वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w17 जुलै पृ. १२-१६
  • शोक करणाऱ्‍यांसोबत शोक करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शोक करणाऱ्‍यांसोबत शोक करा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा “सर्व प्रकारच्या सांत्वनाचा देव” आहे
  • येशूलासुद्धा आपलं दुःख कळतं
  • ‘शास्त्रवचनांतून मिळणारं सांत्वन’
  • मंडळीतून मिळणारं मोठं सांत्वन
  • इतरांना सांत्वन देत राहा
  • “सर्व सांत्वनदाता देव” याजकडून सांत्वन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • दुःखी जनांना सांत्वन द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • ‘सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • “सर्व सांत्वनदाता देव” यहोवा याच्यावर भरवसा ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
w17 जुलै पृ. १२-१६
हॉस्पिटलमध्ये अतिशय दुःखी असलेल्या व्यक्‍ती

शोक करणाऱ्‍यांसोबत शोक करा

“तुम्ही एकमेकांना प्रोत्साहन देत आहात व एकमेकांची उन्‍नती करत आहात, तसेच पुढेही करत राहा.”—१ थेस्सलनी. ५:११.

गीत क्रमांक: ५३, २८

तुमचं उत्तर काय असेल?

  • यहोवा कशा प्रकारे आपलं सांत्वन करतो?

  • दुःखात असलेल्यांना कोणत्या शास्त्रवचनांमुळे सांत्वन मिळू शकतं?

  • मंडळीतले बंधुभगिनी दुःखात असलेल्यांना सांत्वन कसं देऊ शकतात?

१, २. दुःखात असलेल्यांचं सांत्वन कसं करता येईल याबद्दल चर्चा करणं का गरजेचं आहे? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

सूझन नावाची आपली एक बहीण म्हणते: “आमच्या मुलाचा मृत्यू होऊन जवळजवळ एक वर्ष झालं होतं, तरीसुद्धा आमचं दुःख कमी झालं नव्हतं.a आणखी एक बांधव, ज्याच्या पत्नीचा अचानक मृत्यू झाला होता, तो म्हणतो: “शब्दांमध्ये वर्णन करता येणार नाही इतकं दुःख आणि यातना मला व्हायच्या.” आज अनेकांना अशा प्रकारच्या दुःखाला सामोरं जावं लागतं. ख्रिस्ती मंडळीमध्ये असे अनेक जण आहेत, ज्यांनी कधीच असा विचार केला नव्हता की हर्मगिदोनाच्या आधी त्यांच्या प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू होईल. कदाचित तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्‍तीला गमावलं असेल, किंवा तुम्हाला अशी एखादी व्यक्‍ती माहीत असेल जी मृत्यूमुळे शोक करत आहे. असं असल्यास, ‘शोक करणाऱ्‍या व्यक्‍तीला सांत्वन कसं मिळू शकतं?’ असा प्रश्‍न कदाचित तुम्हाला पडला असेल.

२ काही लोक म्हणतात की काळ सरतो तशा जखमा भरून निघतात. पण हे नेहमीच खरं आहे का? एक विधवा म्हणते: “माझ्या मते, एखादी व्यक्‍ती त्या दुःखाच्या काळात आपल्या वेळेचा ज्या प्रकारे उपयोग करते, त्यामुळे जखम भरून येण्यास मदत होते असं म्हणणं जास्त योग्य राहील.” शारीरिक जखमांप्रमाणेच, भावनिक जखमांनाही भरून येण्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि काळजी घ्यावी लागते. मग, जे दुःखात आहेत त्यांना आपलं दुःख हलकं करण्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे मदत मिळू शकते?

यहोवा “सर्व प्रकारच्या सांत्वनाचा देव” आहे

३, ४. आपल्याला होणारं दुःख यहोवा समजतो अशी खातरी आपण का बाळगू शकतो?

३ आपला करुणामय पिता यहोवा हा सांत्वनाचा प्रमुख स्रोत आहे. (२ करिंथकर १:३, ४ वाचा.) सहानुभूती दाखवण्याच्या बाबतीत त्याने सर्वोत्तम उदाहरण मांडलं आहे. तो आपल्या लोकांना अभिवचन देतो: “तुमचे सांत्वन करणारा मी, केवळ मीच आहे.”—यश. ५१:१२; स्तो. ११९:५०, ५२, ७६.

४ आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्यानेही त्याच्या प्रियजनांना गमावलं आहे. जसं की, अब्राहाम, इसहाक, याकोब, मोशे आणि राजा दावीद. (गण. १२:६-८; मत्त. २२:३१, ३२; प्रे. कार्ये १३:२२) बायबल आपल्याला सांगतं की यहोवा त्या दिवसाची फार आतुरतेनं वाट पाहत आहे, जेव्हा तो त्याच्या विश्‍वासू सेवकांचं पुनरुत्थान करेल. (ईयो. १४:१४, १५) त्या वेळी ते सर्व जण परिपूर्ण जीवन अनुभवतील व आनंदी राहतील. पुढे दिलेल्या गोष्टीचाही विचार करा. आपल्या एकुलत्या एका पुत्राच्या मृत्यूमुळे होणारं दुःखही यहोवाने अनुभवलं आहे. बायबल सांगतं की येशू हा यहोवाला “परमप्रिय” होता. (मत्त. ३:१७) आपल्या पुत्राला यातनामय मरण सोसताना पाहून यहोवाला किती दुःख आणि वेदना झाल्या असतील याची कल्पनाही कदाचित आपल्याला करता येणार नाही.—योहा. ५:२०; १०:१७.

५, ६. यहोवा आपल्याला सांत्वन कसं देतो?

५ यहोवा आपल्याला मदत करेल याची पूर्ण खातरी आपण बाळगू शकतो. त्यामुळेच आपण आपलं दुःख आणि भावना मनमोकळेपणाने त्याच्याजवळ व्यक्‍त केल्या पाहिजेत. यहोवा आपल्या भावना समजतो आणि आपल्याला हवं असलेलं सांत्वन देतो, ही गोष्ट खरंच किती दिलासा देणारी आहे! पण यहोवा हे कसं करतो?

६ यहोवा आपल्याला अनेक मार्गांनी सांत्वन देतो. त्यांपैकी एक म्हणजे, तो त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आपलं सांत्वन करतो. (प्रे. कार्ये ९:३१) येशूने म्हटलं की जो कोणी यहोवाकडे त्याचा पवित्र आत्मा मागेल त्याला तो देईल. (लूक ११:१३) सुरुवातीला उल्लेख केलेली आपली बहीण सूझन म्हणते: “कितीतरी वेळा आम्ही अक्षरशः गुडघे टेकून यहोवाला प्रार्थना केली व आमचं सांत्वन करावं अशी कळकळून विनंती केली. आणि प्रत्येक वेळी यहोवाकडून मिळणाऱ्‍या शांतीने आमच्या मनाचं आणि हृदयाचं संरक्षण केलं.”—फिलिप्पैकर ४:६, ७ वाचा.

येशूलासुद्धा आपलं दुःख कळतं

७, ८. येशू आपल्याला सांत्वन देऊ शकतो याची खातरी आपण का बाळगू शकतो?

७ पृथ्वीवर असताना येशूने आपल्या वागण्या-बोलण्यातून, आपल्या स्वर्गीय पित्याच्या सुंदर गुणांचं हुबेहूब अनुकरण केलं. (योहा. ५:१९) “भग्न हृदयी” आणि “सर्व शोकग्रस्तांचे” सांत्वन करण्यासाठी यहोवाने येशूला या पृथ्वीवर पाठवलं होतं. (यश. ६१:१, २; लूक ४:१७-२१) लोकांना माहीत होतं, की येशूला आपलं दुःख समजतं आणि आपल्याला मदत करण्याची त्याची इच्छाही आहे.—इब्री २:१७.

८ येशू तरुण असताना त्याचे असे काही जवळचे मित्र किंवा नातेवाईक असतील, ज्यांना त्याने मृत्यूमध्ये गमावलं असेल. उदाहरणार्थ, असं दिसतं की येशू तरुण असतानाच त्याच्या वडिलांचा, योसेफचा मृत्यू झाला असावा.b कल्पना करा येशूसारख्या एका प्रेमळ व्यक्‍तीला स्वतःचं, आपल्या आईचं आणि भाऊ-बहिणींचं दुःख सहन करणं किती कठीण गेलं असेल!

९. लाजरचा मृत्यू झाला तेव्हा येशूने सहानुभूती कशी दाखवली?

९ सेवाकार्य करतानाही येशूने दाखवून दिलं, की तो लोकांचं दुःख समजू शकतो आणि त्यांच्याबद्दल त्याला सहानुभूती वाटते. उदाहरणार्थ, त्याच्या जवळच्या मित्राचा, लाजरचा मृत्यू झाला तेव्हा मरीया आणि मार्था यांचं अतोनात दुःख पाहून त्याला खूप दुःख झालं. आपण लाजरला लवकरच जिवंत करणार आहोत हे येशूला माहीत होतं; तरी मरीया आणि मार्था यांच्याबद्दल त्याला इतकी सहानुभूती वाटली की तो त्यांच्यासोबत रडला.—योहा. ११:३३-३६.

