ख्रिस्ती सेवकांनी प्रार्थना करण्याची गरज आहे
१. आपली सेवा पूर्ण करण्यासाठी काय करायची गरज आहे?
१ आपली सेवा आपण आपल्या ताकदीवर पूर्ण करू शकत नाही. हे कार्य करण्यासाठी यहोवा आपल्याला शक्ती देतो. (फिलिप्पै. ४:१३) मेंढरांसमान लोकांना शोधण्यासाठी आपल्याला मदत व्हावी म्हणून तो त्याच्या देवदूतांचा उपयोग करतो. (प्रकटी. १४:६, ७) आपण पेरलेले व पाणी घातलेले सत्याचे बीज वाढवणारा यहोवा आहे. (१ करिंथ. ३:६, ९) त्यामुळे, ख्रिस्ती सेवकांनी आपल्या स्वर्गीय पित्यावर प्रार्थनेद्वारे विसंबून राहणे खरोखरच किती आवश्यक आहे!
२. आपण कोणत्या गोष्टींसाठी प्रार्थना करू शकतो?
२ स्वतःसाठी: प्रत्येक वेळी प्रचार करताना आपण प्रार्थना केली पाहिजे. (इफिस. ६:१८) आपण कोणत्या गोष्टींसाठी प्रार्थना करू शकतो? आपल्या क्षेत्राबद्दल सकारात्मक मनोवृत्ती बाळगता यावी व धैर्याने प्रचार कार्य करता यावे म्हणून आपण यहोवाला प्रार्थना करू शकतो. (प्रे. कृत्ये ४:२९, ३०) ज्यांच्यासोबत आपण बायबल अभ्यास करू शकतो अशा योग्य मनोवृत्तीच्या लोकांशी आपली भेट घालून द्यावी अशी आपण यहोवाला प्रार्थनेत विनंती करू शकतो. घरमालक आपल्याला प्रश्न विचारतो तेव्हा योग्य उत्तर देता यावे म्हणून आपण यहोवाला थोडक्यात, मनातल्या मनात प्रार्थना करू शकतो. (नहे. २:४) प्रतिकूल परिस्थितीतही प्रचार कार्य चालू ठेवण्यासाठी आपल्याला समजबुद्धी व धैर्य मिळावे यासाठीही आपण प्रार्थना करू शकतो. (मत्त. १०:१६; प्रे. कृत्ये ४:२९, ३०) तसेच, सेवा कार्याला नेहमी प्रथम स्थानी ठेवण्याची बुद्धी मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू शकतो. (याको. १:५) शिवाय, यहोवाचे सेवक बनण्याचा त्याने आपल्याला जो बहुमान दिला आहे त्याबद्दल प्रार्थनेत आपण त्याचे आभार मानतो तेव्हा यहोवाला आनंद होतो.—कलस्सै. ३:१५.
३. इतरांसाठी प्रार्थना केल्यामुळे प्रचार कार्याला कसा हातभार लागतो?
३ इतरांसाठी: आपण ‘एकमेकांसाठीही प्रार्थना’ केली पाहिजे. उचित असते तेव्हा आपण प्रार्थनेत आपल्या बांधवांच्या नावांचा उल्लेख करू शकतो. (याको. ५:१६; प्रे. कृत्ये १२:५) आजारपणामुळे प्रचार कार्यातील तुमचा सहभाग मर्यादित झाला आहे का? तर मग चांगले आरोग्य असलेल्या तुमच्या बांधवांसाठी प्रार्थना करा. त्यांच्यासाठी तुम्ही केलेल्या या प्रार्थना अतिशय प्रबळ असू शकतात, तेव्हा त्यांचे महत्त्व कधीही कमी लेखू नका. सरकारी अधिकाऱ्यांसाठीही प्रार्थना करणे उचित आहे, जेणेकरून ते प्रचार कार्याबद्दल अनुकूल मनोवृत्ती दाखवतील आणि यामुळे आपल्या बांधवांना “शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण” करता येईल.—१ तीम. २:१, २.
४. आपण प्रार्थनेत तत्पर का राहिले पाहिजे?
४ संपूर्ण जगभरात सुवार्तेचा प्रचार करण्याची खूप मोठी जबाबदारी आपल्याला सोपवलेली आहे. जर आपण “प्रार्थनेत तत्पर” राहिलो तर यहोवाच्या मदतीने आपण हे कार्य नक्कीच पूर्ण करू शकू.—रोम. १२:१२.