समजबुद्धीने सुवार्ता सांगा
१ वेगवेगळ्या धर्मांतील आणि पार्श्वभूमीतील लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी समजबुद्धीची गरज आहे यावर प्रेषित पौलाने जोर दिला. आज काही लोक धार्मिक असल्याचा दावा करतात, तर काहींना आध्यात्मिक गोष्टींत रस नसतो आणि आध्यात्मिक मूल्यांची त्यांना जराही कदर नसते. त्यामुळे, सुवार्तेचे प्रचारक या नात्याने सेवाकार्यात राज्याचा संदेश “सर्वांना” आवडेल अशा पद्धतीने सांगता यावा म्हणून समजबुद्धीचा वापर करणे महत्त्वाचे आहे.—१ करिंथ. ९:१९-२३.
२ घरमालकाची परिस्थिती ओळखा: सेवाकार्यात समजबुद्धीने सुवार्ता सांगण्यासाठी घरमालकाला ज्या गोष्टींविषयी आस्था आहे त्या विचारात घेऊन आपल्या सादरीकरणात फेरबदल करणे गरजेचे आहे. पण त्यासाठी पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. प्रचारकाजवळ जी पुस्तके व नियतकालिके असतील त्यांतील वेगवेगळ्या विषयांबद्दल त्याला चांगल्या प्रकारे माहीत असेल, तर तो वेगवेगळ्या मुद्यांवर सुवार्ता सांगण्यास तयार असू शकतो. वयोवृद्ध लोकांशी, तरुणांशी, कुटुंबप्रमुखांशी, गृहिणींशी, नोकरी करणाऱ्या महिलांशी आणि इतरांशी बोलताना आपण त्यांची परिस्थिती विचारात घेतली पाहिजे आणि त्यांना कोणते साहित्य सादर करावे हे ठरवताना समजबुद्धीचा वापर केला पाहिजे.
३ घरमालकाशी संभाषण सुरू करण्याआधी, सभोवतालची परिस्थिती विचारात घ्या. असे केल्यामुळे घरमालक एक पालक आहे, विशिष्ट धर्मातील आहे, त्याला घराची काळजी आहे, इत्यादी गोष्टी तुम्हाला समजतील. यामुळे, घरमालकाच्या परिस्थितीनुसार व त्याच्या आवडीनुसार सादरीकरणात फेरबदल करण्यास तुम्हाला मदत मिळेल. विचारपूर्वक प्रश्नांमुळे आणि घरमालकाचे लक्षपूर्वक ऐकल्यामुळे, तो कोणत्या धर्माचा आहे आणि त्याचे विचार काय आहेत या गोष्टी तुम्हाला समजतील व संभाषण पुढे चालू ठेवण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल.
४ सादरीकरण जुळवून घ्या: घरोघरचे कार्य करताना एखाद्या घरात तुम्हाला खेळणी किंवा मुले दिसली तर तुम्ही असे म्हणून संभाषण सुरू करू शकता: “आज तुमच्या या भागात आम्ही सर्व पालकांना भेट देत आहोत; आणि मुलांवर होणाऱ्या संस्कारांविषयी त्यांच्याशी बोलत आहोत. हल्ली मुलांना उच्च शिक्षण देण्यावर खूप भर दिला जातो; पण, नैतिक शिक्षणाच्या बाबतीत काय? त्यावरही तितकाच भर दिला जातो का? तुम्हाला काय वाटतं?” घरमालकाचे मत ऐकून घ्या. घरमालकाला या विषयाबद्दल आस्था आहे हे दिसून आल्यास तुम्ही पुढे असे म्हणू शकता: “शास्त्रवचनांत सांगितलं आहे की मुलांनाच नव्हे, तर आपल्या सर्वांनाच या बाबतीत उत्तम मार्गदर्शनाची खूप गरज आहे. नीतिसूत्रे १४:१२ या वचनात काय म्हटलं आहे ते पाहा.” शास्त्रवचन वाचल्यानंतर तुम्ही असे म्हणू शकता: “मी अलीकडेच एक लेख वाचला, ज्यात सांगितलं आहे की बायबलमध्ये दिलेल्या मार्गदर्शनाचा आज आपल्या सर्वांनाच खूप फायदा होऊ शकतो.” बायबल काय शिकवते पुस्तकातील पृष्ठ १३४ काढा आणि विषयाशी संबंधित असलेल्या एखाद्या परिच्छेदावर चर्चा करा.
५ सेवाकार्यासाठी आपण जर चांगली तयारी केली आणि आपल्या समजबुद्धीचा चांगला उपयोग केला तर आपल्यापैकी प्रत्येक जण प्रेषित पौलासारखे म्हणू शकेल: “मी सर्वांना सर्व काही झालो आहे, अशा हेतूने की, मी सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे.”—१ करिंथ. ९:२२; नीति. २:११.