१०. आजही येशूला आपलं दुःख समजतं याची आपण खातरी का बाळगू शकतो?

१० येशूने ज्या प्रकारे लोकांचं सांत्वन केलं त्यामुळे आज आपल्याला कशी मदत होते? बायबल आपल्याला सांगतं की येशू आजही बदललेला नाही. बायबलमध्ये म्हटलं आहे: “येशू ख्रिस्त जसा काल होता, तसाच आजही आहे आणि सदासर्वकाळ राहील.” (इब्री १३:८) येशूला “जीवन देणारा मुख्य प्रतिनिधी” म्हटलं गेलं आहे. कारण, त्याच्यामुळेच आपल्याला सर्वकाळाचं जीवन मिळणं शक्य झालं आहे. दुःख आणि शोक काय असतं हे येशूने स्वतः अनुभवलं आहे आणि “त्यामुळे ज्यांची परीक्षा होत आहे त्यांचे साहाय्य करायला तो समर्थ आहे.” (प्रे. कार्ये ३:१५; इब्री २:१०, १८) म्हणूनच, आपण खातरी बाळगू शकतो की आजही जेव्हा एखाद्याला दुःखाचा सामना करावा लागतो तेव्हा येशूला दुःख होतं. तो इतरांचं दुःख समजू शकतो आणि “योग्य वेळी” त्यांना सांत्वन देऊ शकतो.—इब्री लोकांना ४:१५, १६ वाचा.

‘शास्त्रवचनांतून मिळणारं सांत्वन’

११. वैयक्‍तिक रीत्या तुम्हाला कोणत्या शास्त्रवचनांतून सांत्वन मिळतं?

११ बायबलमध्ये आपल्याला अनेक सांत्वनदायक शास्त्रवचनं वाचायला मिळतात. लाजरच्या मृत्यूनंतर येशूने जो शोक केला त्याबद्दलचा अहवाल हा त्या शास्त्रवचनांपैकीच एक आहे. बायबलमध्ये अशी वचनं वाचायला मिळतात याचं आपल्याला आश्‍चर्य वाटत नाही; कारण, “आधीपासूनच लिहून ठेवलेल्या सर्व गोष्टी मुळात आपल्याला शिक्षण देण्याकरता लिहिण्यात आल्या होत्या; यासाठी की, आपल्या धीराने आणि शास्त्रवचनांतून मिळणाऱ्‍या सांत्वनाने आपल्याला आशा मिळावी.” (रोम. १५:४) तुम्ही जर दुःखाचा सामना करत असाल, तर पुढे दिलेल्या शास्त्रवचनांतून तुम्हालाही सांत्वन मिळू शकतं:

  • “परमेश्‍वर भग्नहृदयी लोकांच्या सन्‍निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो. नीतिमानाला फार कष्ट होतात; तरी परमेश्‍वर त्या सर्वांतून त्याला सोडवतो.”—स्तो. ३४:१८, १९.

  • “माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते तेव्हा तुझ्यापासून [परमेश्‍वरापासून] लाभणारे सांत्वन माझ्या जिवाचे समाधान करते.”—स्तो. ९४:१९.

  • “स्वतः आपला प्रभू येशू ख्रिस्त आणि ज्याने आपल्यावर प्रेम केले व अपार कृपेद्वारे आपल्याला सर्वकाळाचे सांत्वन आणि एक चांगली आशा दिली, तो देव जो आपला पिता आहे, त्याने तुमच्या मनाला सांत्वन द्यावे आणि तुम्हाला स्थिर करावे.”—२ थेस्सलनी. २:१६, १७.c

मंडळीतून मिळणारं मोठं सांत्वन

१२. आपण इतरांचं सांत्वन कसं करू शकतो?

