नियमन मंडळाकडून पत्र
यहोवाचे प्रिय सहसाक्षीदार:
विश्वाचा सार्वभौम प्रभू यहोवा याचे नाव धारण करण्याचा किती मोठा सन्मान आपल्याला मिळाला आहे! हे नाव चिरकालिक, अविनाशी व अतुल्य आहे. यहोवानेच आपल्याला हे नाव धारण करू दिले आहे आणि १९३१ पासून खासकरून या अनोख्या नावाने आपल्याला ओळखले जाते. (यश. ४३:१०) यहोवाचे साक्षीदार म्हणून स्वतःची ओळख करून देण्याचा आपल्याला अभिमान वाटतो.
पण देवाचे नाव पुसून टाकण्याचा सैतान अथक प्रयत्न करत आहे. त्याच्या हातात असलेली राष्ट्रे यहोवाचे नाव झिडकारत आहेत. खोट्या धर्माचे साम्राज्य असलेल्या मोठ्या बाबेलीला तर देवाच्या नावाची घृणा वाटते; त्यामुळे अनेक बायबल भाषांतरांमधून ते काढून टाकण्यात आले आहे. पण याच्या अगदी उलट, येशूने आपल्या पित्याचे नाव उंचावले. आपल्या अनुयायांना शिकवलेल्या आदर्श प्रार्थनेत त्याने देवाच्या नावाला प्रथम स्थान दिले. त्याने म्हटले: “ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा: हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो.” (मत्त. ६:९) नंतर, आपल्या पित्याला मनःपूर्वक केलेल्या एका प्रार्थनेत त्याने म्हटले: “जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझे नाव प्रगट केले.” (योहा. १७:६) येशूच्या पावलांवर पाऊल ठेवून चालण्याची आपली इच्छा असल्यामुळे, संपूर्ण पृथ्वीवर यहोवाच्या नावाचा जयघोष करण्याचा आपण पहिल्यापेक्षा आता जास्त निश्चय केला आहे.
“सुवार्तेची अगदी पूर्णपणे साक्ष द्या,” या २००९ च्या वार्षिक वचनाने आपल्याला, ख्रिस्ती सेवा जोमाने पूर्ण करण्यास प्रेरित केले. (प्रे. कृत्ये २०:२४, NW) मागील सेवा वर्षांत यहोवाने आपल्या प्रयत्नांवर भरघोस आशीर्वाद दिला होता हे आपण खात्रीने म्हणू शकतो. यहोवाच्या नावाच्या गौरवासाठी व सन्मानासाठी संपूर्ण जगभरात मोठी साक्ष देण्यात आली होती. सर्व लोकांना प्रचार कामात तसेच दैनंदिन समस्यांवर उपाय शोधणाऱ्या प्रामाणिक मनाच्या लोकांना शिकवण्याच्या कामात ७३,१३,१७३ प्रचारकांनी भाग घेऊन एक उच्चांक गाठला. ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारक विधीला १,८१,६८,३२३ जण उपस्थित होते. यावरून असे दिसते, की या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश होण्याआधी आणखी कोट्यवधी लोक यहोवाच्या नावाचा धावा करतील.
राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याचे काम थांबवण्यास यहोवा सांगत नाही तोपर्यंत आपण ते पूर्ण आवेशाने करत राहू या आणि शक्य त्या मार्गाने आपण आपल्या क्षेत्रातील लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करू या. (मत्त. २४:१४; मार्क १३:१०) घरोघरचे साक्षकार्य असो, रस्त्यावरचे साक्षकार्य असो, पत्राद्वारे असो, टेलिफोनद्वारे असो किंवा मग अनौपचारिक रीतीने केलेले साक्षकार्य असो, होता होईल तितक्या लोकांना यहोवाचे नाव आणि त्याचा उद्देश कळवण्याचा आपण प्रयत्न करू या.
यहोवा आपले नाव पवित्र करण्यास लवकरात लवकर कार्य करेल असा आपण पूर्ण विश्वास बाळगू शकतो. (यहे. ३६:२३) या नावाची नालस्ती करणाऱ्यांना शांत करण्याची वेळ तेजीने जवळ येत आहे. त्या वेळी, यहोवाचे नाव प्रकट करणारे व त्याच्या विश्वव्यापी सार्वभौमत्वाची बाजू घेणारे त्याचे एकनिष्ठ सेवक धन्य होतील!
जगाच्या बहुतेक भागांत, २००९ साली भरलेल्या “जागृत राहा!” या प्रांतीय व आंतरराष्ट्रीय अधिवेशनांतून, यहोवाला त्याच्या लोकांबद्दल किती प्रेम आहे हे अगदी स्पष्ट दिसून आले. ही अधिवेशने आपल्या ईश्वरशासित इतिहासात मैलाचा दगड ठरली आहेत. यहोवाच्या दिवसासाठी सतत जागृत राहण्यास या अधिवेशनांमुळे आपल्याला प्रोत्साहन मिळाले.—मार्क १३:३७; १ थेस्सलनी. ५:१, २, ४.
खरोखरच, यहोवा आपल्याशी किती चांगुलपणाने वागतो; तो आपली अंतःकरणे हर्षाने भरतो. तो आपल्याला हिरव्यागार कुरणांत बसवतो आणि संथ पाण्यावर नेतो.—स्तो. २३:१, २; १००:२, ५.
येणाऱ्या महिन्यांमध्ये राज्य सेवेत तुम्ही व्यस्त असताना यहोवाचा तुमच्यावर आशीर्वाद असेल, ही तुम्ही खात्री बाळगू शकता.
आमच्या विश्वव्यापी बंधुसमाजाला ख्रिस्ती प्रेम,
आपले बांधव,
यहोवाच्या साक्षीदारांचे नियमन मंडळ