प्रश्न पेटी
▪ अनोळख्या व्यक्तींशी इंटरनेटवर संभाषण करणे का धोकेदायक आहे?
बऱ्याच वेब साईट्स लोकांना एकमेकांशी ओळख करून घेण्याची व संपर्क साधण्याची सोय उपलब्ध करून देतात. यांपैकी बऱ्याच साईट्सवर तुम्ही स्वतःविषयीची माहिती, छायाचित्रे व इतर खासगी माहिती जाहीर करू शकता. ही माहिती वाचणारे मग तुमच्याशी संपर्क साधू शकतात. अशा वेब साईट्स तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत आणि मंडळीतील काही तरुणांनी या साईट्सचा उपयोग करून स्वतःला यहोवाचे साक्षीदार म्हणवणाऱ्या इतरांशी संपर्क साधला आहे.
इंटरनेटवरून ओळख झालेली व्यक्ती स्वतःबद्दल, आपल्या आध्यात्मिक स्थितीबद्दल किंवा आपल्या इराद्यांबद्दल सहज खोटी माहिती सांगू शकते. (स्तो. २६:४) स्वतःला यहोवाच्या साक्षीदारांपैकी सांगणारी व्यक्ती मुळात विश्वासात नसलेली, बहिष्कृत झालेली किंवा धर्मत्यागी कार्यांत सक्रिय असू शकते. (गल. २:४) अनेक वृत्तांनुसार, लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणारे बरेचजण अशाच वेब साईट्सच्या मदतीने मुलांना ठकवतात.
आपण ज्यांच्याशी संपर्क साधला आहे ते चांगल्या आध्यात्मिक स्थितीत असणारे मंडळीचे सदस्य आहेत याची खात्री असली तरीही अशा स्वरूपाचे संभाषण सहज अयोग्य विषयांकडे वाहवत जाऊ शकते. कारण ज्यांना आपण कधीच समोरासमोर भेटलो नाही अशा व्यक्तींशी संभाषण करताना सहसा लोक आपली मर्यादा सोडण्याची शक्यता जास्त आहे. तसेच ऑनलाईन संभाषण खासगी आहे असा दृष्टिकोन असल्यामुळे, आपण काहीही बोललो तरी ते दुसऱ्यांच्या, उदाहरणार्थ पालकांच्या किंवा मंडळीतल्या वडिलांच्या लक्षात येणार नाही असे त्यांना वाटते. दुःखाची गोष्ट म्हणजे, ख्रिस्ती कुटुंबातले बरेच तरुण या धोक्याला बळी पडले आहेत आणि अश्लील संभाषणात सामील झाले आहेत. (इफिस. ५:३, ४; कलस्सै. ३:८) इतरांनी आपली ओळख करून देणाऱ्या वेब साईट्सना स्वतःची उत्तेजक छायाचित्रे, द्विअर्थी टोपणनावे, किंवा अश्लील म्युझिक व्हिडिओ जोडले आहेत.
हे लक्षात घेता, आईवडिलांनी आपली मुले कंप्युटरवर नेमके काय करतात यावर लक्ष ठेवले पाहिजे. (नीति. २९:१५) आपल्या घरात अनोळखी व्यक्तीला येऊ देणे किंवा अशा व्यक्तीला आपल्या मुलांसोबत एकांतात राहू देणे धोकेदायक आहे. त्याचप्रकारे, कोणी स्वतःला यहोवाचे साक्षीदार म्हणत असतील तरीसुद्धा, आपण किंवा आपल्या मुलांनी अशा अनोळख्या व्यक्तींशी इंटरनेटवर दोस्ती करणेही तितकेच धोकेदायक आहे.—नीति. २२:३.