१२ शोक करणाऱ्‍यांना ख्रिस्ती मंडळीतूनही सांत्वन मिळू शकतं. (१ थेस्सलनीकाकर ५:११ वाचा.) जे ‘खिन्‍न हृदयाचे’ म्हणजेच दुःखी आहेत, त्यांना तुम्ही सांत्वन आणि धीर कसं देऊ शकता? (नीति. १७:२२) लक्षात असू द्या, “मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो.” (उप. ३:७) विधवा असलेली आपली एक बहीण डेलिन सांगते, की जे दुःखात असतात त्यांना आपल्या भावना व विचार व्यक्‍त कराव्याशा वाटतात. अशा वेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ते बोलत असताना त्यांना न रोखता त्यांचं ऐकून घेणं. आणखी एक उदाहरण विचारात घ्या. ज्यूलिया हिच्या भावाने आत्महत्या केली होती. ती म्हणते: “तुम्ही कदाचित समोरच्याचं दुःख पूर्णपणे समजू शकणार नाही. पण, त्यांना कसं वाटतं हे समजून घेण्याची तुमची इच्छा आहे हे जास्त महत्त्वाचं.”

१३. दुःख आणि शोक व्यक्‍त करण्याच्या बाबतीत आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

१३ आपण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, की सर्व जण सारख्याच प्रकारे दुःख व शोक व्यक्‍त करत नाहीत. कधीकधी दुःख शब्दांमध्ये व्यक्‍त करणं शक्य नसतं. देवाचं वचन सांगतं: “हृदयाला आपल्या ठायीच्या खेदाची जाणीव असते, आणि परक्याला त्याच्या आनंदाच्या आड येववत नाही.” (नीति. १४:१०) एखादी व्यक्‍ती तिचं दुःख व भावना व्यक्‍त करेलही, पण तिला नेमकं काय म्हणायचं आहे हे समजणं कधीकधी कठीण जाऊ शकतं.

१४. दुःख किंवा शोक करत असलेल्या व्यक्‍तीचं आपण कोणत्या शब्दांत सांत्वन करू शकतो?

१४ शोक करत असलेल्या व्यक्‍तीचं कोणत्या शब्दांत सांत्वन करावं हे समजणं अवघड जाऊ शकतं. पण बायबल आपल्याला सांगतं: “सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे.” (नीति. १२:१८) सांत्वन देताना नेमकं काय बोलावं यासाठी अनेकांना, जब आपका कोई अपना मर जाए . . . या माहितीपत्रकातून मदत मिळाली आहे.d असं असलं, तरी सांत्वन देताना ‘रडणाऱ्‍यांसोबत रडल्यानेही’ त्यांना अधिक मदत होऊ शकते. (रोम. १२:१५) गॅबी नावाच्या आपल्या एका बहिणीचं उदाहरण घ्या; तिने आपल्या पतीला मृत्यूमध्ये गमावलं आहे. ती म्हणते, की कधीकधी भावना व्यक्‍त करण्याचा एकच मार्ग तिला दिसतो, तो म्हणजे रडणं. पुढे ती म्हणते: “त्यामुळेच माझे मित्रमैत्रिणी जेव्हा माझ्यासोबत रडतात तेव्हा मला काही प्रमाणात सांत्वन मिळतं. त्या वेळी मला, माझ्या दुःखात मी एकटी पडल्यासारखं वाटत नाही.”

१५. दुःखात असलेल्या व्यक्‍तीचं प्रत्यक्ष भेटून सांत्वन कसं करावं हे समजत नसेल तर तुम्ही काय करू शकता? (“सांत्वन देणारे शब्द” ही चौकट पाहा.)

१५ दुःखात असलेल्या व्यक्‍तीला प्रत्यक्ष भेटून तिचं सांत्वन कसं करावं हे जर तुम्हाला समजत नसेल, तर तुम्ही त्यांना एखादं कार्ड, ई-मेल, फोनवरून मॅसेज किंवा पत्र पाठवू शकता. त्यांत तुम्ही बायबलचं एखादं सांत्वनदायक वचन लिहू शकता, मृत व्यक्‍तीच्या चांगल्या गुणांचा उल्लेख करू शकता, किंवा त्या व्यक्‍तीसोबत असलेल्या तुमच्या चांगल्या आठवणींबद्दल लिहू शकता. आधी उल्लेख केलेली ज्यूलिया म्हणते: “जेव्हा एखादी बहीण सांत्वन देणारा मॅसेज पाठवते किंवा तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी बोलवते, तेव्हा दुःख हलकं होण्यास खूप मदत होते.” पुढे ती सांगते: “बंधुभगिनींच्या सांत्वनदायक शब्दांमुळे इतरांचं माझ्यावर प्रेम आहे, आणि त्यांना माझी काळजी आहे याची जाणीव मला होते.”

१६. इतरांना सांत्वन देण्याचा एक अतिशय चांगला मार्ग कोणता आहे?

