बायबलचा प्रभावीपणे उपयोग करा
१. क्षेत्र सेवेची तयारी करताना तुम्ही काय करू शकता?
१ क्षेत्र सेवेत आपण कोणतेही साहित्य देण्याची योजना करीत असलो तरी, जे आपला संदेश ऐकतात अशा लोकांच्या विचारांना चालना देणारे एखादे शास्त्रवचन वाचून दाखवल्याने फायदा होऊ शकतो. (इब्री ४:१२) तुम्ही जे प्रकाशन सादर करणार आहात त्यातलेच एखादे शास्त्रवचन निवडल्यास, ते आणखी प्रभावी ठरू शकेल. असे केल्याने आपण देवाच्या वचनाला श्रोत्यांच्या अंतःकरणावर प्रभाव पाडण्याची संधी देतो. ख्रिस्ती नसलेल्या व ख्रिश्चन लोक आवडत नसलेल्या लोकांनाही सहसा बायबलबद्दल आदर असतो.
२. (अ) आपण एखादे शास्त्रवचन दाखवून आपल्या सादरतेची सुरवात कशी करू शकतो? (ब) शास्त्रवचनांतील कोणत्या विषयांवर लोकांना बोलायला आवडेल?
२ शास्त्रवचन दाखवून सुरवात करा: काही प्रकाशक बायबलमधील एखाद्या वचनावर एक साधासा दृष्टिकोनात्मक प्रश्न विचारतात आणि मग ते वचन वाचून दाखवून आपल्या सादरतेची सुरवात करतात. यामुळे लोकांचे लक्ष लगेच देवाच्या वचनाकडे जाते. पुढील काही प्रस्तावना तुमच्या क्षेत्रांत लागू होऊ शकतील का?
◼ “हे बदल घडवून आणण्याची तुमच्याजवळ शक्ती असती तर तुम्ही ते केले असते का?” प्रकटीकरण २१:४ वाचा.
◼ “आपण अशा कठीण दिवसांत का जगत आहोत याचा कधी तुम्ही विचार केला आहे का?” २ तीमथ्य ३:१-५ वाचा.
◼ “सर्वांनी या सल्ल्याचे पालन केले तर आपला समाज आदर्श समाज होईल असे तुम्हाला वाटते का?” मत्तय ७:१२ वाचा.
◼ “सध्याच्या पीडादायक परिस्थितीकडे पाहता, आपली मुलं इथं वर्णन केलेल्या परिस्थितीचा कधी आनंद लुटतील असं तुम्हाला वाटतं का?” स्तोत्र ३७:१०, ११ वाचा.
◼ “आजच्या जगात रोगराईचे व आजारपणाचे प्रमाण वाढत असताना, या वचनातील या शब्दांची पूर्णता होईल असे तुम्हाला वाटते का?” यशया ३३:२४ वाचा.
◼ “सरकार बदलण्याविषयी येथे जे सांगितले आहे त्याविषयी तुम्ही पूर्वी कधी ऐकले होते का?” दानीएल २:४४ वाचा.
◼ “तुम्हाला देवाला कधी हा प्रश्न विचारावासा वाटला का?” ईयोब २१:७ वाचा.
◼ “आपल्या मृत प्रिय जनांना पुन्हा पाहणे शक्य आहे का?” योहान ५:२८, २९.
◼ “जिवंत लोक काय करतात हे मृतांना माहीत आहे का?” उपदेशक ९:५.
३. आपण लोकांना बायबलची वचने वाचून दाखवतो तेव्हा त्यांना ती समजण्यासाठी आपण कशाप्रकारे मदत करू शकतो?
३ स्पष्टीकरण, उदाहरण द्या आणि वचन लागू करा: एखादी व्यक्ती बोलू इच्छिते तेव्हा घाई करू नका. वाचलेल्या वचनाचे स्पष्टीकरण व उदाहरण द्या व ते वचन कसे लागू होते हे निवांतपणे सांगा जेणेकरून समोरच्या व्यक्तीला ते वचन समजेल. (नहे. ८:८) लोकांना देवाच्या वचनातील शिकवण समजते आणि ते ती स्वीकारतात तेव्हा त्यांच्या जीवनात अद्भुत बदल होतो.—१ थेस्सलनी. २:१३.
४. पुनःभेटीत आपण बायबलचा प्रभावीपणे उपयोग कसा करू शकतो?
४ लोक आवड दाखवतात तेव्हा ही आवड वाढवण्यासाठी बायबलचा प्रभावीपणे उपयोग करीत राहा. पुनःभेटी करताना देखील तुम्ही या पद्धतीचा उपयोग करू शकता: (१) एक उचित शास्त्रवचन निवडा. (२) वचनाविषयी एक साधासा दृष्टिकोनात्मक प्रश्न विचारा. मग ते वचन वाचा. (३) त्या वचनाचे स्पष्टीकरण द्या, उदाहरण द्या आणि ते कसे लागू होते ते सांगा. तुम्ही प्रत्येक वेळी जाता तेव्हा देवाच्या वचनाविषयी त्या व्यक्तीला जितके ज्ञान आहे त्याच्यात आणखी भर घालण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने लवकरच तुम्ही एक बायबल अभ्यास संचालित करू शकाल!