वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w25 एप्रिल पृ. २६-३१
  • तरुण भावांनो—मार्क आणि तीमथ्यसारखं वागा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तरुण भावांनो—मार्क आणि तीमथ्यसारखं वागा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मार्कसारखं वागा—सेवा करायला तयार असा
  • तीमथ्यसारखं वागा—इतरांवर प्रेम असल्याचं दाखवा
  • पौलच्या प्रेमळ सल्ल्यामुळे तुम्हाला मदत होऊ शकते
  • इतरांची सेवा केल्यामुळे आशीर्वाद मिळतात
  • “मला त्याची खूप मदत होईल”
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • “मंडळ्यांचा विश्‍वास मजबूत” करण्यात आला
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
  • तीमथ्य—“विश्‍वासू पुत्र”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • भावांनो, तुम्ही मंडळीत सहायक सेवक म्हणून सेवा करायचं ध्येय ठेवलंय का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
w25 एप्रिल पृ. २६-३१

अभ्यास लेख १८

गीत ६५ प्रगती करू या!

तरुण भावांनो—मार्क आणि तीमथ्यसारखं वागा

“येताना मार्कला आपल्यासोबत घेऊन ये, कारण सेवाकार्यात मला त्याची खूप मदत होईल.”—२ तीम. ४:११.

या लेखात:

यहोवाची आणि आपल्या मंडळीतल्या भाऊबहिणींची जास्तीत जास्त सेवा करण्यासाठी मार्क आणि तीमथ्यच्या उदाहरणामुळे तरुण भावांना कशी मदत होऊ शकते ते पाहा.

१-२. मार्क आणि तीमथ्य यहोवाची जास्त सेवा करण्यापासून स्वतःला कोणत्या गोष्टींमुळे रोखू शकले असते?

तरुण भावांनो, तुम्हाला यहोवाची जास्तीत जास्त सेवा करायची आणि मंडळीतल्या भाऊबहिणींची आणखी मदत करायची इच्छा आहे का? नक्कीच तुमची इच्छा असेल. इतरांची सेवा करण्यासाठी बरेच तरुण भाऊ पुढे येत आहेत ही खरंच किती चांगली गोष्ट आहे! (स्तो. ११०:३) पण कदाचित असं करणं तुमच्यासाठी सोपं नसेल. आपली सेवा वाढवल्यावर पुढे आपलं जीवन कसं असेल किंवा यहोवा आपल्याला कुठे जायला सांगेल हे माहीत नसल्यामुळे तुम्ही तुमची सेवा वाढवायला कचरत आहात का? किंवा आत्मविश्‍वासाच्या कमतरतेमुळे एखादी नेमणूक स्वीकारायला तुम्हाला भीती वाटते का? जर तुम्हालाही असंच वाटत असेल, तर तुम्ही एकटे नाही.

२ मार्क आणि तीमथ्यलाही असंच वाटत होतं. पण पुढे काय होईल या भीतीने किंवा कमी अनुभव असल्यामुळे त्यांनी इतरांची सेवा करायचं सोडून दिलं नाही. मार्कला जेव्हा पौल आणि बर्णबाने त्यांच्या पहिल्या मिशनरी दौऱ्‍यासाठी बोलावलं होतं तेव्हा तो कदाचित त्याच्या आईसोबत सुखसोयी असलेल्या घरात राहत असावा. (प्रे. कार्यं १२:१२, १३, २५) पण आपली सेवा वाढवण्यासाठी त्याने आपलं घर सोडलं. तो सगळ्यात आधी अंत्युखियाला गेला. मग तो पौल आणि बर्णबासोबत आणखी दूरदूरच्या ठिकाणी गेला. (प्रे. कार्यं १३:१-५) त्याच प्रकारे, पौलने जेव्हा तीमथ्यला त्याच्यासोबत प्रचार करण्यासाठी बोलावलं तेव्हा तो कदाचित त्याच्या आईवडिलांसोबत राहत होता. त्या वेळी तीमथ्य खूप तरुण होता आणि त्याला अजिबात अनुभव नव्हता. आत्मविश्‍वासाच्या कमतरतेमुळे तो यहोवाची सेवा करायला मागेपुढे पाहू शकला असता. (१ करिंथकर १६:१०, ११ आणि १ तीमथ्य ४:१२ सोबत तुलना करा.) पण तीमथ्यने पौलचं हे आमंत्रण स्वीकारलं आणि यामुळे त्याला बरेच आशीर्वाद मिळाले.—प्रे. कार्यं १६:३-५.

३. (क) पौलला मार्क आणि तीमथ्यच्या सेवेची कदर होती हे कसं दिसतं? (२ तीमथ्य ४:६, ९, ११) (चित्रंसुद्धा पाहा.) (ख) या लेखात आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

३ तरुण वयातच मार्क आणि तीमथ्यने मंडळीतल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्‍या कशा हाताळायच्या हे शिकून घेतलं होतं. पौलला या तरुण भावांच्या सेवेची खूप कदर होती. त्याला त्यांची इतकी कदर होती, की जेव्हा त्याला कळलं की आता आपण लवकरच मरणार आहोत, तेव्हा त्याने त्यांना आपल्याजवळ बोलावून घेतलं. (२ तीमथ्य ४:६, ९, ११ वाचा.) पौलला त्यांच्याबद्दल असं का वाटलं? तरुण भाऊ मार्क आणि तीमथ्यसारखं कसं वागू शकतात? आणि पौलच्या प्रेमळ सल्ल्यामुळे आज तरुण भावांना कशी मदत होऊ शकते? या प्रश्‍नांवर आपण आता चर्चा करणार आहोत.

कोलाज: १. मार्क पौल आणि बर्णबासाठी जेवणाखावणाची तयारी करतोय. २. तीमथ्य वडिलांसमोर पत्र वाचतोय; ते त्याचं लक्ष देऊन ऐकत आहेत.

तरुणपणी जबाबदाऱ्‍या स्वीकारल्यामुळे मार्क आणि तीमथ्य पौलचे लाडके बनले (परिच्छेद ३ पाहा)b


मार्कसारखं वागा—सेवा करायला तयार असा

४-५. मार्क इतरांची सेवा करायला तयार होता हे कसं दिसून आलं?

४ एका संदर्भाप्रमाणे, इतरांची सेवा करण्याचा अर्थ त्यांना मदत करण्यासाठी मेहनत घेणं आणि कठीण असतानाही तसं करत राहणं, असा होतो. मार्कने या बाबतीत एक चांगलं उदाहरण मांडलं. पौलने जेव्हा मार्कला आपल्या दुसऱ्‍या मिशनरी दौऱ्‍यात सोबत घेऊन जायला नकार दिला, तेव्हा मार्कला कदाचित वाईट वाटलं असेल आणि तो निराशही झाला असेल. (प्रे. कार्यं १५:३७, ३८) पण यामुळे त्याने भाऊबहिणींची सेवा करायचं सोडून दिलं नाही.

५ याउलट, मार्क आपल्या नातेवाइकासोबत, बर्णबासोबत दुसऱ्‍या ठिकाणी सेवा करायला गेला. याच्या जवळपास ११ वर्षांनंतर जेव्हा पौलला रोममधल्या तुरुंगात टाकण्यात आलं, तेव्हा मार्क त्याला मदत करायला तिथे होता. (फिले. २३, २४) मार्कने पौलला जी मदत केली होती, त्याबद्दल पौलला खूप कदर होती. म्हणूनच पौलने असं म्हटलं की त्याला मार्कमुळे “खूप सांत्वन” मिळालं.—कलस्सै. ४:१०, ११.

६. प्रौढ भावांसोबत वेळ घालवल्यामुळे मार्कला कसा फायदा झाला? (तळटीप पाहा.)

६ प्रौढ भावांसोबत वेळ घालवल्यामुळे मार्कला खूप फायदा झाला. पौलसोबत रोममध्ये काही वेळ घालवल्यानंतर मार्क बाबेलमध्ये पेत्रकडे गेला. त्यांच्यात इतकं जवळचं नातं निर्माण झालं की पेत्रने त्याला “माझा मुलगा, मार्क” असं म्हटलं. (१ पेत्र ५:१३) सोबत सेवा करत असताना पेत्रने कदाचित आपल्या या तरुण मित्राला येशूच्या जीवनाबद्दल आणि सेवाकार्याबद्दल बऱ्‍याच रोमांचक गोष्टी सांगितल्या असतील. नंतर या सगळ्या गोष्टी मार्कने आनंदाच्या संदेशाच्या पुस्तकात लिहून ठेवल्या.a

७. साँग-वू नावाचा भाऊ मार्कसारखा कसा वागला? (चित्रसुद्धा पाहा.)

७ मार्क यहोवाच्या सेवेत व्यस्त राहिला आणि प्रौढ भावांच्या जवळ राहिला. तुम्हीही मार्कसारखं कसं वागू शकता? तुम्हाला कदाचित यहोवाची जास्तीत जास्त सेवा करायची इच्छा असेल. कदाचित तुम्हाला सहायक सेवक किंवा वडील म्हणून सेवा करायची इच्छा असेल. पण तुम्ही अजून त्यासाठी पात्र नसाल. जर तसं असेल, तर निराश होऊ नका. याउलट, यहोवासाठी आणि मंडळीसाठी तुम्ही काय करू शकता याचा नेहमी विचार करा. वडील म्हणून सेवा करणाऱ्‍या साँग-वू नावाच्या भावाचा विचार करा. तो जेव्हा तरुण होता तेव्हा तो स्वतःची तुलना त्याच्या वयाच्या इतर भावांशी करायचा. त्यांच्यापैकी काहींना मंडळीत जबाबदाऱ्‍या मिळाल्या होत्या. पण त्याला अजून कोणतीच जबाबदारी मिळाली नव्हती. त्यामुळे, आपल्याकडे दुर्लक्ष केलं जातंय असं त्याला वाटू लागलं. म्हणून याबद्दल त्याने वडिलांना सांगितलं. एका वडिलांनी त्याला असं सुचवलं की तो करत असलेली सेवा इतरांच्या लक्षात आली नाही तरी त्याने ती करत राहावी. साँग-वूने हा सल्ला पाळला आणि ज्या वयस्कर आणि इतर भाऊबहिणींना सभांना यायला मदत हवी आहे त्यांना तो मदत करू लागला. आता मागे वळून पाहताना तो म्हणतो: “इतरांची सेवा करायचा नेमका काय अर्थ होतो हे मला कळलंय. इतरांना व्यावहारिक मार्गांनी मदत केल्यामुळे मिळणारा आनंद मी अनुभवलाय.”

एक तरुण भाऊ एका वयस्कर भावाला आपल्या गाडीतून सभेला नेतोय.

प्रौढ भावांसोबत नेहमी वेळ घालवल्यामुळे तरुण भावांना कसा फायदा होऊ शकतो? (परिच्छेद ७ पाहा)


तीमथ्यसारखं वागा—इतरांवर प्रेम असल्याचं दाखवा

८. पौलने तीमथ्यला आपल्यासोबत प्रवासाला का नेलं? (फिलिप्पैकर २:१९-२२)

८ पौलला ज्या शहरांमध्ये विरोधाचा सामना करावा लागला होता त्या शहरांमध्ये त्याला परत जायचं होतं. म्हणून तिथे जाण्यासाठी त्याला धाडसी भावांची गरज होती. त्यामुळे त्याने सगळ्यात आधी सीलाला आपल्यासोबत नेलं. सीलाला यहोवाच्या सेवेत बऱ्‍याच वर्षांचा अनुभव होता. (प्रे. कार्यं १५:२२, ४०) मग नंतर त्याने तीमथ्यला आपल्यासोबत नेलं. तीमथ्यमध्ये असं काय वेगळं होतं? एक गोष्ट म्हणजे, त्याचं मंडळ्यांमध्ये चांगलं नाव होतं. (प्रे. कार्यं १६:१, २) तसंच त्याला लोकांची मनापासून काळजी होती.—फिलिप्पैकर २:१९-२२ वाचा.

९. तीमथ्यला भाऊबहिणींची काळजी होती असं आपण का म्हणू शकतो?

९ तीमथ्यने पौलसोबत सेवा करायला सुरुवात केल्यापासूनच, त्याला स्वतःपेक्षा इतरांची जास्त काळजी आहे हे दिसून आलं. त्यामुळे पौलने बिरुया शहर सोडलं तेव्हा त्याला याची पूर्ण खातरी होती की तीमथ्य तिथल्या नवीन शिष्यांची खूप चांगली काळजी घेईल. (प्रे. कार्यं १७:१३, १४) पण त्या वेळी सीलासुद्धा बिरुयामध्येच थांबला होता. त्यामुळे तीमथ्यला त्याच्याकडून बरंच काही शिकायला मिळालं असेल. पण नंतर पौलने तीमथ्यला एकट्यालाच थेस्सलनीकामधल्या शिष्यांचा विश्‍वास मजबूत करायला पाठवलं. (१ थेस्सलनी. ३:२, तळटीप) पुढच्या १५ वर्षांत तीमथ्य दुःख सोसणाऱ्‍या भाऊबहिणींना सहानुभूती दाखवायला शिकला. एका अर्थाने तो ‘रडणाऱ्‍यांसोबत रडायला’ शिकला. (रोम. १२:१५; २ तीम. १:४) मग तरुण भाऊ तीमथ्यसारखं कसं वागू शकतात?

१०. वू-जे नावाचा भाऊ इतरांची काळजी करायला कसा शिकला?

१० वू-जे नावाचा भाऊ इतरांची काळजी करायला कसा शिकला ते पाहा. जेव्हा तो तरुण होता तेव्हा त्याला वयस्कर भाऊबहिणींशी बोलायला कठीण जायचं. त्यामुळे सभेला आल्यावर तो त्यांना फक्‍त नमस्ते म्हणून निघून जायचा. एका वडिलांनी त्याला सुचवलं की त्याने अमुक एका भावाबद्दल किंवा बहिणीबद्दल त्याला काय आवडतं हे सांगून त्यांच्याशी बोलायला सुरुवात करावी. त्या वडिलांनी त्याला असंही सांगितलं की समोरच्याला कशात आवड आहे याचा त्याने विचार करावा. वू-जेने हा सल्ला लागू केला. आज तो वडील म्हणून सेवा करतोय. तो म्हणतो: “मला आता वेगवेगळ्या वयोगटाच्या लोकांशी बोलायला सोपं जातं. तसंच इतरांची परिस्थिती मला चांगल्या प्रकारे माहीत आहे याचा मला आनंद आहे. यामुळे मला माझ्या भाऊबहिणींना मदत करायला सोपं जातं.”

११. तरुण भाऊ मंडळीतल्या भाऊबहिणींची काळजी कशी घेऊ शकतात? (चित्रसुद्धा पाहा.)

११ तरुण भावांनो, तुम्हीसुद्धा इतरांची काळजी करायला शिकू शकता. सभांमध्ये तुम्ही वेगवेगळ्या वयोगटाच्या आणि संस्कृतीच्या भाऊबहिणींशी बोलू शकता, त्यांचं कसं चाललंय असं विचारून तुम्ही त्यांचं ऐकून घेऊ शकता. यामुळे त्यांना कशाची गरज आहे हे तुमच्या लक्षात येईल. कदाचित तुम्हाला समजेल, की एका वयस्कर जोडप्याला JW लायब्ररी ॲप वापरायला मदत हवी आहे किंवा त्यांच्यासोबत प्रचाराला जायला कोणीच नाही. मग अशा भाऊबहिणींना तुम्ही इलेक्ट्रॉनिक साधनं वापरायला मदत करू शकता का? किंवा त्यांच्यासोबत प्रचाराला जाऊ शकता का? इतरांना मदत करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेता, तेव्हा तुम्ही सगळ्यांसमोर एक चांगलं उदाहरण मांडत असता.

एक तरुण भाऊ आणि एक वयस्कर भाऊ घरोघरचं प्रचारकार्य करत आहेत. वयस्कर भाऊ घरमालकाशी बोलत असताना तरुण भाऊ टॅबमधून व्हिडिओ दाखवतोय.

तरुण भाऊ बऱ्‍याच व्यावहारिक मार्गांनी भाऊबहिणींना मदत करू शकतात (परिच्छेद ११ पाहा)


पौलच्या प्रेमळ सल्ल्यामुळे तुम्हाला मदत होऊ शकते

१२. तरुण भावांना पौलच्या सल्ल्याचा फायदा कसा होऊ शकतो?

१२ आपल्या जीवनात आणि सेवाकार्यात यशस्वी व्हायला पौलने तीमथ्यला व्यावहारिक सल्ले दिले. (१ तीम. १:१८; २ तीम. ४:५) तरुण भावांनो, तुम्हालासुद्धा पौलच्या सल्ल्यांचा फायदा होऊ शकतो. तो कसा? पौलने तीमथ्यला लिहिलेली दोन पत्रं जणू काय तुम्हालाच लिहिलेली आहेत असं समजून ती वाचा. आणि त्यांतला कोणता सल्ला तुम्हाला लागू करता येईल ते पाहा. याच्या काही उदाहरणांकडे लक्ष द्या.

१३. यहोवाला नेहमी एकनिष्ठ राहण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे मदत होईल?

१३ “देवाच्या भक्‍तीचं ध्येय ठेवून त्याप्रमाणे स्वतःला प्रशिक्षित कर.” (१ तीम. ४:७ख) देवाची भक्‍ती म्हणजे काय? एक व्यक्‍ती यहोवाला एकनिष्ठ असते आणि त्याला आवडणाऱ्‍या गोष्टी करते, तेव्हा त्याला देवाची भक्‍ती करणं असं म्हणतात. आपल्यामध्ये हा गुण जन्मतःच नसल्यामुळे आपल्याला तो वाढवावा लागतो. मग आपण तो कसा वाढवू शकतो? “स्वतःला प्रशिक्षित कर” यासाठी असलेला ग्रीक शब्द, सहसा स्पर्धेत भाग घेणाऱ्‍या खेळाडूला कराव्या लागणाऱ्‍या कठोर प्रशिक्षणासाठी वापरला जायचा. अशा खेळाडूंना स्वतःला शिस्त लावावी लागायची. त्याच प्रकारे, आपल्यालाही स्वतःला शिस्त लावावी लागेल. हो, यहोवासोबतचं नातं मजबूत करण्यासाठी आपल्याला चांगल्या सवयी लावून घ्याव्या लागतील.

१४. बायबल वाचताना आपलं ध्येय काय असलं पाहिजे? उदाहरण द्या.

१४ स्वतःला बायबल वाचायची सवय लावत असताना यहोवाच्या जवळ जाण्याचं ध्येय डोळ्यांपुढे ठेवा. उदाहरणार्थ, येशू आणि श्रीमंत तरुणाच्या अहवालातून तुम्हाला काय शिकायला मिळू शकतं? (मार्क १०:१७-२२) त्या तरुण माणसाला येशू हाच मसीहा आहे या गोष्टीवर भरवसा होता. पण येशूचा शिष्य होण्याइतका विश्‍वास त्याच्याजवळ नव्हता. असं असलं तरी अहवालात म्हटलंय की येशूने त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं. येशू त्या तरुण माणसाशी जसा वागला ते वाचून तुम्हाला कसं वाटलं? नक्कीच, त्याने चांगला निर्णय घ्यावा असं येशूला वाटत होतं. तसंच, येशू त्या माणसाशी जसा वागला त्यातून यहोवाचंही त्या तरुणावर असलेलं प्रेम दिसून आलं. (योहा. १४:९) जेव्हा तुम्ही या अहवालाचा आणि तुमच्या परिस्थितीचा विचार करता तेव्हा स्वतःला विचारा, ‘यहोवाच्या जवळ जाण्यासाठी आणि इतरांची आणखी चांगल्या प्रकारे सेवा करण्यासाठी मला काय करायची गरज आहे?’

