सेवानिवृत्ती—कार्य साधण्याजोगे द्वार?
१ पुष्कळ कष्टाळू लोक, नोकरीमुळे त्यांना कराव्या लागणाऱ्या काबाडकष्टातून व त्यांच्यावर येणाऱ्या दबावातून निवृत्तीद्वारे सुटका केव्हा मिळेल याची वाट पाहत असतात. परंतु बहुतेकदा असे होते, की निवृत्तीमुळे औदासीन्य, कंटाळा आणि अकाली म्हातारपण येते. उद्देशपूर्ण कार्य नसल्यामुळे निवृत्त व्यक्तीचे मन स्वतःच्या काळजीनेच भरून जाते. ब्राझीलच्या एका वृत्तपत्राने अशी बातमी दिली, की निवृत्त झालेल्या सार्वजनिक कामगारांनी, ‘असमाधान, चिडचिडेपणा, असुरक्षिततेची भावना आणि अस्मितेची जाणीव गमावणे यांसारख्या समस्यांपासून, नैराश्य व आपले जीवन उद्देशहीन आहे अशा भावना मनांत उत्पन्न होण्यापर्यंतच्या समस्यांची तक्रार केली आहे.’
२ या उलट, पुष्कळ ख्रिस्ती त्यांच्या जीवनातील हा नवीन टप्पा, कार्य साधण्याजोगे द्वार असल्याचे समजतात. एका बांधवाने ६५ वय झाल्याच्या दोन आठवड्यांनंतर पायनियरींग सुरू केली; ते म्हणतात: “गेल्या दहा वर्षांपासून मी करत असलेल्या पायनियरींच्या काळात अनुभवलेले विपुल आशीर्वाद पूर्वी कधी अनुभवले नव्हते.” एका जोडप्याने लिहिले: “आम्ही पायनियरींग करायला सुरवात केली तेव्हापासून आमच्या अस्सल सुवर्ण वर्षांची सुरवात झाली.” होय, सेवानिवृत्तीमुळे अनेकांना आपली सेवा वाढवण्याची व यहोवाकडून विपुल आशीर्वाद मिळण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे.
३ स्वतःला व्यस्त ठेवा व फलदायी बना: आता सेवानिवृत्त झालेले अनेक जण, आज सर्रासपणे आढळणाऱ्या सुखसोयींविना लहानाचे मोठे झाले होते; लहान वयापासूनच ते कष्टाचे काम करायला शिकले होते. आता त्यांना पूर्वीसारखी शक्ती नसली तरी ते फलदायी कामकरी आहेत. एका शाखा दफ्तराच्या क्षेत्रात, २२ टक्के पायनियर—सुमारे २०,००० बंधूभगिनी—कमीतकमी ६० वर्षांचे आहेत. प्रचार कार्यात या वृद्ध जनांचा सिंहाचा वाटा आहे. ते ज्या मंडळीत सेवा करतात ती मंडळी, त्यांच्या अनुभवामुळे व ईश्वरी गुणांमुळे समृद्ध बनते.—याको. ३:१७, १८.
४ ख्रिस्ती सेवेत व्यस्त राहिल्याने आरोग्य उत्तम राहते आणि जीवनाचा दर्जा सुधारतो. सेवानिवृत्त झाल्यावर पायनियरींग सुरू केलेल्या एका ८४ वर्षीय भगिनीने म्हटले: “पुष्कळ आस्थेवाईक लोकांबरोबर मी बायबल अभ्यास करत असल्यामुळे मी मानसिकरीत्या सक्रिय राहू शकले आहे. माझ्याकडे कार नसल्यामुळे मला पुष्कळ चालावं लागतं. यामुळे माझी तब्येत चांगली राहते.” एका वृद्ध पायनियर जोडप्याने म्हटले: “क्षेत्र सेवेमुळे आम्ही मानसिकरीत्या व शारीरिकरीत्या तंदुरुस्त आहोत. आम्ही नेहमी सोबत असतो. आम्ही पुष्कळ हसतो आणि जीवनाचा आनंद लुटतो.”
५ अधिक गरज असलेल्या ठिकाणी सेवा करणे: ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे असे काही सेवानिवृत्त ख्रिश्चन, राज्य प्रचारकांची अधिक गरज असलेल्या ठिकाणी राहायला गेले आहेत. प्रेषित पौलाप्रमाणे हे आवेशी प्रचारक ‘सर्व काही सुवार्तेकरता करतात, अशासाठी की, ते इतरांबरोबर तिचा भागीदार होतील.’—१ करिंथ. ९:२३.
६ एका जोडप्याने आपल्या दोन मुलांना लहानाचे मोठे केल्यानंतर पायनियरींग सुरू केली. अनेक वर्षे पायनियरींग केल्यानंतर त्यांनी चीनी भाषा शिकण्याचे आव्हान स्वीकारले. आता त्या दोघांनी सत्तरी ओलांडली आहे आणि त्यांना, ते ज्या चीनी गटाबरोबर कार्य करत होते त्या गटाची एक मंडळी झालेली पाहून किती आनंद वाटतो! यांच्यासारखे जोडपे खरोखरच एक आशीर्वाद ठरतात!
७ क्षेत्र सेवेतून निवृत्ती नाही: पुष्कळ लोक कालांतराने त्यांच्या नोकरीमधून निवृत्त होतात परंतु देवाच्या सेवेतून कोणाही ख्रिश्चनाला निवृत्ती मिळत नाही. सर्वांनी “शेवटपर्यंत टिकून” राहिले पाहिजे. (मत्त. २४:१३, १४) अर्थात, काही जणांना वाढत्या वयामुळे, पूर्वीइतकी यहोवाची सेवा करता येत नाही. तरीपण ते जितकी सेवा करतात ती पूर्ण हृदयाने करत आहेत हे पाहून आपल्याला किती उत्तेजन मिळते! देवाचे वचन त्यांना अशी हमी देते, की यहोवा त्यांची कार्ये आणि त्याच्या नावासाठी दाखवलेली प्रीती विसरून जाणार नाही.—लूक २१:१-४; इब्री ६:१०.
८ तुम्ही लवकरच सेवानिवृत्त होणार असाल तर, तुमच्या बदलणाऱ्या परिस्थितीचा होता होईल तितका चांगला उपयोग करण्याकरता प्रार्थना व विचार करा. देवाच्या मदतीने तुम्हाला कळेल की सेवानिवृत्तीमुळे तुमच्यासमोर कार्य साधण्याजोगे एक द्वार खुले होईल ज्याद्वारे यहोवाची स्तुती होईल व तुम्हाला अनेक आशीर्वाद मिळतील.—स्तो. १४८:१२, १३.