बायबल काय शिकवते पुस्तकातून एखादी व्यक्ती अभ्यास करायला तयार नसल्यास . . .
१. सुरुवातीलाच सगळे जण बायबल काय शिकवते पुस्तक स्वीकारण्यास तयार होतील का? स्पष्टीकरण द्या.
१ यहोवाचे उपासक बनण्यासाठी बायबल जे शिकवते ते जाणून घेणे गरजेचे आहे. पण, काही जण ख्रिस्ती नसतात आणि बायबल हे देवाचे वचन आहे असे ते मानत नाहीत. तर काही जण देवालाच मानत नाहीत व बायबलबद्दल त्यांना आदर वाटत नाही. जे लोक सुरुवातीला बायबल काय शिकवते पुस्तक स्वीकारण्यास तयार नसतात अशांना मदत करण्यासाठी कोणत्या साहित्यांचा उपयोग केला जाऊ शकतो? खाली काही पद्धती सुचवण्यात आल्या आहेत. या पद्धती, जवळजवळ २० देशांतील प्रचारकांची मते विचारात घेऊन सुचवण्यात आल्या आहेत.
२. ‘मी देवाला मानत नाही,’ असे एखादी व्यक्ती म्हणते तेव्हा आपण काय जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे? व का?
२ जे लोक देवाला मानत नाहीत: ‘मी देवाला मानत नाही,’ असे एखादी व्यक्ती म्हणते तेव्हा ती असे का म्हणते हे जाणून घेतल्यास तिला मदत करणे आपल्याला सोपे जाईल. तिचा उत्क्रांतिवादावर विश्वास असल्यामुळे ती देवाला मानत नाही का? जगातील अन्याय किंवा धर्मातील ढोंगीपणा पाहून देवावरून तिचा विश्वास उडाला आहे का? तिच्या पार्श्वभूमीमुळे किंवा संस्कृतीमुळे ती देवाला मानत नाही का? देव अस्तित्वात नाही असे कदाचित ती ठामपणे म्हणत नसेल, पण देवावर विश्वास ठेवण्याची तिला कधी गरजच भासली नसेल. अनेक प्रचारकांच्या लक्षात आले आहे की, “देवावर तुमचा कधीच विश्वास नव्हता का?” केवळ इतकाच जरी प्रश्न विचारला तरी समोरची व्यक्ती आपले विचार व्यक्त करू लागते. ती बोलत असताना तिला मधेच तोडू नका. ती काय म्हणते ते लक्षपूर्वक ऐका. एक व्यक्ती देवाला का मानत नाही हे समजल्यावर तिला कसे उत्तर द्यावे व कोणते प्रकाशन द्यावे हे आपल्याला समजेल.—नीति. १८:१३.
३. एखाद्या व्यक्तीबद्दल व तिच्या विश्वासांबद्दल आपण आदर कसा दाखवू शकतो?
३ पण अशा व्यक्तीला उत्तर देताना काळजी घ्या. तिचे म्हणणे चुकीचे आहे हे सिद्ध करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात असे तिला वाटायला नको. एका देशातील शाखा कार्यालयाने असे सुचवले: “एका गोष्टीचा आपण नेहमी आदर केला पाहिजे; ती म्हणजे, आपण कशावर विश्वास ठेवावा हे ठरवण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. एखाद्या व्यक्तीशी वाद घालण्याऐवजी तिला विचार करायला लावण्यास आणि योग्य निष्कर्षावर पोहचण्यास मदत करतील असे प्रश्न विचारणे केव्हाही चांगले.” एक प्रवासी पर्यवेक्षक घरमालकाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर उत्तर देण्याआधी सहसा असा प्रश्न विचारतात: “या गोष्टीचा तुम्ही कधी विचार केला का?”
४. आपण बौद्ध धर्मातील लोकांना कशी मदत करू शकतो?
