दररोज यहोवाच्या इच्छेप्रमाणे जगलं पाहिजे. म्हणजेच ‘योग्य काय’ आहे हे समजून त्याप्रमाणे आताच वागलं पाहिजे.—याको. ४:१३-१७.

१२. येशूने दिलेल्या द्राक्षमळ्याच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो?

१२ येशूने दिलेल्या द्राक्षमळ्याच्या उदाहरणाचा विचार करा. त्यात त्याने सांगितलं, की काही मजुरांनी फक्‍त एकच तास काम केलं. तरी त्यांना पूर्ण दिवस काम करणाऱ्‍या मजुरांइतकीच मजुरी देण्यात आली. पण मग आपल्याला प्रश्‍न पडेल, की त्या मजुरांनी इतरांसारखं लवकर काम का सुरू केलं नाही? ते आळशी होते का? नाही. खरंतर “त्यांना अजूनही काम मिळालं नव्हतं” असं ते म्हणाले. म्हणजेच त्यांना पूर्ण दिवस काम करायची इच्छा होती, पण त्यांना कोणीही काम दिलं नव्हतं. आणि जेव्हा त्यांना काम देण्यात आलं तेव्हा त्यांनी लगेच काम करायला सुरुवात केली. (मत्त. २०:१-१६) आज येशूनेही आपल्याला त्याचे शिष्य म्हणून प्रचाराचं काम सोपवलंय. त्यामुळे आपण त्याची आज्ञा पाळून लवकरात लवकर हे काम पूर्ण केलं पाहिजे.

१३. आपण लोटच्या बायकोच्या उदाहरणातून काय शिकू शकतो?

१३ काही जण म्हणतात, की ते अंत येण्याच्या थोडं आधी बदल करून बाप्तिस्मा घेतील. पण लक्षात असू द्या, ऐनवेळी बदल करणं खूप कठीण आहे. ही गोष्ट येशूलाही माहीत होती. म्हणूनच त्याने त्याच्या शिष्यांना म्हटलं: “लोटच्या बायकोला लक्षात ठेवा.” (लूक १७:३१-३५) तिला हे माहीत होतं, की लवकरच देव सदोम आणि गमोराचा नाश करणार आहे. पण तिचं मन तिच्याकडे असलेल्या वस्तूंमध्ये अडकलं होतं. म्हणून ऐनवेळी तिला बदल करणं कठीण गेलं. (उत्प. १९:२३-२६) तिच्या उदाहरणातून आपल्याला याची आठवण होते, की तारण मिळवण्यासाठीचं दार कायम आपल्यासाठी खुलं नसेल. तर यहोवा ठरवलेल्या वेळी ते दार कायमचं बंद करेल.—लूक १३:२४, २५.

१४. अंताबद्दलच्या भविष्यवाण्या पूर्ण होताना पाहून आपण काय करायला प्रवृत्त झालं पाहिजे?

१४ दिवसेंदिवस जगामध्ये ज्या घटना घडत आहेत, त्यांवरून अंताबद्दलच्या बायबलच्या भविष्यवाण्या पूर्ण होत असल्याचं आपल्याला समजतं. या घटनांचा आपल्यावर कदाचित थेट प्रभाव पडत नसेल. तरी इतर ठिकाणी या घटना घडत असताना पाहून, लवकरात लवकर बाप्तिस्मा घेणं किती गरजेचंय हे आपल्याला कळतं. हे समजायला पहिल्या शतकातल्या उदाहरणाचा विचार करा. त्या वेळी प्रेषित पेत्रने ख्रिश्‍चनांना असा सल्ला दिला, की “सर्व गोष्टींचा शेवट जवळ” असल्यामुळे त्यांनी “सतर्क” आणि “जागे” राहावं. (१ पेत्र ४:७; तळटीप) या वचनात तो यरुशलेमच्या आणि तिथल्या मंदिराच्या नाशाबद्दल बोलत होता. पण त्याने ज्या भाऊबहिणींना हा सल्ला दिला ते यरुशलेमपासून खूप लांब राहत होते. म्हणून त्यांच्यावर यरुशलेमच्या नाशाचा थेट प्रभाव पडणार नव्हता. (१ पेत्र १:१) असं असलं तरी, ही भविष्यवाणी पूर्ण होताना पाहून, यहोवाच्या इतर वचनांवरचा त्यांचा भरवसा मजबूत होणार होता. त्याच प्रकारे, आज आपण अंताबद्दलच्या भविष्यवाण्या पूर्ण होताना पाहतो, तेव्हा आपल्याला सतर्क राहायला आणि बाप्तिस्म्याच्या ध्येयापर्यंत पोहोचायला मदत होऊ शकते.

