तुमचा डोळा निर्दोष आहे का?
१. “डोळा निर्दोष” असण्याचा काय अर्थ होतो?
१ आपण जे काही पाहतो त्याचा आपल्या कार्यांवर प्रभाव पडतो. त्यामुळे, “तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल,” हे येशूचे शब्द किती उचित आहेत. (मत्त. ६:२२) येशूने सांगितल्याप्रमाणे, डोळा निर्दोष असण्याचा अर्थ तो एकाच गोष्टीवर अर्थात देवाची इच्छा पूर्ण करण्यावर केंद्रित ठेवणे, असा होतो. असे केल्यास आपण देवाच्या राज्याला प्रथम स्थान देऊ आणि ख्रिस्ती सेवेपासून आपले लक्ष विचलित करणाऱ्या अनावश्यक भौतिक गोष्टी किंवा कार्ये यांच्यामागे धावणार नाही.
२. कशामुळे आपली दिशाभूल होण्याची शक्यता आहे पण कोणती गोष्ट आपली मदत करू शकते?
२ स्वतःचे परीक्षण करून पाहणे गरजेचे: आपल्याला कोणत्या गोष्टींची खरोखरच आवश्यकता आहे किंवा इतरांजवळ कोणत्या गोष्टी आहेत याबद्दल जाहिरातींमध्ये जे दाखवले जाते त्याचा प्रभाव आपल्या मनावर पडल्याने आपलीही दिशाभूल होण्याची शक्यता आहे. आपला बराच वेळ, पैसा किंवा शक्ती ज्यात जाऊ शकते अशा गोष्टी मिळवण्याआधी किंवा खरेदी करण्याआधी, ‘यहोवाची मी करत असलेली सेवा या गोष्टींमुळे आणखी वाढणार आहे की त्यात व्यत्यय येणार आहे?’ असा स्वतःला प्रश्न विचारून आपण “खर्चाचा अंदाज” केला पाहिजे. (लूक १४:२८; फिलिप्पै. १:९-११) शिवाय, सेवेमध्ये अधिकाधिक वेळ घालवता यावा म्हणून आपण आपले राहणीमान आणखी साधे कसे करू शकतो यावरही वेळोवेळी विचार केला पाहिजे.—२ करिंथ. १३:५; इफिस. ५:१०.
३. आपले राहणीमान साधे बनवण्याकरता एका बहिणीला जे काही बदल करावे लागले त्यावरून आपण काय शिकतो?
३ एका बहिणीने सामान्य पायनियरींग सुरू केली तेव्हा तिने आपली पूर्णवेळेची नोकरी धरून ठेवली. अर्ध-वेळेची नोकरी करून सुद्धा ती तिच्या गरजा पूर्ण करू शकली असती. पूर्ण वेळेची नोकरी करून सामान्य पायनियरींग करणे किती कठीण आहे हे जाणवल्यावर तिने म्हटले: “आपण एकाच वेळी दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही. माझ्या गरजा पूर्ण करण्याकरता मला माझ्या इच्छांचा त्याग करावा लागला. नंतर मला जाणवलं की भौतिक गोष्टी काय, कालांतराने जुन्या होतात आणि थोड्या दिवसांनी आपल्याला त्यांचा कंटाळा येऊ लागतो.” तिने तिचे राहणीमान साधे बनवून नोकरी बदलली आणि यामुळे पायनियर सेवा तिला चालू ठेवता आली.
४. आपला डोळा निर्दोष ठेवणे सध्या महत्त्वाचे का आहे?
४ आपण शेवटल्या काळात जगत असल्यामुळे आपला डोळा निर्दोष ठेवणे अधिकच महत्त्वाचे झाले आहे. सरणारा प्रत्येक दिवस आपल्याला या जगाच्या विनाशाच्या आणि देवाच्या नवीन जगाच्या जवळ नेतो. (१ करिंथ. ७:२९, ३१) प्रचार कार्यावर आपले लक्ष केंद्रित करून आपण स्वतःचे आणि आपला संदेश ऐकणाऱ्यांचे जीवन वाचवू शकतो.—१ तीम. ४:१६.