४ बौद्ध धर्माच्या लोकांसाठी देव नावाची कल्पना अगदीच परकी आहे. ब्रिटनमधील काही प्रचारक, अशा लोकांना साक्ष देताना माहितीपत्रकांचा उपयोग करतात. पुढे जमेल तसे ते घरमालकाला बायबल काय शिकवते पुस्तक सादर करतात आणि म्हणतात: “तुम्ही देवाला मानत नसला तरी बायबलचा अभ्यास केल्यानं तुम्हाला फायदाच होऊ शकतो, कारण त्यात जीवनाबद्दल व्यावहारिक मार्गदर्शन दिलं आहे.” अमेरिकेतील चीनी क्षेत्रात सेवा करणारा एक पायनियर बांधव म्हणतो: “आमच्या क्षेत्रातल्या बऱ्याच लोकांना वाचायला खूप आवडतं. त्यामुळं एखादं प्रकाशन दिल्यानंतर आम्ही पुन्हा त्यांना भेटायला जातो तोपर्यंत त्यांनी त्यातलं पान न् पान वाचून काढलेलं असतं. पण, बायबल अभ्यास काय असतो हे अनेकांना ठाऊक नसतं. त्यामुळं पहिल्या भेटीत मी त्यांना आनंदाची बातमी हे माहितीपत्रक सादर करतो, कारण ते अशा प्रकारे लिहिण्यात आलं आहे की ज्यामुळं चर्चा करण्यास वाव मिळतो.” अमेरिकेतील चीनी भाषिक विभागात सेवा करणारे एक विभागीय पर्यवेक्षक म्हणतात की पहिल्या भेटीतसुद्धा बायबल काय शिकवते पुस्तक सादर करणे शक्य आहे. पण, अशा वेळी देवाबद्दल चर्चा करणाऱ्या पहिल्या अध्यायापासून सुरुवात करण्याऐवजी दुसऱ्या अध्यायापासून सुरुवात करणे चांगले आहे कारण त्यात बायबलबद्दलची माहिती दिली आहे.
५. धीर धरणे का महत्त्वाचे आहे?
५ एखाद्याला देवावर विश्वास ठेवण्यासाठी वेळ लागू शकतो; त्यामुळे धीर धरणे खूप महत्त्वाचे आहे. सुरुवातीच्या काही संभाषणांमुळे निर्माणकर्ता अस्तित्वात असल्याचे एक व्यक्ती लगेच मान्य करेल असे नाही. पण काही काळानंतर, एक निर्माणकर्ता अस्तित्वात असण्याची शक्यता आहे असे कदाचित ती कबूल करेल किंवा निर्माणकर्ता अस्तित्वात असल्याचे लोक का मानतात निदान हे तरी तिला समजेल.
६. काहींना बायबल जे शिकवते त्याबद्दल घेणे-देणे का नसते?
६ ज्यांना बायबलबद्दल रुची नाही किंवा त्यावर भरवसा नाही: बरेचदा असे पाहायला मिळते की देव अस्तित्वात असल्याचे एक व्यक्ती मान्य करते, पण बायबल जे शिकवते त्याबद्दल तिला काहीच घेणे-देणे नसते; कारण बायबल हे देवाचे वचन आहे यावर तिचा भरवसा नसतो. ती कदाचित अशा एका देशात राहत असेल जेथे ख्रिस्ती धर्म पाळला जात नसेल आणि त्यामुळे बायबल हा ख्रिश्चन लोकांचा ग्रंथ आहे असा ती विचार करत असेल. किंवा मग, ती नावापुरत्या ख्रिस्ती देशात राहत असेल आणि बायबलचा आपल्याला काहीच उपयोग होऊ शकत नाही असे तिला वाटत असेल. अशा व्यक्तीच्या मनात बायबलबद्दल रुची निर्माण व्हावी आणि पुढे तिने बायबल काय शिकवते पुस्तकातून अभ्यास करण्याची तयारी दाखवावी म्हणून आपण तिला मदत कशी करू शकतो?
७. लोकांच्या मनात बायबलबद्दल रुची निर्माण करण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग कोणता असू शकतो?
७ ग्रीसमधील शाखा कार्यालयाने असे लिहिले: “ज्या व्यक्तींना बायबलबद्दल रुची नाही अशांना मदत करण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे बायबल काय म्हणते ते तिला उघडून दाखवणे. अनेक प्रचारकांच्या लक्षात आले आहे, की एखाद्या व्यक्तीशी आपण प्रत्यक्ष जे काही बोलतो त्यापेक्षा बायबलमधून तिला जे दाखवतो त्याचा तिच्या मनावर सगळ्यात जास्त प्रभाव पडतो. (इब्री ४:१२) बायबलमध्ये देवाचे नाव पाहिल्यानंतर अनेक जण बायबलबद्दल अधिक जाणून घेण्यास उत्सुक झाले आहेत.” भारतातील शाखा कार्यालयाने असे लिहिले: “जीवन-मरणाबद्दलचं सत्य ऐकून अनेक हिंदू लोक आकर्षित होतात. तसंच, जातिभेद नसलेलं जग आणण्याचं देवाचं अभिवचन ऐकूनही ते आकर्षित होतात.” बरेचदा आपल्या क्षेत्रातील लोकांना ज्या समस्या सर्वाधिक भेडसावतात त्या समस्या देवाचे राज्य कशा प्रकारे नाहीशा करेल हे बायबलमधून सांगण्याची संधी प्रचारकांना मिळते.
