यहोवाच्या साक्षीदारांबरोबर चर्चा
देवाचं राज्य केव्हापासून शासन करू लागलं?—भाग २
यहोवाचे साक्षीदार सहसा अशा प्रकारे लोकांशी चर्चा करतात. कल्पना करा, की केतन नावाचा यहोवाचा साक्षीदार जयेश नावाच्या व्यक्तीला पुन्हा भेटायला आला आहे.
नबुखदनेस्सर राजाच्या स्वप्नाची थोडक्यात उजळणी
केतन: काय म्हणतो जयेश, कसा आहेस?
जयेश: एकदम ठीक.
केतन: छान! खरं सांगू जयेश, तुझ्याबरोबर दर आठवडी बायबलचा अभ्यास करायला मला खूप आवडतं.a मग करायचा का अभ्यास सुरू? देवाचं राज्य १९१४ मध्ये सुरू झालं असं यहोवाचे साक्षीदार कोणत्या आधारावर म्हणतात हे आपण मागच्या वेळी पाहिलं.b त्याचा एक महत्त्वाचा पुरावा आपण एका भविष्यवाणीत पाहिला होता. ती भविष्यवाणी दानीएलाच्या चौथ्या अध्यायात दिली आहे. त्यात काय म्हटलंय आठवतं का तुला?
जयेश: हो आठवतं. नबुखदनेस्सर राजाचं स्वप्न ना, ज्यात तो एक मोठं झाड पाहतो.
केतन: हो बरोबर. अन् त्या झाडाची उंची आकाशापर्यंत पोहचली होती. मग एक देवदूत आज्ञा देत असल्याचं तो ऐकतो. देवदूत म्हणतो, की झाड तोडून टाका, पण त्याचा बुंधा मात्र जमिनीतच राहू द्या. पुढं ‘सात काळांनंतर’ ते झाड पुन्हा वाढणार होतं.c तसंच, आपण हेसुद्धा पाहिलं होतं, की या भविष्यवाणीची दोन प्रकारे पूर्णता होते. पहिली पूर्णता कशी झाली बरं?
जयेश: पहिली पूर्णता . . . नबुखदनेस्सर राजाच्या बाबतीत होती ना? त्याला काहीतरी झालं होतं. अरे हो आठवलं, त्यानं सात वर्षं आपली बुद्धी गमावली होती.
केतन: अगदी बरोबर. आणि त्यामुळंच त्याच्या राज्यशासनात खंड पडला. पण, आपण पाहिलं होतं की या भविष्यवाणीची मोठ्या प्रमाणात पूर्णता होणार होती. ती पूर्णता देवाच्या राज्याबद्दल असणार होती. या पूर्णतेनुसार देवाच्या राज्यशासनात सात काळ खंड पडणार होता. आणि या सात काळांची सुरुवात केव्हा झाली तेही आपण पाहिलं होतं. इ.स.पू. ६०७ मध्ये जेरूसलेमचा नाश झाला तेव्हा त्यांची सुरुवात झाली. तेव्हापासून देवाच्या वतीनं कोणत्याही राजांनी त्याच्या लोकांवर राज्य केलं नाही. पण, सात काळांच्या शेवटी देव आपल्या लोकांवर राज्य करण्यासाठी एका नवीन शासकाला नियुक्त करणार होता. तो स्वर्गातला असणार होता. दुसऱ्या शब्दांत, सात काळ संपतात तेव्हा देवाच्या स्वर्गीय राज्यशासनाची सुरुवात होते. तर सात काळ केव्हा सुरू होतात हे आपण पाहिलं. पण, ते केव्हा संपतात हे जर माहीत झालं तर देवाचं राज्य केव्हा सुरू झालं हे आपल्याला कळेल. तर आत्तापर्यंत आपण जी काही चर्चा केली ती तुला समजली का?
जयेश: हो, तू आता सांगत होतास तर मला सगळं स्पष्ट आठवलं.
केतन: छान! तर आता सात काळ म्हणजे नेमके किती ते आपण पाहूया. मी थोडीफार तयारी केलीय म्हणा; प्रयत्न करतो तुला सांगायचा.
