आपण वारंवार लोकांकडे का जातो?
१. प्रचार कार्यासंबंधी कोणता प्रश्न विचारला जातो?
१ अनेक ठिकाणी, आपण प्रचाराचे क्षेत्र बरेचदा पूर्ण करतो. घरमालकाने आपल्याला आस्था नाही असे सांगितले असूनही, आपण त्याच त्याच घरांत वारंवार जात असतो. गतकाळात चांगला प्रतिसाद न दिलेल्या या व्यक्तींकडे आपण वारंवार का जातो बरे?
२. आपण सेवाकार्यात टिकून राहण्यामागचे सर्वात प्रमुख कारण कोणते?
२ यहोवाबद्दल व लोकांबद्दल प्रेम: आपण सेवाकार्यात टिकून राहण्याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे आपले यहोवावर असलेले प्रेम. आपले अंतःकरणच आपल्या महान देवाबद्दल इतरांना सांगत राहण्याची प्रेरणा आपल्याला देते. (लूक ६:४५) यहोवाबद्दल असलेले प्रेम आपल्याला त्याच्या आज्ञांचे पालन करण्यास प्रवृत्त करते आणि इतरांनाही असे करण्यास साहाय्य करते. (नीति. २७:११; १ योहा. ५:३) या कार्यात विश्वासूपणे टिकून राहणे हे लोकांच्या प्रतिक्रियेवर अवलंबून नाही. पहिल्या शतकातील ख्रिश्चनांचा छळ झाला तेव्हासुद्धा त्यांनी प्रचार करण्याचे “सोडले नाही.” (प्रे. कृत्ये ५:४२) लोक आपले ऐकत नाहीत तेव्हा हताश होण्याऐवजी आपण खंबीर राहतो. आणि याद्वारे आपण यहोवाबद्दल आपल्याला असणारे प्रेम व आपले समर्पण व्यक्त करतो.
३. लोकांबद्दल असलेले प्रेम आपल्याला प्रचारकार्य करत राहण्याची प्रेरणा कशाप्रकारे देऊ शकते?
३ सेवाकार्यात टिकून राहण्याचे दुसरे कारण म्हणजे आपल्या शेजाऱ्यांवर असलेले आपले प्रेम. (लूक १०:२७) कोणाचाही नाश व्हावा अशी यहोवाची इच्छा नाही. (२ पेत्र ३:९) जेथे वारंवार कार्य केले जाते अशा क्षेत्रांत, यहोवाची सेवा करण्यास इच्छुक असलेले लोक आपल्याला अजूनही सापडत आहेत. उदाहरणार्थ, ग्वाडेलूपमध्ये दर ५६ लोकांपैकी १ जण यहोवाचा साक्षीदार आहे, पण मागच्या वर्षी २१४ जणांचा बाप्तिस्मा झाला. स्मारकविधीला जवळजवळ २०,००० लोक उपस्थित होते. म्हणजे ग्वाडेलूपमधील दर २२ जणांपैकी १ जण स्मारकविधीला हजर होता!
४. क्षेत्रात कशाप्रकारचे बदल होत असतात?
४ क्षेत्रात होत असलेले बदल: आपण प्रचार करतो त्या क्षेत्रात सतत बदल होत असतात. पूर्वी चांगला प्रतिसाद न मिळालेल्या घरात आपण पुन्हा जातो तेव्हा कदाचित कुटुंबातला दुसरा एखादा सदस्य दार उघडू शकतो. त्याने कदाचित आपला संदेश कधीच ऐकला नसेल आणि त्यामुळे तो आपले ऐकून घेण्याची शक्यता आहे. किंवा त्याच घरात कदाचित नवीन भाडेकरी आले असतील आणि त्यांना आपल्या संदेशाविषयी आस्था असेल. विरोध करणाऱ्या आईवडिलांची मुले मोठी झाल्यावर स्वतंत्रपणे राहू लागतात. ते कदाचित आपला संदेश ऐकून घेतील.
५. काहीजण पूर्वीच्या तुलनेत आता आपल्या संदेशाला चांगला प्रतिसाद देण्यामागे कोणते कारण असू शकते?
५ काळाच्या ओघात, लोकही बदलतात. प्रेषित पौल एकेकाळी “निंदक, छळ करणारा व जुलमी” होता. (१ तीम. १:१३) त्याचप्रकारे, आज यहोवाची सेवा करत असलेल्यांपैकी बऱ्याचजणांना एकेकाळी सत्याबद्दल जराही आस्था नव्हती. काहींनी तर प्रचार कार्याला विरोधही केला असेल. पण जागतिक घडामोडी पाहून काही विरोध करणारे किंवा आस्था नसलेले लोक आपला संदेश ऐकून घेण्यास प्रवृत्त होऊ शकतात. एखाद्याच्या कुटुंबात कोणाचा मृत्यू होतो, एखाद्याची नोकरी जाते, किंवा आर्थिक समस्या किंवा आजारपण येते. अशाप्रकारचे दुःखद अनुभव आल्यावर काहीजण आपल्या संदेशाकडे पूर्वीपेक्षा जास्त लक्ष देण्याची शक्यता आहे.
६. आपण आवेशाने प्रचारकार्य का करत राहिले पाहिजे?
६ या जगाची मुदत आता संपत आली आहे पण आपले प्रचाराचे व शिष्य बनवण्याचे कार्य मात्र वेगाने पुढे चालले आहे. (यश. ६०:२२) म्हणूनच, आपण आवेशाने प्रचार कार्य करत राहतो आणि नेहमी आशावादी दृष्टिकोन राखण्याचा प्रयत्न करतो. कोण जाणे, कदाचित पुढे आपल्याला भेटणारी व्यक्ती आपले ऐकून घेईल. आपण बोलत राहिले पाहिजे! ‘कारण असे केल्याने आपण स्वतःचे व आपले ऐकणाऱ्यांचेहि तारण साधू.’—१ तीम. ४:१६.