१६ दुःखात असलेल्या बंधुभगिनींना आपल्या प्रार्थनांमुळे मदत होऊ शकते. आपण त्यांच्यासाठी किंवा त्यांच्यासोबतही प्रार्थना करू शकतो. प्रार्थना करताना आपल्याला रडू आवरणार नाही आणि त्यामुळे प्रार्थना करणं कठीण जाईल असं कदाचित आपल्याला वाटेल. पण लक्षात ठेवा, अंतःकरणापासून केलेल्या प्रार्थना सांत्वन मिळण्याचा चांगला मार्ग असू शकतो. डेलिन म्हणते: “जेव्हा बहिणी मला सांत्वन देण्यासाठी येतात तेव्हा मी त्यांना प्रार्थना करायची विनंती करते. त्या प्रार्थना करण्यास सुरुवात करतात तेव्हा सहसा त्यांना थोडं अवघड जातं. पण एकदोन वाक्यांनंतर त्या पूर्ण अंतःकरणापासून चांगल्या प्रकारे प्रार्थना करतात. त्यांचा विश्‍वास, प्रेम आणि काळजी यांमुळे माझाही विश्‍वास वाढवण्यास मदत होते.”

इतरांना सांत्वन देत राहा

१७-१९. आपण इतरांना सांत्वन देत राहण्याची गरज का आहे?

१७ एखाद्याचं दुःख किती मोठं आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला किती काळ लागेल हे आपण सांगू शकत नाही. प्रियजनांचा मृत्यू होतो तेव्हा सांत्वन देण्यासाठी आलेले मित्र आणि नातेवाईक काही काळानंतर त्यांच्या दैनंदिन व्यवहारात व्यस्त होतात. पण शोक करणाऱ्‍यांना अजूनही सांत्वनाची गरज असू शकते. त्यामुळे त्यांना सांत्वन देण्यासाठी नेहमी तयार राहा. बायबल सांगतं: “मित्र सर्व प्रसंगी प्रेम करतो, आणि विपत्कालासाठी तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो.” (नीति. १७:१७) शोक करत असलेल्या व्यक्‍तींना गरज आहे तोपर्यंत आपण त्यांना सांत्वन देत राहिलं पाहिजे.—१ थेस्सलनीकाकर ३:७ वाचा.

१८ लक्षात असू द्या, दुःखात असलेल्या व्यक्‍तीला एकाएकी गहिवरून येऊ शकतं. उदाहरणार्थ, लग्नाच्या वाढदिवशी, विशिष्ट संगीत ऐकल्यानंतर, फोटो पाहिल्यावर, एखादी गोष्ट करताना, इतकंच नाही तर विशिष्ट सुगंध, आवाज किंवा ऋतू यांमुळेही तिला रडू कोसळू शकतं. विवाहसोबत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच एखादी गोष्ट एकट्याने करावी लागते, तेव्हा ते फार कठीण जाऊ शकतं; जसं की, संमेलनाला किंवा स्मारकविधीला जाणं. एक बांधव म्हणतो: “माझ्या पत्नीच्या मृत्यूनंतरचा आमच्या लग्नाचा वाढदिवस माझ्यासाठी फार कठीण जाईल हे मला माहीत होतं; आणि तो तसा होताही. पण मला त्या दिवशी एकटं वाटू नये म्हणून काही बंधुभगिनींनी माझ्या जवळच्या मित्रांसोबत मिळून एक लहानसा कार्यक्रम आयोजित केला.”

१९ दुःखात असलेल्या व्यक्‍तींना फक्‍त विशिष्ट प्रसंगीच धीराची आणि सांत्वनाची गरज असते असं नाही. ज्यूलिया म्हणते, की विशिष्ट प्रसंगांशिवाय इतर दिवशी केलेली मदत आणि संगतीही सहसा चांगली मदत ठरू शकते. पुढे ती म्हणते: “अशी अचानक मिळालेली मदत खूप मोलाची असते आणि त्यामुळे बरंच सांत्वन मिळतं.” हे खरं आहे, की शोक करत असलेल्या व्यक्‍तीचा एकटेपणा आणि दुःख आपण पूर्णपणे नाहीसं करू शकत नाही. पण, त्यांच्यासाठी काही गोष्टी करून आपण नक्कीच त्यांना सांत्वन मिळवण्यास मदत करू शकतो. (१ योहा. ३:१८) गॅबी म्हणते: “दुःखाचा सामना करताना मंडळीतल्या वडिलांकडून मिळालेल्या मदतीसाठी मी यहोवाचे खूप खूप आभार मानते. यहोवाच्या प्रेमळ हातांमध्ये मी सुरक्षित आहे याची जाणीव त्यांनी मला करून दिली.”