१५. आपण यहोवाच्या दिवसासाठी तयार असल्याचं कसं दाखवू शकतो? (२ पेत्र ३:१०-१३)

१५ आपण ‘यहोवाच्या दिवसासाठी’ तयार कसं राहू शकतो, हे पेत्रने त्याच्या दुसऱ्‍या पत्रात सांगितलं. जेव्हा त्याने हे पत्र लिहिलं, तेव्हा त्या काळातल्या ख्रिश्‍चनांसाठी यहोवाचा दिवस खूप दूर होता. पण तरी त्यांनी “तो दिवस नेहमी डोळ्यांपुढे ठेवला पाहिजे” किंवा त्याची “उत्कंठा बाळगली पाहिजे,” असं त्याने त्यांना सांगितलं. (२ पेत्र ३:१०-१३ वाचा; तळटीप) यहोवाचा दिवस खूप जवळ आहे हे आपण कायम लक्षात ठेवतो, तेव्हा आपणही तो दिवस आपल्या डोळ्यांपुढे ठेवल्याचं दाखवतो. तसंच आपण आपली “वागणूक पवित्र” ठेवतो आणि “देवाच्या भक्‍तीची कार्यं” करतो, तेव्हा आपण दाखवतो की आपण त्या दिवसासाठी तयार आहोत. आपण असं करतो तेव्हा यहोवाला खूप आनंद होतो. तसंच, आपण समर्पण करून बाप्तिस्मा घेतो तेव्हाही त्याला खूप आनंद होतो.

तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो?

१६. बाप्तिस्मा घ्यायची योग्य वेळ कोणती आहे? (२ करिंथकर ६:१, २) (चित्रंसुद्धा पाहा.)

१६ तुमच्या जीवनात बदल करायची आणि बाप्तिस्मा घ्यायची योग्य वेळ हीच आहे. (२ करिंथकर ६:१, २ वाचा.) तुम्हाला कूशी षंढ आठवतो का? त्याला फिलिप्पने आनंदाची बातमी सांगितली, तेव्हा आपण ताबडतोब पाऊल उचलायला हवं ही गोष्ट त्याला जाणवली. आणि त्याच्यासमोर बाप्तिस्मा घ्यायची संधी आली तेव्हा त्याने असा विचार केला नाही, की ‘मी सत्याबद्दल थोडं अजून शिकून घेतो. तसं बाप्तिस्मा घ्यायला रस्त्यात पुढे आणखीही तळी असतील.’ उलट, त्याने फिलिप्पला विचारलं: “मला बाप्तिस्मा घ्यायला काय हरकत आहे?” (प्रे. कार्यं ८:२६, २७, ३५-३९) त्यानंतर त्याने बाप्तिस्मा घेतला आणि “तो आनंदाने आपल्या मार्गाने निघून गेला.” खरंच, कूशी षंढाने आपल्यासमोर खूप चांगलं उदाहरण मांडलंय!

कोलाज: १. फिलिप्पकडून बाप्तिस्मा घ्यायला कूशी षंढ तळ्यात उतरत आहेत. २. आधीच्या चित्रातली बहीण आणि तिची बायबल विद्यार्थीणी राज्य सभागृहात दोन वडिलांसोबत आनंदाने बोलत आहे.

कूशी षंढाकडून आपल्याला शिकायला मिळतं, की बाप्तिस्मा घ्यायची योग्य वेळ हीच आहे (परिच्छेद १६ पाहा) a


१७. तुम्ही कोणत्या गोष्टीची खातरी बाळगू शकता?

१७ एखादी गोष्ट तुम्हाला बाप्तिस्मा घेण्यापासून रोखत आहे का? असं असेल तर यहोवा तुम्हाला त्याच्याशी मैत्री करायला मदत करू शकतो, याची खातरी बाळगा. (रोम. २:४) तुम्हाला बाप्तिस्मा घ्यायची भीती वाटत असेल, किंवा हे पाऊल उचलणं कठीण वाटत असेल किंवा इतरांकडून तुम्हाला हवं ते प्रोत्साहन मिळत नसेल, तरी यहोवा तुम्हाला मदत करू शकतो हे नेहमी लक्षात ठेवा. बाप्तिस्मा घेतल्यामुळे यहोवा तर खूश होईलच, पण तुम्हालासुद्धा खूप आनंद होईल. तसंच, बाप्तिस्मा घ्यायला तुम्हाला ज्या गोष्टी सोडाव्या लागतील त्याचा तुम्हाला कधीच पस्तावा होणार नाही. (फिलिप्पै. ३:८, १३) तुम्ही विश्‍वास ठेवू शकता, की जे लोक यहोवाला समर्पण करून बाप्तिस्मा घेतात त्यांना तो भविष्यात खूप आशीर्वाद देईल.—प्रे. कार्यं ३:१९.

तुमचं उत्तर काय असेल?

  • बाप्तिस्मा घ्यायला काही लोक का कचरतात?

  • बाप्तिस्मा घ्यायला उशीर करणं का योग्य ठरणार नाही?

  • बाप्तिस्मा घ्यायची योग्य वेळ कोणती आहे?

गीत ३८ तो तुला बळ देईल

a चित्राचं वर्णन: कूशी षंढाने जसं फिलिप्पकडे बाप्तिस्मा घ्यायची इच्छा व्यक्‍त केली, तसंच एक बायबल विद्यार्थी वडिलांकडे बाप्तिस्मा घ्यायची इच्छा व्यक्‍त करत आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा