वल्हांडण सण स्मारकविधीला चित्रित करत नसला, तरीही या सणापासून आपण बरंच काही शिकू शकतो. उदाहरणार्थ, प्रेषित पौलने येशूला आपला “वल्हांडणाचा कोकरा” म्हटलं. (१कर ५:७) ज्या प्रकारे कोकऱ्याचं रक्त दरवाजाच्या दोन्ही बाजूंना आणि कपाळपट्टीला लावल्यामुळे लोकांचा जीव वाचला, त्याच प्रकारे येशूने वाहिलेल्या रक्तामुळे लोकांचा जीव वाचणं शक्य झालं आहे. (निर्ग १२:१२, १३) तसंच, वल्हांडणाच्या कोकऱ्याचं एकही हाड मोडलं जायचं नाही. हीच गोष्ट येशूच्या बाबतीतही घडली. त्या वेळी मृत्यूची शिक्षा मिळालेल्या अपराध्यांची हाडं मोडण्याची प्रथा होती. पण, येशूचं एकही हाड मोडण्यात आलं नाही.—निर्ग १२:४६; योह १९:३१-३३, ३६.