८. ख्रिस्ती धर्मजगतामुळे ज्यांचा बायबलबद्दल नकारात्मक दृष्टिकोन आहे त्यांच्याशी तुम्ही कसे बोलू शकता?
८ ख्रिस्ती धर्मजगतामुळे एखादी व्यक्ती बायबलबद्दल नकारात्मक दृष्टिकोन बाळगत असेल. अशा व्यक्तीला तुम्ही समजावून सांगू शकता की ख्रिस्ती धर्मजगताने बायबलचा व त्यातील शिकवणींचा चुकीचा अर्थ लावला आहे. भारतातील शाखा कार्यालयाने लिहिले: “कधीकधी आपल्याला लोकांच्या हे लक्षात आणून द्यावं लागतं की चर्चेस बायबलमधील माहिती जशीच्या तशी लोकांसमोर मांडत नाहीत.” त्यांनी असेही लिहिले की, जीवनाचा काय उद्देश आहे? तो तुम्हाला कसा शोधता येईल? या माहितीपत्रकातील चौथ्या भागाचा सहसा हिंदू लोकांवर खूप चांगला प्रभाव पडतो. चर्चेसनी कशा प्रकारे देवाच्या वचनात भेसळ केली आहे व ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे याबद्दल त्या भागात सांगितले आहे. ब्राझीलमधील एक पायनियर बांधव घरमालकांना असे म्हणतो: “आज अनेक जण आपला धर्म न बदलता, खुल्या मनानं बायबलमधल्या निरनिराळ्या विषयांचं परीक्षण करत आहेत. तुम्हालाही असं करायला आवडेल का? बायबलमधून तुम्ही जे शिकाल त्यामुळं तुम्ही नक्कीच थक्क व्हाल.”
९. एखाद्या व्यक्तीला सुरुवातीला बायबलबद्दल रुची वाटत नसेल, तर आपण प्रयत्न करण्याचे सोडून का देऊ नये?
९ यहोवा प्रत्येक व्यक्तीचे अंतःकरण पाहतो. (१ शमु. १६:७; नीति. २१:२) तो प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना सत्य उपासनेकडे आकर्षित करत आहे. (योहा. ६:४४) यांपैकी अनेकांना देवाबद्दल कधीच शिकवण्यात आले नसेल किंवा बायबलबद्दल त्यांनी फारसे ऐकले नसेल. पण, आपल्या सेवाकार्यामुळे अशांना तारण व सत्याचे परिपूर्ण ज्ञान प्राप्त करण्याची संधी मिळते. (१ तीम. २:४) त्यामुळे एखाद्या व्यक्तीला सुरुवातीला बायबलबद्दल रुची वाटत नसेल, तर प्रयत्न करण्याचे सोडून देऊ नका! त्यांच्या मनात बायबलबद्दल रुची निर्माण करण्यासाठी तुमच्या भाषेत उपलब्ध असलेल्या साधनांचा उपयोग करा. पुढे तुम्ही बायबल अभ्यास चालवण्यासाठी असलेल्या आपल्या मुख्य पुस्तकातून अर्थात बायबल नेमके काय शिकवते? यातून चर्चा सुरू करू शकता.
[४ पानांवरील चौकट]
‘मी देवाला मानत नाही,’ असे घरमालक म्हणतो तेव्हा:
• घरमालक देवाला का मानत नाही हे जाणून घेण्यासाठी त्याला असा प्रश्न विचारा: “देवावर तुमचा कधीच विश्वास नव्हता का?”
• तो उत्क्रांतिवादावर विश्वास ठेवणारा असेल तर पुढील माहितीपत्रक उपयुक्त ठरू शकते:
समाधानी जीवन—कसे मिळवता येईल?, भाग ४
• जगातील अन्याय व दुःख पाहून देवावरून त्याचा विश्वास उडाला असेल तर पुढील माहितीपत्रके उपयुक्त ठरू शकतात:
देव खरोखरी आपली काळजी करतो का? भाग ६, आणि जीवनाचा काय उद्देश आहे?, भाग ६
• देव अस्तित्वात आहे ही गोष्ट घरमालक मान्य करताच बायबल काय शिकवते पुस्तकाकडे वळा. पुस्तकातील दुसऱ्या अध्यायातून किंवा त्याच्या आवडीच्या एखाद्या विषयावरून चर्चा करणे चांगले राहील.
