संदेष्ट्यांचे अनुकरण करा—योना
१. योनाने कोणते चांगले गुण दाखवले?
१ तुम्ही जेव्हा योनाबद्दल विचार करता तेव्हा तुमच्या मनात काय येते? काही जण त्याला भितरा किंवा पाषाणहृदयी समजतील. पण खरे पाहता त्याने नम्रता, धैर्य आणि स्वःत्यागाची भावना दाखवली. आज आपण योनाच्या उदाहरणाचे अनुकरण कसे करू शकतो?—याको. ५:१०.
२. योनाप्रमाणे आपणही नम्रता कशी दाखवू शकतो?
२ नम्रता: सुरुवातीला योना त्याला सोपवण्यात आलेल्या क्षेत्राच्या अगदी विरुद्ध दिशेला पळून गेला. कारण अश्शूरी लोक अतिशय हिंसक व क्रूर होते आणि निनवे शहराला “रक्तपाती” नगरी असे नाव पडले होते. (नहू. ३:१-३) पण जेव्हा यहोवा देवाने योनाचे ताडन केले व त्याला दुसरी संधी दिली तेव्हा त्याने नम्रता दाखवली व ती नेमणूक स्वीकारली. (नीति. २४:३२; योना ३:१-३) सुरुवातीला जरी तो पळून गेला असला तरी नंतर त्याने यहोवाची इच्छा पूर्ण केली. (मत्त. २१:२८-३१) आपले ताडन केले जाते किंवा आपले क्षेत्र आव्हानात्मक असते तेव्हाही आपण योनाप्रमाणेच प्रचार करत राहण्यास ठाम आहोत का?
३. क्षेत्रसेवेत असताना धैर्याची व स्वःत्यागाची गरज का आहे?
३ धैर्य व स्वःत्याग: आपला चुकीचा निर्णय खलाशांच्या जिवावर बेतला आहे हे जेव्हा योनाला जाणवते तेव्हा तो त्याचा जीव अर्पण करण्यास तयार होतो. (योना १:३, ४, १२) नंतर योना त्याला सोपवलेली नेमणूक पूर्ण करण्याकरता निनवे शहराच्या मध्यभागी जाऊन यहोवाच्या न्यायदंडाची घोषणा करतो. त्याच्या या कार्यावरून कळते की तो भितरा नसून देवाचा एक धैर्यवान संदेष्टा होता. (योना ३:३, ४) आज आपल्याबाबतीत काय? विरोध होत असलेल्या क्षेत्रात प्रचार करण्यासाठी आपल्यालाही धैर्याची गरज आहे. (प्रे. कृत्ये ४:२९, ३१) त्यासोबतच सेवेत वेळ व साधनांचा उपयोग करण्यासाठी स्वःत्यागाची गरज असते.—प्रे. कृत्ये २०:२४.
४. यहोवाच्या संदेष्ट्यांच्या उत्तम उदाहरणांवर मनन करण्याकरता आपण वेळ का काढला पाहिजे?
४ प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही यहोवाच्या संदेष्ट्यांबद्दल वाचता तेव्हा तुम्ही त्या परिस्थितीत आहात अशी कल्पना करा. यामुळे तुम्हाला खूप फायदे होतील. तुम्ही स्वतःला विचारू शकता: ‘मी त्या संदेष्ट्याच्या जागी असतो तर काय प्रतिक्रिया दाखवली असती? मी त्याच्या चांगल्या गुणांचे अनुकरण कसे करू शकतो?’ (इब्री ६:११, १२) आपली राज्य सेवा याच्या पुढील लेखांमध्ये इतर विश्वासू संदेष्ट्यांच्या उदाहरणांवर चर्चा केली जाईल ज्यामुळे आपल्याला अनमोल बोध मिळतील.