जयेश: हो. चालेल.
सात काळ संपतात आणि शेवटचा काळ सुरू होतो
केतन: आपण पाहिलं, की भविष्यवाणीची पहिली पूर्णता नबुखदनेस्सर राजाच्या बाबतीत झाली. त्याच्या बाबतीत सांगितलेले सात काळ खऱ्या अर्थानं सात वर्षं होते. पुढं त्या भविष्यवाणीची मोठ्या प्रमाणात पूर्णता होणार होती आणि ती देवाच्या राज्याच्या बाबतीत असणार होती. पण, या वेळी सात काळ म्हणजे फक्त सात वर्षं नव्हे, तर त्याहीपेक्षा मोठा कालावधी असणार होता.
जयेश: ते कशावरून?
केतन: आपण हेही पाहिलं होतं, की इ.स.पू. ६०७ मध्ये जेरूसलेमचा नाश झाला तेव्हा सात काळांची सुरुवात झाली. जर त्या वर्षापासून सात वर्ष पुढं मोजली तर आपण इ.स.पू. ६०० मध्ये येतो. पण, त्या वर्षी देवाच्या राज्यशासनाच्या बाबतीत विशेष असं काहीच घडलं नाही. शिवाय, पुढं अनेक शतकांनंतर येशू पृथ्वीवर होता तेव्हा त्यानं जे काही म्हटलं त्यावरून दिसून येतं की तोपर्यंत सात काळ संपलेले नव्हते. हेसुद्धा आपण मागे पाहिलं होतं.
जयेश: हो, आठवतं मला.
केतन: तर यावरून दिसून येतं की सात काळ हे फक्त सात वर्षं नसावेत, तर हा एक मोठा कालावधी असावा.
जयेश: म्हणजे नेमका किती मोठा?
केतन: याचं उत्तर बायबलमधल्या प्रकटीकरणाच्या पुस्तकातून आपल्याला मिळू शकतं; कारण प्रकटीकरण आणि दानीएल या दोन पुस्तकांचा एकमेकांशी खूप जवळचा संबंध आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकात साडेतीन काळांचा उल्लेख करण्यात आला आहे आणि हे साडेतीन काळ म्हणजे १,२६० दिवस.d आता साडेतीन काळांचं दुप्पट म्हणजे किती? सात काळ! आणि १,२६० दिवसांचं दुप्पट? २,५२० दिवस, बरोबर? इथपर्यंत कळलं का तुला?
जयेश: हो कळलं. पण, या गणिताचा आणि १९१४ मध्ये देवाचं राज्य सुरू झालं याचा काय संबंध?
केतन: संबंध आहे. तो कसा? सांगतो समजावून. बायबलच्या भविष्यवाणीमध्ये काही वेळा एक दिवस एका वर्षाला सूचित करतो.e या नियमानुसार, सात काळ म्हणजे २,५२० वर्षं. जर इ.स.पू. ६०७ पासून पुढं २,५२० वर्षं मोजली तर आपण १९१४ या वर्षी पोहचतो.f त्याच वर्षी सात काळ संपले आणि देवाच्या राज्याचा राजा म्हणून येशू राज्य करू लागला. विशेष म्हणजे, १९१४ पासून जगात मोठमोठ्या घटना घडल्या आणि अशा घटना शेवटल्या काळी घडतील असं बायबलमध्ये आधीच सांगितलं होतं.
जयेश: कोणत्या घटना?
केतन: त्या घटनांबद्दल येशूनं मत्तय २४:७ मध्ये सांगितलं होतं. त्यानं म्हटलं: “राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील.” तर बघ, दुष्काळ आणि भूकंप होतील असं येशू बोलला होता आणि या घटना तो स्वर्गात राजा बनल्यावर घडणार होत्या. गेल्या शंभर वर्षांपासून या घटना घडत आहेत असं तुला वाटत नाही का?
जयेश: हो, बरोबर.