[५ पानांवरील चौकट]
घरमालकाला बायबलवर भरवसा नसल्यास:
• बायबलमधील तत्त्वांचे पालन करणे किती फायदेकारक आहे याची चर्चा करा. व्यावहारिक जीवनात बायबल किती उपयुक्त आहे हे पटवून सांगण्यासाठी पुढील प्रकाशनांचा उपयोग करा:
देवाकडून आनंदाची बातमी!, पाठ ९ आणि ११; सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक, पृष्ठे २२-२६; आणि समाधानी जीवन—कसे मिळवता येईल?, भाग २
बायबलबद्दल चुकीचा ग्रह असलेल्या क्षेत्रात कार्य करताना तेथील लोकांना तुम्ही सांगत असलेल्या चांगल्या गोष्टी बायबलमधून आहेत हे लगेच नव्हे तर अनेक भेटी घेतल्यानंतर सांगा.
• बायबलमधील भविष्यवाण्या कशा प्रकारे तंतोतंत पूर्ण झाल्या आहेत ते सांगा. तुम्ही पुढील माहितीपत्रकाचा उपयोग करू शकता:
सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक, पृष्ठे २७-२९
• इतर विषयांबद्दल बायबल काय शिकवते असा प्रश्न व्यक्ती विचारताच बायबल काय शिकवते पुस्तकाकडे चर्चा वळवा.
[६ पानांवरील चौकट]
‘मी देवाला मानत नाही,’ असे घरमालक म्हणतो तेव्हा तुम्ही असे म्हणू शकता:
• “पण असं समजा की देव अस्तित्वात आहे आणि तसं जर असेल तर तो कसा असला पाहिजे असं तुम्हाला वाटतं?” बऱ्याच लोकांना असे वाटते की तो प्रेमळ, न्यायी, दयाळू व निःपक्षपाती असावा, जेणेकरून त्यांना त्याच्याशी जवळीक साधता येईल. बायबलमधून त्याला हे दाखवा की देव नेमका असाच आहे. (बायबल काय शिकवते पुस्तकातील अध्याय १, परिच्छेद ६ पासून तुम्ही सुरुवात करू शकता.)
“माझा बायबलवर विश्वास नाही,” असे घरमालक म्हणतो तेव्हा तुम्ही असे म्हणू शकता:
• “आज अनेकांना असंच वाटतं. काहींना असं वाटतं, की वैज्ञानिक गोष्टींबद्दल बायबल जे काही सांगतं ते चुकीचं आहे किंवा बायबलचे स्तर व्यावहारिक नाहीत. तुम्ही कधी बायबलचं वाचन केलंय का? [उत्तरासाठी थांबा. मग, सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक या माहितीपत्रकातील पृष्ठ ३ वरील माहिती दाखवा व माहितीपत्रक सादर करा.] आज धर्मानं बायबलमधील शिकवणींचा चुकीचा अर्थ लावला आहे आणि त्यामुळं बऱ्याच लोकांना बायबलबद्दल आदर राहिलेला नाही. पुढच्या वेळी मी येईन तेव्हा आपण पृष्ठे ४ आणि ५ वर दिलेल्या एका उदाहरणाची चर्चा करू या.”
• “आज अनेकांना असंच वाटतं. पण, बायबलबद्दल कोणती गोष्ट मला विशेष आवडते हे मी तुम्हाला वाचून दाखवलं तर चालेल का? [ईयोब २६:७ किंवा यशया ४०:२२ वाचा, ज्यांत सांगितले आहे की बायबल हे वैज्ञानिकदृष्ट्या अगदी अचूक आहे.] शिवाय, बायबलमध्ये कुटुंबांना लाभदायक ठरेल असं उत्तम मार्गदर्शन दिलं आहे. मी पुढच्या वेळी येईन तेव्हा याचं एक उदाहरण तुम्हाला दाखवेन.”
• “तुम्ही हे स्पष्टपणे मला सांगितलं याबद्दल आभारी. जर देवानं मानवांसाठी एखादं पुस्तक लिहिलं असतं तर त्यात त्यानं काय लिहिलं असतं असं तुम्हाला वाटतं?” मग, त्याच्या उत्तराशी मिळताजुळता एखादा मुद्दा बायबलमधून त्याला दाखवा.