अनुभव
◼ ऑस्ट्रेलिया: जॉन नावाचा एक सुशिक्षित मनुष्य लहानपणापासून चर्चमध्ये जात होता, पण तो “कट्टर नास्तिक” बनला. एका पायनियरने त्याला पहिल्या भेटीत एक माहितीपत्रक दिले. पायनियर बांधव इतर प्रकाशने आणि नव-नवीन नियतकालिके देऊन त्यांतील निर्मितीवर किंवा बायबल भविष्यवाणीवर आधारित असलेले लेख दाखवण्याद्वारे त्याची आवड वाढवत राहिला. ते वाचल्यानंतर आधी अगदीच कट्टर नास्तिक असलेला जॉन आता निदान देवावर थोडाफार विश्वास करू लागला. यानंतर पायनियर बांधवाने त्याला बायबल काय शिकवते हे पुस्तक देऊन त्यातील पृष्ठ २० वरील परिच्छेद ८ आणि २३-२४ पृष्ठांवरील परिच्छेद १३-१६ दाखवले. या परिच्छेदांमधील वचने वाचल्यावर तो इतका भारावून गेला की त्याने म्हटले: “मला बायबलचं परीक्षण करायला आवडेल.”
◼ मेक्सिको: एका मनुष्याने एका प्रचारकाला सांगितले, की बायबल हे देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आले आहे असे मी मानत नाही. मग बांधवाने त्याला बायबल हे देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आले आहे याचे पुरावे सादर केले. अशा काही चर्चांनंतर, बायबलमधून तो मनुष्य जे काही शिकत होता त्याचा त्याच्या मनावर परिणाम होऊ लागला. देवाच्या दर्जांविषयी खासकरून जेव्हा तो शिकला तेव्हा तो खूप प्रभावित झाला. तो बांधवाला म्हणाला: “पहिल्यांदा जेव्हा आपण सोबत मिळून बायबल वाचायचो तेव्हा त्यातील सल्ला इतर पुस्तकांतील सल्ल्याप्रमाणेच मला वाटायचा आणि त्याचा माझ्यावर काही परिणाम झाला नाही. पण, आता जेव्हा आपण त्यातून, खासकरून नैतिकतेच्या बाबतीत असलेली वचनं वाचतो तेव्हा माझं मन मला खाऊ लागतं.”
◼ अमेरिका: एकदा एक ख्रिस्ती जोडपे महानगरात साक्षकार्य करत होते. तेव्हा त्यांना ताइवानमध्ये राहणारी एक स्त्री भेटली. ती देवावर विश्वास तर करायची, पण बायबल हे फक्त पाश्चिमात्य लोकांसाठीच आहे असे तिला वाटायचे. ती खूप प्रतिष्ठित जीवन जगत होती, म्हणजे तिच्याजवळ सर्वकाही होते तरीही ती निराश होती. या जोडप्याने टेबलावर मांडलेल्या प्रकाशनांच्या प्रदर्शनाजवळ ती आली. तिला असे वाटत होते की बायबल तिला जीवनाचा उद्देश शोधण्याकरता मदत करू शकेल. या जोडप्याने तिच्याबरोबर बायबल काय शिकवते पुस्तक आणि एक माहितीपत्रक यांतून बायबल अभ्यास सुरू केला. यांतील काही विषयांवर चर्चा केल्यानंतर, बायबल हे इतर धार्मिक पुस्तकांच्या तुलनेत किती वेगळे आहे असे म्हणत तिने आश्चर्य व्यक्त केले. आतापर्यंत पूर्ण झालेल्या भविष्यवाण्यांची चर्चा केल्यानंतर ती म्हणाली, “मला असं वाटतं की दुसरं कोणतंही पुस्तक बायबल इतकं अचूक असूच शकत नाही!”
◼ जपान: मी देवावर विश्वास ठेवत नाही असे एका घरमालकाने एका प्रचारकाला सांगितले, तरीही प्रचारक त्याला जाऊन भेटत असे व आपल्या नियतकालिकांतील विशिष्ट लेखांवर चर्चा करत असे. हळूहळू घरमालकाचा दृष्टिकोन बदलू लागला आणि एक निर्माणकर्ता असावा, असे तो मानू लागला. पण आता देव आहे असा तो विश्वास करतो आणि प्रचारक त्याच्याबरोबर देवाकडून आनंदाची बातमी! या माहितीपत्रकातून अभ्यास करत आहे.
◼ कॅनडा: एक स्त्री तिच्या घरापासून आपल्या गाडीपर्यंत चालत जात होती तेव्हा एका बहिणीने तिला नवीन नियतकालिके दिली. बहीण तिला परत भेटण्यासाठी गेली तेव्हा मात्र तिने ठामपणे सांगितले की तिला संदेश ऐकण्यात आवड नाही आणि ती देवाला मानत नाही. पण, बहिणीनेही हार मानली नाही. तिने तिला समाधानी जीवन कसे मिळवता येईल? हे माहितीपत्रक देण्याचे ठरवले. म्हणून ती तिला पुन्हा भेटायला गेली तेव्हा तिने तिला म्हटले: “मला माहीत आहे की तुम्ही देवाला मानत नाही पण घरातील सर्व जबाबदाऱ्या तुम्ही एकट्या सांभाळता याचा मी विचार करत होते आणि म्हणून तुम्हाला भेटण्यासाठी आले.” बहिणीने तिला माहितीपत्रकाच्या पृष्ठ ४ वरील परिच्छेद ६ दाखवला जेथे चांगला सल्ला कोठे मिळू शकतो हे सांगण्यात आले आहे. त्यानंतर अध्याय २ मध्ये मुलांच्या संगोपनाविषयी जे सल्ले देण्यात आले आहेत ते वाचण्याचे तिला उत्तेजन दिले. त्या स्त्रीने आनंदाने माहितीपत्रक घेतले.