अत्यंत महत्त्वाचे काम
१. सेवेबद्दल आपल्याला असलेली कदर आपल्याला कोणते त्याग करण्यास प्रवृत्त करेल?
१ सेवेत आपण आपला वेळ, शक्ती आणि पैसा खर्च करावा असे प्रोत्साहन आपल्याला नेहमी का दिले जाते? कारण हे काम अत्यंत महत्त्वाचे आहे! या कामाचे दूरगामी परिणाम लक्षात घेतल्यास, परत कधीच केल्या न जाणाऱ्या या कामात भाग घेण्याची आपली इच्छा अधिक वाढेल.—प्रे. कृत्ये २०:२४.
२. आपल्या प्रचारकार्यामुळे यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण कसे होते?
२ यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण: प्रचारकार्य या गोष्टीवर जोर देते की येशू ख्रिस्ताद्वारे येणारे यहोवाचे राज्य मानवी सरकारांना काढून टाकेल व मानवजातीच्या सर्व दुःखांचे निरसन करेल. (मत्त. ६:९, १०) आजारपण व मृत्यू यापासून केवळ यहोवाच आपली सुटका करू शकतो म्हणून त्याचे गौरव केले जाईल. (यश. २५:८; ३३:२४) आपण त्याचे नाव धारण करत असल्याने आपल्या उत्तम उदाहरणाने व आवेशाने इतरही यहोवाचे गौरव करू शकतात. (१ पेत्र २:१२) संपूर्ण पृथ्वीवर सार्वभौम यहोवा देवाच्या नावाचे गौरव करणे आपल्यासाठी किती समाधानकारक आहे!—स्तो. ८३:१८.
३. राज्य संदेशाला जे योग्य प्रतिसाद देतात त्यांना कोणते आशीर्वाद मिळतात?
३ जीव वाचतात: यहोवाची “कोणाचा नाश व्हावा अशी . . . इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे.” (२ पेत्र ३:९) पण जर कोणी शिकवणारे नसतील तर यहोवाच्या नजरेत कोणते वर्तन योग्य वा अयोग्य आहे हे लोक कसे शिकतील? (योना ४:११; रोम. १०:१३-१५) लोक जेव्हा सुवार्तेला प्रतिसाद देतात व हानीकारक सवयी सोडून देतात तेव्हा त्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारतो. (मीखा ४:१-४) शिवाय त्यांना सार्वकालिक जीवनाची आनंदी आशाही मिळते. आपल्या आवेशी प्रचारामुळे व शिकवण्याच्या कार्यामुळे आपला व आपला संदेश ऐकणाऱ्यांचाही जीव वाचू शकतो. (१ तीम. ४:१६) या अत्यंत महत्त्वाच्या कामात आपली किती सन्मानाची भूमिका आहे!
४. आपण राज्य प्रचार व शिष्य बनवण्याच्या कामात सक्रियपणे भाग का घेतला पाहिजे?
४ लवकरच मोठे संकट या अधार्मिक जगाचा अचानक अंत करेल. यहोवाची बाजू घेणाऱ्यांचा बचाव होईल. अशा प्रकारे प्रचार करणे व शिष्य बनवणे हे आजच्या काळातील सर्वात निकडीचे, महत्त्वाचे व फायदेकारक काम आहे. या कामाला आपल्या जीवनात पहिले स्थान द्या!—मत्त. ६:३३.