२०. यहोवाने दिलेलं अभिवचन सांत्वन देणारं का आहे

२० लवकरच “सर्व प्रकारच्या सांत्वनाचा देव,” यहोवा मेलेल्यांचं पुनरुत्थान करण्याद्वारे दुःख आणि शोक यांचा अंत करेल. ही गोष्ट खरंच किती सांत्वन देणारी आहे! (योहा. ५:२८, २९) यहोवा अभिवचन देतो की “तो मृत्यू कायमचा नाहीसा” करेल आणि “सर्वांच्या चेहऱ्‍यावरील अश्रू” पुसेल. (यश. २५:८) त्यानंतर, ‘रडणाऱ्‍यांसोबत रडाण्याऐवजी,’ पृथ्वीवरचे सर्व जण “आनंद करणाऱ्‍यांसोबत आनंद” करतील.—रोम. १२:१५.

a काही नावं बदलण्यात आली आहेत.

b बायबलमधून आपल्याला कळतं, की येशू १२ वर्षांचा असताना योसेफ जिवंत होता. पण पुढे जेव्हा येशूने पाण्याचा द्राक्षारस करण्याचा पहिला चमत्कार केला, तेव्हा मात्र योसेफचा कोणताही उल्लेख आढळून येत नाही; किंवा त्यानंतरही नाही. याचा अर्थ, कदाचित या घटनेच्या आधीच योसेफचा मृत्यू झाला असावा. शिवाय, जेव्हा येशू वधस्तंभावर मरणयातना सोसत होता, तेव्हा त्याने योहानला त्याची आई, मरीया हिची काळजी घेण्यास सांगितलं. योसेफ जर जिवंत असता, तर येशूने नक्कीच योहानला तिची काळजी घेण्यास सांगितलं नसतं.—योहा. १९:२६, २७.

c अनेकांना या शास्त्रवचनांतूनही सांत्वन मिळालं आहे: स्तोत्रसंहिता २०:१, २; ३१:७; ३८:८, ९, १५; ५५:२२; १२१:१, २; यशया ५७:१५; ६६:१३; फिलिप्पैकर ४:१३; १ पेत्र ५:७.

d टेहळणी बुरूज क्र. ३ २०१६ मधील “मृत्यूमुळे दुःखी असलेल्यांचं सांत्वन करा” हा लेखही पाहा.

एक व्यक्‍ती कार्डवर सांत्वन देणारं शास्त्रवचन लिहित आहे

सांत्वन देणारे शब्द

काहींनी पुढील शब्द लिहून शोक करणाऱ्‍या आपल्या मित्रांचं सांत्वन केलं:

  • “काय बोलावं हे कळत नाही, पण आमचं तुमच्यावर प्रेम आहे याची खातरी असू द्या. तुम्हाला नेमकं कसं वाटतं हे आम्ही पूर्णपणे समजू शकत नाही, पण यहोवाला ते समजतं. आणि तो तुम्हाला नक्की साहाय्य करत राहील. आमच्या प्रार्थनांमुळे तुम्हाला धीर मिळेल अशी आम्हाला आशा आहे.”

  • “या दुःखाच्या काळात यहोवा तुमचं सांत्वन करो.”

  • “तुमची प्रिय व्यक्‍ती यहोवाच्या स्मरणात सुरक्षित आहे आणि तो लवकरच तिचं पुनरुत्थान करेल, या गोष्टीमुळे तुम्हाला सांत्वन मिळवण्यास मदत होईल.”

  • “तुमच्या प्रिय व्यक्‍तीला पुन्हा कधीही शेवटच्या शत्रूला, मरणाला सामोरं जावं लागणार नाही. पण तिचं पुनरुत्थान होईपर्यंत तिने दाखवलेला विश्‍वास नेहमी सर्वांच्या लक्षात राहील.”

  • “आज प्रियजनांच्या मृत्यूमुळे आपल्याला दुःख होतं आणि आपण ते शब्दांमध्ये व्यक्‍त करू शकत नाही. पण आपण त्या काळाची वाट पाहत आहोत जेव्हा यहोवा सर्वांचं पुनरुत्थान करेल. त्या वेळी होणारा आनंद आपल्याला शब्दांमध्ये व्यक्‍त करता येणार नाही.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा