ख्रिस्ती जीवन
यहोवाला स्वच्छ, शुद्ध लोक आवडतात
“हात धुऊन घे! रूम स्वच्छ कर. झाडून घे. कचरा बाहेर टाकून ये.” असं सांगून आज अनेक पालक आपल्या मुलांना स्वच्छतेबद्दल शिकवत असतात. पण खरंतर स्वच्छतेबद्दलची सर्व तत्त्वं आपल्याला आपल्या पवित्र देवाकडून मिळाली आहेत. (निर्ग ३०:१८-२०; अनु २३:१४; २कर ७:१) आपण जेव्हा स्वतः स्वच्छ राहतो आणि आपल्या वस्तू स्वच्छ ठेवतो तेव्हा आपण यहोवाचा आदर करत असतो. (१पेत्र १:१४-१६) पण आपलं घर आणि आजूबाजूच्या परिसराबद्दल काय? आज लोक जरी रस्त्यावर आणि बागेत कचरा टाकून परिसर खराब करत असले तरी आपण मात्र एक ख्रिस्ती या नात्यानं आपल्या घराला म्हणजे पृथ्वी ग्रहाला स्वच्छ ठेवण्याचा होईल तितका प्रयत्न करतो. (स्तो ११५:१६; प्रक ११:१८) अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरूनही स्वच्छतेबद्दल आपला दृष्टीकोन कसा आहे ते दिसून येतं. जसं की, चॉकलेटची कागदं, कोल्डड्रिंक्सच्या रिकाम्या बाटल्या, खाल्लेलं च्युईंगम आपण कुठं टाकतो? थोडक्यात काय तर, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपण ‘देवाचे सेवक म्हणून स्वतःची लायकी पटवून देणं गरजेचं आहे.’—२कर ६:३, ४.
देवाला स्वच्छ, शुद्ध लोक आवडतात हा व्हिडिओ दाखवा मग खाली दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा:
आपल्या वस्तू स्वच्छ न ठेवण्याची कोणती कारणं लोकांकडे असतात?
मोशेच्या नियमशास्त्रातून यहोवाचा स्वच्छतेबद्दलचा दृष्टिकोन कसा दिसून येतो?
कोणत्या गोष्टीमुळे आपण न बोलता यहोवाबद्दल साक्ष देऊ शकतो?
स्वच्छतेबद्दलचा यहोवाचा दृष्टिकोन मी माझ्या व्यक्तिगत जीवनात कसा बाळगू शकतो?