शिकवण्याची कला सुधारण्यासाठी—मुख्य मुद्द्यांवर जोर द्या
१ पौलाने इब्री लोकांना म्हटले, की त्यांनी “शिक्षक” असले पाहिजे. (इब्री ५:१२) पौलाचे हे शब्द आपल्यालाही तितकेच लागू होतात; कारण लोकांना जाऊन शिकवण्याचे जे कार्य येशूने आपल्याला नेमून दिले आहे ते कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात आज केले जात आहे. प्रभावकारी शिक्षक बनण्यासाठी एक गोष्ट आपली मदत करू शकते. ती म्हणजे, आपण जी माहिती वाचतो व इतरांना शिकवतो तिचा एकंदरीत अर्थ समजून घेणे. ही गोष्ट, अभ्यास केल्या जाणाऱ्या संपूर्ण प्रकाशनाला तसेच त्यातील विशिष्ट अध्यायाला व परिच्छेदांना लागू होते.
२ पुस्तकाचे शीर्षक मुख्य विषयाला सूचित करते, जो पुढे क्रमाक्रमाने स्पष्ट केलेला असतो. शिक्षकाने, प्रत्येक अध्यायाच्या शीर्षकाचा पुस्तकाच्या शीर्षकाशी संबंध जोडण्यास शिकले पाहिजे. एखाद्या पुस्तकातून शिकवताना, अध्यायाच्या शीर्षकाचा पुस्तकाच्या शीर्षकाशी कसा संबंध आहे हे पाहण्यास विद्यार्थ्याला मदत करा. सहसा एका अध्यायात चर्चा केलेल्या विषयाचा, एकंदरीत विषयाच्या एका विशिष्ट पैलूशी संबंध असतो. उदाहरणार्थ, “देव संतुष्ट होईल अशा प्रकारे जगणे” व “कौटुंबिक जीवन सुखी बनवण्याचा मंत्र,” या अध्यायांवरून बायबल नेमके काय शिकवते हे समजण्यास विद्यार्थ्याला मदत होते.
३ मुख्य मुद्दे शोधण्यासाठी लेखातील किंवा अध्यायातील उपशीर्षके खूप उपयुक्त ठरतात. अध्यायातील प्रत्येक परिच्छेदाचा कोणत्या ना कोणत्या मार्गाने अध्यायाच्या शीर्षकाशी संबंध असतो. तेव्हा, प्रत्येक परिच्छेदातून, अध्यायाच्या विषयाशी थेट संबंधित असलेला विशिष्ट मुद्दा शोधण्यास शिका. ही महत्त्वपूर्ण गोष्ट तुम्ही विद्यार्थ्याच्या मनावर बिंबवली पाहिजे.
४ तुम्ही पाहिले असेल, की ज्या प्रकाशनात प्रश्न दिलेले असतात त्यातून शिकवताना प्रश्नाचे उत्तर सहसा एका वाक्यांशात, आणि कधीकधी तर केवळ एका शब्दातसुद्धा दिलेले असते. नेमक्या त्याच शब्दाखाली किंवा वाक्यांशाखाली रेघ मारण्यास विद्यार्थ्याला शिकवा. असे करण्याचे बरेच फायदे आहेत. परिच्छेदाचा बराचसा भाग पुन्हा वाचून दाखवण्याऐवजी विद्यार्थ्याला नेमके उत्तर पटकन मिळेल. रेघा मारलेली अनेक वाक्ये जशीच्या तशी वाचून दाखवण्याऐवजी विद्यार्थ्याला स्वतःच्या शब्दांत उत्तर देण्याचे प्रोत्साहन द्या. रेघा मारलेले मोजके शब्द पाहून त्याला त्या माहितीची मनातल्या मनात लगेच रूपरेषा तयार करता येईल.
५ परिच्छेदातील मुख्य शब्दांकडे व वाक्यांशाकडे किंवा शास्त्रवचनांतील महत्त्वाच्या भागांकडे लक्ष वेधण्यासाठी तिरप्या वळणाचा उपयोग केलेला असतो. शिक्षकासाठी आणि विद्यार्थ्यासाठी याचा खास अर्थ होतो. तिरप्या वळणातील माहितीचे महत्त्व काय हे विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे समजले आहे याची खातरी करा. यामुळे इतरांना त्याचे विश्वास समजावून सांगताना त्याला फायदा होईल.
६ मुख्य मुद्दे शोधण्यासंबंधी दिलेल्या या मूलभूत गोष्टींचा टेहळणी बुरूज व बायबल अभ्यास संचालक या नात्याने शिकवताना किंवा गृह बायबल अभ्यास घेताना; तसेच, मुलांना शिकवतानाही उपयोग केला जाऊ शकतो. येशूने म्हटले की आपण शिकवण्याद्वारे शिष्य बनवले पाहिजे. (मत्त. २८:१९, २०) ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मुख्य मुद्द्यांवर जोर देण्यास शिकणे खूप महत्त्वाचे आहे.