आपले दयाशील सेवाकार्य
१ आपला संदेश ऐकणारे बहुसंख्य लोक “मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे . . . गांजलेले व पांगलेले होते,” हे येशूने पाहिले. (मत्त. ९:३६) त्यामुळे त्याने अगदी कोमलतेने व प्रेमाने त्यांना यहोवाचे दर्जे शिकवले, त्यांना सांत्वन दिले आणि अतिशय दयाळुपणे त्यांच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण केल्या. येशूने लोकांबरोबर केलेल्या व्यवहारावर आपण मनन करतो तेव्हा आपणही त्याच्याप्रमाणे विचार करायला, त्याच्याप्रमाणे लोकांच्या भावना समजून घ्यायला शिकतो. आणि त्यामुळे, आपण सेवेत भाग घेतो तेव्हा लोकांबद्दल वाटणारी ही दया आपोआपच दिसून येते.
२ मदतीची अत्यंत गरज असलेले लोक जेव्हा येशूजवळ आले तेव्हा त्याने कशाप्रकारे प्रतिक्रिया दाखवली, यावर थोडे थांबून विचार करा. (लूक ५:१२, १३; ८:४३-३८) विशेष गरज असलेल्या लोकांची परिस्थिती ओळखून त्याप्रमाणे तो त्यांच्याशी वागला. (मार्क ७:३१-३५) इतरांच्या भावनांची जाणीव बाळगून त्याने त्यांच्याबद्दल काळजी दाखवली. तो लोकांना वरवर पाहत नव्हता तर त्याने त्यांच्या आंतरिक भावना ओळखल्या. (लूक ७:३६-४०) होय, येशूने आपल्या देवाची कोमल दया हुबेहूब प्रतिबिंबित केली.
३ “त्याला त्यांचा कळवळा आला”: येशूने केवळ आपले कर्तव्य समजून सेवा केली नाही. तर त्याला लोकांचा “कळवळा आला.” (मार्क ६:३४) तसेच आज आपणही केवळ संदेश सांगत नाही तर लोकांचे अमूल्य जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे लोक विशिष्ट प्रकारे प्रतिक्रिया का दाखवतात, हे आपण समजून घेतले पाहिजे. ते इतके चिंतित का आहेत? खोट्या धार्मिक पुढाऱ्यांचे त्यांच्याकडे लक्ष नाही का? त्यांच्याकडून या लोकांची फसवणूक झाली आहे का? इतरांमध्ये जेव्हा आपण आवड घेतो तेव्हा ते आपण सांगत असलेली सुवार्ता ऐकण्यास प्रवृत्त होऊ शकतील.—२ करिंथ. ६:४, ६.
४ आपण लोकांशी दयाळुपणे वागतो तेव्हा ते त्यांच्या हृदयाला भावते. हे समजण्यासाठी पुढील उदाहरण पाहा. एका स्त्रीची तीन महिन्यांची मुलगी वारली तेव्हा ती दुःखात पार बुडून गेली होती. जेव्हा दोन साक्षीदार भगिनी तिच्या घरी गेल्या तेव्हा तिने त्यांना आत बोलवले खरे परंतु एका वेगळ्या हेतूने. देवाने दुःखाला अजूनपर्यंत का राहू दिले आहे यावर त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन नंतर त्यांनाच चांगले खडसवायचे, हा तिचा हेतू होता. पण ती स्त्री पुढे म्हणते: “या दोघींनी माझं बोलणं इतक्या दयाळुपणे ऐकून घेतलं, की त्या जेव्हा जायला निघाल्या तेव्हा मला जणू काय माझं मन हलकं झाल्यासारखं वाटलं. त्यांनी मला जेव्हा पुढच्या भेटीसाठी विचारलं तेव्हा मी लगेच तयार झाले.” सेवेत तुम्ही भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दया दाखवण्याचा विशेष प्रयत्न करता का?
५ इतरांबद्दल दया विकसित केल्यामुळे आपण त्यांना खऱ्या अर्थाने सांत्वन देऊ शकू. असे केल्याने आपण ‘करुणाकर पित्या’ यहोवाचे गौरव करू.—२ करिंथ. १:३.