शिष्य बनवण्यावर लक्ष केंद्रित करा
१. लोकांचा जीव वाचावा म्हणून आपण काय केलं पाहिजे?
१ यहोवाच्या लोकांनी पूर्ण उत्साहानं त्याच्या राज्याची सुवार्ता लोकांना सांगण्याचा निश्चय केला आहे हे २०१४ च्या वार्षिक अहवालावरून स्पष्ट दिसतं. (मत्त. २४:१४) घरोघरचं प्रचार कार्य, पत्रिका व आमंत्रणपत्रिकांच्या खास मोहिमा आणि सार्वजनिक साक्षकार्य यांद्वारे आपण पहिल्यापेक्षा आज जास्त प्रमाणावर लोकांना बायबलमधील संदेश सांगत आहोत. पण जर लोकांचा जीव वाचला पाहिजे तर आपण त्यांना बायबलचा अभ्यास करून येशूचं शिष्य बनण्यास मदत केली पाहिजे.—१ तीम. २:४.
२. आपण मिळेल त्या संधीला बायबल अभ्यासाबद्दल सांगतो हे, स्वतःला कोणते प्रश्न विचारल्यावर कळेल?
२ मिळेल त्या संधीला बायबल अभ्यासाबद्दल सांगा: एखादी व्यक्ती आवडीनं आपला संदेश ऐकते तेव्हा तुम्ही तिच्याशी पुन्हा संपर्क साधण्यासाठी तिचा फोन नंबर किंवा तिचा पत्ता घेऊन बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी लगेच तिची भेट घेता का? आत्ता अलिकडेच, बायबल अभ्यास कसा केला जाऊ शकतो हे पहिल्या भेटीतच सांगितल्याचं तुम्हाला आठवतं का? तुम्ही ज्यांच्याबरोबर नियतकालिक मार्ग सुरू केला आहे त्यांना बायबल अभ्यासाविषयी कधी सांगितलं होतं? तुमच्या सोबत काम करणाऱ्यांना, शाळासोबत्यांना, शेजाऱ्यांना, नातेवाईकांना किंवा मग इतर ओळखीच्या लोकांना तुम्ही बायबलचा अभ्यास का करावा? आणि बायबल अभ्यास कसा चालवला जातो? हे व्हिडिओ दाखवलेत का? टेबल किंवा ट्रॉली साक्षकार्य करताना, ज्यातून बायबल अभ्यास केला जातो असं एखादं प्रकाशन लोकांनी घेतलं तर या प्रकाशनाच्या मदतीनं बायबलचा अभ्यास केला जाऊ शकतो, असं तुम्ही त्यांना सांगता का?
३. लोकांना चांगल्या प्रकारे सत्य शिकवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे?
३ यहोवा आणि येशू मदत पुरवत आहेत: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा,” असं जेव्हा येशूनं म्हटलं तेव्हा त्याच्या म्हणण्याचा अर्थ, ‘तुमचं तुम्हीच जा आणि शिष्य करा,’ असा नव्हता. तर शिष्य करताना तो त्यांच्यासोबत असेल, असं वचन त्यानं त्यांना दिलं. दुसऱ्या शब्दांत, त्याच्या मदतीनं आपण हे काम जोमानं केलं पाहिजे. (मत्त. २८:१९, २०) याशिवाय लोकांना सत्य शिकवण्यासाठी लागणारा पवित्र आत्मा, विविध प्रकारची साधनं आणि प्रशिक्षणही यहोवा आपल्याला देतो. (जख. ४:६; २ करिंथ. ४:७) या महत्त्वपूर्ण कामात भाग घेण्याची आपल्या मनात इच्छा निर्माण व्हावी आणि ते काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला शक्ती मिळावी म्हणून आपण यहोवाला प्रार्थना करू शकतो.—फिलिप्पै. २:१३.
४. आपण शिष्य बनवण्यावर आपलं लक्ष केंद्रित का केलं पाहिजे?
४ लोकांना देव-राज्याची आनंदाची बातमी सांगितल्यानं आपल्याला एक वेगळाच आनंद होतो. पण जेव्हा आपण एखाद्याला सत्य शिकवतो आणि त्यालाही “जीवनाकडे” जाणाऱ्या मार्गावर येण्यास मदत करतो तेव्हा जो आनंद मिळतो तो वर्णन करता येत नाही. (मत्त. ७:१४; १ थेस्सलनी. २:१९, २०) यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे, शिष्य बनवण्यावर आपलं लक्ष केंद्रित करून आपण यहोवाचं मन आनंदित करतो. कारण, “कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी” आहे.—२ पेत्र ३:९.