स्तुती करण्याद्वारे—व्यक्तिगत आस्था दाखवा
१ प्रामाणिक स्तुती लोकांना उत्तेजन देते. त्यांना कार्य करण्यास प्रवृत्त करते आणि आनंदित करते. सेवेत आपण लोकांची थोडीजरी प्रामाणिक तारीफ केली तरी, ते आपला संदेश ऐकण्यास उत्सुक असतात, हे अनेक प्रचारकांच्या पाहण्यात आले आहे. पण सुवार्ता सांगताना आपण लोकांची स्तुती कशी करू शकतो?
२ निरीक्षण करा: स्वर्गारोहण झालेल्या येशू ख्रिस्ताने आशिया मायनरमधील सात मंडळ्यांच्या सत्कार्यांची दखल घेतली. (प्रकटी. २:२, ३, १३, १९; ३:८) तसेच, क्षेत्र सेवेत भेटणाऱ्या लोकांमध्ये आपण खरी आस्था घेतली तर आपल्याला त्यांची तारीफ करण्यासाठी अनेक संधी मिळू शकतात. जसे की घराभोवतीचे स्वच्छ-सुंदर अंगण, आपल्या मुलाला वात्सल्य दाखणारी आई किंवा वडील, घरमालकाचे मैत्रीपूर्ण स्मित हास्य व स्वागत, हे सर्व पाहिल्यावर आपल्याला स्तुती करण्याची संधी मिळते. अशा गोष्टी चटकन् तुमच्या लक्षात येतात का, जेणेकरून तुम्हाला घरमालकाची तारीफ करायची संधी मिळू शकते?
३ लक्ष देऊन ऐकणारे व्हा: इतरांना प्रचार करताना, त्यांना आपले मत व्यक्त करण्यासाठी उचित प्रश्न विचारा. मग ते जे काही बोलतात ते लक्ष देऊन ऐका. त्यांचे बोलणे लक्ष देऊन ऐकण्याद्वारे तुम्ही त्यांचा आदर करता. (रोम. १२:१०) त्यांच्या बोलण्यात अशा काही गोष्टी असतील ज्याबद्दल तुम्ही त्यांची प्रशंसा करू शकता. यामुळे तुम्हाला एक समान मुद्दा मिळेल ज्याच्या आधारावर तुम्ही त्यांना सुवार्ता सांगू शकता.
४ समंजसपणा दाखवा: घरमालक जेव्हा, बायबल सत्याच्या विरोधात असलेल्या गोष्टी बोलतो तेव्हा आपण काय केले पाहिजे? घरमालकाच्या बोलण्यावर हुज्जत घालत बसण्यापेक्षा त्याने आपले मत निसंकोचपणे मांडल्याबद्दल त्याचे आभार माना आणि मग, “तुम्ही या विषयावर बराच विचार केलेला दिसतोय,” असे काही तरी म्हणून तुम्ही संभाषण पुढे चालू ठेवू शकता. (कलस्सै. ४:६) एखादी व्यक्ती एखाद्या विषयावर आपल्याबरोबर हुज्जत घालत असली तरीसुद्धा, तिला या विषयात खरोखरच किती रस आहे, याबद्दल आपण तिची तारीफ करू शकतो. आपले कोमल शब्द, सुवार्तेचा कट्टर विरोध करणाऱ्यांना देखील नरम करू शकतात.—नीति. २५:१५.
५ आपण करत असलेली तारीफ प्रामाणिक किंवा मनापासून असली तरच ती प्रोत्साहनदायक असू शकते. अशाप्रकारच्या उभारणीकारक संभाषणाद्वारे यहोवाचा सन्मान होतो आणि पुष्कळ लोक राज्य संदेशाकडे आकर्षित होतात.