१५. एका तरुण भावाने इतरांसमोर चांगलं उदाहरण मांडणं का महत्त्वाचं आहे? समजावून सांगा. (१ तीमथ्य ४:१२, १३)

१५ “विश्‍वासू जनांसमोर एक चांगलं उदाहरण ठेव.” (१ तीमथ्य ४:१२, १३ वाचा.) पौलने तीमथ्यला वाचन करणं आणि शिकवणं यांसारखी कौशल्यं वाढवायला सांगितली. पण त्यासोबतच त्याने प्रेम, विश्‍वास आणि शुद्धता यांसारखे गुणसुद्धा वाढवायला सांगितले. का बरं? कारण एक व्यक्‍ती जे काही म्हणते त्यापेक्षा ती जे काही करते ते जास्त महत्त्वाचं असतं. समजा, तुम्हाला प्रचारात आवेश कसा वाढवायचा याबद्दल भाषण द्यायला सांगितलंय. अशा वेळी तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे मदत होईल? तुम्ही जर प्रचार करण्यासाठी शक्य ते सगळं करत असाल, तर तुम्हाला त्या विषयावर आणखी आत्मविश्‍वासाने बोलता येईल. आणि तुमच्या उदाहरणामुळे श्रोत्यांना तुम्ही सांगितलेली गोष्ट लागू करायची प्रेरणाही मिळेल.—१ तीम. ३:१३.

१६. (क) तरुण भाऊ कोणत्या पाच गोष्टींच्या बाबतीत एक चांगलं उदाहरण मांडू शकतात? (ख) एक तरुण भाऊ ‘बोलण्याच्या’ बाबतीत चांगलं उदाहरण कसं मांडू शकतो?

१६ पौलने १ तीमथ्य ४:१२ मध्ये पाच गोष्टींबद्दल सांगितलं. त्यांच्या बाबतीत तरुण भाऊ दुसऱ्‍यांसमोर चांगलं उदाहरण मांडू शकतात. यांपैकी प्रत्येक पैलूवर तुम्ही वैयक्‍तिक अभ्यास करू शकता. समजा तुम्हाला ‘बोलण्याच्या’ बाबतीत चांगलं उदाहरण मांडायचंय. मग तुमच्या बोलण्याने तुम्ही इतरांना प्रोत्साहन कसं देऊ शकता, याचा विचार करा. जसं की, तुमचे आईवडील तुमच्यासाठी जे काही करत आहेत त्याबद्दल कदर असल्याचं तुम्ही त्यांना वेळोवेळी सांगू शकता. सभेत जर तुम्हाला एखाद्याचा भाग आवडला तर त्या भागात तुम्हाला काय आवडलं याबद्दल तुम्ही त्याला सभेनंतर सांगू शकता. तसंच तुम्ही सभांमध्ये स्वतःच्या शब्दांत उत्तरं द्यायचाही प्रयत्न करू शकता. बोलण्याच्या बाबतीत एक चांगलं उदाहरण मांडताना तुम्ही जी मेहनत घेता त्यावरून दिसून येईल की तुम्ही आध्यात्मिक प्रगती करत आहात.—१ तीम. ४:१५.

१७. तरुण भावांना आध्यात्मिक ध्येयं गाठायला कशामुळे मदत होईल? (२ तीमथ्य २:२२)

१७ ‘तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि त्याऐवजी न्याय उत्पन्‍न करायचा प्रयत्न कर.’ (२ तीमथ्य २:२२ वाचा.) पौलने तीमथ्यला तरुणपणाच्या वासनांशी लढायला सांगितलं. कारण या वासनांमुळे तो त्याच्या आध्यात्मिक ध्येयांपासून भरकटू शकला असता आणि यहोवासोबतचं त्याचं नातं धोक्यात येऊ शकलं असतं. एवढंच नाही तर, पौलने तीमथ्यला आणखी एक गोष्ट करायला सांगितली. त्याने त्याला “न्याय” उत्पन्‍न करायला सांगितलं. याचा एक अर्थ ‘नीतिमत्त्व उत्पन्‍न कर’ असाही होऊ शकतो. मग तुम्ही हा सल्ला कसा पाळू शकता? कदाचित तुमच्या लक्षात येईल की काही गोष्टी मुळात चुकीच्या नसल्या, तरी त्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक कामं करायला खूप कमी वेळ मिळतोय. तुम्ही खेळण्यात, इंटरनेट पाहण्यात किंवा मग व्हिडिओ गेम्स खेळण्यात किती वेळ घालवता याचा विचार करा. त्यातला काही वेळ तुम्ही ‘नीतिमत्त्व उत्पन्‍न करण्यासाठी’ म्हणजेच आध्यात्मिक कामांसाठी घालवू शकता का? कदाचित तुम्ही राज्य सभागृहाच्या दुरुस्तीसाठी मदत करू शकता किंवा ट्रॉलीवरचं साक्षकार्य करू शकता. जर तुम्ही अशा कामांमध्ये भाग घेतलात तर तुम्हाला नवीन मित्र बनवता येतील. आणि हे मित्र तुम्हाला आध्यात्मिक ध्येयं ठेवायला आणि ती गाठायला मदत करतील.

