शोक करणाऱ्यांना सांत्वन द्या
१. शोक करणाऱ्यांना सांत्वनाची गरज का आहे?
१ आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचे निधन होते तेव्हा आणि खासकरून देवाच्या राज्याची आशा तिला नसेल तर जणू आपल्यावर आभाळच कोसळते. (१ थेस्सलनी. ४:१३) पुष्कळ लोकांच्या मनात असे प्रश्न येतात: ‘लोक का मरतात? मेल्यानंतर ते कुठे जातात? मी माझ्या प्रिय व्यक्तीला पुन्हा भेटू शकेन का?’ आपल्या नातेवाईकाच्या अथवा मित्राच्या मृत्यूमुळे शोकीत असलेल्या लोकांना आपण क्षेत्रात भेटतो तेव्हा त्यांना सांत्वन कसे देऊ शकतो याबाबतीत खाली काही मुद्दे सुचवण्यात आले आहेत.—यश. ६१:२.
२. घरमालकाने आपल्याला सांगितले, की त्याच्या घरी नुकतेच कोणाचे तरी निधन झाले आहे तर अशावेळी तिथे लांबलचक साक्ष देणे उचित ठरेल का?
२ घरोघरी: घरोघरी प्रचार करताना, घरमालक आपल्याला कदाचित सांगेल, की त्याच्या कुटुंबात नुकतेच कोणाचे तरी निधन झाले आहे. घरमालक तुम्हाला कसा वाटतो? तो खूप रडतोय का? घरात खूप नातेवाईक आहेत का? अशावेळी, तिथे लांबलचक साक्ष न दिलेली बरी. (उप. ३:१, ७) कदाचित आपण, झालेल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करू शकतो आणि घरमालक काही साहित्य स्वीकारण्यास तयार असल्यास एखादी पत्रिका, मासिक अथवा माहितीपत्रक देऊन तेथून निघू शकतो. आणि मग काही दिवसांनी त्या घरी पुन्हा जाऊन घरमालकाला बायबलमधील सांत्वनदायक संदेश आपण सांगू शकतो.
३. शक्य असेल तर आपण शोक करणाऱ्या घरमालकाला कोणती शास्त्रवचने दाखवू शकतो?
३ इतर प्रसंगी कदाचित आपण पहिल्या भेटीत पुष्कळ गोष्टी घरमालकाला सांगू शकतो. ही वेळ घरमालकाचे चुकीचे विचार सुधारण्याची नाही हे आपण ओळखले पाहिजे. घरमालकाला हरकत नसल्यास, या प्रसंगी आपण त्याला बायबलमधून पुनरुत्थानाच्या आशेबद्दलची वचने दाखवू शकतो. (योहा. ५:२८, २९) किंवा, मृतांच्या स्थितीविषयी बायबल काय म्हणते ते आपण त्याला सांगू शकतो. (उप. ९:५, १०) बायबलमधून कदाचित पुनरुत्थानाचा एखादा अहवाल सांत्वनदायक ठरू शकेल. (योहा. ११:३९-४४) दुसरा पर्याय म्हणजे, विश्वासू ईयोबाने यहोवावरील आशा व्यक्त केलेले शब्द आपण वाचून दाखवू शकतो. (ईयो. १४:१४, १५) निघण्याआधी, आपण मृत्यूच्या वेळी काय होते? (इंग्रजी), तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी) किंवा दुसरे कोणतेही उचित माहितीपत्रक अथवा पत्रिका घरमालकाला देऊ शकतो. किंवा आपण त्याला बायबल काय शिकवते पुस्तक व तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? ही पत्रिका देऊ शकतो आणि पुस्तकातील सहावा अध्याय दाखवून पुढच्या वेळी या अध्यायातील मुद्द्यांची चर्चा करण्याची व्यवस्था करू शकतो.
४. आणखी कोणत्या प्रसंगी सांत्वन दिले जाऊ शकते?
४ दुसरे प्रसंग: अंत्यविधीचा कार्यक्रम जर राज्य सभागृहात होणार असेल तर यहोवाचे साक्षीदार नसलेले लोकही तिथे येणार आहेत का? सांत्वन देणारी प्रकाशने त्यांना देता येतील. काही ठिकाणी, घरीच शोकविधी पाळणाऱ्या लोकांना आपण सांत्वन देणारी प्रकाशने देऊ शकतो. कधीकधी, वर्तमानपत्रात, शोकाकुल सदस्यांचे नाव आणि पत्ता दिलेला असतो. अशा पत्त्यांवर आपण त्यांना सांत्वनदायक पत्र पाठवू शकतो. एकदा, एका भगिनीने अशाच एका विधूर मनुष्याला व त्याच्या मुलीला सांत्वनदायक पत्र आणि त्यासोबत काही पत्रिका पाठवल्या तेव्हा ते दोघे तिच्या घरी गेले आणि त्यांनी तिला विचारले: “तुम्ही मला हे पत्र पाठवलत का? मला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे!” त्या मनुष्याने व त्याच्या मुलीने बायबल अभ्यास करायला सुरुवात केली आणि ते मंडळीतल्या सभांनाही उपस्थित राहू लागले.
५. शोकाकुल लोकांना सांत्वन देण्याच्या संधींचे आपण भान का ठेवले पाहिजे?
५ उपदेशक ७:२ म्हणते: “भोजनोत्सवगृही जाण्यापेक्षा शोकगृही जाणे बरे.” मौजमस्ती करणाऱ्या व्यक्तीपेक्षा दुःख करणारी व्यक्ती सहसा देवाच्या वचनातील गोष्टी ऐकण्याच्या मनःस्थितीत असते. आपल्या प्रिय व्यक्तीच्या निधनामुळे शोकाकुल झालेल्या लोकांना सांत्वन देण्याच्या संधींचे आपण सर्वांनी भान ठेवले पाहिजे.