केतन: या वचनात, येशूनं हेही सांगितलं होतं, की देवाच्या राज्याचा राजा म्हणून तो राज्य करू लागेल तेव्हा युद्धंसुद्धा होतील. आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकात सांगितलं आहे की शेवटल्या काळी जी युद्धं होतील ती छोटीमोठी नाहीत, तर जागतिक पातळीवर होणारी युद्धं असतील.g तुला आठवतं का, पहिलं महायुद्ध केव्हा सुरू झालं?
जयेश: १९१४ मध्ये. अच्छा! म्हणजे तुला म्हणायचं की हे तेच वर्ष आहे जेव्हा येशूनं राज्य करायला सुरुवात केली! आत्ता माझ्या ध्यानात आलं.
केतन: हो. आपण सात काळाच्या भविष्यवाणीचा आणि शेवटल्या काळाविषयीच्या भविष्यवाण्यांचा एकत्र विचार करतो तेव्हा ते लक्षात येतं. यहोवाच्या साक्षीदारांना पक्की खातरी आहे, की देवाच्या राज्याचा राजा म्हणून येशू १९१४ मध्ये राज्य करू लागला आणि त्याच वर्षी शेवटचा काळ सुरू झाला.h
जयेश: हं. . . . थोडंफार कळलं मला; पण, पूर्णपणे समजायला आणखी थोडा वेळ लागेल.
केतन: काही हरकत नाही रे. सुरुवातीला मलापण थोडा वेळ लागला. पण निदान तुला इतकं तरी समजलं असेल, की बायबलमध्ये १९१४ ही तारीख स्पष्टपणे दिली नसली, तरी त्या वर्षाबद्दल यहोवाचे साक्षीदार जे काही मानतात ते बायबलवरच आधारित आहे.
जयेश: तुमच्या याच गोष्टीचं मला खूप कौतुक वाटतं. तुम्ही जे काही शिकवता ते बायबलमधूनच शिकवता; मनाचं काहीच शिकवत नाही. पण अजूनही एक प्रश्न आहे रे. १९१४ मध्ये येशू स्वर्गात राज्य करू लागेल असं देवानं बायबलमध्ये स्पष्टपणे का नाही सांगितलं? नाही म्हणजे, आज आपल्याला इतका खटाटोप करायची गरजच पडली नसती ना!
केतन: छान प्रश्न आहे तुझा. खरंतर, बायबलमध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या स्पष्टपणे सांगितलेल्या नाहीत. त्या समजून घेण्यासाठी आपल्याला थोडी मेहनत घ्यावी लागते. पण मग, देवानं अशा पद्धतीनं बायबल का लिहिलं? याचं उत्तर आपण पुढच्या वेळी पाहूया?
जयेश: हो, चालेल. ▪ (w14-E 11/01)
बायबलच्या एखाद्या विषयासंबंधी तुमच्याही मनात काही प्रश्न आहेत का? यहोवाच्या साक्षीदारांच्या विश्वासांबद्दल किंवा त्यांच्या चालीरीतींबद्दल जाणून घ्यायची तुमची इच्छा आहे का? असल्यास, यहोवाच्या साक्षीदारांना विचारण्यास कचरू नका. तुमच्याबरोबर चर्चा करण्यास त्यांना नक्कीच आवडेल.
a यहोवाचे साक्षीदार, मोफत बायबल अभ्यासाद्वारे लोकांसोबत बायबलविषयी पद्धतशीर चर्चा करतात.
b या नियतकालिकाच्या जानेवारी – मार्च २०१५ च्या अंकातील, “यहोवाच्या साक्षीदारांबरोबर चर्चा—देवाचे राज्य केव्हापासून शासन करू लागले?—भाग १” हा लेख पाहा.
c बायबलमध्ये दानीएल ४:२३-२५ ही वचने पाहा.
d प्रकटीकरण १२:६, १४ पाहा.
e गणना १४:३४; यहेज्केल ४:६ पाहा.
f “नबुखदनेस्सरनं पाहिलेलं झाडाचं स्वप्न,” हा तक्ता पाहा.
g प्रकटीकरण ६:४ पाहा.
h यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील अध्याय ९ पाहा.