इतरांची सेवा केल्यामुळे आशीर्वाद मिळतात

१८. मार्क आणि तीमथ्य आनंदी आणि समाधानी आयुष्य जगले असं आपण का म्हणू शकतो?

१८ इतरांची जास्तीत जास्त सेवा करण्यासाठी मार्क आणि तीमथ्यने त्याग केले. यामुळे त्यांना आनंदी आणि समाधानी जीवन जगता आलं. (प्रे. कार्यं २०:३५) भाऊबहिणींची सेवा करण्यासाठी मार्कने दूरदूरच्या ठिकाणी प्रवास केला. तसंच, त्याने येशूच्या जीवनाचा आणि सेवाकार्याचा रोमांचक वृत्तांतही लिहिला. तीमथ्यनेही पौलला मंडळ्या सुरू करायला आणि भाऊबहिणींना प्रोत्साहन द्यायला मदत केली. मार्क आणि तीमथ्यने जे त्याग केले ते पाहून यहोवाला नक्कीच आनंद झाला असेल यात काही शंका नाही.

१९. (क) पौलने तीमथ्यला दिलेल्या सल्ल्याकडे तरुण भावांनी लक्ष का दिलं पाहिजे? (ख) याचा काय परिणाम होईल?

१९ पौलचं तीमथ्यवर खूप प्रेम होतं. ही गोष्ट त्याने त्याच्या या तरुण मित्राला लिहिलेल्या पत्रांमध्ये दिसून येते. तरुण भावांनो, देवाच्या प्रेरणेने लिहिलेल्या या पत्रांतून देवाचं तुमच्यावर किती प्रेम आहे हे दिसून येतं. त्याची इच्छा आहे की तुम्ही त्याच्या सेवेत यशस्वी व्हावं. त्यामुळे पौलने दिलेला प्रेमळ सल्ला लागू करा. इतरांची जास्तीत जास्त सेवा करायची इच्छा स्वतःमध्ये वाढवा. तुम्ही जर असं केलं तर तुम्हाला आता आनंदी आणि समाधानी जीवन जगता येईल आणि पुढे येणाऱ्‍या ‘खऱ्‍या जीवनाला घट्ट धरून ठेवता येईल.’—१ तीम. ६:१८, १९.

तुमचं उत्तर काय असेल?

  • मार्कच्या उदाहरणातून तुम्ही काय शिकलात?

  • तुम्ही तीमथ्यसारखं वागून इतरांची काळजी असल्याचं कसं दाखवू शकता?

  • पौलच्या कोणत्या सल्ल्यामुळे तरुण भावांना आध्यात्मिक प्रगती करायला मदत होऊ शकते?

गीत ८० यहोवा किती चांगला आहे हे पारखून पाहा!

a पेत्र हा भावना व्यक्‍त करणारा माणूस होता. त्यामुळे वेगवेगळ्या परिस्थितींत येशूला कसं वाटलं आणि त्याने काय केलं, या गोष्टी तो मार्कला खूप चांगल्या प्रकारे सांगू शकला. कदाचित यामुळेच, मार्कला त्याच्या लिखाणांमध्ये येशूच्या भावनांबद्दल आणि त्याच्या कामांबद्दल चांगल्या प्रकारे लिहिता आलं असेल.—मार्क ३:५; ७:३४; ८:१२.

b चित्राचं वर्णन: पौल आणि बर्णबाच्या मिशनरी दौऱ्‍यादरम्यान मार्क त्यांना मदत करतोय. तीमथ्य आनंदाने मंडळीला भेट देतोय. तो मनापासून तिथल्या भाऊबहिणींना प्रोत्साहन देतोय आणि त्यांचा विश्‍वास मजबूत करतोय.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा