यहोवासोबत जवळचा नातेसंबंध निर्माण करणे
१. एका बहिणीला तिच्या आध्यात्मिक नित्यक्रमाविषयी काय जाणवले?
१ एका ख्रिस्ती बहिणीने कबूल केले: “केवळ सभांना जाऊन व क्षेत्र सेवेत भाग घेऊन मी गेल्या २० वर्षांपासून सत्यात कशीबशी टिकून आहे.” ती पुढे म्हणते, “या गोष्टी महत्त्वाच्या आहेत यात शंका नाही पण कठीण प्रसंग येतात तेव्हा केवळ यांच्याच आधारे तग धरून राहणे शक्य नाही. . . . माझ्या हे लक्षात आलंय की, मला माझी विचारसरणी बदलण्याची गरज आहे आणि अर्थपूर्ण अभ्यासाचा नित्यक्रम सुरू करण्याची गरज आहे म्हणजे मला खऱ्या अर्थाने यहोवाला जाणता येईल, त्याच्यावर प्रेम करता येईल आणि त्याच्या पुत्राने आपल्याला जे दिले आहे त्याची कदर करता येईल.”
२. यहोवासोबत जवळचा नातेसंबंध वाढवणे का महत्त्वाचे आहे?
२ यहोवासोबत जवळचा, व्यक्तिगत नातेसंबंध वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. केवळ नेहमीच्या ख्रिस्ती कार्यहालचालींचा नित्यक्रम पाळून हे करता येत नाही. यहोवासोबत नियमितपणे बोलण्याचे आपण सोडून दिल्यास तो अशा मित्रासारखा होईल ज्याच्यासोबत एकेकाळी आपला फार जवळचा नातेसंबंध होता पण सध्या ज्याच्याशी आपला संपर्क तुटला आहे. (प्रकटी. २:४) व्यक्तिगत बायबल अभ्यास आणि प्रार्थनेकरवी यहोवासोबत जवळचा नातेसंबंध निर्माण करण्यास कशी मदत मिळू शकेल याचे परीक्षण आपण करू या.—स्तो. २५:१४.
३. कशाप्रकारचा व्यक्तिगत अभ्यास आपल्याला यहोवासोबत जवळचा नातेसंबंध वाढवण्यास मदत करील?
३ प्रार्थना आणि मनन आवश्यक: हृदयाला पोषण देणारा व्यक्तिगत अभ्यास म्हणजे केवळ अभ्यासाच्या साहित्यातील महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करणे आणि दिलेली शास्त्रवचने वाचून पाहणे एवढेच नव्हे. तर त्या माहितीतून यहोवाच्या मार्गांविषयी, त्याच्या दर्जांविषयी व व्यक्तिमत्त्वाविषयी काय शिकायला मिळते यावर मनन करणे आवश्यक आहे. (निर्ग. ३३:१३) आध्यात्मिक गोष्टींची समज प्राप्त झाल्यावर आपल्या भावनांवर त्याचा प्रभाव पडतो आणि आपण आपल्या स्वतःच्या जीवनशैलीचा विचार करू लागतो. (स्तो. ११९:३५, १११) व्यक्तिगत अभ्यास, यहोवासोबत जवळचा नातेसंबंध वाढवण्याच्या हेतूने केला जावा. (याको. ४:८) गंभीर अभ्यासाकरता वेळ लागतो त्याचप्रमाणे योग्य वातावरण लागते आणि नियमित अभ्यासाकरता शिस्त लागते. (दानी. ६:१०) तुमचे जीवन फार व्यस्त असले तरी यहोवाच्या अद्भुत गुणांवर मनन करण्यासाठी तुम्ही दररोज वेळ काढता का?—स्तो. ११९:१४७, १४८; १४३:५.
४. व्यक्तिगत अभ्यासाच्या आधी प्रार्थना केल्यामुळे आपल्याला यहोवासोबत जवळीक साधण्यास कशी मदत मिळते?
४ मनःपूर्वक प्रार्थना ही अर्थपूर्ण व्यक्तिगत अभ्यासाचा एक अत्यावश्यक भाग आहे. आपल्याला देवाच्या पवित्र आत्म्याची गरज आहे; तो मिळाला तरच बायबलची सत्ये आपल्या अंतःकरणाला भिडतील व आपण “देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा, आदर व भय धरून” करू. (इब्री १२:२८) त्याकरता अभ्यासाला बसल्यावर प्रत्येक वेळी प्रथम यहोवाच्या आत्म्याकरता विनंती केली पाहिजे. (मत्त. ५:३) शास्त्रवचनांवर आपण मनन करतो आणि यहोवाच्या संघटनेद्वारे पुरवलेल्या अभ्यासाच्या साधनांचा उपयोग करतो तेव्हा आपण यहोवाविषयी जाणून घेण्यास ग्रहणशील मनोवृत्ती दाखवत असतो. (स्तो. ६२:८) अशारितीने अभ्यास करणे ही एक प्रकारची उपासना आहे ज्याने आपण यहोवाप्रती आपली भक्ती जाहीर करतो आणि त्याच्यासोबतचा आपला नातेसंबंध वाढवत असतो.—यहू. २०, २१.
५. देवाच्या वचनावर दररोज मनन करणे महत्त्वाचे का आहे?
५ नाती, मग ती कोणतीही असोत, ती आयुष्यभर टिकून राहण्यासाठी व उत्तरोत्तर वाढत जाण्यासाठी ती सांभाळावी लागतात; हेच यहोवा देवाशी असलेल्या आपल्या नातेसंबंधाबद्दलही खरे आहे. तर मग, देवासोबत जवळचा नातेसंबंध निर्माण करण्यासाठी आपण दररोज वेळ काढू या आणि हे लक्षात ठेवू या की, असे केल्याने तो स्वतः आपल्याजवळ येईल.—स्तो. १:२, ३; इफिस. ५:१५, १५.