देवाचे वचन सत्य आहे
१. बायबलमध्ये कोणती महत्त्वाची माहिती आहे?
१ “तुझे वचन संपूर्णपणे सत्य आहे,” असे स्तोत्रकर्त्याने लिहिले. (स्तो. ११९:१६०) आपल्या प्रेरित वचनाद्वारे यहोवा जीवनाच्या सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देतो. दुःखाने जर्जर झालेल्यांना तो सांत्वन व आशा देतो. आणि आपण त्याच्या जवळ कसे येऊ शकतो हे तो दाखवतो. “बायबलमधून सत्य शिकणे हे, एखादी काळीकुट्ट, कोंदटलेली खोली सोडून एका स्वच्छ, प्रकाश असलेल्या व हवेशीर सुखद खोलीत प्रवेश करण्यासारखे आहे,” असे एका कृतज्ञ स्त्रीने म्हटले. हरप्रसंगी देवाच्या वचनातील सत्य सांगण्याचा तुम्ही प्रयत्न करता का?
२. बायबल लोकांच्या जीवनात रूपांतर कसे करते?
२ रूपांतर करण्याची व संपूर्ण जगभरातील लोकांना आकर्षित करण्याची शक्ती असलेले: बायबलमधील सत्यात, लोकांच्या अंतःकरणांना स्पर्श करण्याची व त्यांच्या जीवनात रूपांतर करण्याची शक्ती आहे. (इब्री ४:१२) रोझा नावाची एक तरुण स्त्री वेश्याव्यवसाय करत होती, शिवाय मद्यपान आणि मादक पदार्थही घेत होती. ती म्हणते: “एके दिवशी मी अगदीच हताश झाले होते, तेव्हा एक साक्षीदार दांपत्याने मला, बायबल आपल्या समस्यांचे निरसन कसे करते ते दाखवले. मी देवाच्या वचनाचा अभ्यास करू लागले, आणि मला ते खूपच आकर्षक वाटू लागले. एका महिन्यातच मला नैतिकरीत्या माझे जीवन शुद्ध करून जगण्याची नवी ऊर्मी मिळाली. आता माझ्या जीवनात एक उद्देश आहे, मला मद्यपानाच्या किंवा मादक पदार्थांच्या आधाराची गरज पडत नाही. मला यहोवाचा मित्र होण्याची तीव्र इच्छा असल्यामुळे मी त्याच्या दर्जांनुरूप जीवन जगण्याचा ठाम निश्चय केला. देवाच्या वचनातील व्यावहारिक बुद्धी मला मिळाली नसती तर मी तुम्हाला नक्की सांगते, की मी केव्हाच माझे जीवन संपवले असते.”—स्तो. ११९:९२.
३. इतरांना बायबलचा संदेश सांगायला आपण कुचराई का करू नये?
३ बायबल हे आजच्या अनेक पुस्तकांसारखे नाही; ते “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा” बोलणाऱ्या लोकांना आकर्षित करू शकते. (प्रकटी. ७:९) “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे,” अशी देवाची इच्छा आहे. (१ तीम. २:४) यास्तव, एखादी व्यक्ती अमुक पार्श्वभूमीची असल्यामुळे ती सुवार्तेला प्रतिसाद देणार नाही असे आपण केव्हाही गृहित धरू नये. त्याऐवजी आपण सर्वांना राज्याचा संदेश सांगितला पाहिजे आणि शक्य असल्यास तो संदेश थेट बायबलमधूनच दाखवला पाहिजे.
४. साक्ष देताना आपण बायबलचा उपयोग कसा करू शकतो?
४ शास्त्रवचनांवर जोर द्या: सेवेमध्ये बायबलचा उपयोग करण्याच्या अनेक संधी मिळतात. मासिके सादर करताना, सुचवलेल्या सादरतांमधील वचन दाखवण्याचा प्रयत्न करा. महिन्यासाठी असलेले साहित्य सादर करताना काहींना प्रभावी मार्ग सापडला आहे; त्यांच्या संभाषणाच्या सुरवातीलाच ते काळजीपूर्वक निवडलेले एखादे वचन वाचून दाखवतात. पुनर्भेट करताना, प्रत्येक वेळेस एक अथवा अनेक बायबल वचने वाचून दाखवा जेणेकरून घरमालकाला अचूक ज्ञान प्रगतीशीलपणे घेण्यास मदत होईल. बायबल अभ्यास चालवताना, मुख्य शास्त्रवचनांवर आपली चर्चा केंद्रित ठेवा. औपचारिक सेवा करत नसताना देखील सोबत बायबल ठेवत जा जेणेकरून तुम्हाला अनौपचारिक साक्ष देण्याची संधी मिळाल्यास तुम्ही बायबलमधून वचने वाचून दाखवू शकता.—२ तीम. २:१५.
५. आपल्या सेवेत आपण बायबलचा उपयोग करण्याचा नेहमी प्रयत्न का केला पाहिजे?
५ आपल्या सेवेत हरप्रसंगी बायबलचा उपयोग करण्याद्वारे आपण इतरांना देवाच्या वचनातील सत्याच्या प्रेरक शक्तीचा लाभ घेण्यास मदत करू या.—१ थेस्सलनी. २:१३.