अभ्यासासाठी टीप
चित्रं पाहा आणि शिका
आपल्या प्रकाशनांमध्ये महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट करण्यासाठी बरीचशी चित्रं दिलेली असतात. मग या चित्रांचा तुम्ही कशा प्रकारे फायदा करून घेऊ शकता?
लेख वाचण्याआधी त्यात दिलेली चित्रं पाहा. ज्या प्रकारे एखादा स्वादिष्ट पदार्थ ताटात सजवलेला पाहून आपली भूक वाढते, त्याच प्रकारे चित्रांमुळे लेखाबद्दलची आपली उत्सुकता वाढते. त्यामुळे लेख वाचण्याआधी स्वतःला विचारा: ‘चित्रांमध्ये मला काय दिसतंय?’—आमो. ७:७, ८.
लेख वाचत असताना, अमुक एक चित्र का निवडण्यात आलं याचा विचार करा. त्या चित्राखालच्या ओळी किंवा चित्राचं वर्णन असेल तर ते वाचा. त्या चित्राचा लेखाशी काय संबंध आहे आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो यावरही विचार करा.
लेख वाचून झाल्यावर लेखाचे मुख्य मुद्दे आठवायला चित्रांचा वापर करा. मग, डोळे बंद करून चित्रं आठवायचा प्रयत्न करा आणि त्यांतून कोणते मुद्दे शिकायला मिळाले त्याचाही विचार करा.
या अंकातली चित्रं परत बघा आणि शिकलेले मुद्दे तुम्हाला आठवतात का ते पाहा.