आपल्या बायबल विद्यार्थ्यासाठी ‘जीवही देण्यास’ तयार राहा
१. बायबल विद्यार्थ्याला आध्यात्मिकरीत्या वाढण्यास मदत करण्याकरता कशाची गरज आहे?
१ बायबल विद्यार्थ्याला समर्पणापर्यंत मदत करण्यामध्ये केवळ त्याच्यासोबत नियमितरीत्या बायबल अभ्यास करणेच पुरेसे नाही. प्रेषित पौलाने, तो ज्यांना सत्य शिकवत होता त्यांच्याबरोबर त्याचे संबंध कसे होते हे सांगताना म्हटले, की आपल्या मुलाबाळांचे लालनपालन करणाऱ्या दाईसारखे तो त्यांच्यामध्ये होता. आपण देखील आपल्या बायबल विद्यार्थ्यांसाठी आपला ‘जीवही देण्यास’ अर्थात आध्यात्मिकरीत्या त्यांना वाढण्यास मदत करण्याकरता आपली शक्ती व वेळ खर्च करण्यास तयार असले पाहिजे.—१ थेस्सलनी. २:७-९.
२. बायबल विद्यार्थ्यामध्ये आपण आस्था का घेतली पाहिजे व ती कशी घेऊ शकतो?
२ त्यांच्यामध्ये आस्था घ्या: बायबल विद्यार्थी जसजसा शिकत असलेल्या गोष्टींचा आपल्या जीवनात अवलंब करतो तसतसे त्याचा विवेक त्याला, बायबल तत्त्वांनुसार वागत नसलेल्या लोकांबरोबर उठणे-बसणे कमी करण्यास प्रवृत्त करेल. (१ पेत्र ४:४) त्याचे घरचे कदाचित त्याच्याशी नातेसंबंध तोडतील. (मत्त. १०:३४-३६) अशा वेळी, त्याच्यामध्ये आस्था घेऊन आपण ती भावनिक पोकळी भरून काढू शकतो. एका अनुभवी मिशनरी बांधवाचे असे म्हणणे आहे: “अभ्यास संपला की लगेच निघण्याची घाई करू नका. थोडा वेळ थांबून त्यांच्याबरोबर बोला.” बायबल विद्यार्थ्याला काही व्यावहारिक मदत हवी आहे का हे पाहा. जसे की, तो आजारी असेल तर तुम्ही त्याला फोन करू शकता किंवा भेटायला जाऊ शकता. सभांना येत असेल तर, सभांमध्ये तुम्ही त्याच्या सोबत बसू शकता, त्याची मुले असतील तर मुलांनाही मदत करू शकता.
३. आपण आपल्या विद्यार्थ्याला मंडळीकडून प्रोत्साहन मिळण्यास कशी मदत करू शकतो?
३ मंडळीतील बंधूभगिनीही मदत करू शकतात: बायबल विद्यार्थ्याच्या घराच्या जवळपास तुम्ही प्रचार कार्य करत असाल तर प्रचारकार्यात सोबत असलेल्या बांधवाला अथवा बहिणीला तुमच्या बायबल विद्यार्थ्याच्या घरी उभ्या उभ्या भेट देण्याकरता तुम्ही नेऊ शकता. उचित असते तेव्हा अधूनमधून वेगवेगळ्या प्रचारकांना अथवा वडिलांनाही तुम्ही तुमच्यासोबत अभ्यासाला नेऊ शकता. तसेच, विद्यार्थी चांगल्याप्रकारे अभ्यास करायला लागल्यावर लगेच त्याला राज्य सभागृहात होणाऱ्या सभांना उपस्थित राहायचे उत्तेजन द्या. मंडळीतल्या इतरांबरोबर संगती केल्यामुळे त्याला प्रोत्साहन मिळेल; ते त्याचे आध्यात्मिक कुटुंबीय बनू शकतात.—मार्क १०:२९, ३०; इब्री १०:२४, २५.
४. आपल्या अविरत मदतीचे फळ आपल्याला कसे मिळू शकते?
४ मुले यहोवाची सेवा करण्याची व सत्यात चालण्याची निवड करतात तेव्हा त्यांना ही अविरत आध्यात्मिक मदत देणाऱ्या पालकांना किती आनंद होत असेल! (३ योहा. ४) आपल्या बायबल विद्यार्थ्यांसाठी जेव्हा आपण आपला जीवही देण्याची तयारी दाखवतो तेव्हा वर उल्लेख केलेल्या पालकांप्रमाणे आपणही खूप आनंदित होऊ शकतो.